
दीक्षाभूमीच्या आर्थिक व्यवहाराची लपवाछपवी!
दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांचा खळबळजनक आरोप
भदंत आर्य आमच्यासाठी वंदनीय त्यामुळे गुन्हा दाखल करणार नाही
दीक्षाभूमीवर आंबेडकर स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये गैरव्यवहार
थायलंड वरून आणलेल्या बुद्ध मूर्तीला विरोध नाही मात्र जागेचा अभाव
भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना इंग्रजीतले पत्र कळतात का? लिहिता धनी कोण?
धर्मादाय आयुक्त तसेच न्यायालयीन लढा सुरू राहणार
नागपूर,१२ फेब्रुवरी २०२४: आज पर्यंत बऱ्याच राजकीय पत्रकार परिषदा घेतल्या मात्र आज पहिल्यांदा दीक्षाभूमी वर आणि दीक्षाभूमी विषयी पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आहे.दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली त्यामुळे समितीचे सदस्य आणि सचिव म्हणून मला पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या बाबीवर खुलासा करणे गरजेचे होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी बोलताना डॉक्टर गवई म्हणाले, की मागील वर्षी स्मारक समिती संचालित डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापक निवडीच्या संदर्भात काही वृत्तपत्रात खोट्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. प्राध्यापक निवड प्रक्रियेत समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सूरई ससाई यांनी एकट्यांनीच प्राध्यापकांची निवड केली.त्यांनी समितीचे सचिव म्हणून मला किंवा बारा सदस्यांपैकी कोणालाही प्राध्यापकांच्या मुलाखतीत उपस्थित राहू दिले नव्हते. प्राध्यापकांच्या सर्व नियुक्त या भदंत यांनीच केल्या असा खुलासा डॉक्टर गवई यांनी याप्रसंगी केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे एकूण १३ सदस्य हे समितीमध्ये असून एक जागा ही रिक्त आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे समितीचे अध्यक्ष तर मी सचिव आहे. याशिवाय इतर दहा सदस्य समितीमध्ये असून आज माझ्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये सहा सदस्य उपस्थित आहे. याशिवाय दोन सदस्य हे वयोमानाच्या कारणामुळे येऊ शकले नाही असे गवई म्हणाले याचा अर्थ समितीचे दहा सदस्य हे भदंत आर्य यांच्या एकंदरीत कारभाराविषयी विरोधात असल्याचे सिद्ध होतं.
याप्रसंगी बोलताना डॉक्टर राजेंद्र गवई म्हणाले, की मागील अकरा वर्षांपासून दीक्षाभूमीवर डॉक्टर आंबेडकर स्पोर्ट्स अकॅडमी सुरू आहे.या अकॅडमीचा कोट्यावधीचा आर्थिक व्यवहार आहे परंतु, समितीच्या अंकेक्षणात कुठेही या स्पोर्ट्स अकॅडमीच्या आर्थिक व्यवहारांचा अंतर्भावच नाही! जवळपास १२ कोटी अकॅडमीच्या खात्यात आढळून येत आहे तर बारा कोटी खात्यातून परस्पर
काढून घेण्यात आल्याचे लक्षात आले मात्र, याचा कोणताही हिशोब समितीच्या सदस्यांना देण्यात आला नाही परिणामी, ही स्पोर्ट्स अकॅडमी बंद करण्याचा निर्णय समितीच्या सदस्यांनी बहुमताने पारित केला मात्र, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी लगेच इंग्रजीमध्ये आमच्या पत्राला विरोध करणारे पत्र धर्मादाय आयुक्तांकडे पाठवले. महत्त्वाचे म्हणजे भदंत आर्य यांना इंग्रजीमध्ये टाईप केलेले पत्र ,त्यावरील मसुदा कसा समजला? असा प्रश्न डॉक्टर राजेंद्र गवई यांनी उपस्थित केला.
याशिवाय दीक्षाभूमीवर थायलंड वरून आलेल्या मूर्ती संबंधित देखील भदंत आर्य यांनी त्यांनी घेतलेल्या पत्र परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला मात्र, दीक्षाभूमीवर आधीच एकूण चार बुद्ध मुर्त्या आहेत. त्यापैकी दोन मुर्त्या या स्तूपात असून वरच्या हॉलमध्ये एक, स्तूपाच्या बाहेर एक मूर्ती आहे. या व्यतिरिक्त एक मूर्ती पेटीत बंद आहे तरी देखील थायलंड मधून मोठी मूर्ती मागवण्यात आली यासाठी भदंत आर्य हे समितीच्या पैशावर थायलंडमध्ये गेले या मूर्तीचा विरोध नाही मात्र एवढी भव्य मूर्ती दीक्षाभूमीवर लावण्यासाठी चार एकरची जागा लागेल. परिणामी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात लोकांना जागा अपुरी पडेल. विशेष म्हणजे ती मूर्ती दीक्षाभूमीवर ठेवण्याकरिता समितीने कोणताही ठराव केला नव्हता. ती मूर्ती स्वीकारली हे दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या सदस्यांना देखील माहिती नव्हते.
समितीच्या सदस्यांनी बहुमताने क्रिकेट अकॅडमी बंद करण्याचे पत्र दिल्याने रागा रागात तत्कालीन सचिव फुलझले यांनी सचिव पदावरून राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी समितीचे अनेक सदस्य वेगवेगळ्या वेळी फुलझले यांच्या निवासस्थानी गेले मात्र, त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही. समिती ही सचिवाशिवाय कार्यरत राहू शकत नाही त्यामुळे समितीच्या सदस्यांनी सचिव म्हणून सर्व सहमतीने माझी नियुक्ती केली. माझ्या बाजूने दहा मते पडली यात
फुलझले यांनी सुद्धा मला समर्थन दिले. फक्त भदंत आर्य यांनी माझ्या सचिव पदाला विरोध केला असे डॉक्टर गवई यांनी याप्रसंगी सांगितले.
ही पत्रकार परिषद भदंत आर्य यांच्या विरोधात नाही मात्र, कोणतीतरी अदृश्य शक्ती त्यांच्या मागे कार्यरत असल्याची आम्हाला दाट शंका आहे.भदंत इंग्रजीचे पत्र वाचू देखील शकत नाही तरी देखील त्यांच्या सहिनिशी आमच्या पत्राला काउंटर करणारे पत्र धर्मादाय आयुक्तांकडे गेले याशिवाय स्पोर्ट्स अकॅडमी बाबत आम्हाला जेव्हा कळले तेव्हा आम्ही ती आर्थिक गैरव्यव्हाराच्या कारणामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला. अरविंद जोशी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे ते कोषाध्यक्ष म्हणून या क्रिकेट अकॅडमीचा संपूर्ण आर्थिक व्यवहार बघत होते. गेल्या अकरा वर्षापासून या क्रिकेट अकादमीच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारावर तत्कालीन सचिव सदानंद फुलझले यांच्या व त्यानंतर त्यांचेच चिरंजीव असलेले सचिव यांच्या सह्या आम्हाला आढळल्या. सुधीर फूलझले यांच्या सह्या त्यावर आहेत. अकॅडमी बंद करण्याच्या निर्णय झाल्यावर अरविंद जोशी हे तेथील कोषाध्यक्ष असल्याचे आम्हाला कळले. या संपूर्ण गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, समितीचे सदस्य या नात्याने बहुमताने आम्हाला या संपूर्ण आर्थिक घोटाळ्या बाबत भदंत आर्य यांना अध्यक्षपदावरून तात्काळ काढण्याचा अधिकार आहे मात्र,आम्ही भदंत यांना अध्यक्षपदावरून काढणार नाही कारण ते आमच्यासाठी पूजनीय ,आदरणीय असल्याचे याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र गवई म्हणाले.
समितीला शंका आहे की कोणतीतरी अदृश्य शक्ती त्यांच्याकडून असे काम करून घेत आहे
मात्र, भदंत आर्य यांना याची कल्पना नाही परिणामी, समितीला अधिकार असताना देखील भदंत आर्य यांनी समितीला अधिकार नसल्याचे पत्र धर्मादाय आयुक्तांना पाठवले. याशिवाय अनेक बँकांची खाती आहे ज्यावर फक्त भदंत आर्य यांच्यात सह्या आढळतात यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे खाते तसेच दीक्षाभूमीची खाती समाविष्ट आहे मात्र, सचिव म्हणून मला ती बघण्याचा किंवा हाताळण्याचा कोणताही अधिकार प्रदान करण्यात आला नाही. या खात्यांमध्ये पैसा जातो कुठे? आम्हाला भंतेजीला इतकच सांगायचं आहे जो कोणी तुमचा मार्गदर्शक आहे ?,जी अदृश्य शक्ती आहे ती तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन करीत आहे. तुमचा या स्पोर्ट्स अकाऊंट ला आशिर्वाद आहे का? बारा कोटी रुपये गेले कुठे स्पोर्ट्स अकादमीचे खाते कोणी उघडले?कधी उघडले? कोणतेही उत्तर समितीचे सदस्य किंवा सचिव या नात्याने भदंत आर्य आम्हाला देत नसल्याची खंत यावेळी डॉक्टर गवई यांनी व्यक्त केली.
आम्हाला भदंत आर्य यांच्या विषयी नाराजी आहे मात्र, त्यांना अध्यक्षपदावरून काढणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
समितीचा विरोध असताना देखील थायलंड मध्ये जाऊन बुद्ध मूर्ती आणण्याचा अट्टहास त्यांनी पूर्ण केला. आधीच दीक्षाभूमीचे फार मोठे मोठे जमीन, इमारती लाटण्यात आल्या. गर्दीला जागा मिळत नाही तरी देखील थायलंड वरून शंभर फुटांची मूर्ती अट्टहासाने भन्ते यांनी दीक्षाभूमीवर आणली. येण्या जाण्याचा पैसा देण्यात आला हे योग्य होते का? असा प्रश्न डॉक्टर गवई
यांनी केला.
नुकतीच बजरंग दलाने “सद्भभावना” यात्रा दीक्षाभूमी समोरून काढली याविषयी समाज माध्यमांवर चुकीचे वृत्त व्हायरल झाले असे गवई म्हणाले. बजरंग दलाने पत्रक काढले मात्र, ही दीक्षाभूमीची जागा आंदोलनासाठी नाही. समितीने त्यांना कोणतीही परवानगी दिली नाही. समितीने करोना काळात 300 कोटी रुपये सरकारला दिले हे देखील खोटे आहे. जनतेला अधिकार आहे त्यांनी थेट समितीच्या सदस्यांना येऊन प्रश्न विचारावे, कोणत्याही प्रकारच्या खोट्या वृत्तांवर किंवा व्हायरल पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान गवई यांनी केले.
दीक्षाभूमीच्या सौंदर्यकरणासाठी नासूप्र कडे २०० कोटी रुपये असल्याचे गवई यांनी सांगितले. सौंदर्यकरणाच्या वेळी स्मारकाला धक्का लागणार, ही देखील अफवा आहे. नासुप्रला देखील सौंदर्यकरण करताना काळजी असणार, त्यामुळे अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. असे आवाहन त्यांनी केले.
आम्ही इथे उत्तर देण्यासाठी आलो असून काहीही लपविण्यासाठी आलो नसल्याचे असे गवई यांनी सांगितले. थायलंड मधून जी बुद्ध मूर्ती आली आहे,समिती अध्यक्षांनी स्वीकारली आहे ती मूर्ती आमच्यासाठी देखील वंदनीय आहे. इतका मोठा पैसा खर्च करून मूर्ती दीक्षाभूमीत आणण्यात आली, सरकारला मूर्तीसाठी दुसरी जागा मिळू शकते का याबाबत विचारणा करण्याचा समितीचा विचार असल्याचे गवई यांनी सांगितले.
.वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांना समितीमध्ये का घेत नाही? असा प्रश्न केला असता त्यांनी आम्हाला साथ द्यावी आम्ही त्यांना साथ देऊ असे गवई म्हणाले. त्यांची संस्था आणि आमच्या संस्था मिळून काम करू. आम्ही त्यांना मार्गदर्शनाची ऑफर देतो असे गवई उतरले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत “राणीच्या पोटातून राजपुत्र जन्माला येत नाही तर मतपेटीतून राजपुत्र जन्माला येत असतो” तरीदेखील बाळासाहेब आंबेडकर हे देखील आम्हाला आदरणीय असल्याचे सूचक विधान डॉक्टर गवई यांनी केले.
याप्रसंगी बोलताना भदत आर्य यांनी परवानगी दिली तर समितीच्या सदस्यांची संख्या पंधरा लोकांची करता येईल असे गवई म्हणाले. भदंत यांनी मार्गदर्शन करावे मात्र, सचिवपदीच्या सहा महिन्यांचा अनुभव आहे, समितीचे सदस्य आपल्या अधिकारातून एखादे पत्र धर्मादाय आयुक्तांना पाठवतात त्या पत्राला काउंटर करणारे पत्र भदंत आर्य तत्काळ देतात.समितीच्या बैठकींचे रेकॉर्डचे रजिस्टर देखील भदंत आर्य हे इंदोरा येथील मठात घेऊन गेले. वास्तवतेत दीक्षाभूमी समिती संबंधी कोणतीही कागदपत्रे किंवा रजिस्टर अध्यक्षांना स्वतःच्या निवासस्थानी घेऊन
जाण्याचा कायदेशीर अधिकार नसतो मात्र ,तरी देखील भदंत यांनी बैठकीचे वृत्तांत असलेले रजिस्टर स्वतःच्या निवासस्थानी नेले परिणामी, आम्ही आज जी बैठक घेतली त्यासाठी आम्हाला नवीन रजिस्टर आणावे लागले आणि त्यात बैठकीची नोंद घ्यावी लागली, असे त्यांनी सांगितले. भदंत आर्य यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले,सचिव म्हणून सत्य सांगण्याची जबाबदारी असल्याने ही पत्रकार परिषद घेतली असल्याचे गवई म्हणाले.
भदंत आर्य यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाही, अध्यक्षपदावरून काढणार नाही मात्र, ही लढाई आता धर्मादाय आयुक्त तसेच न्यायालय इथे सुरू असून निर्णयाला पाच सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो परिणामी, दीक्षाभूमीच्या सर्वतोपरी विकासासाठी भदंत आर्य यांनी अदृश्य शक्ती सांगतात त्याप्रमाणे वागणे बंद करावे असे आवाहन डॉक्टर गवई यांनी केले. नवीन समिती नागरिकांचे उत्तर देण्यास सदैव तयार असल्याचे ते म्हणाले.
वारंवार अदृश्य शक्तीचा उल्लेख करण्यात आल्यामुळे ही अदृश्य शक्ती नेमकी कोणती? असा प्रश्न केला असता, माहिती आहे पण पुरावा नाही त्यामुळे सांगू शकत नाही असे सूचक उत्तर डॉक्टर गवई यांनी याप्रसंगी दिले.
याप्रसंगी समिती सदस्य विलास गजघाटे,प्राध्यापक प्रदीप आगलावे, पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, डी.जे. दाभाडे एन. आर. चुटे,भंते नाग दीपंकर आधी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
