

राख तलाव बांधकामावर प्रश्नचिन्ह:पाईपलाईनचे काम अद्यापही अपूर्ण
नागपूर,ता. १७ जुलै २०२२ : काेराडी विद्युत केंद्राच्या राख तलाव बांध फुटण्याच्या घटनेला गंभीर वळण मिळाले असून विद्युत केंद्रात आज पार पडलेल्या बैठकीत तलाव फुटण्यासाठी जबाबदार कोण?यावर चर्चा झडली.काेराडी केंद्राच्या दोन्ही मुख्य अभियंत्यांना प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोटीस दिली असल्याची माहिती बैठकीतील उपस्थित पदाधिका-याने दिली.याच संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बाेलविण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली.
कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रातील राखेच्या विर्सजनासाठी खसाळा येथे जो बंधारा बांधण्यात आला होता तो शनिवारी सकाळी १० वाजता फूटला.यातील लाखो टन राख वाहून गेली.हे राख मिश्रीत पाणी खसाळा,मसाळा,खैरी गावातून परिसरातील नदी नाल्यात जात असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
तलावाचा बांध फुटल्याप्रकरणी कारोडी विद्युत केंद्रात, परिसरातील गावातील सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली.या बैठकीत तलाव फुटीप्रकरणी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कारोडी विद्युत केंद्र अधिकारी व प्रशासनाला धारेवर धरले.या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोराडीच्या दोन्ही मुख्य अभियंत्यांना नोटीस बजावल्याची माहिती बैठकीतून समोर आली.
खसाळा राख बंधा-यातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी विशिष्ट पाइपलाईनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.परंतु या पाईपलाईनचे काम अद्याप अपूर्ण आहे,या वरुन या अधिका-यांचा पराकोटीचा बेजबाबदारपणा दृष्टक्षेपात येतो.या बंधा-याच्या देखभाल दुरुस्तीचे काम ‘अभी कन्ट्रक्शन’ंकंपनीला देण्यात आले होते.या बंधा-याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ही फार पूर्वीपासून केला जात आहे.
हे पण वाचा…..
यांना लाज कशी वाटत नाही…खसला फूटला सामान्यांच्या जीवावर उठला https://sattadheesh.com/?p=16065
या कामाची चौकशी करण्याची मागणी ही वारंवार सबंधित यंत्रणेकडे करण्यात आली होती.कामाचा दर्जा पाहून हा बंधारा फुटेल अशी शक्यता फार पूर्वीपासूनच व्यक्त करण्यात येत होती.मात्र संबंधित कंत्राटदार व अधिका-यांना या घटनेचा अंदाज का आला नाही?या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान,आज पुन्हा घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करण्यात आली.उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर,तहसीलदार अक्षय पोयाम,खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे,पंयायत समिती सभापती उमेश रडके,जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे,नाना कंगाले,खसाळ्याचे सरपंच रवी पारधी,खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे,कवळाचे सरपंच लक्ष्मण सिरसाम,वीज केंद्राचे मुख्य अभियंते राजेश कराळे,अभय हरणे,राजकुमार तासकर आदी उपस्थित होते.
दरम्यान आज कोराडीच्या दोन्ही वीज केंद्राचे मुख्य अभियंते राजेश कराळे,अभय हरणे,राजकुमार तासकर यांना प्रदुषण नियंत्रण मंडळाची नोटीस बजावण्यात आली असून चौकशी अंती दोषींवर कावाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी सांगितले.
महानिर्मितीने स्वखर्चाने द्याव्यात आरोग्य सुविधा-
राख मिश्रित पाणी शेतात गेल्यानंतर ती शेती पूर्ववत सुपीक बनवण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो.त्यामुळे शेतक-यांचे तीन वर्षे नुकसान होणार आहे.जिल्हाधिका-यांनी महसूल यंत्रणेला सर्व शेतक-यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेने परिसरातील पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असून ते ही तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सर्व नुकसान भरपाई महानिर्मिती कंपनीने स्वखर्चाने करुन देणे,गावातील आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा आता महानिर्मितीने पुरवाव्यात अशी मागणी सरपंचांच्या वतीने करण्यात आली आहे.

आमचे चॅनल subscribe करा