
(व्हिडीयो-भाजपतर्फे झालेल्या अतिशय थंड स्वागताचा आणि शहा यांच्या क्षणात गच्छंतीचा!)
विमानतळावर दोन तास ताटकळत बसलेल्या माध्यमकर्मी व कार्यकर्त्यांशी शहा यांचा एक ही शब्दाचा संवाद नाही
काहीच गर्दी नसल्यानेच न बालल्याची चर्चा!
नागपूर,ता.१७ फेब्रुवरी २०२३: बहूप्रतिक्ष्त अश्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन आज शुक्रवार दिनांक १७ जानेवरी रोजी महाराष्ट्राच्या उपराजधानीत झाले,विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत होणार असल्याची बतावणी देखील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत व्हॉट्स ॲप ग्रूपवर जनसंपर्क पदाधिका-याने टाकली,गृहमंत्री पद हे काही छोटे मोठे पद नसून संपूर्ण देशाची अंतर्गत व बार्ह्य सुरक्षा व्यवस्थाच ज्यांच्या ‘भारदस्त‘खांद्यावर आहे,असे भारदस्त व्यक्तिमत्व उपराजधानीत येणार व पक्षातर्फे त्यांचे जंगी स्वागत होणार आहे,या घोषणेनंतर उपराजधानीतील सर्वच मिडीया क्षेत्रातील माध्यमकर्मींनी विमानतळाकडे धाव घेतली.
सुरवातीला सायंकाळी ७ ची वेळ देण्यात आली,यानंतर आठ पर्यंत येणार असल्याची ‘अचूक‘वेेळ सांगण्यात आली मात्र दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांनी भाजपच्या जनसंपर्क पदाधिका-यांनी शहा यांचे विमान एक तास आधीच येणार असल्याने ते ६ वाजताच विमानतळावर येणार असल्याचा मॅसेज ग्रूूपवर टाकला.परिणामी,हातातली कामे सोडून माध्यमकर्मींनी सहा वाजण्यापूर्वीच विमानतळ गाठले.
अमित शहा हे लोकमततर्फे आयोजित कार्यकम्रासाठी येत असल्याने लोकमततर्फे विमानतळावर भव्य असे विविध स्लोगनने अलंकृत केलेले कटआऊट्स झळकत होते मात्र ज्या पक्षाची सत्ता केंद्रात व राज्यात आहे त्या पक्षातर्फे विमानतळावर शहा यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी कुठेही दिसली नाही.
कार्यकर्ते हे देखील अगदी वेळेवर व मोजकेच आले.सायंकाळी साढे सात नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे स्वागत स्थळी प्रकटले.आज निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षालाच ‘खरी‘शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब केले,याशिवाय धनुष्यबाण चिन्हावर देखील शिंदे गटाची माहोर उमटवली.परिणामी राज्यात एवढ्या मोठ्या घडामोडीकडे लक्ष न देता नागपूरातील माध्यमकर्मींचे डोळे अमित शहा यांच्या आगमन व भव्य स्वागताकडे लागले होते.
तत्पूर्वी भाजपच्या पदाधिका-यांनी मंचावरील माईकवरुन जय-विजयाच्या घोषणांचा सराव ही करुन घेतला होता.बँडवाले देशभक्तीपर धून वाजवितच होते.बावणकुळे यांचे आगमन होताच निवडणूक आयोगाच्या निकालावर त्यांची प्रतिक्रिया उरकून घेण्यात आली.यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वागत स्थळी प्रकट होत,याच विषयावर उस्फूर्ततेने प्रतिक्रिया दिली व पुन्हा गायब झाले.
शिणलेल्या,दमलेल्या देहाच्या माध्यमकर्मींच्या कानांना अमित शहा यांच्या दोन प्रेमाच्या,आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या शब्दांची आस होती,सगळ्यांचे कॅमरे,मोबाईल हे सीमेवर सज्ज असणा-या जवानांसारखे तयार होते,अखेर आठ वाजता शहा यांचे विमान रन-वे वर उतरले.आगत स्वागत झाल्यावर एकदाचे ते स्वागत मंचावर आले.
जयजयकारच्या घोषणांनी आसमंत दुमदुमायला गर्दी होतीच कुठे?अवघे दीड दोनशे कार्यकर्ते यांनी कंठाला जोर देऊन घसा मोकळा केला.माध्यमकर्मींचे तर हे कामच नाही घोषणाबाजी करने!
भला मोठा हार आणून शहा यांच्या गळ्याचा माप घेण्यात आला,कारण एवढा मोठा हार गळ्यात टाकताच येत नाही,उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक टोक धरुन फूलांचा तो हार शहा यांच्या गळ्याशी लावला,शहा यांनी हात जोडले व माध्यमकर्मींच्या डोळ्याची पापणी लवते न लवते ते तरातरा मंचावरुन उतरुन आपल्या भव्यदिव्य वाहनात बसून अदृष्य ही झाले!
मंचावर एक सोडून दोन दोन माईक लावण्यात आले होते.माजी नगरसेवक संदीप गवई यांनी दोन्ही माईक योग्यरित्या सुरु आहे ना?हे अनेकदा तपासून बघितले,त्यामुळे माध्यमकर्मींनाही वाटले शहा हे एक सोडून दोन्ही माईकमध्ये काही तरी बोलतील…..!
माध्यमकर्मींसोबत त्या दोन्ही माईक नावाच्या यंत्रांची देखील घोर निराशा झाली.सब ठगे से रह गये….! काय झालं,कळायला मार्गच नाही,आतापर्यंत ऐ तुझा कॅमरा खाली कर,तुझा मोबाईल खाली कर,एे तुझा हात खाली कर,सगळे एंगल घेण्यासाठी सरसावले असताना शहा मात्र काहीही न बोलता ‘टाटा बाय बाय’करत मंचावरुन तरातरा उतरुन निघून ही गेलेत!
निदान भाजपचे जेवढे काही कार्यकर्ते जमा झाले होते किवा माध्यमकर्मींसाठी तरी दोन शब्द…फक्त दोन शब्द शहा बोलले असते तर….!दमलेल्या मनांना,थकलेल्या पायांना,आसुसलेल्या कानांना तेवढेच बरे वाटले असते.नुकतेच नागपूर नगरीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भव्य व जंगी स्वागत याची देही याची डोळा अनुभवले होते,मग इथे तर देशाचे गृहमंत्री येणार होते.अनिल देशमुखांसारखेच स्वागत शहा यांचे होणार असा काहीचा ‘गैर‘समज माध्यमकर्मींचा झाला असावा.ते सगळं कॅम-यात टिपण्यासाठी,टिपटाप न होताच आपापल्या यंत्रांसह विमानतळ त्यांनी गाठले होते.
मात्र,देशाच्या गृहमंत्र्यांचे आगमन आणि…दीड दोनशे कार्यकर्ते!शहांच्या चाणाक्ष नजरेने क्षणात ही गर्दी ओळखली आणि आपले भारदस्त शब्द एवढ्या कमी गर्दी पुढे मुळीच खर्ची न पाडता, आपले शब्द सहेजून निघून ही गेलेत.हीच जर हजार,दीड हजार कार्यकर्त्यांची गर्दी असती तर कदाचित शहा यांनी त्यांची दखल घेत निदान दोन शब्द तरी आभाराचे मानले असते, की ते त्यांच्या स्वागतासाठी आलेत,थांबलेत,जयजयकार केला,पण?
शहांचे फक्त क्षणिक दर्शन आणि फूलाच्या हाराने स्वागत इतकेच फूटेज जर मिळणार होते तर ते अनेक राजकीय नेत्यांच्या फेसबुक पेजवरुन ही मिळवता आले असते,त्यासाठी अखंड दुखदायी पायउभारणी कशाला? भारतीय जनता पक्षाचा ‘फ्लॉप शो‘ म्हणत असा चरफडत त्रागा करीतच मग माध्यमकर्मींनी विमानतळावर सोडले.




आमचे चॅनल subscribe करा
