फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजधक्कादायक!पदावनती करुन श्रावण हर्डीकरांची मुंबई मनपात अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती!

धक्कादायक!पदावनती करुन श्रावण हर्डीकरांची मुंबई मनपात अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती!

Advertisements

मुंबई पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नियुक्ती!चर्चेला उधाण

नागपूर मनपाच्या निवडणूकीच्या काळात हर्डीकर होते आयुक्त पदी

बंटी शेळके यांचे उपोषण सोडवणे हर्डीकरांना पडले महागात!विरोधकांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वेळेवर होतील व त्या आम्ही १०० टक्के जिंकू:फडणवीसांच्या या दाव्या मागे ‘मर्जीतील’ सनदी अधिका-यांची लॉबी कार्यरत असणार आहे का?खासगीत रंगली चर्चा

तुकाराम मुंढे कृषि खात्यात झाले सचिव

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२ मे २०२३: राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी पदभार सांभाळताच सचिव पदावरील मात्तबर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची वित्त विभागात उचलबांगडी करण्यात आली असून नागरी उड्डायन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे २०१७ मध्ये नागपूर मनपाच्या निवडणूकीच्या वेळी श्रावण हर्डीकर हे आयुक्त पदी होते.त्यावेळी चारची प्रभाग रचना करताना सत्ताधारी भाजपला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.याच पार्श्वभूमीवर मुंबई मनपावरील उद्धव ठाकरे गटाचे गेल्या पंचवीस वर्षांपासूनचे वर्चस्व संपविण्यासाठी हर्डीकर यांचा नागपूरातील निवडणूकीच्या ‘अनुभवाचा ’फायदा राज्यातील सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला होणार आहे का?विजयाची यशस्वी खेळी पुनश्‍च खेळण्यासाठीच हर्डीकर यांची नियुक्ती ‘पदावनती’’ करुन अति.आयुक्त पदी करण्यात आली असल्याची चर्चा नागपूरातील मनपातील विरोधकांमध्ये रंगली आहे.

विशेष म्हणजे हर्डीकरांची नियुक्ती मनपाच्या आयुक्त पदी २०१६ च्या मध्यामध्ये झाली होती.२०१७ मध्ये मनपाची निवडणूक पार पडली.या निवडणूकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तब्बल १०८ जागा जिंकल्या होत्या.राष्ट्रीय पक्ष असणा-या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला फक्त २९ जागा मिळू शकल्या तर राष्ट्रवादीचे एकमेव खाते दुनेश्‍वर पेठे यांनी उघडले होते.बसपाचे १२ नगरसेवक निवडून आले तर मनसेचे एकमेव फलकच त्या निवडणूकीत गायब झाले कारण मनसेचा एकही नगरसेवक २०१७ च्या निवडणूकीत खाते ही उघडू शकला नाही.

राज्यातही भाजपची सत्ता होती व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी होते.फडणवीस यांच्याशिवाय नागपूर शहर हे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचेही शहर असल्याकारणाने येथील मनपा निवडणूका जिंकणे हा या दोन्ही कद्दावर नेत्यांसाठी ‘इभ्रती’चा प्रश्‍न असल्यानेच त्या निवडणूकीत साम,दाम,दंड,भेदाची निती वापरुन ती निवडणूक पार पडल्याची चर्चा होती.माजी महापौर व काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना तर महानगरपालिकेत पुन्हा प्रवेश न करु देण्याची भीष्म प्रतिज्ञाच भाजपच्या मनपातील काही स्थानिक नेत्यांनी उघडपणे केली होती.

परिणामी चारचा प्रभाग जाहीर होताच विकास ठाकरे यांच्या प्रभाग क्रमांक ३७ मध्ये बरीच काटछांट झाली होती,त्यांचा बराचसा प्रभाग हा प्रभाग क्रमांक ३८ मध्ये समाविष्ट करण्यात आला तर प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भाजपचे वर्चस्व असणा-या भागांचा समावेश झाल्याने विकास ठाकरे यांनी पक्षाकडे प्रभाग बदलून मागितला होता.मात्र प्रभाग क्रमांक ३८ हा प्रफूल्ल गुडधे पाटील यांचा प्रभाग असल्याने ही मागणी मान्य होऊ शकली नाही,परिणामी भाजपला आपली प्रतिज्ञा ‘सफल’करता आली आणि विकास ठाकरे यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते,नंतर २०१९ च्या विधान सभेच्या निवडणूकीत ते पश्‍चिम नागपूर मतदारसंघातून विधान सभेत काँग्रेसचे आमदार म्हणून पोहोचले,हा भाग अलहदा मात्र, हर्डीकर मनपा आयुक्त पदी असताना सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या प्रभागांमध्ये सोयीस्कर बदल केल्याची चांगलीच ओरड त्यावेळी झाली होती.

फडणवीस यांनी संविधान ‘ताक पर रखके’देशात कुठेही नाही अशी चारची प्रभाग पद्धती महाराष्ट्रात रुजू केली.यामुळे देशाचा संविधान जिथे एका व्यक्तीला एकच मत देण्याचं मूल्य स्वीकारतो, तिथे एका व्यक्तीला चार-चार मत देण्याची जवाबदारी मतदारांवर आली चार मत दिल्यानंतरच मतदार आपला नगरसेवक निवडू शकत होता.आता देखील राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर झाल्या बरोबर उद्धव ठाकरे सरकारचा, तीनच्या प्रभाग पद्धतीचा निर्णय फिरवून पुन्हा चारची प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे,हे विशेष.

२०१६-१७ च्या आपल्या कार्यकाळात मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर मात्र सत्ताधा-यांसोबतच विरोधकांचे देखील प्रिय होते.प्रवीण दटके हे महापौर पदी होते.यानंतर नंदा जिचकार महापौर बनल्या.याच काळात काँग्रेसचे फायरब्रॅण्ड युवा नेते बंटी शेळके हे ओसीडब्ल्यू या शहराला पाणी पुरवठा करणा-या खासगी कपंनीच्या वाढीव पाणी बिलाच्या विरोधात महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषणाला बसले.सात दिवस उलटून देखील सत्ताधारी भाजपने बंटी शेळके यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही,परिणामी काँग्रेसमधीलच काही नगरसेवक यांनी हर्डीकर यांचे कक्ष गाठले व उपोषण सोडविण्याची विनंती केली.

मूळात हर्डीकरांची गणना एक चांगले सनदी अधिकारीची होत असल्याने, आपल्या चांगल्या स्वभावानुसार हर्डीकर स्वत: उपोषणस्थळी पोहोचले व बंटी शेळके यांचे उपोषण सोडवले.राज्यात व मनपात भाजपचीच सत्ता असल्याने त्यांच्याच बाले किल्ल्यातील एक सनदी अधिकारी विरोधकांशी एवढी चांगली वर्तवणूक करतो म्हणजे काय?हा अहंकार तत्कालीन काही भाजप नेत्यांमध्ये असल्याकारणाने, हर्डीकर यांच्या या कृतीची ‘गूंज’मुंबई पर्यंत पोहोचली व फक्त दोन वर्षापेक्षाही कमी कालावधीत हर्डीकर यांची नागपूर मनपाच्या आयुक्त पदावरुन उचलबांगडी झाली व त्यांच्या ठिकाणी अश्‍विन मुद् गल यांनी पदभार सांभाळला.मुद् गल यांची देखील नंतर जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली.

यानंतर वीरेंद्र सिंह हे अतिशय शिस्तप्रिय असे सनदी अधिकारी आयुक्त पदी विराजमान झाले मात्र नागपूर मनपातील मोगलाईचा ‘कारभार’बघताच त्यांनी आईच्या आजारपणावरुन एवढ्या प्रदीर्घ सुट्टया टाकल्या की अनेक महिने नागपूरकरांनी आयुक्तांशिवायच मनपाचा कारभार चालताना बघितला.शेवटी कंटाळून फडणवीस सरकारनेच वीरेंद्र सिंह यांना पदमुक्त करुन त्यांची बदली केली व अभिजित बांगर हे मनपा आयुक्त झाले.

एवढ्या सर्व राज्यकारभारात मध्यंतरी श्रावण हर्डीकर यांची पुणे येथे नोंदणी महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली.या ही विभागात हर्डीकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत महसूलातील गळती रोखण्यात यश मिळवले.नोंदणी व मुद्रांक विभाग राज्य सरकारला महसूल देणारा दुस-या क्रमांकाचा विभाग मानला जातो.हर्डीकर यांची दोन वर्षांपूर्वी या विभागात नियुक्ती झाली होती.तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करुन आणि बोगस एनए ऑर्डरचा वापर करुन होणा-या दस्तनोंदणीवर हर्डीकर यांनी चांगलेच नियंत्रण आणले होते.एवढंच नव्हे,तर चाळीसहून अधिक अधिका-यांवर कारवाईचा बडगा त्यांनी उचलला होता.दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी ऑन लाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यावर मोठा भर दिला होता.कारभारात पारदर्शकतेला महत्व देतानाच महसूलातील गळती रोखण्यावर त्यांनी भर दिल्याने मागील आर्थिक वर्षात ४३ हजार कोटींचा महसूल या विभागाला मिळवून देण्याचा विक्रम हर्डीकर यांनी त्यांच्या नावावर नोंदवला आहे.

मात्र,गेल्याच महिन्यात हर्डीकर यांची बदली करण्यात आली व हर्डीकर यांना नवीन पदस्थापना देण्यात आली नव्हती.त्यांच्या ठिकाणी फडणवीस-शिंदे सरकारने हिराराल सोनवणे यांची नियुक्ती केली.सोनवणे यांच्या नियुक्तीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढले होते.आज अचानक हर्डीकर यांची नियुक्ती ‘पदनावती’ करुन मुंबई महापालिकेच्या अति.आयुक्त पदी केल्याने,नागपूर मनपाच्या वर्तुळात चांगलेच माेहोल उठले व हर्डीकर,२०१७ च्या मनपाच्या निवडणूका व त्यांच्या उचलबांगडीच्या चर्चेलाही उधाण आले.

आजच फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या वेळेवर होतील व त्यात आम्ही १०० टक्के जिंकू असा दावा केला.त्यांच्या या आत्मविश्‍वासाच्या मागे सनदी अधिका-यांचा बदल्या या तर कारणीभूत नाहीत ना?अशी चर्चा ऐकू येत असून, मुंबईचे विद्यमान आयुक्त चहल यांच्या मागे चांगलाच चौकशीचा ससेमिरा लागला आहे.ऐन मुंबई मनपाच्या निवडणूकीत चहल यांना घरी बसवले जाईल व हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे गटाला मात देण्यासाठी मुंबई मनपाची निवडणूक लढली जाईल,असा कयास आता बांधला जात आहे.
काँग्रेस पक्षाने देखील आपल्या ६२ वर्षांच्या म्हणजेच आपल्या अनेक दशकांच्या कारभारात सनदी अधिका-यांचा,राज्यपाल,राष्ट्रपती सारख्या घटनादत्त पदांचा आपल्या सोयीसाठी व निवडणूका जिंकण्यासाठी जो वापर केला आहे,त्याच काँग्रेस प्रस्थापित‘आदर्शावर’भाजपसारखा ‘पार्टी विथ डिफरेन्स’पक्ष चालत असल्याची बोचरी टिका देखील ऐकू येत आहे.Everything is Fair in Love&War अशी म्हण प्रसिद्ध आहे.आजच्या काळात प्रेम आणि युद्धा ऐवजी ’राजकारण’शब्द या म्हणीत चपखल बसतो,असेच म्हणावे लागेल.

यांच्याही झाल्या नियुक्त्या-
महापारेषण विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डी. टी. वाघमारे यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आयएएस अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्यांक विभागात बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची महापारेषणच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. अभिजीत चौधरी यांची छत्रपती संभाजीनगर राज्य कर विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाचे नागपूर येथील संचालक पी. शिवशंकर यांची बदली शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.
…………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या