फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशहर ‘की’चर्चा है...

शहर ‘की’चर्चा है…

Advertisements

अखेर अखिल भारतीय सी-२० ‘संघ’ सभा संपली!

सर्वोकृष्ट विषयांवर मात्र बौद्धिक चर्चा:विविध संस्थेचे सभासद तृप्त

‘ग्लोबल’ परिषद ‘लोकल’ लाेक!सगळीकडे फक्त भाजपचेच वर्चस्व अधोरेखित!

या विचार प्रक्रियेवर खर्च झाले जनतेचे ‘फक्त‘ दोनशे कोटी!

उद्या पाहूण्यांची पर्यटनवारी

फक्त विजेच्या लखलखाटावर खर्च केले वीस कोटी रुपये!

माध्यमकर्मीं अन्… हॉटेल रेडिसन ब्ल्यूची स्टोर रुमची जागा

तेलंगखेडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर ही प्रशासनाने झाकले:मंदिराचीही वाटली ‘लाज!’

हायकोर्टाच्या आदेशालाच केराची टोपली:ऐन ट्रॅफिक सिग्नलवरच जी-२०चे बोर्ड झळकवले!

तीन हजार झाडांवर ठोकले एक लाख खिळे!मनपा आयुक्त स्वत:वर करतील का कारवाई?

जी-२० ची संकल्पना ‘वसुधैव कुटूंबकम’:शहरातील ‘भिक्षूकच’ गायब

तेलंगखेडीत पाहूण्यांना शाही भोजन:‘भाजपाईं’च्या पुढाकारात ‘मोगलाईचा‘ फिल!

महावितरणाचा भुर्दंड बसणार ग्राहकांवर तरीही नागपूरकरांची ‘सेल्फी’जोमात

डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)

नागपूर,ता. २१ मार्च २०२३: जागतिकस्तरावरील विचार प्रक्रियांच्या विषयांवर तब्बल वीस देशांंमधील साढे तीनशे प्रतिनिधींनी जी-२० परिषदे अंतर्गत,आयोजित करण्यात आलेल्या सी-२० या वैचारिक देवाण-घेवाणस्तरावरील परिषदेचा आज, मंगळवार दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी समारोप झाला असला तरी उद्याच्या दिवशी या सर्व देश-विदेशातील पाहूण्यांसाठी देवलापार,सेवाग्राम,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इत्यादी ठिकाणी पर्यटनाचा बेत आयोजकांनी आयोजिला अाहे. या तीन दिवसीय सी-२० विषयीची सकारात्मक-नकारात्मक चर्चा त्यामुळेच समाजमाध्यमांवर चांगलीच रंगली आहे.यात सर्वाधिक छायाचित्रे,सेल्फी,व्हिडीयोज व नागपूर ‘शहर याचीच चर्चा’रंगली आहे.

या परिषदेचा एकंदर रागरंग बघता अखेर सी-२० ‘संघ’ परिषद संपली असल्याचा संवाद समाज माध्यमावर उमटला!ही परिषद अगदी जागतिकस्तरावरील असली तरी परिषदेत संघप्रणित लोकांचाच व संस्थांचाच भरणा असल्याची चर्चा चांगलीच होती, त्यामुळेच या जागतिक दर्जाच्या परिषदेला, संघाची प्रातिनिधीक बैठक पार पडल्यापर्यंतची कोटी करण्या इतपत नेटीझन्सनी मजल मारली!

ही परिषद केंद्रीयस्तरावरुन भारत या देशाने आयोजित केली असली तरी, महाराष्ट्राच्या उपराजधानीत तरी ती सर्वस्वी भाजप ‘प्रायोजित’ भाजप कार्यकर्त्यांची व भाजपच्या संस्थांची असल्याची कोटी देखील उमटली.एवढंच नव्हे तर यातील विचार प्रक्रियेचे विषय यांचा देखील दर्जा हा जागतिकस्तरावरचा नव्हता,अशी देखील टिका उमटली!‘ग्लोबल परिषद लोकल माणसे’असा हेटाळणीचा सूर देखील उमटलेला दिसून पडला.विशेष म्हणजे नागपूरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असलेल्या या जागतिकस्तराच्या परिषदेविषयी सर्वसामान्य नागपूरकरांच्या मनातही अभिमानच आहे मात्र, स्थानिक प्रशासनाने ज्या ‘कल्पकतेने’या परिषदेसाठी नागपूर शहराला बाह्य मूर्तरुप दिले त्याचीच चर्चा आता समाज माध्यमांवर अगदी ट्टीटर,इन्सटाग्राम पासून तर फेसबूकपर्यंत रंगली आहे.

आजच एका तरुणाने छत्रपती चौकातून येत असताना वीज विभागाने ज्या पद्धतीने वर्धा रोडवर डोळ्यांना विचलीत करणारे शार्पी हायड्रोलिक लाईट्स लावले आहे त्यावर ट्टीटरवर प्रतिक्रिया खरडली!अगदी उंचपर्यंत प्रकाशाचा मारा करणारे व सतत डोळ्यांना रुतणा-या या प्रकाश योजनेमुळे त्याचे दुचाकीवरील संतुलन जाता जाता वाचले!यापेक्षा शहरातील अनेक भाग जो अद्याप अंधारात आहे त्या भागांमध्ये स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आले असते तर या ‘लग्न’ सोहळ्यासाख्या तात्पुरत्या लाईटिंगपेक्षा, नागपूरकरांना त्याचा दिर्घकालीन व कायमचा फायदा झाला असता,असे हा तरुण खरडतो.

तसेच संपूर्ण वर्धा रोड व पाहूणे-राऊणे नागपूर शहराच्या ज्या भागातून जाणार होते उदाहरणत:तेलंगखेडीत राजेशाही थाटातले जेवायला,फूटाळ्यातील, अगदी दुबईच्या समुद्रासारखा सांगण्यात येणारा फाऊंटेन शो बघायला,त्या सर्व मार्गावरील तब्बल तीन हजार पेक्षा जास्त झाडांवर एक लाखांपेक्षा जास्त खिळे ठोकून चायनामेड लाईटिंगवर देखील चांगलेच ‘भाष्य‘समाज माध्यमात उमटले.

एकीकडे देशाच्या संसदेत राहूल गांधी यांना पंतप्रधान मोदी हे चायनामध्ये गेले असता एकेकाळी ते भारत या देशाविषयी काय-काय बोलले होते?हे संसेदच्या पटलावर आणण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाच चक्क त्यांना संसदेत बोलू द्या,म्हणून पत्र दिले मात्र,हे पटलावर येऊ नये म्हणून सत्ताधारी भाजपचेच खासदार हे संसेदत गोंधळ घालून राहूल गांधी यांनीच लंदनच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात भारतात लोकशाही आता नांदत नसून यूरोप अमेरिकेसारख्या देशाने भारतात लक्ष घालावे,असे केलेल्या अक्षम्य विधानाबाबत त्यांना संसदेत बाेलूच न देण्याचा प्रण केला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून संसदेचे एक ही दिवस कामकाज होऊ शकले नाही,त्याच धर्तीवर नागपूर शहरभर ‘चायनामेड ‘ लाईटिंगचा जो लखलखाट करण्यात आला आहे त्यावर उच्च दर्जाचे ताशेरे ओढले गेले आहे.‘लदाख व अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर किती ही वाद असले तरी ‘हिंदी चीनी भाई-भाई’चा आदर्श नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिका-यांनी घालून दिल्याचे प्रेरणादायी अभिवचनाने, समाज माध्यमांच्या भिंती चांगल्याच रंगल्या आहेत.नागपूर शहरात लग्नसराईसारख्या वीजेच्या या लखलखाटासाठी फक्त ‘२०‘कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती चर्चिली जात आहे!

याच प्रमाणे वर्धा रोडवरील शाश्‍वत पर्यावरणाला पूरक अशी ‘रोप वाटिका’ जी मनपाच्या उद्यान विभागाने फूलवली त्याचा देखील कौतूक सोहळा समाज माध्यमांवर चांगलाच रंगला आहे.यावर फक्त एक पोस्ट व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रियांचा जो पाऊस पडला ते बघता,नेटीझन्सच्या या बौद्धीक चर्चेला सी-२० चे व्यासपीठ मिळायला हवे होते,असं वाटून जातं!लवकरच नागपूरात दरवर्षीप्रमाणे उन्हाळा पुन्हा तापू लागणार आहे.अगदी ४८ डिग्री सेल्सियस पल्लयाड तापमान जाणार असून त्यावेळी कोट्यावधी रुपये खर्च करुन पाहूणे-राहूण्यांसाठी जी रोप वाटिका फूलवली त्याचे काय होणार?अनेक रोपे तर आजच कोमेजली असून त्याची देखील छायाचित्रे समाज माध्यमात व्हायरल झाली!

राज्य सरकारने तब्बल ‘दोनशे कोटी’ रुपये मुक्त हस्ताने नागपूरातील या तीन दिवसीय सी-२० परिषदेसाठी शहरातील विविध विभागांना प्रदान केले,त्याचा कसा व किती ‘सदुपयोग’झाला हे येणा-या काळात नागपूरकरांना कळेलच मात्र एके ठिकाणी वाचण्यात आलं होतं दोनशे कोटी रुपये हे नागपूर शहराची संपूर्ण पुरातन कालीन ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी पुरेशी ठरली असती!किंबहूना साढे बारा हजार कोटी रुपयांच्या मेट्रोपेक्षा नागपूरकरांची या दुर्गंधी व ड्रेनेजमिश्रिीत पाणी पिण्यापासून कायमची सुटका झाली असती!

या शहरातील संपूर्ण मलनिस्सारण वाहीन्या शहराच्या मध्यभागी असणा-या व नागपूर शहराची ओळख असणा-या नाग-नदीमध्ये सोडण्यात आल्या आहेत!जागतिकस्तरावर जो आराखडा या चर्चांमधून फायनल झाल्यावर ३० व ३१ जुलै रोजी जयपूर येथील परिषदेत सोपवला जाणार आहे व जो पुढे जगातील वीस देश हे त्यांच्या त्यांच्या देशात पॉलिसी तयार करताना उपयोगात आणनार आहेत त्यात ‘नदीचा नाला झाल्यावर त्याला पुर्नवैभव कसे प्राप्त करुन द्यायचे‘याचा देखील मसुदा रहाणार आहे का?असा खोचक सवाल नागपूरात ,नागपूरच्या स्थानिक प्रश्‍नांवर आयोजित जागतिक दर्जाच्या परिषदेच्या आयोजकांना आता विचारला जात आहे.

या परिषदेला भारताच्या कानाकोप-यातूनही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आले मात्र दोनशे कोटी रुपये हे राज्य सरकारने या परिषदांवर जे खर्च केले ते महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेच्या कराच्या पैशातून केलेला खर्च आहे, त्यामुळेच या परिषदांमध्ये स्थानिक प्रश्‍नावर खरीखुरी चर्चा न होता,त्यावर उपायांच्या रुपात उत्तर शोधण्याचा प्रयत्न न होता, केवळ लायटिंग,पेंटिग,शाही जेवण,पर्यटन व दिखावेबाजी यावर हा पैसा वायफळ खर्च केला असल्याचा संताप देखील चांगलाच व्यक्त झालेला दिसतोय.

सर्वात महत्वाचे म्हणजे या आंतरराष्ट्रीय परिषदेची संकल्पनाच ‘वसुदैव कुटुंबकम’यावर आधारित आहे मात्र या परिषदेच्या पाहूण्यांना, शहरातील बाराही महिने चोवीस तास नागपूरकर भोगत असणा-या भिक्षेक-यांचा त्रास नजरेस पडू नये म्हणून वर्धा रोड,यशवंत स्टेडियम व अनेक मंदिरांसमोरील भिक्षेकरीच गायब करण्यात आल्याने, या शहराच्या आणखी एका प्रमुख समस्याचे दर्शन व अाकलनापसून मुकावे लागले !प्रत्येक चौका चौकात प्रत्येक सिग्नलवर भिक्षेकरी बाया,अट्टल बेवडे पुरुष,लहान लहान मुले हे कशाप्रकारे नागपूरकरांना मानसिकरित्या छळतात,स्वच्छतेच्या संदर्भात पिडतात,त्यांची भेट या परदेशी पाहूण्यांना झाली असती तर यावरही प्रकाश पडला असता,त्यांनी सूचविलेल्या सुझावांमध्ये या प्रश्‍नाबाबतही उहापोह झाला असता आणि ख-या अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पनाही साकारल्या गेली असती.

मात्र,या ही बाबतीत असे घडले नाही उलट सी-२० च्या नावाने हातवर पोट असलेल्या फेरीवाल्यांचाच छळवाद स्थानिक प्रशासनाच्या अधिकारी,कर्मचा-यांनी ज्या प्रकारे मांडला त्यावर देखील चांगलाच रोष समाज माध्यमांमध्ये उमटला आहे.एकीकडे तेलंगखेडी उद्यानात पाहूणे-राहूणेंसाठी छ्त्तीस भोगांचा पाहूणचार जरी असला तरी नागपूर या शहरात लाखो फेरीवाल्याचे व त्यांच्या कुटुबियांचे पोट हे, दिवसभराच्या अल्पशा कमाईने भरत असतं.मात्र पराकोटीच्या दिखाव्यावर भर असणा-या मनपाच्या अतिक्रमण झोनने शहरातील अनेक ठिकाणच्या फेरीवाल्यांचे ठेलेच हस्तगत केले!

(छायाचित्र: विष्णूजी की रसोई प्रायोजित शाही भोजन)

धरमपेठ झोनच्या अधिका-यांनी तर कहरच केला.दिनेश जैस्वाल व उमाबाई तुमराम या दोघांचे रामगिरी व फुटाळा तलाव परिसरातील रस व चहाचे ठेले या झोनच्या अतिक्रमण विभागाने जप्त केले.नियमानुसार कारवाईत जप्त केलेले साहित्य दंड भरल्यानंतर संबंधितांना परत करण्यात येतं मात्र धरमपेठ झोनचे नरेंद्र तोटेवार व आनंद सातपुते यांनी या दोन्ही गरीब,गरजू हातठेलेवाल्यांना साहित्य परत करण्यासाठी दोन हजारांची मागणी केली!इतके पैसे भरण्यास या दोघांनी असमर्थता दर्शवल्याने त्यांचे ठेले व उसांचा साठा या महाभागांनी गौरखेडे कॉम्प्लेक्स परिसरातील भागात फेकून दिले,इतकंच नव्हे तर जेसीबीच्या सहाय्याने त्यावर माती टाकून दिली!यामुळे उसाचा रस विकणा-या दिनेश जैस्वाल याची दैना उडाली.त्याने पंचेचाळीस हजार रुपये भरुन उधारीत हा उस घेतला होता,उन्हाळ्यात या उस विक्रीच्या भरवशावरच त्याचे व कुटुंबियाचे पोट भरणार होते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच झोनच्या मस्तवाल कर्मचा-यांनी दोन गरीबांच्या उदरनिर्वाहाचे साधन कच-यात फेकले,नष्ट केले.याचाही व्हिडीयाे समाज माध्यमात चांगलाच व्हायरल झाला,एवढंच नव्हे तर दोन हजारांची लाच मागणा-या तोटेवाराच्या संभाषणाची ऑडीयो क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली.या व्हिडीयोमध्ये उसाचा रस विकाणा-या जैस्वाल याने देखील ‘सी-२०’ चा उल्लेख केला आहे,हे विशेष!

महिन्याकाठी लाखो रुपये पगार घेणारे मनपाचे काही अधिकारी व कर्मचारी हे कशाप्रकारे वरकमाईसाठी चटावलेले आहे,हे या ही उदाहरणावरुन सिद्ध झालं,दीड हजार नको ,आम्ही चार जण आहोत,दोन हजार रुपयेच द्यावे लागतील असे त्या ऑडियो क्लिपमधील तोटेवाराचा आवाज हा सी-२० साठी, ठेले उचलून पाहूण्यांसाठी गडकरींच्या फूटाळाच्या फाऊंटन शोच्या तयारीसाठी किती सज्ज होता,या कर्तव्य दक्षतेची साक्ष देतो,याची देखील खमंग चर्चा समाज माध्यमांवर वाचायला मिळाली.

यावर कहर म्हणजे शहरात ठिकठिकाणी अर्धवट बांधकामांच्या इमारतींना तिरंगाने झाकण्याची संकल्पना तर ‘अफाट’होतीच मात्र तेलंगखेडी येथील विठ्ठल-रुख्मिणी हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असणा-या मंदिरालाच जी-२० च्या फलकांनी झाकण्याचे प्रकरण तर खूपच भक्तीभावपूर्ण होते!प्रशासनाच्या अधिका-यांनी शहरातील अपूर्ण बांधकाम असणा-या इमारती व एका मंदिरामध्ये कोणताही भेदभाव न करता, संविधानातील ‘समन्यायी‘ तत्वाचा जो परिचय दिला,त्याचाही खोचक शब्दात कौतूकसोहळा समाज माध्यमावर चांगलाच रंगला.

 

(छायाचित्र : मंदिर ही झाकले!)

हायकोर्टाचेच निर्देश आहेत ट्रफिक सिग्नलवर कोणत्याही प्रकारचे फलक लावले जाऊ नये,असे आढळल्यास वाहतूक विभागाने त्वरित कारवाई करीत दंड आकारावा व कारवाई करावी,शहरातील जीपीओ चौकासह अनेक चौकात ट्रफिक सिग्नल्सवरच जी-२० चे मोठमोठे फलक हायकोर्टाच्या आदेशाची ‘अवमानना‘करीत असल्याचे दिसून आलेत.नागपूर शहराच्या चर्चेत ही देखील एक चर्चा उल्लेखनीय अशी होती.

( छायाचित्र :जीपीओ चौकातील ट्रफिक सिग्नलवर असा फलक लावण्यात आला)

महत्वाचे म्हणजे ज्या रेडिसन्स ब्ल्यूमध्ये ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटीझन्सची सभा अर्थात सी-२० भरली त्याचे थेट वार्तांकन करण्याची परवानगीच नागपूरकर माध्यमकर्मींना नव्हती!या परिषदेमध्ये फक्त विविध विषयांवर विचार प्रक्रियेचे आदान-प्रदान होणार होते त्यात पत्रकारांचे काय काम?पत्रकारांना पीआयबीकडून मिळणा-या बातम्यांमधूनच नागपूरकर वाचकांना संपूर्ण घडामोडीची माहिती पोहोचवण्याचे नियम होते.मात्र,तरीही पत्रकारांना या व्यतिरिक्त पाहूणे-राहूणे यांच्याशी संवाद साधायचा असेल,माहिती घ्यायची असेल तर रेडीसन ब्ल्यूच्या परिसरातच त्यांच्यासाठी मिडीया लॉन्च तयार करण्यात आला.एवढंच नव्हे तर दर सत्रानंतर, पाहूण्यांना वाटल्यास ते स्वत: येऊन मिडीयासोबत माहिती शेअर करतील असे ही परिषद सुरु होण्याच्या एक दिवसा पूर्वी नागपूरकर मिडीयासाठी,प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत एक प्रमुख समन्वयक असणारे डॉ.स्वदेश यांनी सांगितले होते.

मात्र,असे काहीही घडले नाही,मिडीया लॉन्चमध्ये एकाही विदेशी किवा स्वदेशी प्रतिनिधींनी ढूंकून सुद्धा पाहीले नाही!याचे कारण मिडीया लॉन्च हा ज्या जागेवर घाईघाईत परिषदेच्या दोन दिवसांपूर्वी तयार करण्यात आला ती जागा या हॉटेलची स्टोअर रुम होती.या ठिकाणी संपूर्ण हॉटेलमधले पडदे,चादरी व इतर साहित्य धुण्यासाठी आणून ठेवली जात होती!‘सत्ताधीश’ने खास या ‘उजाड’ जागेचा मागोवा घेतला असता नाव न छापण्याच्या अटीवर हॉटेलच्याच एका सुरक्षा रक्षकाकरवी या जागेची सत्यता समोर आली!मिडीयासाठी त्यातील थोडीसी जागा रिकामी करण्या आली व संपूर्ण माल हा उर्वरित जागेत ठूसण्यात आला!

अशा ठिकाणी स्वदेशी-विदेशी पाहूण्यांना नागपूरकर माध्यमकर्मींसोबत संवाद साधण्यासाठी आणलेच जाणे शक्य नव्हते,त्यामुळेच डॉ.स्वदेश यांनी जे भव्य चित्र पत्र परिषदेत रंगवून सांगितले होते ते सपशेल खोटे ठरले.

या ठिकाणी माध्यमकर्मीना जे जेवण पुरवण्यात आले ते देखील चवीला फार खराब असल्याची तक्रार आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्य हॉटलच्या पार्किंग जागेच्याही समोर असणा-या या ठिकाणी सुलभ शौचालयाची कोणतीही व्यवस्था करण्यातच आली नाही!फक्त एक ‘वॉश रुम’चा फलक एका ठिकाणी लटकवण्यात आला,पुढे पूर्ण उजाड जागा होती,जेणेकरुन माध्यकर्मी महिला व पुरुषांनी समोरच्या उघड्या जागेवरच आपले नैसर्गिक विधी उरकावे,असा अर्थ माध्यम अायोजकांना कदाचित अभिप्रेत असावा!मनपाचा एखादा मोबाईल टॉयलेट देखील या ठिकाणी ठेवण्यात आला नसल्याने अनेक माध्यमकर्मींना मुख्य हॉटेलमध्ये जाऊन आतील रिपेश्‍नसजवळील वॉशरुम वापरावा लागत होता!

(छायाचित्र :पाहूणे आलिशान हॉटेलात.. नागपूरकर मिडीया हॉटेलच्या कच-याच्या सानिध्यात! लाखांच्या जाहीराती घेतल्यात ना?मग बघा आणि गप्प बसा….!))

प्रेस इन्फॉरमेशन ब्यूरोतर्फे मिळणा-या माहितीत चुकीचे नाव चुकीचे फोटोज प्राप्त होत असल्याची देखील तक्रार समोर आली.विशेष म्हणजे जी-२० च्या बेवसाईटच्या शेड्यूलवर नागपूरातील सी-२० चा कोणताही उल्लेेख आढळून आला नसल्याचे देखील बोलले जात होते.असे जर घडले असेल तर राज्य सरकारचे २०० कोटीं हे पाण्यात गेले समजावे,अशी देखील कुजबुज ऐकू आली.

(छायाचित्र : वॉश रुमचा फक्त फलकच आहे….सीआयडीच्या दयालाही शोधून सापडणार नाही! दया…कुछ तो गडबड है!)

भाजपच्या माजी नगरसेविका व आमदार परिणय फूके यांच्या सुविद्य पत्नी परिणिता फूके यांच्याकडे नागपूरातील माध्यमकर्मीसोबत समन्वयाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र त्या एकदाही मिडीया लॉन्चमध्ये फिरकल्या नसल्याची बाब समोर आली आहे!

नागपूर शहरातील या सी-२० आयोजनावरील चर्चेत मात्र सहभागी झालेल्या काही स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांशी ‘सत्ताधीश‘ने संवाद साधल्यावर, ही परिषद खरोखरंच ‘मेरा भारत महान’ची सिद्धता करणारी असल्याचे त्यांनी सांगितले,‘वसुधैव कुटुंबकम‘या वैचारिकतेला तोड नसल्याचे सांगून, या परिषदेत ज्या दर्जाची चर्चा घडली त्याने ते तृप्त झाल्या असल्याचा अभिप्राय त्यांनी कळवला.
………………………….

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या