
बिल्डर्सच्या घश्यात जमीन देण्यासाठी हजारो नागरिक मुलांबाळांसोबत उघड्यावर:वस्तीधारकांचा आरोप
पोलिस कूमूकसोबतच सीआरपीएफच्या जवानांनी दडपले शांततापूर्ण आंदोलन:यश गौरखेडे यांचा आरोप
सामान्यांच्या घरांवर अतिक्रमणाचा बुलडोजर चालवणा-या मनपा आयुक्तांनी समस्येला भिडण्या ऐवजी काढला पळ!
फडणवीस यांची २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीआधी वस्तीधारकांना दिली आश्वासनाची ‘रेवडी’!भाजपवर वस्तीधारकांचा रोष
नागपूर,ता. २१ ऑक्टोबर २०२२: देशातील साढे सहा कोटी नागरिक हे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात तर त्यातील एक कोटीहून अधिक नागरिक हे एकट्या महाराष्ट्रात आहेत,हा अहवाल आहे ‘हाऊसिंग ॲण्ड अर्बन अफेयर्स मिनिस्ट्री ’ यांचा.उपराजधानी नागपूरमध्ये बारा लाख पाच हजारपेक्षा जास्त नागरिक ,४२६ झोपडपट्टयांमध्ये आपले आयुष्य कंठत आहे.असे असताना शहरातील हिंगणा रोडवरील टाकली सीम वस्तीवर मनपाद्वारे बुलडोजर चालविण्यात आल्याने, आज वस्तीतील हजारो नागरिकांनी मनपा मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.दुपारी बारा वाजता पासून शांततापूर्ण आंदोलन करणा-या आंदोलनकर्त्यांना हूसकावून लावण्यासाठी सायंकाळी चार वाजता नंतर स्थानिक पोलिस कुमूकसाेबतच सीआरपीएफच्या जवानांना बोलावण्यात आले,यावेळी ‘घर बचाओ आंदोलन समिती‘चे नेतृत्व करणारा सामाजिक कार्यकर्ता यश गौरखेडे याला अटक करण्यासाठी सीआरपीएफचे जवान सरसावले असतानाच आंदोलनकारी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला व याच धुमश्चक्रीत मनपा मुख्यालयासमाेर आज चांगलाच राडा झाला.
विशेष म्हणजे या वस्तीतील नागरिकांना विद्यमान राज्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधान सभा निवडणूकी पूर्वी या भागातील रस्ता हा ऐंशी ऐवजी चाळीस चौ.मी.चा करु मात्र वस्तीतील नागरिकांना बेघर करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले होते,असे असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर या वस्तीवर मनपातर्फे बुलडोजर चालवण्यात आले,यामुळे लहान लहान मुलांची अबाळ झाली,विद्यार्थ्यांना ऐन शालेय परिक्षांच्या काळात आयुष्याच्याच परिक्षेला सामोरे जावे लागले,अनेकांच्या परिक्षा बुडाल्या,ज्यांना शक्य आहे ते विद्यार्थी उधवस्त वस्तीतील मनपाच्या स्ट्रीट लाईट्सच्या खाली अभ्यास करीत आहेत.या वस्तीतील दोनशे कुटूंब मनपा अधिका-यांच्या हूकूमशाही व तानाशाही कारभारामुळे अक्षरश: उघड्यावर आलेत.
आंदोलन स्थळीच स्तनदा माता उघड्यावर आपल्या मुलाला दूध पाजत होती.माझ्या डोक्यावरच छप्पर राहीले नाही तर मी रस्त्यावर आपल्या मुलाची भूक नाही भागवणार तर कुठे भागवणार?असा व्यथित करणारा प्रश्न तिने माध्यमकर्मींसमोर उपस्थित केला.
२००६ मध्ये रेणूका डेव्हलेपर्सतर्फे टाकली सीम वस्तीतील नागरिकांच्या विरोधात न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती.२०११ मध्ये पहील्यांदा ही वस्ती बुलडोजरच्या चाकांखाली उधवस्त करण्यात आली.यामुळे येथील नागरिकांनी मनपाकडे त्यांच्या पुर्नवसनाची मागणी केली.यावर मनपाद्वारे या नागरिकांना काही काळासाठी याच ठिकाणी वास्तव्य करा,असे सांगण्यात आले
२०२२ मध्ये मात्र मनपातर्फे कोणतीही पूर्व सूचना न देता पुन्हा एकदा या वस्तीवर बुलडोजर चालविण्यात आले.मनपाच्या या कृत्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेकडो घरांतील दिवे अंधारले.लहान लहान मुले,महिला वर्ग हा उघड्यावर पडला.
पुर्नवसन न करता घरे बुलडोजरने उधवस्त केल्याने येथील रहीवाश्यांनी न्यायालयात दाद मागितली.मात्र या वस्तीतील रहीवाश्यांना इतर ठिकाणी घरे देण्यात आली असून ती भाड्याने देऊन पुन्हा वस्तीत येथील नागरिक राहण्यास असल्याचा ‘हलफनामा’ मनपातर्फे न्यायालयात सादर करण्यात आल्याने, न्यायालयाने मनपाच्या हलफनाम्यावर विश्वास ठेऊन तातडीने वस्ती उठवण्याचे निर्देश दिले,ज्यावर मनपाच्या अधिका-यांनी बुलडोजर चालवून ऐन दिवाळीच्या तोंडावर शेकडो नागरिकांना उघड्यावर आणले असल्याचे आंदोलनकारी महीलांनी माध्यमकर्मींना सांगितले.
आमची कुठेही घरे नाहीत.असते तर आम्ही झोपडपट्टीत कशासाठी राहयलो असतो?आपल्या तरुण मुलींना व मुलाबाळांना घेऊन झोपडपट्टीत राहण्यास कोणाला आवडतं?असा प्रश्न त्यांनी केला.
महत्वाचे म्हणजे नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या सामाजिक कार्यकर्ते यश गौरखेडे व बरखा पटनायक यांनी या बाबीचा मागोवा घेतला असता धक्कादायक वस्तूस्थिती समोर आली.टाकली सीमच्या रहीवाश्यांच्या नावाने त्यांच्या कागदपत्रांचा उपयोग करुन व त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत,पुर्नवसन योजनेत त्यांच्या नावे घरे तर देण्यात आली मात्र याचा पत्ताच येथील रहीवाश्यांना नसून त्यांच्या नावाने आवंटित झालेल्या घरकूलात इतरच कोणी वास्तव्य करीत आहेत!
मनपाचे चुकीने रहीवाश्यांना पत्र!
२०११ पासून मनपाच्या अधिका-यांनी हा गाेरखधंदा चालवला मात्र आपल्या नावे या शहरात कुठेतरी घरकुले आहेत,याची माहितीच वस्तीतील रहीवाश्यांना नव्हती!
या वस्तीतील एक नागरिक दूर्गा बिरहा याने सांगितले ,की मनपाच्या अधिका-यांनी २०११ मध्ये त्यांना एक पत्र दिले की दीक्षीत नगर नारीमध्ये त्यांना पुर्नवसनात घरकूल मिळाले आले आहे.मात्र दीक्षीत नगरमध्ये नेमके कुठे,कोणत्या क्रमांकाच्या घरात,कोणत्या भागामध्ये याचा कोणताही उल्लेख त्या पत्रात नव्हता!याबाबत मनपाच्या अधिका-यांना त्या भेटल्या असता,हे पत्र चुकीने त्यांना प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले!
या सर्व गौडबंगालविषयीची संपूर्ण कागदपत्रे माहिती अधिकार कार्यकर्ते अर्पित आठवले यांनी एकत्रित केल्यावर या वस्तीतील रहीवाश्यांसोबत मनपाच्या अधिका-यांनी फार मोठा धोका केल्याचे वास्तव समोर आले.या सर्व कागदपत्रांवर या वस्तीतील कोणत्याही रहीवाश्यांच्या स्वाक्षरी किवा अंगठ्यांचे ठसे नसतानाही त्यांच्या नावे घरकूले आवंटित करण्याचा चमत्कारिक पराक्रम मनपाच्या अधिका-यांनी केला.
या कागदपत्रांसोबत असलेल्या रसीदवर देखील या घरांचा कब्जा संबंधित रहीवाश्यांना कधी देण्यात आला याचा देखील उल्लेख नाही,विशेष म्हणजे हे आदेश फक्त छापील स्वरुपात असून यावर झोनच्या कार्यकारी अभियंतांच्या स्वाक्ष-या आहेत!
रहीवाश्यांनी त्यांच्या नावे आवंटित झालेल्या घरांचा शोध घेतला असता त्या घरांमध्ये पूर्वीपासून इतर कोणतेतरी कुटुंबिय रहात होते!याबाबत त्यांना विचारणा केली असता,या घरांमध्ये ते मनपाच्या काही भ्रष्ट अधिकारी व पदाधिका-यांच्या कृपेने १२ ते १५ वर्षांपासूनच राहत असल्याचे धगधगते वास्तव समोर आले.एवढंच नव्हे तर हे कुटूंबिय त्यांच्या नावानेच वीज बिले,पाणी पट्टी,घरांचा कर भरत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच आम्हाला हे वास्तव कळाले की आमच्या नावाने नारा येथे घरकूल मंजूर आहेत. मनपाच्या अधिका-यांनी नारा येथे राहत असणा-या विद्यमान कुटूंबियांकडूनही जबरीने ‘वसूली’केल्याचा आरोप ही तेथील कुटूंबिय करतात.
अधिकृतरित्या कोणतीही नोटीस न देता दोन दिवसांपूर्वी मनपाच्या आधिका-यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर शेकडो नागरिकांच्या घरावर बुलडोजर चालवले.दूसरीकडे न्यायालयाची देखील फसवणूक केली की,आमच्या नावे नारा येथे घरे आवंटित आहेत,आम्हीच ती इतरांना भाड्याने देऊन वस्तीत परत आलो!
चंदा थूल नावाच्या महिलेने सांगितले की,गेल्या २२ वर्षांपासून ती शिवकृष्ण धाम झोपडपट्टीत राहत आहे.तिला पट्टेवाटप देखील झाले आहे.सर्व प्रकारचे कर ती भरते.मात्र २०२२ मध्ये आता मूर्तजा कोठावाला नावाचा बिल्डर ही वस्ती रिकामी करण्याचा धमक्या देत आहे.या ठिकाणी ७०० पेक्षा जास्त रहीवाशी गेल्या २० वर्षांपासून राहत आहेत.
बिल्डर्स लाॅबीने सोन्याचा भाव असणा-या या जमीनींसाठी मनपाच्या आयुक्तांना, अधिका-यांना व माजी नगरसेवकांना लाच दिली असल्यानेच आमची घरे तोडली जात असल्याचा आरोप चंदा यांनी केला.
कायदा हेच सांगतो की पुर्नवसन केल्याशिवाय कोणाचीही घरे तोडली जाऊ शकत नाही मात्र स्लम पुर्नवसन प्राधिकरण(एसआरए)आणि मनपा या दोन्ही स्थानिक संस्था, वस्तीतील नागरिकांच्या पुर्नवसनासाठी पूर्णत:अपयशी ठरली असून, आता शहरातील अडीचशे झोपडपट्टयांचे नागरिक हे आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यश गौरखेडे यांनी याप्रसंगी दिला.
यशला अटक करण्याचा प्रयत्न विफल-
दूपारी बारा वाजता पासून या वस्तीतील नागरिकांनी यश गौरखेडे यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण आंदोलनाची सुरवात मनपा मुख्यालयासमोर केली.दूपारी चार वाजेपर्यंत त्यांनी नारेबाजी केली,आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.यावेळी पोलिसांची कूमूक आंदोलनस्थळी सकाळपासूनच उपस्थित होती.अचानक दूपारी चार नंतर सीआरपीएफच्या जवानांनी त्या ठिकाणी प्रवेश केला व यश गौरखेडे याला अटक करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या या कारवाईमुळे आंदोलनकारी महिला या संतप्त झाल्या व पोलिस,सीआरपीएफचे जवान व आंदोलनकारी महिलांमध्ये जोरदार राडा झाला.यावेळी सीआरपीएफच्या एका जवानाने आंदोलनस्थळी गर्दीचा फायदा घेत, एका महिलेसोबत अश्लील व्यवहार केल्याचा आरोप यश गौरखेडे यांनी केला.यामुळे वातावरणात आणखी ठिणगी पडली.
मात्र यश याने आंदोलनकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करीत या आंदोलनाच्या मूळ उद्देश्यापासून लक्ष भरकटविण्यासाठीच मनपा प्रशासन,पोलिस विभागाचा व बळाचा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.लाठीचार्जपर्यंत मजल या आंदोलनाने गाठली असताना यश गुरखेडेने आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले व पुढील अनर्थ टळला.
विशेष म्हणजे मनपा मुख्यालयासमोरील आंदोलन चिघळ्यानंतर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी मुख्यालयातूनच पळ काढल्याची माहिती यश गौरखेडे यांनी दिली.
मात्र शहरातील मोक्याच्या जागेवरील अनेक झोपडपट्ट्यांवर बिल्डर्स लॉबीचा डोळा असून, मनपा अधिका-यांना व काही माजी सत्ताधारी पदाधिका-यांना हाताशी धरुन शहरातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना बेघर करण्याचा डाव आखण्यात आला आहे,असा आरोप यश यांनी केला. आजच्या आंदोलनात फक्त अनेक वस्त्यांमधील प्रतिनिधींच उपस्थित होते,आता किमान वीस हजार झोपडपट्टीधारक मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला.




आमचे चॅनल subscribe करा
