
(रविवार विशेष)

नागपूरातील नाट्यकर्मी मागत आहेत आटा चक्कीवाल्यांना मत!
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी मतदान १६ एप्रिल रोजी
नागपूर शाखेतून तीन उमेदवार जातात नियामक मंडळात
नागपूरातील रंगकर्मी यावेळी घडवणार का सुखद परिवर्तन?
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.९ एप्रिल २०२३: नागपूरच्या रंगभूमीनी एकेकाळी सुवर्ण असा काळ अनुभवला आहे,नाट्यकर्मींमध्येही पराकोटीचा एकोपा होता,परस्परांविषयी आत्मीयता होती याशिवाय एकमेकांच्या मतांचा आदर करणारा तो काळ होता.मतभेद असले तरी परस्परांवर रंगभूमीच्या सेवेबाबत विश्वास होता.हळूहळू काळ बदलला,तत्वनिष्ठ रंगकर्मी काळाने बाजूला सारले,एका ‘राजकरण्याचा’यात शिरकाव झाला आणि…रंगभूमीच्या -हासाचे पर्व सुरु झाले.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी नागपूरची रंगभूमी ज्या ज्येष्ठ कलावंतांच्या नाट्यसेवेतून बहरली,नंतरच्या काळात ती ओस पडू लागली,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या गेल्या दोन पंचवार्षिक निवडणूकीत तर रंगभूमीशी निगडीत तत्व आणि मूल्ये ही पार लयाला गेलेली नागपूरकरांनी अनुभवली.गेल्या वीष वर्षात एका सांस्कृतिक राजकारण्याचा शिरकाव या क्षेत्रात झाला अन नाट्यकर्मी मनाने दुभंगले असल्याची व्यथा खास ‘सत्ताधीश’कडे नाव न छापण्याच्या अटीवर नागपूरातील काही ज्येष्ठ रंगकर्मींनी व्यक्त केली.
खरं तर नागपूरातून तीन प्रतिनिधी रंगकर्मींची सर्वानुमते निवड न होता निवडणूक व्हावी हेच रंगभूमीचे सर्वात मोठे दूर्देव असल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी सांगतात.रंगकर्मींनी आपापसात निवडणूक लढावी इतकं अद्य:पतन या क्षेत्राचे झाले आहे.गेल्या पाच -दहा वर्षात ना नाट्यगृहे,ना तालीमीची जागा यावर काम न करता प्रत्येकाला मुंबईच्या मध्यवर्तीमध्ये जाण्याची घाई झाली आहे.काय पडलं आहे मुंबईला?महत्वाचे म्हणजे नाट्यकर्मींच्या या निवडणूकीत गैर नाट्यकर्मी निवडणूकीत उतरत आहेत त्यांची बांधिलकी खरंच रंगभूमीशी आहे का?हे कोण तपासणार?तर मतदार तपासणार आणि मतदार कोण आहेत?तर आटा चक्कीवाले,झाडीपट्टी भागात शेतात काम करणारे शेतमजूर!भाजीवाले,वाहन चालक,गल्लीत धोबी काम करणारा,घरातली मोलकरीण,अगदी दूधवाला सुद्धा!यांच्या हातात नागपूर शहरातून निवडून जाणा-या तिनही प्रतिनिधींचं यश-अपयश अखेर एकवटले कोणी?असा सवाल हे ज्येष्ठ रंगकर्मी करतात आहेत.
नागपूरच्या रंगभूमीने १९८५ चा तो काळ पाहीला आहे, नाट्य क्षेत्रात वेगवेगळ्या संस्था काम करीत होत्या मात्र मुंबई-पुण्याहून येणा-या नाट्यकर्मींच्या सुविधा पाहण्यासाठी भोजन समिती,निवास समिती,मंडप समिती इत्यादी विविध समितींचे काम कोण बघणार?यावर बैठकीत चर्चा घडत असत. तेव्हा जरी एकमेकांवर विश्वास नव्हता तरी अवघ्या ३५ वर्षीय अनिल चनाखेकरसारख्या तरुण,उमद्या नाट्यकर्मीच्या खांद्यावर एकसाथ सगळ्याच समितीच्या जबाबदा-या सोपवून तत्कालीन नाट्यकर्मी निर्धास्त झाले होते.संजय नार्व्हेकर,मदन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाट्यकर्मींनी तरुण नाट्यकर्मीवर देखील विश्वास दाखविण्याचा ताे काळ होता.
तो काळ एका ताटात जेवणाचा काळ होता….!आता ज्यांना रंगकर्म नाही,रंगधर्म नाही ते इतक्या महत्वाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूकीत उभे राहताना दिसतात,अशी खंत व्यक्त केली जात आहे.विवेक खेर,शेखर बेंद्रे यांना तर त्या काळी बर्लिन वॉल,चायनीज वॉल संबोधले जायचे… ‘दिपरंग’नाट्य महोत्सव इतिहासजमा झाला,वैदर्भिय रंगकर्मींचे मेळावे हद्दपार झाले,दरवर्षी नागपूरातील सर्व नाट्यकर्मींनी मिळून राम गणेश गडकरी यांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे ते दुर्लभ झाले,निवडून येणा-यांनी सगळेच उपक्रम बंदच केले.नागपूरातील नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी अध्यक्षांनी किवा सचिवांनी सामान्य सभेची बैठक देखील गेल्या दहा वर्षांपासून बोलावली नाही!प्रफूल्ल फरकासे किवा नरेश गडेकर यांचे हे दायित्व नव्हते का?असा सवाल विचारला जातो मात्र त्याचेही कोणतेही सोयरसूतक सत्ताधारी नाट्यकर्मींना उरले नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
निवडून यायचं मात्र रंगभूमीसाठी काहीही करायचं नाही,करायचं ते फक्त राजकारण्याच्या नादी लागून राजकारण!असा संताप ही अनेक ज्येष्ठ रंगकर्मी व्यक्त करतात.आयुष्यात कधी रंगभूमीवर काम केलंच नाही,नाटकं ही बघितली नाही,नागपूरची रंगभूमी समृद्ध करण्यासाठी मुंबई-पुण्याच्या नाटकांची तसदी ही घेतली नाही,परवाच देशपांडे सभागृहात ‘देव बाभळी’ नाटकाचे सादरीकरण झाले,प्रसाद कांबळी यांचं ते नाटक होतं,नागपूरातील किती रंगकर्मींनी हजेरी लावली?विठ्ठल आणि पांडूरंगाच्या बायकांमधील दोनच पात्रांमध्ये रंगवलेलं अप्रतिम संगीत नाटक होतं,रंगभूमीची बाता करणारे आपल्याच शहरात दर्जेदार नाटकांना हजेरी लावत नाही…!
सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण केंद्र,राजाराम सीताराम दिक्ष्त वाचनालय व अखिल भारतीय नाट्य परिषद महानगर शाखा नागपूरतर्फे गेल्याच महिन्यात १ ते ५ मार्च दरम्यान ‘स्मृतिशेष’नाट्य महोत्सव सायंटिफिक सभागृहात पार पडले.यात लेखक अनिल चनाखेकर लिखित व महेश पातुरकर दिग्दर्शित ‘मोडीत निघाले काडीमोड’ज.रा.फळसाणकर लिखित रमेश भिसीकर दिग्दर्शित ‘पोहा चालला महादेवा’पु.ल.देशपांडे लिखित अजित दिवाडकर दिग्दर्शित ‘एक झुंज वा-याशी’रविशंकर झिंगरे लिखित इंदाेरचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम जोग यांचे ‘खिडक्या’तसचे समीर बोबडे लिखित अमित शेंडे दिग्दर्शित ’राजमाता जिजाऊ’सादरकर्त्या दिपाली घोंगे हे… नि:शुल्क नाट्यप्रयोग पार पडले,नागपूरकर प्रेक्षकांची तूफान गर्दी लाेटली होती,यावरुन नागपूरकर प्रेक्षक नाटकांच्या बाबतीत किती सुजाण आहे हे लक्षात येतं,तरी देखील नागपूरची रंगभूमीच्या समृद्धीसाठी तळमळीने मोजके नाट्यकर्मी झटताना दिसतात,इतरांना फक्त पदे हवीत,सत्ता हवीत,राजकारण हवं…अशी खंत हे ज्येष्ठ रंगकर्मी व्यक्त करतात.
महत्वाचे म्हणजे २०१८ च्या निवडणूकीत अनिल चनाखेकर हे उभे राहीले होते मात्र त्यांचा पराभव झाला आणि तो ख-या नाट्यकर्मींच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.नरेश गडेकर,शेखर बेंद्रे व प्रमोद भुसारी त्या निवडणूकीत उभे होते,त्यांच्या विरोधात दिलीप देवरणकर,अनिल चनाखेकर आणि सलीम शेख आदी उभे होते.वयाची सत्तरी ओलांडलेले अनिल चनाखेकर यांना त्या निवडणूकीत उभे करण्यामागे ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश लुंगे यांच्या महत्वाचा वाटा होता.आम्हाला ‘प्रस्थापित ’उमेदवार मान्य नाही हे सिद्ध करण्याकरिताच अनिल चनाखेकर यांना उभे करण्यात आले.त्या निवडणूकीत चनाखेकर यांचा पराभव उघडपणे दिसत असतानाही प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात नागपूरातील ज्येष्ठ तसेच अन्य मिळून किमान २५० रंगकर्मी ‘विरोधात ’आहेत,फक्त हे दाखविण्यासाठी अनिल चनाखेकर यांच्यासारख्या गेली पाच दशके रंगभूमीची अविरत व नि:स्वार्थ सेवा करणा-या रंगकर्मीला २०१८ च्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणूकीत उभे करण्यात आले होते……!यावरुन नागपूरातील ज्येष्ठ रंगकर्मींची आपल्या रंगभूर्मीविषयीची तळमळ सिद्ध होते.
याच नाट्य परिषदेचे ९९ वे संमेलन नागपूरात भट सभागृहात पार पडले होते.त्यात नागपूरातील एका ही ज्येष्ठ रंगकर्मींला सन्मानाचे स्थान नव्हते, नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात पराकोटीची ढवळाढवळ करणा-या तो एकमेव राजकारणी व त्यांच्या ‘पोपट’ प्रतिनिधींनी एकहाती ते संमेलन कश्याप्रकारे ‘बळकावळे’ आणि ‘आपटवले’,याचा पाढाच हे ज्येष्ठ रंगकर्मी वाचतात…!
९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात नरेंद्र इंगळे हे नाट्य दिंडीचे प्रमुख होते.साढे सहा लाखांचा खर्च त्यांनी स्व पदरातून केला मात्र नंतर स्वत:चे दूकान विकून त्यांना बँडवाल्यांपासून तर इतर सर्वांचे पैसे द्यावे लागले,परिषदेवर नागपूरातून निवडून गेलेल्या एकाने तर त्यांचा अपमान करुन त्यांना बाहेर हाकलले….त्यांची व्हॉटस ॲपवरील पोस्ट…. अनेकांना थक्क करुन गेली होती,असा धक्कादायक अनुभवही एका ज्येष्ठ रंगकर्मीने सांगितला.शासनाकडून या संमेलनासाठी ५० लाख रुपये तर नागपूर महानगरपालिकेने १ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले होते,हे विशेष!

(छायाचित्र: व्हॉटस ॲपवरील पोस्ट…!)
शिशुपालाच्या ९९ अपराधाप्रमाणे ती वर्तवणूक होती. आता या निवडणूकीत तो राजकारणी शंभरावा अपराध करण्यास निघाला असल्याची जहाल टिका हे ज्येष्ठ रंगकर्मी करीत आहेत.शंभराव्या अपराधानंतर भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध करुन त्याला नामशेष केले तसेच या वेळी या निवडणूकीत घडणार,अशी अपेक्षा करुया… अशी आशाही ते व्यक्त करतात.
पुढल्या रविवारी दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० ते ५.३० पर्यंत मोरभवन जवळील सेवासदन शिक्षण संस्था,सिता बर्डी आणि महिला महाविद्यालय नंदनवन या दोन केंद्रांवर मतदान पार पडणार आहे.या निवडणूकीच्या अनुषंगाने नागपूरच्या रंगभूमीवर नितांत व निखळ प्रेम करणारे,रंगभूमीची साधना करणा-या काही ज्येष्ठ रंगकर्मींच्या मनाचा कल समजून घेण्यासाठी ‘सत्ताधीश‘चा हा लेखप्रपंच आहे.
या निवडणूकीत परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून नागपूरच्या रंगभूमीसाठी आपले सक्रिय योगदान देणारे रंगकर्मी सलीम शेख,कुणाल गडेकर व दिलीप देवरणकर निवडणूकीच्या रिंगणात आहेत.महाराष्ट्रातील रंगकर्मींची हक्काची एखादी संघटना असावी यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची स्थापना करण्यात आली होती मात्र या परिषदेवर रंगकर्मींसाठी भरीव कामगिरी करणा-यांची निवड होत नसल्याने, ही परिषद पुन्हा सक्रीय रंगकर्मींच्या हितासाठी काम करणा-या प्रतिनिधींच्या हातात असावी यासाठी नागपूरातून परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवित असल्याचा दावा हे तिन्ही उमेदवार करीत आहे.
विशेष म्हणजे नागपूरातील आणखी एक ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्यांनी मुंबईतील छबीलदास सारखी नाट्य चळवळ महाराष्ट्राच्या उपराजधानीत जिंवत ठेवण्यात अत्यंत मोलाचा वाटा उचलला आहे,तरुण पिढीसाठी सातत्याने रंगभूमीवरील प्रयोग सादर करीत असून,ज्यांच्या प्रयोगशील नाटकांची अमृत महोत्सवी घंटा देखील निनादली असल्याचे नागपूरकर नाट्यप्रेमींनी अनुभवले ते ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे हे परिवर्तन पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसून पडत आहेत,त्यामुळेच नागपूरात यावेळी सुखद‘परिवर्तन’पहावयास मिळणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे संजय भाकरे यांनी स्वत: या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता मात्र त्यांच्या अर्जावरील सूचक व अनुमोदकांची अर्जासोबतच्या ओळखपत्रांच्या प्रतींवर स्वाक्षरी नसल्याने ते अपात्र ठरले.अहं आश्चर्य म्हणजे कुणाल गडेकर व सजंय भाकरे यांच्यातील ‘अनबन’ अनेक वर्ष नागपूरकर रंगकर्मींनीही अनुभवली असताना, या निवडणूकीत, परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून कुणाल गडेकर,दिलीप देवरणकर व सलीम शेख यांच्यासोबत एकाच मंचावर पत्र परिषद घेऊन संजय भाकरे यांनी चक्क आपलं समर्थन जाहीर केलं असल्याने,ही निवडणूक खरोखरंच परिवर्तनाची नांदी ठरेल का?हे बघण्याची उत्सुकता नागपूरकर नाट्यप्रेमींमध्ये जागृत झालेली दिसून पडतेय.
नागपूरकर रंगकर्मींनी रंगभूमीशी इमान राखणा-या उमेदवारांनाच मतदान करा असे आवाहन केले जात असून यामुळे नागपूरच्या रंगभूमीचे भले होईल अशी साद ज्येष्ठ रंगकर्मी घालत आहे मात्र दुसरीकडे या निवडणूकीत मतदान करणारे आटा चक्कीवाले,भाजीवाले,शेत मजूर,धोबी काम करणारे,दूधवाले,वाहन चालक ज्यांचा नाट्य क्षेत्राशी दूरान्वयाचाही संबंध नाही त्या मतदारांचा कौल काय राहणार?हे मतदार कोणी मतदार यादीत घूसवले,कोणत्या हेतूने घूसवले,मतदारांच्या यादीत ‘गांधी’नावाच्या मतदारांची संख्या ही लक्षणीय कशी?याविषयी मात्र उमेदवारांचा कस त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागत असल्याचा दिसून पडतोय.
एका उमेदवाराने रामटेक येथील एका मतदाराचे घर गाठले तेव्हा तो आटा चक्कीवाला निघाला असल्याची धक्कादायक बाब सांगितली.ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे जेव्हा अ.भा.मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचे अध्यक्ष पदी होते तेव्हा त्यांनी परिषदेच्या घटनेत बदल करुन सभासदांच्या बाबतीत ठोस भूमिका घेतली होती.त्यांनी २०१८ पासून नवीन घटना लागू केली.या घटनेनुसार राज्यातील कोणत्याही शाखेतून सभासद होणा-याने स्वत: अर्ज स्वत:भरुन देणे बंधनकारक केले.त्यावर अर्जदाराची स्वत:ची स्वाक्षरी असावी याशिवाय सूचक-अनुमाेदकाची नावे असणे ही गरजेचे केले.याशिवाय सभासद हा नाट्य चळवळीशी जुळलेला असावा व याचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत देणे बंधनकारक केले.
असे असतानाही, आटा चक्कीवाले,धोबी,भाजीपाला विकणारे आदी नागपूरच्या रंगभूमीच्या भल्यासाठी काम करणारे हेच नागपूरातून तीन उमेदवार निवडून देण्यासाठी याही वेळी मतदान करणार आहेत हे विशेष.यावेळी तर ३३२ नवे मतदार झाले असून यात घरी गॅस सिलेंडर पोहोचवणारे यांचासह शेजारी,नातेवाईकांचा भरणा आहेसच ज्यांचा नाट्य क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही,त्यामुळेच अश्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवरांची चांगलीच दमछाक होताना दिसतेय.
‘सत्ताधीश’ने या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांशी संवाद साधला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
ऑकेस्ट्रा क्षेत्राशी संबंधीत मोहम्मद सलीम यांना नरेश गडेकर यांनी तातडीने घरी बोलावून ‘भाईंनी तुझे नाव सुचवले आहे त्यामुळे तू हा उमेदवारीचा अर्ज भरुन दे‘असे सांगण्यात आल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी सलीम शेख सांगतात.मोहम्मद सलीम शेख व मोहम्मद सलीम फकिरा या नावात मतदारांची मोठ्या प्रमाणात गल्लत व्हावी व माझ्या मतदानात घोळ व्हावा यासाठी ‘भाईंनी’ही करामात केल्याचा सरळ सरळ आरोप सलीम शेख करतात. मोहम्मद सलीम हा निवडून तर येणार नाही मात्र मला देखील मध्यवर्तीवर पोहचू द्यायचे नाही यासाठीच हा डाव रचला,हे खरंच फार दूर्देवी आहे,राजकारण्यांनी निदान नाट्य क्षेत्रात तरी राजकारण खेळू नये.त्या राजकारणीने ही निवडणूक जणू विधानसभा व लोकसभेची करुन टाकली आहे.रंगकर्मींची दिशाभूल व्हावी यासाठी रंगभूमीशी काडीचाही संबंध नसणा-या मोहम्मद सलीमला निवडणूकीत उतरवण्याचा डाव त्यांनी रचला मात्र खरे रंगकर्मी त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही.राहीला प्रश्न मतदारांचा तर झाडीपट्टीत बोरचांदली या ठिकाणी मी मतदारांची भेट घेण्यास गेलो असता ते शेतीत काम करणारे शेतमजूर निघालेत! आता त्यांचा नाटकाशी काय संबंध?नागपूरातील मतदार केंद्रांपर्यंत त्यांना घेऊन येण्याचा खर्च कोण करणार आहेत?हे ’भाई’म्हणजे नेमके कोण?हे सर्वाना माहितच आहे,मी मात्र रंगभूमीसाठी आता ही काम करतोय,नंतर ही काम करीतच राहील,असे ते म्हणाले.
याच संदर्भात नाट्य परिषदेचे माजी उपाध्यक्ष नरेश गडेकर यांच्याशी संवाद साधला असता विरोधक हे सातत्याने अपप्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.घटनेमध्येच नाट्य रसिकांना सभासद करता येतं असा नियम आहे.१८ वर्ष पूर्ण झालेल्या व परिषदेची घटना मान्य असणा-याला सभासद करता येतं. निवडणूकीत मी,संजय राहटे व प्रफूल्ल फरकासे याचं पॅनल उभं आहे.दिलीप ठाणेकर व मोहम्मद सलीम हे अपक्ष उभे आहेत.मात्र,धक्कादायक बाब अशी की ठाणेकर यांनी वेगळेच पत्रक छापून ते मतदारांकडे पाठवले असून त्यात ठाणेकर,नरेश गडेकर व सलीम शेख यांचा पॅनल या निवडणूकीत उभा असल्याचा अपप्रचार त्यांनी केला.वास्तविक पाहता हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे.ही बदमाशी आहे,माझं नाव ठाणेकरांनी हेतुपुरस्सर टाकलं.एका ६५ वर्षाच्या नाट्यकर्मीला हे शोभत नाही.ही बदमाशी आहे,खोटारडेपणा आहे,धोकेबाजी आहे.

(छायाचित्र: ठाणेकर यांनी छापलेले पॅनलचे पत्रक)
ठाणेकरांना असे करण्यासाठी ‘पैशां‘चा व्यवहार झाला आहे अशी चर्चा आहे,याबाबत विचारणा केली असता फक्त २८ मते घेणा-यासोबत पैशांचा व्यवहार होऊ शकतो का?असा प्रश्न करीत मला त्यांच्या या अपप्रचारामुळे स्वत:चा प्रचार सोडून ठाणेकरांनी केलेला हा अपप्रचार आहे,असा प्रचार करावा लागत आहे.परिषदेत पुन्हा निवडून गेल्यावर ठाणेकरांच्या या बदमाशीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार का?यावर बोलताना,नाही मी नाही करणार कारण मला बाकीची भरपूर कामे आहेत,प्रोडक्शनची कामे आहे,तो उघडा पडणार आहे,मी एक-एक मत मागत फिरत नाही,मी माझे जे पॅनल आहे त्यासाठी मत मागतोय.इतक्या वयाच्या माणसाला हा असा बालिशपणा शोभत नाही.
माझ्या विरोधात कुणाल गडेकर याला उभे करण्यात आले आहे.त्याचं रंगभूमीसाठी योगदान काय?सलीम शेख हा काही तरी रंगभूमीसाठी करीत असतो मात्र कुणाल गडेकरला फक्त माझ्या नावाबाबत संभ्रम निर्माण व्हावा यासाठी उभं करण्यात आलं असल्याचा आरोप नरेश गडेकर करतात.
‘
सत्ताधीश’ने मोहम्मद सलीम यांच्याशी संपर्क साधला असता,सलीम शेख यांनी त्यांना हजार फोन केल्याचे ते सांगतात.रंगभूमीशी संबंध नसताना का उमेदवारी अर्ज भरला?अशी विचारणा करतात,मी त्यांना ही सांगितले नरेश गडेकर यांचा मला फोन आला व ‘भाईंची’ईच्छा आहे तू उमेदवारी अर्ज भरावा असे त्यांनी सांगितले.मी ‘भाईंचा’आदेश टाळू शकत नाही त्यामुळे मी नरेश गडेकर यांच्या घरी गेलो,अर्ज भरला,फोटो दिला,स्वाक्षरी केली.कलाकार हे कधीही राजकारण करत नाही मला सुरवातीला सलीम शेख का फोन करत आहे हे कळलच नाही ,मात्र नंतर मला वस्तुस्थिती कळली सलीम शेख हे प्रत्येक वेळी उमेदवारी अर्ज भरतात आणि निवडणूक हरतातही.१६० च्या वर त्यांना मत मिळत नाही.मग माझ्या उमेदवारी अर्जाने त्यांना या ही वेळी काय फरक पडणार आहे?मी प्रचार करणार नाही मात्र नाटकाशी माझा ही संबंध आहे.कादर खान यांच्यासोबत मी हिंदी नाटक ‘तबादला’यात काम केलं आहे.‘मोरुची मावशी’चे मी तीन प्रयोग लावले आहे.‘तो मी नव्हेच’मध्ये मी मुख्य पात्राच्या भावाची भूमिका निभावली होती,‘मरता क्या न करता’‘झलकारी बाई’ या नाटकाचे प्रयोग माझ्या मोहम्मद रफी कल्चरल फॅन्स क्लब ऑर्गनायझेशनतर्फे प्रायोजित केले.मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय,निवडून आलो तर ‘ते’जे काम सांगतील ते करील.विशेष म्हणजे मला रुपाली कोंडावार,अनिल पालकर,मुकुंद वसूले यांचेही मला फोन आले आहेत याचा अर्थ मला नाट्यकर्मींचाही पाठींबा मिळतोय हे सिद्ध होतंय.
संजय भाकरे या सर्व घडामोडींविषयी बोलताना, निवडून गेलेल्यांवर चांगलेच तोंडसुख घेत, ते फक्त मुंबईत ‘साईड एक्टर’म्हणून बाजूला उभे राहतात अशी टिका करीत,ही रचना बदलण्याची वेळ आली असल्याचे सांगतात.अश्यांना पुन्हा परिषदेत पाठवायचे का?हा रंगभूमीकार यांच्या समोर कळीचा प्रश्न आहे.त्यामुळेच जे सातत्याने रंगमंचावर काम करतात ज्यांना नाटकाची कळकळ आहे अशांनाच निवडून देण्यासाठी मी परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभा असल्याचे संजय भाकरे सांगतात.

(छायाचित्र: संजय भाकरे पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे पत्रक)
प्रफूल्ल फरकासे यांच्याशी संवाद साधला असता चांगले लोक परिषदेत निवडून यायला पाहिजे,असे त्यांनी सांगितले.आमच्या कार्यकारिणीने नागपूरात ९९ वे नाट्य संमेलन ३५ वर्षांनंतर खेचून आणनले व ते यशस्वी करुन दाखवले.१५ वर्षांपासून परिषदेचे काम करीत आहोत.कोविडच्या काळातही आमच्या कार्यकारिणीने नाट्यकर्मींसाठी खूप चांगले काम केले असून, निवडून आल्यानंतर पुढे ही नाट्यकर्मींचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याचे काम करु,असे ते म्हणाले.

(छायाचित्र: अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या घटनेप्रमाणे कोणालाही सभासद होता येतं,गडेकर यांनी केलेला दावा व पाठवलेला परिपत्रकातील उल्लेख)
‘सत्ताधीश’ने कुणाल गडेकर यांच्यासोबत संवाद साधला असता मला निवडणूक किवा नागपूरातील नाट्य क्षेत्रातील गलिच्छ राजकारण यावर काहीही बोलायचं नाही,मी इतकच सांगील शासनातर्फे मिळणाऱ्या सगळ्या योजनेचा लाभ मुख्य कलाकारापासून ते रंगभूमीवरील शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्याला मिळऊन देण्याकरीता प्रयत्न नाही तर ,मी पुढाकार घेऊन करणार. विदर्भ हा सगळ्यात जास्त कलावंत असलेला विभाग आहे. नागपूर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील सगळ्या नाट्य परिषदेच्या सभासदांनी आपल्या भविष्याच्या दृष्टीने मतदानाचा हक्क बजावने गरजेचे आहे. एक कलावंत या नात्याने रंगभूमीवरील कलावंतांचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न, झाडीपट्टी रंगभूमीचा विकास, कलावंतांचे अनेक प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा आहे, झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटके चार महिने न होता वर्षभर चालावे आणि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या जिल्ह्यात सादर व्हावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
थोडक्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक ही तोंडावर येऊन ठेपली असून प्रचार-अप्रचाराचे मुद्दे नागपूर नगरीत चांगलेच चर्चेत आहे.शह-काटशह,‘भाईगिरी’ व ‘भाईंचा नाट्य परिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी साम,दाम,दंड,भेदाची नीती सर्वांनीच वापरावी,असा त्यांना भेटण्यास गेलेल्या उमेदवारांना दिलेला असंवैधानिक सल्ला,या सर्वांचे उत्तर येत्या रविवारी नागपूरकर नाट्यकर्मींना व रसिकांना मतमोजणीनंतर मिळणारच आहे,तूर्तास थांबणे भाग आहे.
…………………………….




आमचे चॅनल subscribe करा
