

राज्यसभा निवडणुक
राजकीय वाद केंद्रिय निवडणूक आयोगात पोहोचला:महाराष्ट्राला निकालाची प्रतिक्षा
मुंबई : महाविकास आघाडीनं राज्यसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारदाखल केली. सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्या मतदानावर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेनेनं तक्रारीचा ड्राफ्ट तयार केला आहे. शिवसेना नेते आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि सेनेचे सचिव अनिल देसाई यांनी तक्रार तयार केली. त्यानंतर तक्रारीचा मसुदा आदित्य ठाकरे यांना दाखवण्यात आला. आदित्य ठाकरेंनी तक्रारीचा ड्राफ्ट पाहिल्यानंतर शिवसेनने तक्रारीच्या पत्राचा ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवला आहे.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. काँग्रेस आमदार अमर राजूरकर यांच्याकडून लेखी आक्षेप घेण्यात आला होता. अमर राजूरकर यांनी यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. भाजपचे पोलिंग एजंट चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमर राजूरकर यांनी घेतलेले आक्षेप फेटाळले आहेत. मात्र, आता शिवसेनेनं देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं आहे.
बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मतदान केल्यानंतर हनुमान चालिसा दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. रवी राणा यांचं मत बाद करण्यात यावं, या मागणीसाठी देखील शिवसेना तक्रार करणार आहे. दरम्यान, रवी राणा यांनी हनुमान चालिसा दाखवणं काय गुन्हा नाही, असं म्हटलं आहे. हनुमान चालिसाला इतका विरोध का आहे, असा सवाल देखील राणा यांनी केला आहे.
भाजपनं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मतपत्रिका राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या हातात दिल्याचा आरोप केला होता. तर, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांना मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. सुहास कांदे यांनी दोन पक्षांच्या पोलिंग एजंटला मतपत्रिका दिसेल, अशा पद्धतीनं दाखवल्याचा आक्षेप भाजपनं घेतला आहे.
राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबली
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतील २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर भाजपचं केंद्रीय शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलं. त्यांनी जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांची मतं बाद करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
अगदी उमेदवारी जाहीर होण्यापासून रंजक घडामोडींनी गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेत ही मतं बाद केली जावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. गेली २ तास ही मतमोजणी रखडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत.
राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. शिवसेना आमदार सुहास कांदेंनी देखील तीच चूक केली. त्यामुळे मविआच्या तीनही आमदारांचं मत बाद केलं जावं, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.
भाजपच्या पत्रानंतर राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाची एन्ट्री झाली आहे, आयोगाने मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत. हे तिन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याप्रकरणी निर्णय देणार आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकत्र ताकद आणि त्यांना असलेल्या अपक्ष आमदारांचा पाठिंबा पाहता सत्ताधाऱ्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे भाजप महाविकास आघाडीचे एखाद्या आमदाराला गळाला लावण्याचा किंवा एखादे मत कमी कसे होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. याचेच प्रत्यंतर शुक्रवारी विधानभवनात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून याठिकाणी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे मत बाद ठरवले जावे, अशी मागणी भाजपने केली आहे. मविआच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी मतदान करताना जरासा घोळ केल्याने त्यांची मतं बाद करण्याची मागणी भाजप आमदार पराग अळवणी यांनी केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
