Homeनागपूर न्यूजयांना लाज कशी वाटत नाही...खसला फूटला सामान्यांच्या जीवावर उठला

यांना लाज कशी वाटत नाही…खसला फूटला सामान्यांच्या जीवावर उठला

Advertisements


औष्णिक वीज केंद्रे पाजणार नागपूरकरांना राखमिश्रीत पाणी!

हजारो हेक्टर शेतजमीन राखेत बुडाल्या:किमान तीन वर्षे शेतकरी करणार नापिकीचा सामना

मंत्री मंडळच अस्तित्वात नाही:नुकसान भरपाईच्या पोकळ घोषणा

नागपूर,ता.१६ जुलै २०२२: वीज निर्मितीचे दाेन औष्णिक वीज केंद्रे आहेत.खापरखेडा आणि कोराडी.कोराडीत दोन केंद्रे असून या केंद्रांतून कोळश्‍याद्वारे वीज निर्मितीनंतर त्या पासून निर्माण झालेली राख(फ्लाय ॲश)ही बंधारे बांधून साठवली जाते.यातील एक खसला नामक एक बंधारा आज सकाळी १० वाजता फूटला व हजारो क्यूसेस लीटर राखमिश्रीत पाणी हे नागपूरकरांना ज्या कन्हान नदीतून पाणी पुरवठा केला जातो त्या नदीत मिसळले,इतकंच नव्हे तर आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतजमीनीवरील उभी पिके, या राखमिश्रीत पाण्याखाली बुडाली.पुढील किमान तीन वर्षे तरी आता या राखेमुळे ही शेतजमीन नापिक झाली असून, वीजनिर्मितीच्या मुजोर,शिरजोर,बेफिकिर व ‘परंपरागत’नोकरशाही धोरणामुळे या भागातील शेतकरी पार उधवस्त झाला आहे.विशेष म्हणजे हे धरण फूटणार असल्याची माहिती या अधिका-यांना आधीपासूनच होती मात्र तरीही यावर तातडीची उपाययोजन करण्यात आली नाही,दूसरीकडे नागपूरकरांनाही आता राखमिश्रीत पाणी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून केवळ मानव जातीच नव्हे तर पशु पक्षी व मुकी जनावरे यांच्यावरही वीजनिर्मिती अधिका-यांच्या बेफिकिर धोरणांमुळे महाभयंकर संकट ओढवले आहे,आज सोशल मिडीयावर देखील या घटनेची दखल घेत ’यांना लाज कशी वाटत नाही!’हाच टिकेचा सूर उमटला.

खसला बंधारा हा वीज निर्मिती केंद्राने २५० एकरवर निर्माण केला होता.याच बंधा-यात दरराेज शेकडो टन राख जमा होत होती.यात ७० टक्के पाणी व ३० टक्के राखेची साठवणूक केली जात असते.केंद्र सरकारचाच नियम आहे या १०० टक्के राखेचा १०० टक्के पुर्नउपयोग करण्यात यावा मात्र या नियमांचा, हा अधिकारी वर्ग, १०० टक्के फक्त कागदोपत्रीच पालन करताना आढळत होता.

कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राची स्थापना होऊन ३५ वर्षांचा काळखंड लोटला तेव्हापासून या केंद्रातील राखेचे मिश्रण हे वारंवार नदींच्या पात्रात सोडले जात होते मात्र याकडे फारसे गांर्भीर्याने लक्ष देण्यात आले नाही.३० ऑक्टोबर २०२१ रोजी देखील खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून कन्हान नदीत राख मिश्रीत पाणी सोडल्याचा प्रकार पुढे आला होता.

कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्र यामुळे बंद कररण्यात आले होते. अशीच घटना दोन दिवसांपूर्वीही घडली.हे राखमिश्रीत पाणी कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या इंटेक वेलपर्यंत पोहोचले.वाहत्या पाण्यात फ्लाय ॲश दिसताच कर्मचा-यांनी जलशुद्धिकरण केंद्र बंद केले.फ्लाय ॲशमुळे पंप बंद पडण्याची शक्यता असल्याने वारंवार हे पंप बंद कराव्या लागण्याची घटना घडत आहेत, यामुळे शहरातील अनेक झोनमध्ये पाणी पुरवठा बाधित होत आहे.

या फ्लाय अॅशमध्ये मरक्यूरी,सिलीकॉन्ससारखे हेवी मेटल्स हे घातक रसायन असून,सुक्ष्म,अति सुक्ष्म कण पाण्यात मिसळतात.यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होतं.नदीतून पाणी पुरवठा करताना जरी ते शुद्ध केले जात असले तरी देखील हे पाणी ‘सजीव’ जीवांच्या पोटात जाण्याची शक्यता असते.यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले असून एकदा हे मेटल्स मनुष्याच्या शरीरात पाण्याद्वारे शिरल्यास पुन्हा बाहेर निघत नाहीत,असे सर्वेक्षण ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा लीना बुधे यांनी प्रसिद्ध केले आहे.

अश्‍या दूषित पाण्यामुळे किडनीचे विकार,लहान मुलांना पोटदूखी निर्माण होते,हाडे ठिसूळ होतात यासोबतच राखमिश्रीत पाण्याच्या सेवनाने जनावरांच्या तोंडालाही छाले आल्याचे निर्दशनास आले.अश्‍या जनावरांचे दूध मानवी पोटात गेल्यानेही अनेक विकारांचा ’उगम’होतो!

गेल्या ३५ वर्षांपासून आज या बंधा-यांमध्ये लीगेसी फ्लाय ॲशचा साठा २.४७ कोटी मेट्रीक टन आहे व दररोज यात भरच पडत असते.परिस्थिती अतिशय गंभीर असून या राख मिश्रीत बंधा-यांमुळे आजूबाजूच्या अनेक गावांतील पाण्याची भू-जल पातळी ही दूषित झाली आहे.अनेक गावातील लोक हे महाजनकोने निर्मित केलेल्या वॉटर एटीएम ऑरो प्लान्टचे पाणी ५ रुपये प्रति २० लीटर दराने विकत घेऊन आयुष्य ढकळत आहेत!

ग्रामीण असो किवा शहरी,नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी ही सरकार आणि शासनाची आहे मात्र काेराडी व खापरखेडा येथील वीज औष्णिक केंद्रांच्या अधिका-यांच्या ‘दूरदर्शी’धोरणांमुळे शहरातील नागरिकांवरही दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून ग्रामीण भागातील नागरिक तर पदरातला पैसा खर्च करुन पाण्याची गरज भागवित असताना दिसतोय.

विशेष म्हणजे हे पाणी आंघोळीसाठी वापरले असताना अनेकांना त्वचा रोगाला बळी पडावे लागले आहे.या दोन्ही राख मिश्रीत बंधा-यांमुळे अनेक गावातील विहीरी,नदी,नाले,बोअरवेलचे पाणी संपूर्णत:दूषित झाले अाहे तरी देखील खापरखेड्याच्या वीज केंद्रातील राख विर्सजित करण्यासाठी वारेगांव बंधारा बांधण्यात आला.हा बंधारा २५० एकर जागेवर नव्यानेच बांधण्यात आला असून नांदगांव येथील अश्‍याच राख विसर्जित केंद्रासाठी ७५० एकर जागा ही शेतक-यांकडून संपादित करण्यात आली.

ज्यांच्या शेत जमिनी घेतल्या,राखे खाली बुडवल्या त्यांना तर नुकसान भरपाई मिळाली मात्र ज्या शेतक-यांचा या बंधा-यांशी काहीही संबंध नाही तरीही त्यांच्या शेत जमिनी या बंधा-यांमुळे कायमच्या बाधित,दूषित व प्रदूषित झाल्यात त्यांना मात्र ’भगवान भरोसे’सोडून देण्यात आल्याचे विदारक दृष्य या ग्रामीण भागात दिसून पडतंय.माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याच वर्षी १४ फेब्रुवारी रोजी या नांदगांव बंधा-याला भेट दिली होती.

यावेळी त्यांनी बैठकीत नांदगांव फ्लाय ॲश बंधारा त्वरीत बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या एवढंच नव्हे तर याच बैठकीत वीज निर्मिती केंद्राच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले होते.या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांनी,गावाच्या सरपंचांनी आदित्य ठाकरेंसमोर पर्यावरण व जिविताच्या हानिची संपूर्ण उधवस्तताच मांडली होती!

आज खसला फूटला तसाच नांदगांव बंधारा फूटला तर सरळ पेंच नदीला प्रदूषित करणारा ठरेल.नागपूर शहराला पेंच नदीतूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो,परिणामी शहरातील ३० लाख नागरिकांचा जीव ही धोक्यात घालण्याचा प्रकार औष्णिक वीज केंद्राचे बेमुरव्वत अधिकारी करीत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

खसला बंधारा फूटण्या पूर्वीच खेरी गावापर्यंत राख मिश्रीत नाला ओव्हर फ्लो होऊन वहात होता.ग्रामीण लोकं या नाल्यातील पाण्याचा उपयोग करीत असतात.९ दिवस सतत पावसाने कहर बरपवताच औष्णिक वीज केंद्रांच्या अधिका-यांची पोल खोल झाली.सरकारी नोकरशाही नियम पाळत नसली तरी निसर्ग हा नियम पाळत असतो,हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले.या अधिका-यांनी मानसून पूर्वीच पाहणी करुन,दुरुस्तीची पाऊले उचलायला हवी होती मात्र ’सरकारी काम आणि ३५ वर्षे थांब’ही उक्ती नागपूरकरांच्या व ग्रामीण भागातील शेतक-यांच्या नशीबी आली.

सकाळी खसला फूटला यावर एक प्रेस नोट जारी करुन ही नैसर्गिक आपत्ती असल्याची मखलाशी करण्यात आली,हा आणखी एक ‘सरकारी’कहर आज नागरिकांवर बरपला.वीज निर्मितीनंतर उर्वरित राखेचे त्वरित १०० टक्के पुर्नवापर करने हा नियम असल्याने या राखेची साठवणूक अश्‍या बंधा-यांमध्ये करण्या ऐवजी त्याचा वापर सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात,वीटा भट्टीत इत्यादी ठिकाणी केला जाऊ शकतो.मात्र ‘आजचे मरण उद्यावर ढकलणारी वृत्ती’ असणा-या नोकरशाहीला एवढे कष्ट उपसण्याची सवयच नसल्याने,आज खसला बंधारा फूटला यासोबतच नागपूरकरांच्या ह्दयाचा ठोका तर चूकलाच मात्र आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेत जमिनीच्या मालकांंच्या उधवस्त अश्रूंचाही बांध फूटला.

माजी उर्जामंत्री व आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांनी या बंधा-यावर जाऊन पाहणी केली,नेहमीच्याच पठडीतील घोषणा केल्या.मंत्री मंडळ बैठकीत नुकसान भरपाईचा निर्णय घेऊ,दोषी अधिका-यांना शिक्षा करु मात्र ५ वर्ष ते उर्जाखात्यात ‘उर्जावान’ मंत्री असताना,आपल्याच मतदारसंघातील नागरिकांच्या उधवस्ततेला कारणीभूत ठरणा-या राखेचे नियाेजन करु शकले नाहीत,त्याचे काय?आता तरी या मानवनिर्मित आक्राळ विक्राळ समस्येचे निराकरण करण्यासाठी ते कोणती प्रभावी उपाययोजना तातडीने आखणार आहे,याचे उत्तर आता जनतेचे मायबाप असणा-या आमदारांना, औष्णिक वीज केंद्रांतील अधिका-यांच्या ‘नोकरशाही’ वृत्तीच्या काराभारामुळे, बाधित झालेली जनता मागत आहे.एवढी मोठी घटना घडल्यानंतर नागपूरकर असो किवा ग्रामस्थ त्यांना तात्पूरती मलमपट्टी नको.जुनेच राखेचे बंधारे सांभाळले गेले नाहीत अन खापरखेड्यासाठी बखारी-नांदगावचे दोन नवे बंधारे बांधून टाकण्यात आले!

(फूटलेल्या खसाळा बंधा-याचे निरीक्षण करताना माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे)

मूळात असे बंधारे बांधण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?अश्‍या बंधा-यामध्ये पाईपलाईनद्वारे राख विसर्जित करण्यापूर्वी खाली प्लास्टिक टाकणे हे बंधनकारक असताना पैसे नाहीत,या सबबीखाली खुशाल ग्रामस्थ व नागपूरकरांची थट्टा चालविली जात आहे!‘प्लास्टिक टाकणे परवडत नाही’ याचे अतिशय गंभीर परिणाम धरणी मातेला भाेगून द्यावी लागत आहे.शेवटी ते विष जमिनीतच झिरपत आहे.प्लास्टिकची लाईनिंग टाकण्याचे सौजन्य न दाखवून या अधिका-यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राला देखील केराचीच टोपली दाखवण्याचे दुस्साहस केले कारण या बाबीचे गांर्भीय ओळखून गडकरी यांनी वीज निर्मिती केंद्राच्या अधिका-यांना फार पूर्वीच प्लास्टिकच्या लाईनिंग टाकाव्या अशी सूचना केली होती!

ध्वनि प्रदुषण,जलप्रदुषण व वायुप्रदुषण या तीनही क्षेत्रात काम करने गरजेचे असून यासाठी मानके ठरवून नागपूर शहराला प्रदुषणापासून मुक्ती मिळेल,असा कार्यक्रम मनपाने तयार करावा व नागपूरला येत्या ५ वर्षात प्रदुषण मुक्त करावे अशी सूचना गडकरी यांनी गेल्या वर्षी १६ ऑगस्ट २०२१ रोजी मनपाच्या वतीने शहरातील तीन उद्यानांमध्ये लघु सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पाच्या उद् घाटनाप्रसंगी केली होती मात्र कोराडी औष्णिक वीज केंद्रातील अधिका-यांच्या ढिसाळ व बेजबावदार कारभारामुळे नागपूरांवरच प्रदुषण मुक्ती तर सोडा, उलट राख मिश्रीत घातक पाणी पिण्याची वेळ आली आहे.

हेच काय कमी होते की आणखी ६५० मेगावॉटचा आखणी एक वीज प्रकल्प हा देखील लवकरच कोराडी जवळ सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.चंद्रपूर शहराची दूर्दशा आज नागपूरकर बघतच आहे.तेथील औष्णिक वीज केंद्रांमुळे जगातील सर्वाधिक उष्ण शहरासोबतच सर्वाधिक प्रदुषित शहरात चंद्रपूरचा क्रमांक लागतो. तेथील घरोघरी कर्करोगाचे रुग्ण वाढले आहेत.आज नागपूरात ९ दिवस पाऊस कोसळून देखील पाऊस थांबताच, उमस व गर्मीचा जोर वाढताना दिसतोय,हजारो क्यूसेस धो-धो कोसळणारे पावसाचे पाणी, हे जमितीत कुठेही न मुरता नाल्यात गेले व वाहून गेले.

सरकारी अधिका-यांची नियोजनशुन्यता यासाठी जवाबदार असून नागपूर शहर जल,वायू व हवेच्या प्रदुषणाबाबत लवकरच चंद्रपूरच्या श्रेणीत जाऊन बसणार आहे,यात कोणालाही शंका नाही.

एकीकडे कोट्यावधींचे प्रकल्प आकारात येत असताना सामान्यांना मात्र या प्रकल्पांपेक्षा पिण्याचे शुद्ध पाणी,मलनिस्सारणाची प्रभावी व्यवस्था व आरोग्याची उत्कृष्ट सेवा एवढेच राजकारणी व प्रशासनाकडून अपेक्षीत आहे.यासाठी हा नागरिक कोट्यावधींचा कर सरकारी खजिन्यात जमा करीत असतो. त्यामुळेच आज खसाला येथे जे घडले ते अक्षम्य असून यासाठी कारणीभूत असणा-या बेजवाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे मात्र त्यांच्या लाखोंच्या पगारातून तीन वर्षांसाठी उधवस्त झालेल्या शेतक-यांना नापिकीची भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची देखील कठोर तजवीज सरकारने आता करावी,असा देखील उद्रेगाचा सूर आज समाज माध्यमात चांगलाच उमटला.

Latest बातम्या