फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजआता खापरखेड्याचा राख बंधारा फुटला: अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन राख मिश्रित पाण्याखाली!

आता खापरखेड्याचा राख बंधारा फुटला: अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन राख मिश्रित पाण्याखाली!

Advertisements

कामठी तालुक्यातील वारेगाव परिसरातील घटना

नागपूर,ता.१९ जुलै: कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा तलाव(ॲशपाँड) गेल्या वर्षी जुलै महिन्यातच फूटला होता. १६ जुलै २०२२ रोजी खसाळा राख बंधारा फुटल्याने खसाळा,म्हसाळा,खैरी,कवठा,सुरादवी या पाच गावात पाणी शिरले होते.ती देखील घटना दिवसा घडल्याने मोठ्या प्रमाणात जिवित हानी टळली होती मात्र या पाच ही गावातील शेकडो एकर जमीनीवर राख पसरली व या गावांमधील शेतकरी हा कायमचाच उधवस्त झाला.आज पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली व सकाळच्या सुमारास खापरखेड्याचा राख बंधारा फूटला.पुन्हा एकदा अनेक शेतक-यांची शेत जमीन राख मिश्रीत पाण्याखाली तुंबली.

गेल्या वर्षीच्या घटनेनंतर माजी कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन महिन्यांपूर्वी २८ एप्रिल रोजी विदर्भाच्या दौ-यात या समस्येवर कायस्वरुपी तोडगा काढण्यासाठी येत्या १५ दिवसात संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावू,असे आश्‍वासन दिले होते मात्र,मुंबईत पोहोचल्यावर त्यांनी कृषि मंत्री या नात्याने या गंभीर समस्येकडे लक्ष दिले नाही.

त्याचीच परिणिती पुन्हा एकदा राखेचा तलाव फूटण्यात झाली.या वेळी कामठी तालुक्यातील वारेगाव परिसातील शेकडो एकर शेतजमीन राख मिश्रीत पाण्याखाली उधवस्त झाली.वीज प्रकल्पातील राख शेतजमीनीत शिरणे अतिशय धोकादायक आहे.रेडिॲकटिव्ह रसायने यात जात असल्यामुळे किमान दहा वर्षे तरी अश्‍या जमीनीवर शेती करणे शक्य होत नाही,जमीनीचा पोत या घातक रसायनामुळे कायमचा बिघडतो,असे तज्ज्ञच सांगतात.

गेल्या वर्षी शेकडो एकर शेतजमीनीवर राखेचा बंधारा फूटून राख मिश्रीत पाणी पसरले. शेतकरी व गावक-यांवर गंभीर संकट ओढवले असताना देखील महाजनकोने या तलावांची तात्पुरती दुरुस्ती केल्याचे आजच्या घटनेवरुन सिद्ध झाले. खसाळा राख बंधारा ३४१ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला असून सुमारे ७ किलोमीटर जागेत राखेची साठवण होत असते.मूळात राखेची शास्त्रीय पद्धतीने दररोजच विल्हेवाट लावण्याचा पर्यावरण मंत्रालयाचा कायदा असताना देखील गेल्या दोन दशकांपासून कोराडी व खापरखेडा येथील बंधा-यात लाखो टन राखेची साठवणूक केली जात आहे,व यात दररोज अधिकाधिक भर पडत आहे.

परिणामी,पावसाळ्यात पाण्याचा जोर वाढताच कमकुवत बंधा-यांची साठवणूक क्षमता ही अपुरी पडते,त्यात अनेक ठिकाणी बंधा-यापर्यंत औष्णिक केंद्रापासून राखेचे वहन करणा-या कालव्यांना तडे गेले असल्याने, याच कालव्यातून ओव्हर फ्लो होत राख मिश्रीत पाणी सरळ शेतक-यांच्या शेतांमध्ये पसरतं व बळीराजाच्या परिश्रमाच्या जीवनाचीही राख होते.

आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी नांदगावला भेट दिली होती व नांदगावचा परिसर राखमुक्त करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले होते.पर्यावरण मंत्री असताना त्यांनी राख बंधारे बंद करण्याचे आदेश दिले होते.या ठिकाणी सौर प्रकल्प उभारुन प्रस्तावित १३२० मेगावॉटच्या प्रकल्पाचा त्यांनी देखील विरोध केला होता.

(छायाचित्र : बळीराजांच्या परिश्रमावर महाजनकोची राख….!)

सध्या जे कोराडी व खापरखेडा येथील दोन औष्णिक प्रकल्प सुरु आहे त्यापासून होणा-या प्रदुषणावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना महाजनकोने केली नाही.प्रकल्पातील राख सरळ कोलार नदीत सोडली जाते.कोलार नदी पुढे कन्हान नदीत जाऊन मिसळते.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अाले असताना ११ हजार कोटी रुपये खर्च करुन पुन्हा कोराडी येथे विस्तारीकरणाचा सरकारचा घाट आहे.यासाठी मे महिन्यात काेराडी येथे जनसुनावणी देखील पार पडली.

औष्णिक विद्युत प्रकल्पाची राख ही किरणोत्सर्गी असते.या राखेमुळे जवळपासच्या पाण्याच्या साठ्यात लेड,आर्सेनिक,मर्क्युरी,लिथियम सारखे घातक पदार्थ आढळतात.ही राख कोलार व कन्हान नदीच्या पाण्यात मिसळली जात असून यात नागपूर या उपराजधानीसह आजूबाजूच्या ४० किलोमीटर परिसरातील लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असताना नागपूरची वाटचाल कँसर सिटीकडे होत असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले होते.

खापरखेडा,कोराडी येथील प्रकल्पांच्या चिमणीतून निघणा-या धुरामुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी सुमारे दोन दशकांपूर्वीच फ्यूएल गॅस डिसल्फरायझर ‘(एफजीडी) हे संयंत्र लावण्याचे दिनानिर्देश प्रदुषण मंडळाने दिले असताना देखील, महाजनकोने याचे पालन केले नाही.नागरिकांच्या व शेतक-यांच्या जिविताशी सुरु असणारा हा खेळ थांबविण्याचा,कोराडी येथेच वास्तव्यास असणारे माजी उर्जा मंत्री व विद्यमान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी देखील कोणतेही प्रयत्न केले नाही.

उलट नव्याने राज्य सरकार १३२० मेगाव्हॉट्सचा वीज प्रकल्प कोराडीत आणण्याचा घाट घालत आहे.या प्रकल्पाची राख साठविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील?याचे कोणतेही शास्त्रशुद्ध उत्तर महाजनको व राजकीय नेत्यांकडे नाही.

जगभरात प्रचंड प्रदुषण निर्माण करणा-या औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या विरोधात आेरड होत असून काही देशांनी तर औष्णिक विद्युत प्रकल्पच कायमचे हद्दपार केले आहेत.असे असताना राज्य सरकार कोराडीत नव्याने १३२० मेगावॉट्सचा वीज प्रकल्प आणण्याचा घाट घालत असून संपूर्ण देशात जवळपास ४० हजार मेगावॉट्स क्षमतेचे विद्युत प्रकल्प बंद पडलेले असून,यात मिहानसह,नाशिक इत्यादी ठिकाणचे प्रकल्प बंद करण्यात आले आहे.देशभरातील वीज कोराडी व खापरखेडा येथेच निर्मितीचा घाट घालून येथील नागरिकांच्या आरोग्याशी व शेतक-यांच्या जिविताशी खेळण्याचा घाट राज्य सरकार रचत असल्याचा आरोप जनसुनावणीत अनेक पर्यावरणवाद्यांनी केला होता.

पंचमहाभुतांचा होत असलेला -हास थांबविण्यासाठी राज्य सरकार २५ लाख हेक्टरवर सेंद्रीय शेतीसाठी शेतक-यांना सहकार्य करणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ फेब्रुवरी २०२३ रोजी कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’उद् घाटनाप्रसंगी केली होती.दुसरीकडे राज्याच्या उपराजधानीत औष्णिक केंद्रामुळे आहे त्याच शेकडो ऐकर शेती राख मिश्रीत पाण्याखाली कायमच्या उधवस्त होत आहेत,हे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे विडंबन नाही का?असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.

गेल्या वर्षी इतकी गंभीर घटना घडली असतानाही महाजनकोने कोणत्याही कायमस्वरुपी उपाययोजना राख बंधा-याबाबत केल्या नाही,आजची घटना याची द्योतक आहे.याचा अर्थ महाजनकोच्या दृष्टिने गावकरी व शेतक-यांच्या जीवनाचे किती मोल आहे,हे ठलकपणे अधोरेखित झाले..

……………………………………..

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या