

केकेचा मृत्यू की आत्मघात?
आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे केकेची ‘एक्झीट’
नागपूर,ता. १ जून २०२२: मंगळवार दि.३१ मे २०२२ हा दिवस संगीतप्रेमींसाठी अतिशय धक्कादायक ठरला.मधाळ स्वरांचा गुणी गायक केके याचं अचानक कोलकता येथील एक लाईव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर जग सोडूनच निघून जाणं हे कोणालाही पचनी पडलंच नाही,त्या कॉन्सर्टचे जे काही व्हिडीयोज सोशल मिडीयावर व्हायरल झालेत ते बघता केकेची शारिरीक व मानसिक अवस्था एवढ्या गुदमरणा-या वातावरणात ‘हाय पीच’ची गाणी सादर करण्यासारखीच नव्हतीच मुळी,हे स्पष्टपणे दाखवणारीच होती,माणसाचा मेंदू,त्याचं शरिर हे कोणताही घात होण्यापूर्वीच सातत्याने काही सूचना देत असतात,त्याच सूचना केके यालाही मिळत होत्या मात्र आपल्या कलेप्रति,आपल्या गायनाप्रति संपूर्णत:समर्पित या गायकाने तब्बल तीन तास त्या सूचनांकडे सतत दुर्लक्ष केले व शेवटी निसर्गनियमाप्रमाणे हा अट्टहास केकेवर प्राणांतिकरित्या बेतला,त्यामुळेच केकेचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नसून ‘आत्मघाताच्याच’श्रेणीत मोडणारा ठरतो,असेच आता म्हणावे लागेल.
कोलकता येथील नजरुल मंच ऑडोटोरियमध्ये गुरुदास कॉलेजतर्फे केकेचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता.२,७८२ आसन क्षमता असणा-या या सभागृहात मात्र तब्बल साढेसात हजारच्या वर अतिशय दाटीवाटीने तरुणाई, केकेच्या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी जमली होती.त्यातही सभागृहाची वातानुकुलीन व्यवस्था बंद होती,सभागृहाच्या एकूण सात प्रवेश द्वारांपैकी दोन द्वारे पार कोलमडून पडली होती,केके याची सुरवातीची काही गाणी ही दमदाररित्या नेहमीसारखीच सादर झाली मात्र लवकरच त्याला खूप घाम येऊ लागला,अनेक व्हिडीयोमध्ये तो वारंवार ’बहोत गर्मी है,बहोत ज्यादा गर्मी है,एसी बंद है क्या?’यासारखी वाक्ये उच्चारतानाही दिसून पडत आहे.

जगातील कोणत्याही गायकाला आपले गायन सादर करताना एका वेगळ्या शारिरीक व मानसिक उर्जेची गरज असते,त्यासाठी सभोवतालचं वातावरणही सुसह्य असावं लागतं,केकेच्या या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आल्हादायक असे काहीही नसताना केकेने फक्त कलेप्रतिच्या आपल्या बांधिलकीसाठी व आपल्या गीतांवर निरातिशय प्रेम करणा-या तरुणाईसाठी अश्या घुसमटणा-या वातावरणात गायन सुरुच ठेवले.
केके हा तार सप्तकातील(हाच पीच)चे गाणे गातो,त्याची गाणी नेहमीच्या पट्टीपेक्षाही उंच स्वरात गायलेली आहे,केकेचा मधाळ सूर हायपीचची गाणी गातानाही अगदी सहज लागतो,केकेनी एकाहून एक सरस गीतांची पूंजीच तरुणाईसाठी ठेवली अाहे मात्र एवढ्या दमट आणि घुसमटणा-या वातावरणात सलग २० गाणी गाताना त्याला जो काही शारिरीक व मानसिक थकवा आला,अतिरिक्त श्रम पडलेत त्याचा ताण त्याच्या, एक ठराविक क्षमता असणा-या ह्दयावर पडत राहीला,या लाईव्ह कॉन्सर्टमधील शेवटची गाणी जर केकेची ऐकली तर त्याचे सूर ही लागत नव्हते,तो अस्वस्थ दिसत होता,वारंवार नॅपकिनने आपल्या चेह-यावरचा घाम पुसताना दिसत होता,वारंवार पाणी पिताना दिसत होता,ही सगळी लक्षणे त्याला सातत्याने सावध करीत होती,त्यानी या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायलेल्या त्या २० गाण्यांची यादी ही आज सोशल मिडीयावर व्हायरल झाली,त्याच यादीतील शेवटचे गाणे जे चक्क त्यांनी अडखळत गायले ते होते ’ हम रहे या ना रहे कल..याद आयेंगे ये पल….!’नियतीने दिलेला संकेत जणू त्याच्या गायनातून सिद्ध झाला होता…..!

सभागृहातील तरुणाईचा प्रतिसाद बघता केके ‘मै मर जाऊं यहां पर’अशी दाद त्यांना देत होता मात्र हीच दाद आणि साद त्याने आपल्या अतिशय ताण पडणा-या ह्दयाचीच ऐकली असती तर……?केके आज जिवंत असता,आणखी एकाहून एक सरस अजरामर गाणी गाण्यासाठी,पण……?
शेवटचे गाणे सादर करुन केके लडखडतच स्टेजच्या मागे आला,त्याच्या रितेश भट नावाच्या मॅनेजरने व बाऊंरर्सने त्याला सांभाळत एका दारातून बाहेर काढले,यावेळी देखील त्याचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेत होते,त्याची एवढी गंभीर अवस्था असतानाही त्याच्या मॅनेजर किवा आयोजकांनी त्याला सरळ रुग्णालयात न नेता दहा मिनिटांच्या अंतरावर असणा-या त्याच्या हॉटेलच्या खोलीत नेले,यावेळेपर्यंत त्याचा श्वास अडखळत होता,त्याला श्वाश घेताना त्रास होत होता,खोलीत शिरताच केके सोफ्यावरच कोसळला,याच दरम्यान त्याच्या होठांना व डोक्यावर भिंतीचा मार बसला अन्…..केकेचा लाईव्ह कॉन्सर्ट तो ‘अलाईव्ह ’झाल्यानंतर अश्यारितीने संपला…..!
एवढ्या मोठ्या सभागृहात एक ही डॉक्टर नव्हता,केकेला सुरवातीची काही गाणी गायल्यानंतरच अस्वस्थ वाटत होते त्याच वेळी आयोजक सुदिप्ता मित्रा आदींनी तज्ज्ञ डॉक्टरर्सला पाचारण करुन काही क्षणांचा ब्रेक घेतला असता तर आभाळ नसते कोसळले मात्र असे घडले नाही,शो संपल्यानंतरही केकेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसत असतानाही त्याला हॉस्पीटल ऐवजी हॉटेलमध्ये नेण्यात आले! आयोजकांची अतिशय कॅज्यूअल मानसिकता व ढिसाळ नियोजनामुळे भारत देश एका अतिशय गुणी गायकला कायमचा मुकला…..!
इस्माईल दरबार या सुप्रसिद्ध संगीतकाराने एकदा आठवण शेअर करताना सांगितले होते की त्यांनी ’हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटासाठी केके कडून जे लॅण्डमार्क गीत गाऊन घेतले होते ते त्यांनी चक्क मध्यरात्री ध्वनिमुद्रित केले होते!चित्रपटात सलमान खान याला गाव सोडून जाण्याचे आदेश विक्रम गोखले या नायिकेच्या वडीलांनी देताच तो गाव सोडून जाताना,प्रेयसीपासून दूर लाबं परदेशात जाताना, प्रियकराच्या मनाची जी घालमेल होते ती घालमेल,ती हताशा,ते नैराश्य,ते कोलमडून पडणं हे गायकाच्या प्रत्येक सुरात उमटवण्यासाठी इस्माईल दरबार यांनी मध्यरात्री केकेला फोन करुन रेकॉर्डिंग स्टूडियोमध्ये बोलावले होते आणि मध्यरात्रीच्या वेळी गायकाच्या गळ्यात जी खरज उमटली होती,त्याचा पुरेपूर उपयोग इस्माईल दरबार यांनी या गाण्यासाठी ध्वनिमुद्रित केली,पुढे ’तडप तडप के इस दिल से आज निकलती रही ऐसा क्या गुनाह किया की लृट गये तेरी मोहब्बत मे’ या गाण्याने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड मोडले,केकेला देखील आश्चर्य वाटलं होतं,सकाळी पुरेशी झोप झाल्यानंतर ताजेतवाणे होऊन गाणे रेकॉर्ड करण्याचे ठरल्यानंतरही मध्यरात्री संगीतकार इस्माईल दरबार यांनी त्याला मध्यरात्री बोलावून हे गाणे रेकॉर्ड करुन घेतले,या मागील महत्व केकेला नंतर स्वत:च्या आवाजातील ते गाणे ऐकल्यानंतर कळले…….!
संगीतकार अनू मलिक यांनीही केकेसोबतची आठवण सांगताना केके याने ओरिजनल नोटपेक्षा चक्क दोन स्केल वरती त्यांच्या चित्रपटातील गीते गायले असल्याचे सांगितले.यावरुन ह्दयावर पडणारा ताण लक्षात येतो.कोलकता येथील लाईव्ह कॉन्सर्टसाठी केकेने रिहर्सल केली तेव्हा तो अतिशय सामान्य होता,लाईव्ह कॉन्सर्टमध्येही सुरवातीची काही गाणी त्याने सहज गायली मात्र यानंतरच्या सादरीकरणात त्याच्या ह्दयावर अतोनात ताण पडला,ज्याची परिणीती एवढ्या दु:खद घटनेत झाली..!
केकेचे अश्यारितीने जाणे हे प्रत्येकाच्या मनाला चटका लाऊन जाणारे होते,आज दिवसभर सर्व माध्यमांवर फक्त आणि फक्त केकेचीच बातमी बघितली व ऐकली जात होती.सुप्रसिद्ध गायक सोनू निगमचाही असाच एक फार मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी सोनू निगम केकेच्या ठिकाणी असता तर जगातून अश्यारितीने एक्झीट होण्या ऐवजी कॉन्सर्टमधूनच एक्झीट घेतली असती,असा विश्वाश समाज माध्यमांवर दर्शवला आहे यावरुन हे तरुण गायक कश्याप्रकारे आजच्या तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनले आहेत हे दृष्टिक्षेपात येतं.
केकेच्या या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पराकोटीचे दमट वातावरण असतानाही अनेक गाण्यांमध्ये यांत्रिकी माध्यमांमधून सारखासारखा धुर सोडला जात होता! परफॉरमेन्स प्रभावी करण्याच्या नादात या धूरामुळेही केकेचा जीव जास्त कासाविस झाला होता,शेवटी शेवटी तर केकेने गर्मीने व्याकूळ होत स्टेजवरील अधिकाधिक स्पॉट लाईट्स चक्क बंद करण्याची सूचना केली……!
काल मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजता शो ला सुरवात झाली,सायंकाळी ६.१५ वाजता केकेने स्टेजवर एंट्री घेतली,रात्री ९ वाजता शो संपला,यानंतर केकेला हॉटेलमध्ये नेण्यात आले,रात्री १० वाजता सुन्न करणारे वृत्त पसरले…केके इज नो मोर…..!
भारतात ३० टक्के लोकांचा मृत्यू ह्दयघाताने(हार्टअटॅक)होतो यात एक नाव आता….केकेचेही जुळले….!अर्थात हा मृत्यू नैसर्गिक नसल्याने आता आयोजकांवर अनैसर्गिक मृत्यूसाठी जवाबदार असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: उपस्थित राहून शासकीय इतमामात केकेला श्रद्धांजली वाहीली. पंतप्रधान नरेंद मोदींसह अनेक सेलिब्रिटींनी केकेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली आहे. सकाळी १० वाजता केकेचे पार्थिव मुंबईत आणण्यात येईल मात्र केके हा एका लाईव्ह कॉन्सर्टसाठी कोलकताला गेला होता त्याने मुंबईत अश्यारितीने परतण्याची काेणी साधी कल्पनाही केली नव्हती.
कृष्णकुमार कुन्नथ असे संपूर्ण नाव असणा-या केकेचे वय फक्त ५४ वर्षाचे होते.२३ ऑगस्ट १९६८ मध्ये त्याचा जन्म दिल्ली येथे झाला होता. सुरवातीला जाहीरातींसाठी जिंगल्सपासून आपल्या गायनातील करिअरला त्याने सुरवात केली होती. अद्याप खूप बहारदार गीतांची पर्वणी केकेला आपल्या चाहत्यांना द्यायची होती मात्र अर्ध्यावरती डाव मोडला अन्……!या लाईव्ह कॉन्सर्टविषयीची केकेची इन्सटाग्रामवरील पोस्ट अखेरची ठरली…!
पत्नी ज्योथी कृष्णा या अद्यापही सदम्यात आहेत,ज्योथी या केकेच्या शालेय जिवनापासूनच मैत्रीण होत्या.१९९१ मध्ये त्यांनी रेशीमगाठ बांधली.मुले कुन्नथ नकूल आणि कुन्नथ तामरा ही तरुण मुले पितृछायेला कायमची पारखी झाली.केकेनी वेगवेगळ्या भाषेतील २०० हून अधिक गाणी चित्रपटसृष्टिला कायमची विरासत म्हणून जरी देऊन ठेवली असली तरीही केकेच्या मधाळ स्वरांमधील तृप्ती अद्यापही संगीतप्रेमींना मिळवायची होती.
२००७ साली आलेला चित्रपट ‘ओम शांती ओम’ यातील ’आंखो में तेरी अजब सी अजब सी,२००९ साली प्रर्दशित झालेला ’तूम मिले’ चित्रपटातील गीत‘दिल इबादत’ २०१३ चित्रपट ‘मर्डर ३ ’मत आजमा रे’ किवा ‘दिल खुजगर्द है फिसला है ये फिर हात से,यासारखी केकेची अजरामर गाणी ऐकताना त्याची अश्याप्रकारची एक्झीट कायम मनाला चटका लाऊन जाणारी ठरणार,यात शंका नाही.




आमचे चॅनल subscribe करा
