

सुश्मिता सेन,ललित मोदी आणि शिगेला पोहोचलेला नेटीझन्सचा संताप
ललित मोदीचे ट्टीट’माय बिटर हाफ’अन् नेटीझन्सचे ‘वेश्या’पर्यंतचे कमेंट्स!
नागपूर,ता.१७ जुलै २०२२: जगातील एक अतिशय रम्य पर्यटन स्थळ मालदिववरुन, भारतीयांमध्ये बहूचर्चित असलेेले एक नाव, ललित मोदीने आपल्या अधिकृत ट्टीटर हॅण्डल व इंन्टाग्रामवर काल काही फोटोज व्हायरल केले त्यात शब्द होते ’माय बिटर हाफ’आणि ते बघून भारतीयांना चांगलाच मानसिक धक्का बसला.कोणी कल्पना ही केली नसेल अशी ‘राम मिलाई जोडी’ प्रत्यक्षात धरणीवर अवतरलेली बघून, भारतीयांचा संताप-संताप झाला. यानंतर सोशल मिडीयावर जो हडकंप माजला तो तर ‘अवर्णातीत’ आहे.कोणालाही माजी मिस युनिवर्स सुश्मिता सेन व पळपुटा ललित मोदी यांचे नाते रुचले नाही,अनेकांना या धक्क्यातून सावरताही न आल्याने सोशल मिडीयावर त्यांनी जे कमेंट्स केले हे त्या नेटीझन्सच्या मनाची,बुद्धिची,विचारपद्धतीची पातळीही ठलकपणे अधोरेखित करतात,मूळात सुश्मिता ही एक ‘खुली किताब’आहे जिच्या आयुष्यातील पाने कोणीही सहज वाचू शकतात,तरीही तिला ‘वेश्या’म्हणन्यापर्यंत नेटीझन्सची मजल गेली,याचे आकलन सुश्मिताने नव्हे तर सोशल मिडीयावर या पद्धतीने व्यक्त होणा-या नेटीझन्सनीच करण्याची खरी आवश्यकता आहे.
आता पर्यंत सुश्मिताच्या ‘अविवाहित’ आयुष्यात एक-दोन नव्हे तर तब्बल १२ प्रेमी आलेत.आयुष्याच्या वाटचालीत वेगवेगळ्या टप्प्यात तो-तो पुरुष तिच्या जीवनात आला,स्थिरावला मात्र ते नातं ’लग्न’या अतुट संस्कारापर्यंत पोहोचूच शकले नाही,याला अनेक कारण असतील,हा सर्वस्वी सुश्मिता हिचा खासगी विषय आहे,भारतीय नागरिक किवा भारतीय समाज तिच्यावर जबरदस्ती करु शकत नाही की अमुक पुरुष ,प्रियकर म्हणून तुझ्या जीवनात आला म्हणून आता तूला त्याच्याशी लग्न करावंच लागेल!’
आपला समाज खरं तर इतका संकुचित विचारांचाही नाही,आजपर्यंत सुश्मिताच्या जीवनात आलेल्या विविध पुरुषांच्या बाबतीत हाच समाज तिच्या खासगी आयुष्याचा सन्मान देखील राखत होता,आता मात्र हद्द झाली,चक्क ललित मोदी!हे नाव मात्र भारतीयांना अगदी आतून खटकले.केव्हा,कसे,कुठे सूत जुळले या दोघांचे?अन् सुश्मितासारख्या देखण्या,समजूतदार,बाणेदार नटीने प्रेमात पडावे तरी कोणाच्या?ललित मोदीच्या!
भारतीयांसाठी तो आयपीएलचा माजी संचालक आणि सुप्रसिद्ध व्यवसायिक असून पैश्यांच्या हेराफेरीतून तो आपलं चंबूगबाळे गुंडाळून विदेशात पळून जाणारा व भारत सरकारच्या नजरेतला एक पळपुटा बिजनेसमन आहे,एवढीच ओळख त्यांची भारतीयांच्या मानसपटलावर कोरलेली आहे.अश्या बदनाम,बेभरवश्याच्या माणसावर सुश्मितासारख्या नटीने भाळावे,चक्क लग्न करावे किवा लग्नाचे खंडण करावे,किवा ललित माेदीने फक्त नात्यात असल्याचे सांगावे व लवकरच लग्न करणार असल्याचा खुलासा नंतर पोस्ट करावा किवा मालदिवमधील ललित मोदीसोबतचे अंतरंग क्षणातील छायाचित्रे स्वत:ही सुश्मिताने सोशल मिडीयावर शेअर करावे,हे सगळंच अनाकलनीय व जबर मानसिक धक्का देणारेच आहे,हे मान्य करावंच लागेल.
ललित मोदीने सुश्मिता सोबतच्या नात्याचा खुलासा करीत, परिवारासोबत मालदीवमध्ये काही अत्यंत सुखद क्षण उपलभोगल्यानंतर पुन्हा लंडनमध्ये परत आलोय, माझी बिटर हाफ सुश्मितासोबत एक नवी सुरवात,शेवटी एक नवे जीवन,आज मी चंद्रावर आहो,असे पोस्ट करीत,या पोस्टसोबत त्याने सुश्मिासोबतच्या अंतरंग क्षणातील अनेक छायाचित्रे ही व्हायरल केली.यातील एक छायाचित्र त्यांच्या दिवंगत पत्नी व सुश्मितासोबचे देखील होते.ललित मोदीची ही पोस्ट निश्चितच भारतीयांना मानसिक धक्काच देणारी होती.परिणामी सुश्मिता व ललित मोदीला मोठ्या प्रमाणात नेटीझन्सनी ट्रोल केले.

फक्त अज्ञात किवा सामान्य ट्रोलर्सने नव्हे तर बहूप्रतिष्ठित व्यक्तींनी देखील यावर खरमरीत कमेंट्स केलेले आढळतात.एकीकडे सार्वजनिक जीवनात वावरणा-या अनेक नटी या आपल्या खासगी आयुष्य इतरांपासून लपवून ठेवताना दिसतात मात्र सुश्मिताने कधीच आपले खासगी आयुष्य इतरांपासून कधीही लपवलेले नाही.उलट तिच्या कारचा पाठलाग करणा-या माध्यम प्रतिनिधींना ती समोर येऊन प्रियकरासोबत पोझ देत होती,वरुन त्यांचीच ख्याली खुशहाली विचारत होती.
तिच्या या बेबाक व दिलखुलास वागणूकीविषयी तिला नेहमीच प्रश्ने विचारल्या जात असे यावर उत्तर देताना ती सांगते ’मी माझ्या जीवनात एका तत्वाला फार महत्व देते आणि ते म्हणजे तुम्ही जर सत्यापासून पळाल तर तुम्ही काहीच नसाल,मी प्रामाणिकपणे जगण्यावर विश्वास करते,जे माझ्या मनात व मेंदूत आहे तेच मी सांगत असते,मी आपल्या गोष्टी विनम्रतेने सांगायला शिकले आहे.तुम्ही रागात किवा चिडूनही तीच गोष्ट सांगू शकता मात्र असे केल्याने गोष्टच हरवून जाते,मग ती गोष्ट माझी प्लास्टिक सर्जरी करण्या विषयी असो किवा माझ्या जीवनात आलेल्या पुरुषांबाबत,विवाहित पुरुषांबाबत किवा अशी कोणतीही गोष्ट,जी हा समाज चुकीची मानत असतो पण त्या सगळ्या गोष्टी माझ्या खासगी आयुष्याचा भाग आहे,आता तुम्ही या सर्व गोष्टीतून पुढे जा ,’असा सल्लाही ती द्यायला विसरत नाही.
एकाने ट्रोलकरीने लिहले ‘सुश्मिाता सेनला वेश्या म्हण्यात काहीच वागगे नाही,एवढी प्रेम प्रकरणे झाल्यावरही ती कोणाशीच लग्न करत नाही’.एकाने लिहले,सगळं काही ललित मोदीच्या पैश्यांसाठी सुरु आहे,लंगूर के हात में अंगूर,यासोबतच ललित मोदी व सुश्मिता सेनच्या जुन्या २०११ मधील ट्टीट्सचा ही शोध या नेटीझन्सनी लावला.२०१३ मध्येही सुश्मिताने ललित मोदीला त्याच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. यावरही ललित मोदीने ९ वर्षे सुश्मिताची वाट बघितली,असे ट्रोल करण्यात आले.
महत्वाचे म्हणजे फक्त पैश्यांसाठी सुश्मिताने ललित मोदीला फासले,अशी सर्वाधिक चर्चा सोशल मिडीयावर रंगली मात्र सुश्मिताची स्वत:ची जगात एक ओळख आहे,ती एक यशस्वी नटी आहे,स्वत:च्या भरवश्यावर तिने दोन अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांचे आयुष्य सावरले.ललित मोदीच्या पूर्वी ही तिचे अनेक पुरुषांसोबत भावनिक संबंध जुळले आहेत त्यामुळे ती ललित मोदीसोबत फक्त पैश्यांसाठी जुळली,असा आरोप करने तिच्या भावनांचा अपमान करणाराच ठरु शकातो.
५६ वर्षीय ललित मोदीला ‘म्हातारा’ म्हणण्यापर्यंत ट्रोलकरींची मजल गेली असून हा त्याचा अतिशय खासगी विषय अाहे असेही या ट्रोलकरींना वाटत नाही. मूळात त्याच्या शारिरीक क्षमतेबाबतची चिंता ट्रोलक-यांना का असावी?हा ही प्रश्न सुज्ञांना छळतोय.त्याची शारिरीक क्षमता हा ट्रोलक-यांच्या विषय होऊच शकत नाही मात्र त्याची पैश्यांची अफरातफर व देशातून पलायन हा नक्कीच ट्रोलक-यांचा विषय होऊ शकतो,यात वाद नाही.
याशिवाय सुश्मिताला ‘वेश्या’ म्हणणा-यांना हे माहिती असायला हवे की तिने कधीही आपले खासगी आयुष्य कोणापासूनही लपवून ठेवले नाही.तिने कधीही भारतीय समाजातील परंपरागत मुल्यांवर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही, जे हे सांगतो की एका वयानंतर मुलींना लग्न करायला हवे,त्या शिवाय तिने पुरुषांसोबत संग करु नये. येथे तर सुश्मिताने ११ ते १२ पुरुषांसोबत संग केला असला तरी त्यांच्यासोबतचे तिचे हे नाते तिने कधीही ‘गॉसिप्स’चा विषय होऊ दिला नाही, कारण तिने कधीही काही लपवलेच नाही.तिचा या पूर्वीचा प्रियकर रहमान हा तर तिच्यापेक्षा १० वर्ष वयाने लहान होता आणि अशी नाती आपल्या भारतीय संस्कृतीत मान्य करण्यासारखीच नसतात!
सारखं सारखं प्रेमात पडणे,चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात पडणे,चुका करणे आणि त्या चुकांमधून शिकत जाने,या गोष्टी तिने कधीही लपवल्या नाही.आपल्या जीवनात ज्या गोष्टी चुकीच्या किवा अमान्य आहेत त्या सर्व तिच्या जीवनात तितक्याच ’सहज’आहेत,हे ट्रोलकरींनी ही लक्षात घ्यायला हवी.
या सर्व वादात तर ट्रोलकरींनी शशी थरुरलाही मध्ये आणले व थरुर हा ललित मोदीचा ‘गुरु’ असल्याची वल्गना केली.ट्रोलक-यांना असं वाटतं की स्त्रिया या पुरुषांसाठीच्या ‘आभूषण’ आहेत,जसजसं पुरुषांचं वय वाढत जातं,स्त्रियांची त्यांच्या जीवनात येण्याची संख्या ही कमी ‘झालीच’ पाहिजे कारण वयानुसार त्यांचे पुरुषत्व हे कमी झालेले असते.ती चुंबकीय शक्ती कमी होत असते ज्या शक्तीमुळे त्यांच्याजवळ स्त्रिया येत असतात.वयस्कर पुरुष तर फक्त ‘लिचेपिचे मास’ असतात फक्त पैसाच असतो जे त्यांना वाचवत असतात!अश्या स्वरुपाचे विचार हे निश्चितच कुंठीत व पूर्वग्रहदुषित दृष्टिकोणातून येत असतात,यात दूमत नाहीच.
२०१० मध्ये सुश्मिताने जेव्हा आपल्या लहान मुलीला दत्तक घेतले त्यावेळी एका पत्रकाराने तिला विचारले की,तिला जीवशास्त्रीयरित्या स्वत:च्या अपत्याची ओढ नाही का?तेव्हा तिने सांगितले हो मला माझे ही अपत्य जन्माला घालायला आवडेल मात्र आता माझे वय ही वाढत आहे.यावर तो पत्रकार म्हणाला,याचा अर्थ हा आहे की ती लग्न करतेय,यावर ती म्हणाली,मी आई होण्यासंबंधी बोलले,लग्नासंबधी नाही!
वयाच्या ५९ व्या वर्षी सुप्रसिद्ध नटी झीनत अमानने तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या ३३ वर्षाच्या अमन खन्ना उर्फ सरफराजसोबत तिसरा निकाह केला त्यावेळीही हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता व प्रसार माध्यमांमध्ये खूप गाजला होता,अर्थात त्यावेळी सोशल मिडीया नसल्याने तिच्या चारित्र्यावर एवढ्या खालच्या पातळीवर शिंतोडे पडले नव्हते,हे विशेष!
ललित मोदीने ट्वीटर व इंन्सटाग्रमावर टाकलेल्या या बॉम्ब नंतर सुश्मिताने सोशल मिडीयावर आपल्या दोन्ही दत्तक मुलींसोबतचे फोटो व्हायरल करीत ’मी जिथे आहे खुश आहे,ना तर मी लग्न केले ना साखरपुड्याची अंगठी घातली आहे,विना शर्तो के मेरे पास बहोत सारा प्यार है,काफी स्पष्टीकरण दे दिया है,अब अपनी जिंदगी में लौट जाईये और काम करीये,हमेशा मेरी खुशीयो को साझा करने के लिये सभी का शुक्रिया,और जो ऐसा नही करते तो सीधी बात आहे,इट्स नन ऑफ युवर बिजनेस’

तिच्या एवढ्या बेबाकीनंतर आता तरी ट्रोलकरींनी तिच्या आयुष्यात लुडबुड करण्यापेक्षा व आपल्या नीतीमुल्यांची जपमाळ जपण्यापेक्षा आपले काम करावे.
‘फिझा’या चित्रपटात सुश्मिता हीचे एक गाणे चांगलेच गाजले होते,‘मेहबूब मेरे,मेहबूब मेरे तेरी आंखो से मुझे पीने दे,कुछ दर्द है मेरे सीने में, मुझे मस्त महौल में जीने दे’सुश्मिताच्या आयुष्यात तिचे स्वत:चे वैयक्तीक सुख-दु:खे असून यात कोणालाही ढवळाढवळ करण्याचा अधिकार ती देत नाही.’ये दूनिया गम तो देती है,शरिके गम नही होती,किसीके दूर जाने से,मोहब्बत कमी नही होती’असं ती जगातील सर्व दिलवाल्यांना बेधडक सांगत असते.यावरुन तिच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज ही येतो.
’हम किसीसे खुशिया मांगे ये हमे मंजूर नही,मांगी हूयी खुशियो से किसका भला होता है,जितना अपनी तकदीर में लिखा है वो जरुर अदा होता है’असे सांगणारी,मानणारी आणि जगणारी सुश्मिता ही, फक्त पैश्यांच्या हव्यासापायी ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये पडली असेल,असे मानणा-यांच्या कथनात कितपत सत्यता आहे,याचे उत्तर येणारा काळच देईल,असेच आता म्हणावे लागेल.




आमचे चॅनल subscribe करा
