

नाव जाहीर होताच मोदींनी वाराणसीत जल्लोष साजरा केला का?
काही विरोधक व मिडीयाने गडकरींच्या उमेदवारीविषयी चुकीचे संभ्रम निर्माण केले:आ.प्रवीण दटके
नागपूर,ता.१३ मार्च २०२४ : केंद्रिय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची घोषणा अजूनही केली नसली तरी राजकीय पक्षांमध्ये निवडणूक पूर्वीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे तिकीट वाटप हे होय.सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दहा दिवसांपूर्वी १९३ उमेदवारांची आपली पहीली यादी प्रसिद्ध केली मात्र,त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील शीर्षस्थ मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा नव्हती,परिणामी अनेक प्रकारचे कयास भाजप,विरोधी पक्ष् तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये उमटले.आज भाजपच्या दुस-या यादीत गडकरी यांचे नाव घोषित होताच धंतोली येथील विभागीय कार्यालयात भाजप नेत्यांनी जल्लोष साजरा केला.या जल्लोषावर देखील सोशल मिडीयावर अनेक प्रश्न उमटले.भाजपच्या पहील्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,अर्थमंत्री निर्मला सीतारमण आदी मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक शीर्षस्थ मंत्र्यांची नावे होती मात्र,मोदींचे वाराणसी मतदारसंघ असो किवा इतर मंत्र्यांचे मतदारसंघ,कुठेही तिकीट मिळाले म्हणून ‘जल्लोष’साजरा झाल्याची वार्ता उमटली नाही.
या पार्श्वभूमीवर गडकरी यांच्या नावाची घोषणा होताच नागपूरात जल्लोष साजरा केला जातो याचा अर्थ नागपूरातील आमदार तसेच शीर्षस्थ नेत्यांना,कार्यकर्त्यांनाच हा विश्वास नव्हता का की यंदा गडकरींना तिकीट मिळणार नाही?असा सवाल समाज माध्यमावर उमटला.
महत्वाचे म्हणजे सतत देशातील युवांच्या भवितव्याविषयी चिंतन आणि मनन करणारे मोदी यांनी नागपूरात यंदा युवा नेतृत्वाविषयी विचार का केला नाही?गडकरी हे त्यांच्या मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत,त्यांना राज्यसभेवर घेऊनही त्यांचे खाते त्यांना दिल्या जाऊ शकले असते व नागपूरात युवा नेतृत्वाला संधी देण्याचे धाडस दाखवले जाऊ शकले असते मात्र,४०० चा आकडा या गणितामध्ये नागपूरची जागा देखील समाविष्ट करण्याशिवाय मोदींना पर्याय उरला नसावा,या चर्चेला ऊत आला आहे.गडकरींशिवाय नागपूरची जागा इतर कोणी जिंकू शकत नाही,भाजपच्या या पूर्वग्रहाला बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके आता नागपूरातील तरुणाईची म्हणजे युवा नवमतदारांची किती मते गडकरींच्या बाजूने वळविण्यात यशस्वी होतील,याकडे आता अनेकांचे लक्ष राहणार आहे.
महत्वाचे म्हणजे,दटके यांनी त्यांच्या महाल येथील श्री दक्ष्णामूर्ती गणेश उत्सवात गडकरी यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावले असताना,आता आमची रेल्वेतून उतरण्याची वेळ आली असल्याचे गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले होते.दटके यांच्यासारख्या युवा नेतृत्वाची त्यांनी फार कौतूक केले होते.फडणवीस असो किवा दटके यांचे वडील आमदार होते मात्र,फडणवीस आणि दटके यांचे नेतृत्व आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांवर लादले नाही तर त्यांनी त्यांचे नेतृत्व सिद्ध केले असल्याचे गौरवोद्गगार गडकरी यांनी काढले होते.यंदा दटके यांचा ही विचार लोकसभेसाठी होऊ शकतो,अशी शक्यता वर्तवली जात होती.मात्र,अद्याप गडकरींचे त्या दिवशीचे भाषण व वास्तवातील निर्णय यात महत अंतर दिसून पडले व सत्तारुपी रेल्वेतून मोदींप्रमाणेच गडकरी यांना ही उतरण्याची कोणतीही घाई नसल्याचे मतदारांना दिसून पडले.
गडकरी यांची ही तिसरी टर्म असून मागील दहा वर्षांच्या विकासरुपी कामकाजावरुन ते नागपूरकर मतदारांसमोर जाणार असले तरी ऐन महालात इंदोरा चौक ते शिवाजी पुतळा उड्डाण पुलाचे बांधकाम, यामुळे तेथील दूकानदारांमध्ये तीव्र नाराजी उमटलेली दिसून पडते.अनेकांची तीन-चार पिढ्यांपासून या मार्गावर दूकाने असून,या उड्डाण पूलामुळे ग्राहकवर्ग हा सरळ पूलावरुन निघून जाणार असल्याची नाराजी ते व्यक्त करतात.मेयो,मेडीकलमधील मृतक आणि संघाचे भागवत हेच दिवसातून अनेकदा उड्डाणपूलाखालून जातील ,बाकी सगळे वरुन निघतील अशी खोचक प्रतिक्रिया देखील समाज माध्यमावर वाचायला मिळाली!
गडकरींना यंदा मतदारांसमोर जाताना फूटाळ्याचे काम,ज्याच्या निविदा देखील काढण्यात आल्या नाहीत,ते आंतरराष्ट्रीयस्तराचे रंगीत कारंजे का बंद पडले आहे?याचेही उत्तर नागपूरकर जनतेला द्यावे लागणार आहे.कोट्यावधीच्या बंद पडलेल्या या प्रकल्पाच्या नुकसानीचे भुर्दंड नागपूरकर जनता का भरुन देणार?फूटाळा सारख्या हेरिटेज तलावात साढे आठशे टन लोखंड,फ्लोटिंग रेस्टाेरेंटच्या नावाने टाकण्यात आला,त्या विरोधात शहरातील पर्यावरणवादी हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देत आहेत.फूटाळा मागील पंजाबराव कृषि विद्यापीठाची बॉटनिकल गार्डनची २७६ एकर जागेवर देखील नागपूरकर जनतेला कोणतीही माहिती न करता सिमेंट क्राँक्रिटचे बांधकाम महामेट्रो करीत आहे.सिमेंट-काँक्रिटच्या बांधकामांमुळे फूटाळ्याचे नैसर्गिक स्त्रोत पुढील काळात पूर्णपणे आटणार असून रंगीत कारंजे चंद्रावर नाचवणार का?असा संतप्त सवाल पर्यावरणवादी करतात.पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या जागेवर फक्त कृषि विद्यापीठाचे विद्यार्थी हे शेतीसंबंधी संशोधन करु शकतात इतर कोणत्याही कारणासाठी जमीन दिली जाऊ शकत नाही,हा नियम नव्हे तर कायदाच असताना देखील नागपूरातील हजारो एकर जागा ही व्यवसायिक हेतूसाठी सर्रास वापरली जात आहे.याचाही जाब विद्यार्थी वर्ग विचारणार असल्याचा सूर उमटला आहे.
शहरातील सर्वाधिक हिरवळ,हरीत पट्टे हे गडकरी यांच्या दहा वर्षांच्या ‘विकास पर्वात’ नष्ट झाल्याचा आरोप ते करतात.नागपूरकर जनतेला न विचारता,कोणतेही जनमत न घेता महामेट्रोसारखा पांढरा हत्ती अवघ्या काही लाख लोकसंख्या असणा-या शहरात आणने,तोट्यात चालणारी महामेट्रो पोसणे,शेकडो उड्डाण पूलांची निर्मिती,सिमेंट काँक्रिटचे रस्ते, मागितले नसताना निर्मित होणारे भुयारी मार्ग,नियोजनशून्य आरओबी,शहरातील विविध तलाव,उद्याने,क्रिडांगणे यांचा सत्यानाश,इत्यादी त्यांच्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळातील लांबलचक यादी गडकरींना तिकीट घोषित होताच समाज माध्यमांवर उमटली.
आजच्या यादीत जल्लोष साजरे करणारे जर कोणते नाव होते तर ते पंकजा मुंढे यांचे होते,असा सूर देखील उमटला.पंकजा मुंढे यांनी प्रदीर्घ काळ संघर्ष भोगला आहे,संयम ठेवला आहे.इतकंच नव्हे तर नागपूरातून गिरीश गांधी यांचे नाव जरी जाहीर झाले असते तरी जल्लोष केला जाऊ शकला असता मात्र,गडकरींचे नाव घोषित झाल्यावर भाजप कार्यालयासमोर वर्दळीचा रस्ता रोखून धरुन जल्लोष साजरा करण्याचे औचित्य अनेकांना पटले नाही.
मोदींनी घोषित केलेल्या पहील्याच यादीत गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांचे नाव घोषित व्हायला हवे होते.त्यावेळी जल्लोष साजरा करण्याचे औचित्य ही नागपूरकरांना पटले असते.नागपूरची जागा ही शिवसेनाला द्यायची की भाजपकडे ठेवायची?अशी चर्चा सुरु होती का?असा खोचक सवाल देखील उमटलेला दिसून पडतो.
महत्वाचे म्हणजे भाजपच्या यादीत आणखी कोणाची विकेट पडली असेल तर ती चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची.त्यांचे नाव घोषित झाले असले तरी चंद्रपूरवासियांनी कोणताही जल्लोष साजरा केला नाही कारण मूळात मुनगंटीवार यांनी उघडपणे ते दिल्लीत जाण्यास मुळीच इच्छूक नसल्याचे वारंवार माध्यामांजवळ सांगितले.इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींकडे आपले वजन वापरुन मुनगंटीवारांची लोकसभेत न पाठविण्याची इच्छा बोलून दाखवावी,असे जाहीर विधानच त्यांनी केले होते.तरी देखील त्यांचे नाव घोषित झाले,या मागे राज्याच्या राजकारणातून ‘हिंग लगे ना फिटकरी रंग चोखा का चोखा’या उक्तीप्रमाणे अलगद त्यांची गच्छंती करण्यात आली,अशी भाजपमध्येच चर्चा आहे.
फडणवीस यांच्यानंतर वर्कृत्व,कर्तृत्व आणि मुरलेले राजकारण हे गुण वैदर्भिय मुनगंटीवारांमध्येच आहेत..एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून बघितले जात होते.विधी मंडळ अधिवेशनात अनेकवेळा विरोधकांनीच चिमटे काढत त्यांना फडणवीसांपासून सावध राहण्याचे इशारे दिले.पंकजा मुंढेंप्रमाणेच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असणारे मुनगंटीवार आता देशाच्या राजकारणात आपली किती छवि उमटवतात,याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.‘लोकसभेमुळे विधानसभेचे हिशेब बिघडले असून सांस्कृतिक ‘टक्केवारी’ धोक्यातआल्याची कुजबुज ही ऐकू आली.
२०१९ मध्ये गडकरींच्या प्रचारासाठी स्वत: अमित शहा हे लकडगंज येथील कच्छी विसा येथे आले होते.मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात त्यांनी भरगच्च सभेला संबोधित केले होते.इतकंच नव्हे तर त्यांचे विमान असल्यामुळे गडकरी यांचे भाषण ऐकण्या पूर्वीच जनतेला, गडकरी यांनाच मतदान करा व मोदींचे हात बळकट करा असे आवाहन करुन मंचावरुन निघत असताना ,गडकरी हे स्वत: मंचावरुन त्यांना निरोप देण्यासाठी उतरु लागले असताना,जबरीने गडकरी यांचे खांदे धरुन अमित शहा यांनी त्यांना खूर्चीवर बसवले व तुम्ही माझ्या निरोपाची औपचारिकता पूर्ण करण्या ऐवजी जनतेला संबाेधित करा,असे सांगून त्यांनी मंचावरुन प्रस्थान केले.हे दृष्य अनेकांच्या नजरेतून सुटले नव्हते.यंदा गडकरींच्या प्रचारासाठी शहा किवा मोदी नागपूरात येणार का?तितकी आत्मीयता दिल्लीश्वरांसोबत गडकरी यांची राहीली आहे का?नागपूरकरांना हे देखील जाणून घ्यायचे आहे.
स्वत:गडकरी यांनीच मी इतकं काम केलं आहे की मी प्रचाराला जाणार नाही,असे एका भाषणात सांगितले आहे.मी सभा घेणार नाही,स्वत:चा प्रचार करणार नाही,मत द्यायचं आहे तर द्या नाही तर नका देऊ,अशा शब्दात लोकशाही संवैधानिक व्यवस्थेतील उमेदवार व मतदार यांची ‘नवीनच’ व्याख्या त्यांनी अधोरेखित केली .त्यामुळे गडकरी यंदा प्रचाराचे कोणते तंत्र वापरतात,याकडेही नागपूरकर जनतेचे लक्ष राहणार आहे.
गडकरींचे स्वागत आज रात्री पावणे दहा वाजता विमानतळावर करण्यात आले.महत्वाचे म्हणजे शहरातील काही पत्रकारांना गडकरी यांना तिकीट मिळताच त्यांचा आनंद गगनात समावला नाही!अनेकांनी तडक गडकरी यांचे निवासस्थान गाठले असल्याची माहीती समोर आली आहे.माध्यमकर्मी किवा पत्रकार म्हणून कोणत्याही उमेदवारांशी संवाद साधणे,प्रश्न विचारणे यात काही चूक नाही मात्र,गडकरी नागपूरात पोहोचत असल्याचे समजताच ज्या तातडीने गडकरी यांचे निवासस्थान गाठण्याची काही माध्यमकर्मींना घाई झाली,ती बघता अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाली नसती तर नवलच.
‘सत्ताधीश’ने गडकरींचे नाव पहील्याच यादीत का नाही?उशिर का झाला?असा प्रश्न नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके यांना केला असता,भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष असल्याचे ते म्हणाले.केंद्रिय संसदीय मंडळासमोर जेव्हा महाराष्ट्राचा क्रमांक आला तेव्हा त्या यादीत आमच्या नेत्याचं पहीलं नाव आहे आणि ती तिकीट येणारच होती असे त्यांनी सांगितले.हा संभ्रम काही राजकीय पक्षांनी आणि काही माध्यमकर्मींनी निर्माण केला असल्याचा आरोप त्यांनी केला.त्याचं हे कामच आहे असे सांगून, मी केंद्रिय संसदीय मंडळाचे आभार मानतो,पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे मी आभार मानतो व शहराचा प्रत्येक कार्यकर्ता,प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक मतदारासोबत संवाद साधून, गडकरींना रेकॉर्डतोड मतांनी देशात निवडून आणेल असा आमचा विश्वास आहे आणि हा संकल्प आम्ही पाच वर्षांपासूनच केला असल्याचे ते म्हणाले.
………………………………..




आमचे चॅनल subscribe करा
