

बसपाचा बी-फॉर्म निवडणूक घोषित झाली तेव्हापासूनच घरात!
विकास ठाकरेंसोबत भावा-बहीणीचे नाते मात्र,राजकारणात काँग्रेसने ज्वाला धाेटेंचा विचार केला का?
आणिबाणिनंतर मृतप्राय काँग्रेसला विदर्भवीर जांबुवंतराव धाेटेंनीच दिली विदर्भातून संजीवनी
जांबुवंतराव धाेटेंकडे कुठे होता निवडणूक लढण्यासाठी पैसा?जनतेने उभारला पैसा
मी ‘फकीर’बापाची ‘राजा’मुलगी:शेवटच्या दिवसा पर्यंत जाहीर करील निर्णय
नागपूर,ता.२१ मार्च २०२४: नागपूरातून भारतीय जनता पक्षाचे तिस-यांदा उमेदवार म्हणून केंद्रिय मंत्री व लोकसभेत दोन वेळा नागपूरचे प्रतिनिधित्व करणारे नितीन गडकरी यांचे नाव भाजपच्या दुस-या यादीत घोषित झाल्यावर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोण?याची चर्चा सुरु झाली.अखिल भारतीय स्तरावरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे गडकरी यांच्या विरोधात उमेदवार कोण?याची घोषणा होने अपेक्षीत असताना,आज आठ दिवस उलटून गेले तरी काँग्रेसने आपला उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केला नाही.अश्या वेळी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांची धाकटी कन्या व अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांना बहूजन समाजवादी पक्षाने त्यांच्या पक्षातर्फे गडकरींच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढण्याची गळ घातली आहे.एकीकडे गडकरींना र्निविरोध विजयी घोषित करण्याची मागणी रेटून धरली जात असताना,त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज होऊ पाहणा-या ज्वाला धोटे यांच्याशी ‘सत्ताधीश’ने संवाद साधला असता,निवडणूकीत हरणे-जिंकणे हे महत्वाचे नसून ‘लढणे’हे महत्वाचे आहे,आहे,असे उत्तर त्यांनी दिले.
बहूजन समाजवादी पक्षाच्या पदाधिका-यांनी पराकोटीचा आग्रह धरला असून माझ्या घरी ‘बी-फॉर्म‘देखील आणून ठेवला आहे.त्यांना मी त्यांच्या पक्षातील इतरही उमेदवाराची तयारी निश्चित करुन ठेवण्याची विनंती केली आहे.माझ्या कुटूंबियांशी,सहका-यांशी तसेच शुभचिंतकांशी विचार विमर्श सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ मार्च आहे,त्या वेळेपर्यंत नक्कीच निर्णय नागपूरकरांना कळलेला असेल,असे त्या म्हणाल्या.
मूळात हा गढ काँग्रेसचा नसून जांबुवंतराव धोटेंचा आहे.विदर्भवीर अशी त्यांना उपाधी मिळाली आहे.देशात आणिबाणिनंतर काँग्रेस पक्ष हा जवळपास मृतप्राय झाला होता,त्या वेळी जांबुवंतराव धोटे यांनी इंदिरा गांधी यांना मदतीचा हात दिला,हा इतिहास सर्वश्रृत आहे.धोटे यांनी त्यांचे ४ खासदार आणि १८ आमदारांचा पाठींबा इंदिरा गांधींच्या पाठीशी उभा केला आणि त्यांना राजकीय अज्ञातवासातून बाहेर काढले.कस्तुरचंद पार्कमध्ये फार मोठी सभा झाली होती.इंदिरा गांधी त्या सभेला आल्या होत्या.यानंतर महात्मा गांधींच्या सेवाग्राम तसेच विनोबा भावे आश्रमातही जांबुवंतराव त्यांना घेऊन गेले .काँग्रेसचे ’पंजा’चिन्ह हे जांबुवंतराव यांनीच फायनल केले होते.त्या चिन्हावर नंतर धाेटे यांनी काँग्रेसचे खासदार निवडून आणून दिले होते.
आज जो गढ जांबुवंतराव धाेटे यांची कर्मभूमी आणि तपोभूमी राहीला आहे त्या गढावर काँग्रेस दावा करीत आहे.गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून कोण?यावर खलबते करण्यासाठी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या घरी बैठक घेतली जाते.विलास मुत्तेमवारांचे राजकीय गुरु हे जांबुवंतराव धोटे होते,हे त्यांनी स्वत: अनेकदा सांगितले आहे.मुत्तेमवारांना पहीली तिकीट जांबुवंतराव धोटेंनी दिली.हा खुलासा मी यासाठी करतेय कारण,मला अनेकांचे फोन आले की मी काँग्रेसच्या तिकीटावर लढावे व गडकरींना कडवी टक्कर द्यावी.काँग्रेसकडे संघटना आहे,बुथ कार्यकर्त्यांचे जाळे आहे,काँग्रेसचा स्वत:चा २० टक्के मतदार आहे जो,कोणाची कितीही लाट आली तरी विचलित न होता काँग्रेसलाच मत देतो.मात्र,ज्यांच्या राजकीय कारर्कीदीची सुरवात ज्या विदर्भवीर असलेल्या जांबुवंतरांनी विदर्भात केली, त्या विदर्भवीरांची कन्या ज्वाला धोटे ही तिकीटाची भीक मागायला काँग्रेसच्या दारावर जाणे शक्य नाही.
माझ्या एका शुभचिंतकाने विलास मुत्तेमवारांकडे हा विषय काढला होता,यावर ज्वाला यांनी माझ्या कानावर ही बाब टाकायला हवी होती,मला सांगायला पाहिजे होते,अशी मखलाशी त्यांनी केली.त्यांच्या गटातील आमदार विकास ठाकरे यांचं नाव पुढे रेटल्या जात आहे.अनेक मंचावर ते गडकरी यांच्यासोबत नागपूरकरांना दिसले.या शिवाय गडकरींच्या विरोधात ठाकरे हे आक्रमकपणे लढतील,अशी उमेद नागपूरकरांनाच नाही.ईडी,सीबीआयची भीती ज्वाला धोटेला नाही.प्रस्थापिंतांच्या विरोधात लढताना व्यक्ती नव्हे तर त्यांनी राबविलेल्या धोरणांविरुद्ध लढाई लढायची असते.विकास ठाकरे हे आपल्या निवडणूक प्रचारात गडकरींच्या धोरणांवर प्रहार करतील का?अशी शंका मी नव्हे तर अनेकजण घेत आहेत.गडकरी हे दहा वर्षांपासून नागपूरचे खासदार आहेत,त्यांनी राबविलेली धोरणे या विरोधात अनेकांच्या मनात नाराजी आहे तर अनेकांनी त्यांना समर्थन ही दिले आहे.ही विचारधारेची लढाई आहे व या लढाईचे रणांगण लोकसभेची निवडणूक आहे.ही जागा सहजासहजी गडकरींना दान करायची का?असा प्रश्न मला विचारला जात आहे.माझे व विकास ठाकरेंचे नाते भावा-बहीणीसारखे असले तरी आज लोकसभा त्यांच्यासाठी सोडली,उद्या विधान सभेत व पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत ही काँग्रेस ज्वाला धोटेंकडून हीच अपेक्षा करेल.
काँग्रेसला आतापासूनच भाजपची ’बी’टिम म्हणून साेशल मिडीयावर हिणवले जात आहे.आ.विकास ठाकरे गडकरींच्या विरोधात प्राणपणाने लढतील,यावर नागपूर शहरातील शेंबडं पोर ही विश्वास ठेवीत नाही.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना ज्वाला धोटे ही नवखी आहे का?का नाही त्यांनीच दिल्लीला ज्वाला धोटेंच्या नावाचा प्रस्ताव पाठवला?नागपूरवरुन लढण्यासाठी नगरसेवकांचे नाव पुढे रेटले जात आहे,यावरुन या अखिल भारतीय राष्ट्रीय पक्षाची लढण्याची ‘जिद्द‘दिसून पडतेय,असा खोचक टोमणा त्यांनी मारला.एक काळ असा होता की जांबुवंतरावांच्या नावावर काँग्रेसचे गधे-घोडेही निवडूण येत होते.काँग्रेसची परंपरा आहे,पक्षात ते कोणालाही मोठं होऊ देत नाही,एक पुढे जाऊ लागला तर चार नेते त्याला मागे ओढतात. या पक्षात एकदा बोट दिलं की तेच नेते मोठे झाल्यावर डोक्यावर बसतात,हा अनुभव नवखा नाही.
त्या पेक्षा बहूजन समाजवादी पक्षाचा कॅडर किती तरी चांगला आहे.स्वत: पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या नागपूरात सभा घेण्यास उत्सूक आहेत.पक्षातील पदाधिका-यांना ज्वाला धोटेंचे मन शेवटपर्यंत वळविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.राजकारणाच्या झालेल्या चिखलाला ‘हत्तीच‘पायदळी तुडवू शकतो,यात वाद नाही.शहरातील आंबेडकरी समाज फार आशेने माझ्याकडे पहात आहे.नागपूरात हजारच्या वर बौद्ध मठ आहे,त्या प्रत्येक मठातील आंबेडकरी माता-भगिनी माझ्या प्रचारासाठी झटण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.माझ्या जवळ निवडणूक लढ्यासाठी आणि जिंकण्यासाठीही….पैसा नाही.जांबुवंतरावांची देखील हीच अशीच परिस्थिती होती.मात्र,ते जेव्हा निवडणूकीला उभे झाले तेव्हा फॉरवर्ड ब्लॉक,जनसंघ व काँग्रेसनेही त्यांना समर्थन जाहीर केलं.सर्वच जातीच्या अगदी ब्राम्हण माता-भगिंनीनी देखील गळ्यातले मंगळसूत्र काढून त्यांच्या हातावर ठेवले.इतिहासाची पुनरावृत्ती होणार,असं वाटत आहे.
माझ्या गंगा-जमुना येथील माता-भगिनी,माझे मुस्लिम बांधव,डोबी नगरसारख्या अनेक झोपडपट्टीतील गरीब नागरिक इतकंच नव्हे तर शहरातील अनेक पर्यावरणवाद्यांनी देखील मला ही निवडणूक लढण्यासाठी गळ घातली आहे.नागपूरातील आंबेडकरी समाज फार आशेने माझ्याकडे बघतोय.१९९० च्या दशकात अटल बहादूर सिंग हे महापौर पदी असताना पटवर्धन मैदान हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाच्या स्मारकासाठी आरक्षीत करण्यात आले.नागपूर महानगरपालिकेच्या सभेत देखील एकमुखाने ठराव पारित झाला.तो प्रस्ताव अजूनही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे.अनेकदा मंजुरीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला मात्र,अद्याप बाबासाहेबांच्या स्मारकाला परवानगी मिळाली नाही.दूसरीकडे यशवंत स्टेडियम ते पत्रकार भवन पाडून त्या ठिकाणी ‘विकासाचा’अजेंडा तयार आहे.स्टेडियम पडू नये,बाबासाहेबांचे स्मारक व्हावे,या ठिकाणी असलेली संगम चाळ तसेच गरीबांच्या झोपडपट्या उठवण्यात येऊ नये,तेथील दूकानदारांचा अनेक पिढ्यांपासून जम बसलेला धंदा हिरावू नये,अशा कितीतरी कारणांसाठी सतत मला माणसे येऊन भेटत आहेत.अंबाझरी येथील खासगी विकासकांनी पाडलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचाही प्रश्न लोससभेत चर्चिला जावा,ही आंबेडकरी जनतेची ईच्छा आहे.
संपूर्ण शहरातूनच वेगवेगळ्या जाती-धर्माची,वर्गाची माणसे मला भेटतात आहेत.मी ही निवडणूक लढावी,यासाठी गळ घातली जात आहे.मात्र,बसपकडून मी ही निवडणूक लढल्यास व शहरातील आंबेडकरी समाजाचा मला पाठींबा मिळाल्यास,आंबेडकरी समाजाच्या मतांमध्ये फूट पडावी यासाठी आंबेडकरी समाजाचेच अनेक ‘डमी‘उमेदवार निवडणूकीत उतरवले जातील,याची मला खात्री आहे.नागपूरात वंचित आघाडी तसेच बसपा या दाेन राजकीय पक्षात देखील आंबेडकरी समाज विभागला गेला आहे.बसपकडून लढण्याचा माझा निर्धार पक्का झाल्यास वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांना देखील विनंती करणार आहे त्यांनी नागपूरातून या वेळी त्यांचा उमेदवार उतरवू नये.२०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत बसपाकडून मोहम्मद जमाल यांनी ३१ हजार ६५४ मते घेतली तर वंचित आघाडीचे सागर डबरासे यांनी मते घेतली होती.यावेळी आंबेडकरी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी विदर्भवादी प्रकाश आंबेडकरांनी वंचितचा उमेदवार, विदर्भवीराच्या कन्येच्या विरोधात उतरवू नये,अशी मी त्यांना विनंती करणार असल्याचे ज्वाला धोटे म्हणाल्या.
अनेक गोष्टी तत्वात बसत नव्हत्या म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून दोन वर्षात बाहेर पडले.एका क्रांतिकारक,असामन्य राजकारणी असलेल्या जांबुवंतराव धोटेंसोबत आयुष्य कंठलेल्या व माजी आमदार असलेली माझी आई तसेच विद्यमान आमदार असलेली मोठी बहीण क्रांती यांनी माझ्या राजकारणातील निर्णयाबाबत ‘मौन’बाळगले आहे.आईची ईच्छा, मी काँग्रेसच्या तिकीटावर लढावे,ही होती,हे मी प्रामाणिकपणे सांगेन.मात्र,बसपचे पदाधिकारी व माझी आंबेडकरी जनताही माझ्याकडून फार मोठी आशा लाऊन बसले आहेत.
अद्याप निर्णय घेतला नसला तरी योग्यवेळी ‘योग्य’ निर्णय घोषित करेल,शेवटी हरणे-जिंकणे हे माझ्या हातात नाही मात्र,अन्याया विरोधात लढणे ही माझी वृत्ती आहे,कर्म आहे ,म्हणूनच निवडणूक ही’लढण्यासाठी ’लढायला हवी आणि तीच संवैधानिक लोकशाहीला देखील अपेक्षीत असल्याचे खास ‘सत्ताधीश’सोबत बोलाना ज्वाला धोटे यांनी सांगितले.
……………………..
……………………………….




आमचे चॅनल subscribe करा
