फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजशंभर कोटींच्या डोममधून विद्यार्थ्यांना काय लाभले?

शंभर कोटींच्या डोममधून विद्यार्थ्यांना काय लाभले?

Advertisements

(रविवार विशेष)

भारतीय विज्ञान परिषदेच्या ढिसाळ व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी

ट्रेव्हल्स ॲण्ड टूरिझमचा डोम म्हणजे अर्थकारण साधण्याचे ठिकाण:माजी विद्यार्थ्यांना बसण्याची देखील परवानगी नाकारण्यात आली!

पद्मश्री राही पोपरे यांचा खुलासा चुकीचा:भाषण लवकर संपवण्याची सूचना करण्यात आली होती:विद्यार्थ्यांची ग्वाही

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता ७ जानेवरी २०२३: देशातील सर्वोच्च विज्ञान मेळावा असलेल्या १०८ व्या भारतीय विज्ञान परिषदेचा समारोप शनिवारी झाला.या परिषदेला केंद्राकडून,राज्याकडून,बँकांकडून मिळणारे डोनेशन,खासगी महाविद्यालयांकडून मिळणारा निधी,शेकडो स्टॉल्ससाठी घेण्यात आलेली रक्कम,विद्यार्थ्यांकडून परिषदेत उपस्थित राहण्यासाठी,जेवणासाठी,मान्यवरांच्या अनुभवातून ज्ञान मिळवण्यासाठी हजारो रुपयांचे मिळालेले पंजीकरण शुल्क इत्यादी या सर्व मार्गातून शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल झाली असल्याची बाब समोर आली आहे,मात्र या कोटीच्या कोटी उड्डाणातून ज्यांच्यासाठी हा भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेचा नागपूरात घाट घातल्या गेला त्या परिषदेतून या विज्ञान परिषदेचे खरे लाभार्थी असणा-या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना काय लाभ झाला?हा प्रश्‍न आता चर्चिला जात आहे.

सर्वात मोठी उणीव म्हणजे या परिषदेचा हवा तसा प्रचार झालाच नाही,असा संताप अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना व्यक्त केला.नागपूर शहरात पाचपावली सारख्या ठिकाणी असणा-या एका आश्रम शाळेतील अतिशय हूशार विद्यार्थी वर्ग देखील या परिषदेच्या आयोजनाविषयी अनभिज्ञ आढळला.राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान परिषद आपल्या शहरात होत आहे हे योग्यरित्या शहराच्या कानाकोप-या पोहोचलेच नाही.विशेष म्हणजे ही परिषद नागपूरात होणार असल्याची माहिती आयोजकांना एका वर्षा आधीच माहीती झाली असल्याचे सूत्राने सांगितले.तेव्हा पासूनच या विज्ञान परिषदेचे योग्य नियोजन,व्यवस्थापन व प्रसिद्धी झाली असती तर फक्त नागपूरातीलच नव्हे तर देशभरातील विद्यार्थ्यांचा यात उस्फूर्त सहभाग आढळला असता.

अंदाजे दीडशे कोटींची उलाढाल असणा-या या परिषदेचे नियोजन मात्र यातून बक्कळ आर्थिक लाभ पदरात पाडून घेणा-यांच्या हातात देण्यात आल्याचा आरोप देखील अनेकांनी केला.नाही वर्षभर तरी किमान महिनाभर आधीपासून मोठ्या प्रमाणात जाहीरात व्हायला हवी होती,त्यामुळे शहरातील आणखी शाळा व महाविद्यालयांच्या सहभाग वाढला असता,असे मत त्यांनी नोंदवले.

याशिवाय या परिषदेत प्रदर्शन होतं,प्रोजेक्ट होते,पेटेंट होते पण ज्ञान?ज्यासाठी ही परिषद प्रख्यात असते ते उच्चतम दर्जाचे ज्ञान १०८ व्या परिषदेतून मिळाले नसल्याची खंत देखील अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.परिषदेतील सर्वात मोठा भाग तर खासगी सेक्टरने आपापले प्रोडक्ट विकण्यासाठी व मार्केटिंकसाठी काबिज केले होते!यातून कोणते ज्ञान मिळणार होते?नाव भारतीय विज्ञान काँग्रेस पण विज्ञान सोडून मार्केटिंगचे तंबूच मोठ्या प्रमाणात ‘ज्ञानपिपासू ’विद्यार्थ्यांना आढळले.

याहून कहर म्हणजे विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या प्रसिद्धीसाठीचे तंबू हे मुख्य डोमच्या फार मागे अगदी छोट्या-छोट्या जागेत लावण्यात आले होते,याचे दिशानिर्देश करणारे फलक देखील कुठेही नव्हते.परिषदेत येणा-या हजारो विद्यार्थ्यांना,विद्यार्थ्यांनी शोध लावलेल्या या संशोधनाच्या ज्ञानाविषयी माहितीच नव्हते! ज्या महाविद्यालयाजरन विद्यार्थ्यांचक शोध,पेटंट,स्टार्ट अप्स आणि संशोधनाचे स्टॉल्स या परिषदेत होते त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी हे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तंबूंचा ‘शोध’घेताना परिषदेत आढळले!सर्वात संतापजनक बाब म्हणजे ऐरवी आपापल्या उत्पादनांचे फलक सर्वदूर परिषदेत झळकत असताना,एका टोकावर असणा-या फूड कोर्टसाठी फलकच लावण्यात आले नव्हते!त्यामुळे अनेक ‘उपाशी ’जीव मोठमोठ्या डोमला प्रदक्ष्णिा घालतानाच आढळले!

केंद्रिय विभागाच्या विविध विभागांना मुख्य प्रवेश द्वारासमोरच मोठमोठ्या डोममध्ये जागा मिळाली मात्र ज्या विज्ञान परिषदेचा मुख्य हेतू व साध्यच हे ‘विद्यार्थी आणि त्यांची ज्ञानपिपासा’आहे ते साध्यच मोठमोठ्या डोममागे कुठेतरी छोट्याशा जागेत झाकोळले गेले होते!
शासकीय आणि खासगी विभागांना प्राधान्य,जेवणाचे आणि खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्सही अग्रभागी मात्र ‘विद्यार्थी‘हा घटक सर्वात मागे,हेच वैशिष्ठ प्रामुख्याने या १०८ व्या भारतीय विज्ञान परिषदेतील आयोजना विषयी आता सांगावे लागत आहे.

जेवणावळीचे(फूडकोर्ट) एक सोडून चार-चार मोठमोठे डोम मुख्य प्रवेश द्वाराच्या उजव्या हातावर सर्वात कोप-यात होते,सन्मानीय निमंत्रितांसाठी व्हीआयपी जेवणावळीचा डोम असतानाही आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे ते देखील याच सर्वसामान्यांच्या जेवणावळीच्या डोममध्ये जेवणासाठी आलेले आढळले!आयोजकांना निमंत्रितांना परिषदेसाठी बोलविण्याची मोठी घाई मात्र त्यांच्या योग्य ‘पाहूणचाराची ’अश्‍याप्रकारे दखल घेतल्याने देखील अनेक विद्यार्थ्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली.चर्चासत्रांच्या बुजबुजरेपणात त्यांना कोणीही योग्य मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही,हे विशेष.

विद्यार्थ्यांकडून आयोजकांनी २०० रुपये मेंबरशिपचे व १२०० रुपये प्रति व्यक्ती नोंदणीचे घेण्यात आले.अर्थात यात त्यांना बॅग,ओळखपत्र व १७ पुस्तके मिळाली.३ तारखेपासून तर ७ तारखेपर्यंत या १४०० रुपयात विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्‍ता व दोन्ही वेळेचे जेवण ही देण्यात आले मात्र त्यांना प्रदान करण्यात आलेले ओळखपत्र कागदी व इतके तकलादू होते की दुस-याच दिवशी ते फाटायला आले,त्यावरील बारकोड फाटू नये म्हणून विद्यार्थ्यांना ती ‘अमूल्य’ ओळखपत्र जपून ठेवावी लागली,हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका विद्यार्थ्याने सांगितले माझ्या फक्त एका ओळखपत्रावरील बारकोडवर माझे चार मित्र जेवून आलेत!

याचा अर्थ या फूडकोर्टमधील स्कॅनिंग मशीन देखील कोणत्या दर्जाची होती,याची प्रचिती येते.एकाच ओळखपत्रावरील बार कोड एकाच दिवशी एकाच वेळी चार वेगवेगळे मित्र स्कॅन करुन जेवत असतील तर,खरंच ही भारतीय विज्ञान परिषद, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच असल्याची ग्वाही देखील मिळते,असेच आता म्हणावे लागेल.
१०७ वी परिषद ही बंगलोर येथे भरवण्यात आली होती.या परिषदेत विद्यार्थ्यांना पैसे भरल्यानंतर नोंदणीकृत झालेले जे ओळखपत्र प्रदान करण्यात आले होते,त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र लावण्यात आले होते,एवढंच नव्हे तर त्या ओळखपत्राचा दर्जा हा तकलादू नसून उच्च प्रतिचा होता,हे विशेष!त्यामुळेच नागपूरातील सन्माननीय आयोजकांनी ज्या कंत्राटदाराला ओळख पत्र बनविण्याची कामगिरी साेपवली,त्या कंत्राटदाराची व ‘टक्केवारी’ खाणा-याची चौकशी होणे गरजेचे आहे,असा ही सूर परिषदेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थी वर्गामध्ये उमटला.

याशिवाय बाहेरुन,इतर राज्यातून व शहरातून आलेल्यांसाठी राहण्याची व जेवणाची जी सोय आयोजकांनी केली होती त्याचा देखील पहील्याच दिवशी ३ जानेवारी रोजीच फज्जा उडाला.अनेकांना नियोजित जागेवर जागाच मिळाली नसल्याने परिषदेसाठी येणा-या हजारो आगंतुकांनी पदरातला पैसा खर्च करुन,स्वत:ची सोय करुन घेतली.
परिषदेत विज्ञानावरील भरगच्च चर्चासत्रे,व्याख्याने इत्यादी आयोजित करण्यात आले मात्र नेमक्या कोणत्या डोममध्ये कोणाचे व्याख्यान सुरु आहे हे शोधण्यातच आगंतुकांचा अर्धावेळ वाया जात होता.योग्य जागी पोहोचेपर्यंत अर्धा कार्यक्रम पार पडलेला असायचा,यामुळे देखील अनेकांची निराशा झाली.अर्ध्या हळकुडांने पिवळे होऊन म्हणजे ‘ज्ञानवर्धित’होऊन बाहेर निघण्याची वेळ त्यांच्यावर येत होती.यात ही आयोजकांची ‘कल्पकता ’दिसून पडली.डोरले सभागृह ते फार्मा सिटीकल,स्पेस पासून तर रिसर्च,इस्त्रो इत्यादी वरील ‘भाषणांची ’शोधाशोध करण्यापर्यंत परिषदेचा समारोपीय समारंभच जवळ आला होता!

आयोजन स्थळ ‘समतल’ करण्यात फार काही मेहनत घेण्यात आल्याचे कुठेही दिसून पडले नाही.नागपूरी स्टाईलने कार्यभार उरकण्याचीच प्रचिती, परिषद स्थळी आलेल्या दिव्यांगाना,ज्येष्ठांना,लहानग्यांना व आगंतुकांना आली.दिव्यांगांना देखील त्या ओबडधोबड जागांवरुन आपापल्या गाडीवर उसळी घेतच विविध डोमचे परिक्रमण करावे लागत असल्याचे दिसून पडले.खड्डा खड्डयातून उसळी घेत चालतांना अनेकांनी राष्ट्रीयस्तरावरील होणा-या या आयोजनाचे भरभरुन ’कौतूकच’केले!

या परिषदेत नोबेल पुरस्कारप्राप्त Ada Yonath या एकाच विद्ववांनाच्या ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला.त्यांना रसायनशास्त्रातील संशोधनामुळे २००९ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.असे आणखी नोबेल पुरस्कारप्राप्त विद्ववानांना आयोजकांनी आवर्जून आमंत्रित करायला हवे होते,अशी अपेक्षाही भौतिकशास्त्रातील एम.एस.सीच्या अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

५ जानेवारी रोजी शेतकरी विज्ञान परिषदेत पद्मश्री राही पोपरे यांनी ११.३० च्या सुमारास प्रर्दीघ भाषण केले.भरगच्च भरलेल्या त्या डोममध्ये राही पोपरे यांचे संशोधनात्मक अनुभव ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.यानंतर मात्र पार पडणा-या विमेन्स सायंस काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या डोममध्ये कांचन गडकरी यांच्या उपस्थिीतीत पार पडलेल्या कार्यक्रमात राही पोपरे यांचे भाषण अर्धा तास झाल्यानंतर त्यांना थांबविण्यात आल्याचे अनेक विद्यार्थी सांगतात.या कार्यक्रमाच्या आयोजक कल्पना पांडे यांनी राही पोपरे यांच्याजवळ येऊन त्यांना भाषण थांबविण्यास सांगितले यानंतर मात्र अर्धा मिनिट बोलून राही पोपरे आसनस्थ झाल्या.

या देखील घटनेची बरीच चर्चा माध्यमांमध्ये उमटली. कालच राही पोपरे यांनी पत्र प्रसिद्ध करुन, ना कुणी थांबवले ना अपमान झाला असे सांगितले.पोपरे हे केंद्र सरकारवर टिका करीत असल्याने त्यांना थांबविण्यात आल्याचा देखील आक्षेप घेण्यात आला.मात्र,पोपरे यांनी सर्व बाबी फेटाळून लावल्या.संयोजकांनी मला सन्मानाची वागणूक दिली,वेगवेगळ्या तीन व्यासपीठावर मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली.हे विचार व्यक्त करताना कुठेही थांबविण्यात आले नाही,मी माझ्या भाषणांमधून कुणावरही टिका केली नाही,असे पोपरे यांनी आपल्या पत्राद्वारे स्पष्टीकरण दिले,मात्र त्या वेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित अनेक प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोपरे यांना भाषण देताना थांबविण्यात आल्याच्या घटनेला दुजोरा दिला.त्यामुळे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून नागपूरात पार पडलेल्या या परिषदेत त्या वेळी त्यांच्या सुविज्ञ पत्नी कांचन गडकरी उपस्थित असल्यानेच हा वाद पोपरे यांनी शमविला असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात राज्यातील विद्यार्थी वर्ग, राही पोपरे यांच्यावरील धडा शिकत असतात.मात्र, त्यांनाच प्रत्यक्ष ऐकण्याची संधी वुमेन्स सायंस काँग्रेसच्या व्यासपीठावरुन विद्यार्थ्यांना मिळू नये,ही एकच घटना या परिषदेचे देदिप्यमान ‘यश’ठलकपणे अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.त्यांच्या नंतर दोन मोठमोठी भाषणे झाली,हे विशेष!याप्रसंगी कुलगुरु हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते!

या परिषदेसाठी गडकरी यांनी खासदार निधीतून पैसे दिले असल्याची देखील चर्चा आहे.गडकरी हे स्वत: आयोजकांच्या ढिसाळ व दर्जाहीन आयोजनावर नाराज असल्याचे खासगीत बोलले जात आहे.

एम.एस.सी.पीएच.डी च्या विद्यार्थ्यांची नाराजी देखील तीव्र अशी आहे.त्यांना हवा ताे कंटेंट या सर्वोच्च अश्‍या परिषदेतून मिळालाच नाही,अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.‘ज्ञान होते पण सामान्य होते’अश्‍या शब्दात ते आपली भावना व्यक्त करुन मोकळे झाले.पोस्टर लाऊन एक्सप्लेन करणे,आपापल्या उत्पादानांची विक्री करणे,यातून ज्ञानाची भूक शमविणे शक्यच नव्हते,अशी देखील खरमरीत टिका हे विद्यार्थीवृंद व विज्ञान क्षेत्रात देशाचे भविष्य घडवू पाहणारी देशाची भावी पिढी करताना आढळली.

आंगंतुकांना राहण्या जेवणासाठी तसेच आयोजनस्थळी आणण्या-नेण्यासाठी ज्या खासगी ट्रॅव्हल्ससोबत करार करण्यात आला,तो देखील वादग्रस्त ठरला आहे.महाविद्यालयाच्या तसेच नागपूर महानगरपालिकेच्या बसेस तर फक्त डिजेल खर्चाच्या करारावर आयोजकांनी वापरल्या मात्र अनेक खासगी बसेस चक्क भाड्याने घेऊन चालविण्यात आल्या.यात ही गौडबंगालाचे अर्थकारण साधण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.यात पंधरा वर्षे जुन्या,नियमबार्ह्य व कालबार्ह्य वाहनांचाही सर्रास वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे ’ट्रेव्हेल्स ॲण्ड टूरिझम’च्या तंबूत आपल्याच एका अश्‍या विद्यार्थ्याला बसविण्यात आले ज्याची स्वत:ची ट्रेव्हल एजंसी आहे!विद्यार्थ्याला या ठिकाणी बसणे यावर आक्षेप जरी नसला तरी पैशांची देवाण घेवाण व बुकींगची परवानगी कायद्यात बसत नाही.विशेष म्हणजे ही परिषद नागपूरात होणार असून दीड दोनशे कोटींची उलाढाल या परिषदेमार्फत होणार असल्याची चाहूल लागताच,या ट्रेव्हल एजंसीच्या मालकाला विद्यापीठाच्या या विभागात विद्यार्थी म्हणून एडमिशन देण्यात आली!असा धक्कादायक आरोप याच विभागातील काही माजी विद्यार्थ्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे केला. यावरुन गेल्या वर्षभरापासून या परिषदेसाठी आयोजकांतर्फे कश्‍याप्रकारची पूर्वतयारी करण्यात येत होती,हे निर्दशनास येतं.

या विभागातील आजी-माजी विद्यार्थ्यांना परिषदेसाठीच्या तयारीसाठी वारंवार बैठकींसाठी बोलावण्यात आले.या बैठकीत विभाग प्रमुख डॉ.प्रियदर्शी खोब्रागडे यांनी या परिषदेत येणा-यांसाठी राहण्याची व्यवस्था,एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी आणण्या नेण्याची व्यवस्था यासोबतच कोणाला नागपूर शहर व शहरा लगतच्या पर्यटन स्थळांवर जायचे असल्यास ट्रॅव्हल डेस्क़ची सोय,आयोजन स्थळी नोंदणी स्थळाच्या बाजूलाच करण्यात आल्याची माहिती दिली.रातूम नागपूर विद्यापीठाच्या पर्यटन प्रवास व पर्यटन विभागाला ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.

या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की इंग्रजी,हिंदी, व उर्दू विभागाच्या प्राध्यपकांकडे पर्यटन नोंदणीची जबाबदारी सोपविण्यात येईल.या पार्श्वभूमीवरच या विभागाच्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या पर्यटन संबधी व पॅकेजेसची माहिती जमा करण्यासाठी सांगण्यात आले.तसेच या प्राध्यापकांना या संबंधीचे ज्ञान देण्यास सांगितले गेले.फक्त दोन महिन्यांच्या कालावधीत या प्राध्यापकांना पर्यटन संबधीचे ज्ञान देणे शक्य नसल्याचे या माजी विद्यार्थ्यांनी डॉ.खोब्रागडे यांना सांगितले.चुकीचे व अर्धवट ज्ञान परिषदेसाठी नकारात्मकता पसरविणारे ठरु शकतात असे देखील त्यांनी सांगितले.मात्र,डॉ.खोब्रागडे यांनी या सबबीला गांर्भीर्याने घेतलेच नाही व फर्मान सोडले की माजी विद्यार्थी जे आता ट्रेव्हल एजेंट आहेत ते डेस्कवर नाही बसू शकणार.

ऐन वेळेवर मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक,या डेस्कसाठी नेमलेल्या इंग्रजी,हिंदी,उर्दूच्या प्राध्यापकांना इतर दूस-याच कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आणि एका अश्‍या विद्यार्थ्याच्या हातात या डेस्कची बागडोर देण्यात आली जो स्वत:एक ट्रेव्हल एजेंट आहे!त्याच्यासोबत बसणारे इतर विद्यार्थी डेस्कवर पर्यटनासंबंधी चौकशीसाठी येणा-या आगंतुकांना फक्त त्या एकाच विद्यार्थ्याच्या पॅकेजेसची माहिती प्रदान करीत होते!

विशेष म्हणजे हा तोच विद्यार्थी आहे ज्याने दोन महिन्यांपूर्वी पर्यटन विभागात पार पडलेल्या बैठकीत विज्ञान परिषदेतर्फे छापण्यात आलेल्या बुकलेटमधील पॅकेजेससाठी ‘बोली’ लावली होती की जो सर्वात कमी दाम सांगेल त्यालाच पर्यटन विभागातर्फे छापण्यात आलेल्या पर्यटन स्थळांचे पॅकेजेस करण्याची संधी मिळावी.याचा इतर ट्रेव्हल एजेंट्सनी त्याच वेळी पुरजोर विरोध केला.त्यावेळी ही बाब दाबून टाण्यात आली होती.

विज्ञान परिषदेत मात्र या विभागाचा हा डेस्क हाच विद्यार्थी एकहाती सांभाळताना दिसला,महत्वाचे म्हणजे त्या तंबूत ट्रॅव्हल एजंसी असणा-या इतर कोणत्याही आजी-माजी विद्यार्थ्यांना बसण्याची तर दूर उभे राहण्याची देखील परवानगी देण्यात आली नाही!अक्षरश: त्यांना हाकलून देण्यात येत होते!त्यांचे पॅकेजेस यांची माहिती त्यामुळे आगंतूकांनाही मिळू शकली नाही.सगळे कांऊंटर हाच एकमेवाद्वितीय विद्यार्थी, विज्ञान परिषदेच्या पाच ही दिवस सांभाळताना दिसला.

यावर कहर म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणित गाईड देखील त्याने या काऊंटरवर बसू दिले नाही!

त्यामुळेच या ट्रेव्हल डेस्कवरुन विकण्यात आलेल्या पॅकेजसमध्ये विभाग प्रमुखांची देखील ’टक्केवारी’ असल्याचा आरोप करण्यात आला.टक्केवारीमुळेच कायद्याच्या चौकटी पलीकडे व नियमांना ताक वर ठेऊन विभाग प्रमुखांनी ही खेळी खेळल्याचा आरोप या विभागाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी केला.

सत्ताधीश’ने याबाबत विभागप्रमुख डॉ.खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधला असता,या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.मनोज वाहणे हा त्याच विभागाचा विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. या डेस्कवर कमर्शियल ट्रेव्हल्स एजंट बसवण्या ऐवजी, ज्यांना इंटरशिप करायचं आहे त्यांना संधी देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.आम्ही आमच्या ट्रेव्हल एजेंट्स असणा-या माजी विद्यार्थ्यांना त्यांचे ग्रीटींग व व्हिजिटिंग कार्ड्स बनवून इंटरशिप करणा-या या विद्यार्थ्यांकडे देण्यास सांगितले होते जेणेकरुन त्यांच्या देखील पैकेजसची माहिती पर्यटकांना मिळू शकेल अशी देखील ऑफर दिली होती,असा खुलासा त्यांनी केला.

थोडक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व भारतीय विज्ञान काँग्रेस असोशिएशनच्या वतीने ३ ते ७ जानेवारी दरम्यान पार पडलेली दीडशे कोटींची ही सर्वोच्च परिषद म्हणजे अनेक बाबतीत ‘फ्लॉप शो’ठरली.नोंदणी केंद्रापासूनच या फ्लॉप शोची सुरवात होत होती.नोंदणी केंद्र मुख्य आयोजन स्थळापासून फार-फार लांब होते.पायपीट करुनच आंगतूक दमत होते.त्यांच्यासोबत लहान लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,दिव्यांगांचे देखील हाल झालेत.त्यात पर्यटन माहिती संबधीचे फलक देखील परिषदेत कुठेही लावण्यात आले नव्हते.

रातूम नागपूर विद्यापीठाला ही सर्वोच्च परिषद आयोजित करण्यास मिळाली ही नागपूरकरांसाठी गौरवाचीच बाब होती मात्र ज्या ढिसाळपणे हे आयोजन पार पडले,ते मांडण्यासाठी देखील मराठी शब्दकोषात, योग्य शब्द शोधावे लागतील आली असेच आता म्हणावे लागेल.ही एकमेव परिषद अशी होती की ज्याचे उद् घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले नाही.राज्य पातळीवर देखील पहीला दिवस सोडला तर नंतर कोणतेही मंत्री-संत्री,आमदार परिषद स्थळी फिरकलेच नाहीत.ऐनवेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष व पाहूणे बदलण्याची नामुष्की आयोजकांवर येत होती.राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप करावा लागला.

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याच्या आणि आगंतुकांच्या नजरेत ही परिषद पूर्णपणे अयशस्वी ठरली असतानाही, परिषद पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे अध्यक्षा डॉ.विजयालक्ष्मी सक्सेना यांनी समारोपीय कार्यक्रमात घोषित करुन स्वत:स्वत:ची पाठ ही थोपटून घेतली.किमान एक वर्षांचा काळ हातात असताना ही परिषद नागपूरकरांसाठी भूषणावह ठरली असती असे कार्य त्यांच्या हातून घडायला हवे होते मात्र, राज्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधित्व यात पाहायला मिळाले नसल्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये विषयांच्या वैविध्याचा आणि नावीन्याचा पूर्णपणे अभाव आढळल्याने नागपूरच्या नावलौकिकतेत मानाचा तूरा रोवण्यात, आयोजनाची जबाबदारी असणारे स्थानिक सचिव हे देखील पूर्णपणे अपयशी ठरलेत,यात दूमत नाही.

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या