

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या विश्वस्त पदावरील प्रश्न टाळला
ज्या बैठकीत गिरीश गांधींना विश्वस्त नेमले ती बैठकच अवैध असल्याचा रंगकर्मींचा दावा
माझ्याकडे पत्र!पण माध्यमांना दाखविण्यासाठी नाही:गिरीश गांधी यांचा हेकटपणा
नागपूर,ता.१३ जुलै २०२३: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी याच वर्षी १६ एप्रिल रोजी पार पडली.यानंतर मे महिन्यात नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या निवडणूकीत प्रशांत दामले यांनी माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचा पराभव केला.यानंतर नवीन कार्यकारिणीने एक जूना प्रस्ताव पारित करुन नागपूरातील ज्येष्ठ समाजसेवी डॉ.गिरीश गांधी यांची नियामक मंडळाच्या विश्वस्त पदावर नेमणूक केली मात्र,अनेक रंगकर्मींनी या वर आक्षेप घेत,ज्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,ती बैठकच अवैध असल्याचा वाद सोशल मिडीयावर रंगवला.आज गिरीश गांधी यांनी प्रेस क्लब येथे डॉ.सी.डी.मायी कृषि तज्ज्ञ पुरस्काराची माहितीकरीता पत्रकार परिषद घेतली असता,या वादाविषयी त्यांना प्रश्न विचारला असता,याचं उत्तर मी नाही देणार!असे ते म्हणाले.
मी पत्रकार परिषदा घेत नसतो,माझे अनेक संपादकांसोबत वैयक्तिक व सलोख्याचे संबंध आहेत मात्र, माझी बातमी प्रसिद्ध करा किवा करु नका असे मी त्यांना सांगत नाही.माझं वय आता ७५ वर्ष आहे.एकेकाळी मी देखील पत्रकारिता केली आहे.आजचे अनेक पत्रकार अभ्यासाशिवाय पत्रकार परिषदा घेणा-या मान्यवरांना प्रश्न विचारत असतात,जे योग्य नाही अशी खंत ही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
सत्कारमूर्ती विलास शिंदे हे नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून, यंदाचा डॉ.सी.डी.मायी पुरस्कार त्यांना जाहीर झाला अाहे. येत्या १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वा.वनामती धरमपेठ येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहीती गिरीश गांधी यांनी दिली.
नाशिकच्या सुप्रसिद्ध द्राक्षांचे वेगवेगळ्या रुपात जगातील ४० देशात निर्यात करण्याचे कर्तृत्व सत्कारमूर्ती शिंदे यांचे असल्याचे गांधी यांनी याप्रसंगी सांगितले.यावर ,विदर्भाच्या कापसावर असे प्रयोग करु ते शकतील का व विदर्भाच्या शेतक-यांनाही नाशिकच्या फळ बागायती शेतक-यांप्रमाणे समृद्ध करु शकतील का?या प्रश्नावर बोलताना, शिंदे यांनी नागपूरच्या संत्रींवर प्रक्रिया करण्यात रस दाखवला असल्याचे गांधी यांनी सांगितले.
संत्र्याची वेगवेगळ्या रुपात निर्यात झाली तर आनंदच आहे मात्र,कापूस उत्पादक शेतक-यांचे काय?नागपूरात आल्यानंतर पत्रकारांशी ते याबाबत संवाद साधतील का?असा प्रश्न विचारला असता,अलीकडे अनेक पत्रकार हे मान्यवरांना अभ्यासाशिवाय प्रश्न विचारत असल्याने सत्कारमूर्ती शिंदे हे देखील पत्रकारांशी संवाद साधणार नसल्याचे ते म्हणाले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विश्वस्त पदी त्यांची नियुक्ती झाली मात्र अद्याप त्यांना तसे पत्र प्राप्त झाले नाही,अशी चर्चा आहे,ते पत्र मिळाले अथवा नाही?असा प्रश्न केला असता,मी याचं उत्तर देणार नाही,ते पत्र मला त्याच बैठकीत मिळाले मात्र ते माध्यमांना मी दाखवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी आता ७५ वर्षाचा आहे,माझा अनुभव आणि वय बघता मला काहीही सिद्ध करायचं नसल्याचे ते म्हणाले.पत्र परिषदेच्या सुरवातीलाच गांधी यांनी फक्त सत्कारासंबंधीच प्रश्ने विचारा अशी उपस्थित पत्रकारांना सूचना केली.मात्र,गिरीश गांधी यांना मुंबईच्या नाट्य परिषदेच्या घडामोडींवरच प्रश्न विचारला गेल्याने,इतर काही प्रश्न असल्यास माझ्या कार्यालयात येऊन विचारा,अशी सूचना केली.
यावर, विश्वस्त पदी नियुक्तीची ती बैठकच अवैध होती,त्यांच्या विश्वस्त पदी नियुक्तीची घोषणा अद्याप आमसभेत झाली नाही का?याचे उत्तर कार्यालयात आल्यावर द्याल का?असे विचारले असता,याचे कोणतेही उत्तर मी कार्यालयात आल्यावर देखील देणार नाही,असे ते स्पष्टपणे उत्तरले!
मूळात मुंबईच्या ज्या सभेत नागपूरातील डॉ.गिरीश गांधी यांना विश्वस्त नेमण्यात आले त्या सभेत नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी,प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे व आजीवन विश्वस्त शरद पवार हेच उपस्थित नव्हते,त्यामुळे ही सभाच अवैध असल्याचा दावा अनेक रंगकर्मी करतात.
नागपूरातून मुंबईच्या नाट्य परिषदेवर गेल्या तीन टर्म पासून नरेश गडेकर,प्रफूल्ल फरकसे निवडून जात आहे. या वेळी तिसरे उमेदवार म्हणून संजय रहाटे यांनी वर्णी लावली.हे तिन्ही उमेदवार ‘प्रस्थापित पॅनल’म्हणून लढले होते व त्यांनी सलीम शेख(परिवर्तन पॅनल)कुणाल गडेकर व दिलीप देवरणकर यांचा या ही वेळी पराभव केला.गडेकर,फरकसे व रहाटे यांना याच वर्षी १६ एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणूकीत अनुक्रमे ५४२,४७० व ४५९ मते मिळाली होती तर कुणाल गडेकर,सलीम शेख व दिलीप देवरणकर यांनी अनुक्रमे २८५,२६८ व २५० मते खेचली होती.
नरेश गडेकर व प्रसाद कांबळी यांच्यात गेल्या टर्ममध्ये अध्यक्ष पदावरुन रंगलेला कलगीतुरा संपूर्ण महाराष्ट्राच्या रंगकर्मींना दोन गटात विभाजित करुन जाणारा होता.प्रसाद कांबळी यांना पायउतार करुन नरेश गडेकर हे हंगामी अध्यक्ष पदी रुजू झाले होते व हा वाद सरळ धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचला होता.करोना काळातच नागपूरातील डॉ.गिरीश गांधी यांना नियामक मंडळाच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्याचा निर्णय झाला होता.मात्र,करोनामुळे ही नियुक्ती खोळंबली होती.
आता नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत दामले यांच्याकडे सर्व रेकॉर्ड बुक सुपुर्द करण्यात आले.त्यातील जुन्या निर्णयानुसार गिरीश गांधींना विश्वस्त पदी नियुक्तीचा निर्णय पार पाडला गेला मात्र,अनेक रंगकर्मींचा या नियुक्तीला विरोध आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शशी प्रभू हे ता-हयात नियामक मंडळाचे विश्वस्त आहेत तर इतर विश्वस्त हे पाच-पाच वर्षांसाठीच नियुक्त असतात.याशिवाय वयाच्या पंचाहतरीनंतर विश्वस्त पदी राहता येत नाही.
डॉ.गिरीश गांधी हे येत्या २३ जुलै २०२३ रोजी वयाची पंचहात्तरी पूर्ण करणार असल्याने त्यांची विश्वस्त पदी नियुक्ती तशी ही अवैध ठरणार असल्याचे बोलले जात आहे.नागपूरातील नरेश गडेकर हे जर स्वत:ला नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सभेचे हंगामी अध्यक्ष मानतात व गिरीश गांधींना विश्वस्त पदी नियुक्तीचा निर्णय घेतात तर नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत दामले यांना माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी कोणत्या अधिकाराने सूत्रे सोपवली?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
थोडक्यात,नागपूरातील सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्वाचे धनी डॉ.गिरीश गांधी यांचा नागपूरातील नाट्य परिषदेच्या निवडणूकीत चांगलाच प्रभाव असल्याचे रंगकर्मी मानतात.परिणामी गेल्या तीन टर्मपासून तेच-तेच तीन उमेदवार नागपूरातून मुंबईच्या मध्यवर्तीमध्ये निवडून जात असले तरी, नागपूरातील रंगभूमी समृद्ध करण्याच्या दृष्टिने त्यांचे कार्य याबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावर चर्चिले जाणा-या अनेक प्रश्नांच्या बाबतीत डॉ.गिरीश गांधी हे जर पत्रकार परिषदेत किवा स्वत:च्या कार्यालयातही पत्रकारांना उत्तर देण्यास टाळाटाळ करीत असतील तर,लोकशाहीची मुल्ये ,अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि पत्रकारिता यावर देखील आपल्या भाषणात त्यांना बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याची चर्चा आज त्यांच्या पत्र परिषदेनंतर चांगलीच रंगली.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,




आमचे चॅनल subscribe करा
