फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपाच्या कर संकलनात सातशे कोटींचा भ्रष्टाचार!

मनपाच्या कर संकलनात सातशे कोटींचा भ्रष्टाचार!

Advertisements


प्रशांत पवार यांचा खळबळजनक आरोप

लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक कर थकित:वासवी लॉन्सवर ६४ लाख ३० हजार रुपयांची थकबाकी!

गरीबांचे भूखंड लीलावात:श्रीमंतांना भूखंडांवर कर चोरीतून सवलत!

सहायक आयुक्त करतात सरकारी जमीनीचाही लिलाव:अजब अधिका-यांचा गजब कारभार

मनपा आयुक्तांची नोटीस भ्रष्टाचाराचाच पुरावा

मनपा कंगाल अधिकारी मालामाल!आयुक्तांनी मनपा अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी करावी

नागपूर,ता.१६ डिसेंबर २०२२:महाराष्ट्राच्या उपराजधानीतील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या कर संकलन विभागातर्फे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून या विभागात जवळपास ७०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केला.

मुंबई महानगरपालिकेचे बजेट जवळपास ४६,००० कोटी रुपयांचे असून नागपूर मनपाचे बजेट २,२०० कोटी रुपयांचे आहे.त्यापैकी १,५०० कोटी शासकीय अनुदान असून नागपूर महानगरपालिकेच्या कर संकलन विभागातर्फे दरवर्षी फक्त ४०८ कोटींचेच कर संकलन होत असल्याचे ते म्हणाले.नागपूर शहरातील बांधकाम क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेता नागपूर मनपाला जवळपास २,००० कोटींचे कर संकलन करने सहज शक्य असताना,मनपाच्या सर्वच झोन कार्यालयाचे अधिकारी व सहायक आयुक्तांच्या भ्रष्ट कारभारांमुळे जवळपास १६०० कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.

नुकतेच मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी यांनी सर्व झोनच्या अधिका-यांना कर संकलन वेळेवर होत नसल्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्या.नागपूरच्या इतिहासात पहील्यांदाज सर्व झोन अधिका-यांना अश्‍या नोटीस देण्यात आल्या असून यातून कर संकलनातून भ्रष्टाचार होत असलेल्या आमच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे पवार म्हणाले.

झोनल अधिकारी व कर निरीक्षक यांनी कर निर्धारण करण्यासाठी नागरिकांकडून लाखो रुपये भ्रष्ट मार्गाने जमा केले, सोबतच शहरातील विविध व्यवसायिक प्रतिष्ठांनाचा कर ‘कमी’ करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला.

लक्ष्मी नगर झोन अंतर्गत येणा-या व मूळ कृषि विद्यापीठाच्या जागेवर अनाधिकृतरित्या चालणा-या बजाज नगर येथील ‘वासवी’ लॉन्सच्या वीस हजार फूटांच्या जागेपैकी फक्त पाच हजार फूटांवरील बांधकामांवरच दरवर्षी लक्ष्मी नगरचे झोनल अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून कर वसूल करीत आहेत,उर्वरित जागेवर लॉन असून या लॉनवर देखील दररोज विविध सोहळे पार पडत असतात मात्र लॉनच्या जागेवरील ‘ कर’संकलन न करता मनपाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्या जातो आणि स्वत:च्या तुंबड्या भरल्या जात असल्याचे ते म्हणाले.

नागपूर शहरात असे पाच हजारच्या वर व्यवसायिक भूखंड आहेत ज्यांचे योग्यरित्या कर निर्धारण केले तर मनपाला फक्त कर संकलन विभागाकडून तब्बल दोन हजार कोटींचा महसूल प्राप्त होऊ शकेल,असा दावा यायप्रसंगी प्रशांत पवार यांनी केला.

या सर्व गौडबंगालात मनपामध्ये कर संकलनासाठी गेल्या ६ वर्षांपासून जी एजंसी नियुक्त केली आहे ती देखील या सर्व भ्रष्ट कारभारात व मनपाचा कोट्यावधींचा महसूल बुडविण्या सम्मिलित असून,ही एजंसी भारतीय जनता पक्षाच्या एका माजी आमदाराची आहे व या एजंसीच्या भ्रष्ट कारभारावर अनेकदा मनपा सभागृहात ताशेरे ओढण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले.

एकीकडे मनपाच्या कर संकलन विभागातर्फे गोरगरीबांचे भूखंड जप्त करुन लीलाव केला जात आहे,दुसरीकडे मात्र हजारो व्यवसायिक भूखंडावर ‘पूर्ण’कर न आकारता भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.विशेष म्हणजे मनपाचे अधिकारी हे एवढे बुद्धिवान आहेत की ते सरकारी जागेचा देखील कर न भरल्यामुळे लीलाव करीत असल्याची टिका त्यांनी केली.

का नाही मनपाचा कर संकलन विभाग आणि ज्या खासगी एजंसीला मनपा दर महिन्याला याच कामाचे लाखो रुपये भुगतान देते ते अधिकारी, शहरातील कर न भरणारे किवा संगमताने कमी कर भरणारे लाखो व्यवसायिक भूखंड जप्त करीत नाही?या गौडबंगालात किवा ‘टक्केवारीत’मनपा आयुक्त ही सहभागी आहेत का?त्यांनाही शहरातील मंत्र्यांना यातून वाटा द्यावा लागतो का?असा प्रश्‍न उपस्थित करुन, आयुक्तांना या संपूर्ण भ्रष्ट कारभारात हात नसेल तर त्यांनी तातडीने ‘वासवी ’ लॉनच्या संपूर्ण वीस हजार फूट व्यवसायिक जागेवर नव्याने कर आकारावा आणि या लॉनच्या मालकाकडून थकीत असणारा ६४ लाख ३० हजार रुपयांचा कर वसूल करावा,असे आवाहन याप्रसंगी प्रशांत पवार यांनी मनपा आयुक्तांना केले.

मनपा आयुक्तांनी झोन आयुक्तांना कर संकलनासाठी फक्त ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून काहीही उपयोग नाही कारण अश्‍या नोटीसांना एका रुपयाची देखील किंमत नसल्याची टिका त्यांनी केली.फक्त प्रसिद्धी माध्यमात काही तरी ‘कृती’ केली हे ‘छापून’ आणण्यासाठीच मनपा आयुक्तांची ही कृती असल्याची जहाल टिका प्रशांत पवार यांनी यावेळी केली.

शहरातील अनेक इमारतींमध्ये व्यवसायिक कोचिंग क्लासेस चालतात मात्र त्या इमारतींवर देखील वाणिज्यिक करा ऐवजी सामान्य कर आकारला जातो.सर्व झोनच्या सहायक आयुक्तांकडे अश्‍या व्यवसायिक मालमत्तांची यादीच असते मात्र,ते ही यादीच बाहेर काढत नाही.गोर गरीबांशी मात्र ते रंगदारीने बोलतात,धन दांडग्यांकडे थकीत बिलासाठी जातात तेव्हा गार पाणि पितात,चहा घेतात,गोड बोलतात,अशी उपरोधिक टिका त्यांनी केली.

यानंतर शहरातील कोणत्याही गोर गरीबांकडे मनपाचे कर संकलन अधिकारी आलेत तर त्यांना चक्क कोंडून ठेवा व आम्हाला कॉल करा,असे आव्हान त्यांनी शहरातील कर दात्यांना केले.आम्ही त्या अधिका-यांचा सर्व कच्चाचिठ्ठा घेऊन हजर होऊ,मात्र कर दात्यांचा भूखंड जप्त होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.

अतिक्रमण केलेल्या अनाधिकृत जागेवर लग्न,वाढदिवस व इतर कार्यक्रम करण्यासाठी ग्राहकांकडून प्रती दिन पाच-पाच लाख रुपये वसूल केले जातात.मनपा अधिकारी व पोलिस प्रशासनाकडून असे प्रकार शहरात राजरोजपणे सुरु आहेत.कृषि विद्यापीठाच्या जागेवर चालू असलेल्या सर्व लॉन्सवर व हॉटेल्सवर लक्ष्मी नगर झोन अधिका-यांकडून सर्वाधिक कमी कर वसूल केला जातो.या जागेपासून कर संकलन विभागाला जवळपास ५० कोटी रुपयांचा महसूल सहज मिळू शकतो.परंतू झोनच्या सहायक आयुक्तांना हाताशी धरुन ५० कोटींऐवजी फक्त १ कोटींच्या कराचा भरणा केला जात असल्याचे ते म्हणाले.

या सर्व भ्रष्ट कारभारात मनपाचे प्रशासन पूर्णपणे गुंतले असून झोन अधिकारी व कर निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या प्रसंगी प्रशांत पवार यांनी केली.अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेवर सर्रास व्यवसायिक सोहळे पार पडत असून या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी देखील घेतली जात नाही.अग्निशमन विभागाकडून देखील लॉन्स किवा मंगल कार्यालये चालवण्याची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

एकीकडे नागपूरकर जनतेसाठी मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी मनपाकडे पैसा नसल्याची ओरड केली जाते, दूसरीकडे ‘मनपा कंगाल मगर मनपा अधिकारी मालामाल’असा कारभार गेल्या पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात सुरु असल्याची टिका यावेळी प्रशांत पवार यांनी केली.

जोपर्यंत या सर्व लॉन्स व मंगल कार्यालय,हॉटेल्स इत्यादीला शासनाच्या सर्व कायदेशीर परवानग्या व अग्निशमन विभागाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत ही सर्व कार्यालये चालविण्यास मनाई करण्यात यावी,अशी मागणीही त्यांनी केली.

पत्र परिषदेला ‘जय जवान जय किसान’संघटनेचे सहसचिव अरुन वनकर,समन्वयक विजयकुमार शिंदे,मिलिंद महादेवकर,रविंद्र ईटकेलवार,अभिनव फटिंग,प्रकाश डोंगरे,निलिकेश कोल्हे,उत्तम सुळके आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या