Homeदेश-विदेशप्रदेश काँग्रेससेलतर्फे उद्यापासून नागपूरात दोन दिवसीय ‘नवसंकल्प’ शिबिर

प्रदेश काँग्रेससेलतर्फे उद्यापासून नागपूरात दोन दिवसीय ‘नवसंकल्प’ शिबिर

देशभरातून येणार पदाधिकारी:२०२४ च्या निवडणूकीची पूर्व तयारी

भाजपच्या फसव्या सोशल मिडिया मोहिमेला देणारा आक्रमक उत्तर:विशाल मुत्तेमवार यांची माहिती

नागपूर,ता.२६ मे २०२२: आजचं जग हे समाज माध्यमाचं जग समजल्या जातं,आज भारत या देशातील ४३ टक्के लोक सोशल मिडियाचा वापर करताना दिसतात,यात ही महाराष्ट्रात नेटीझन्सची संख्या ही सर्वाधिक आहे. भारतातील ६१ टक्के लोकसंख्या ही इंटरनेटचा वापर करते तर यातील ६० टक्के लोक हे सोशल मिडीयाच्या कोणत्या ना कोणत्या प्लेटफॉर्मवर सक्रिय आहेत,या अाकडेवारीवरुन सोशल मिडियाचा प्रभाव दृष्टिपथास येतो. त्यामुळे नुकतेच राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरामध्ये सोशल मिडियावर अधिक भर देण्याचा निर्णय झाला असून याच पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दि.२८ मे व रविवार २९ मे रोजी, दोन दिवसीय ‘नवसंकल्प‘शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख व महासचिव विशाल मुत्तेमवार यांनी शंकर नगर येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्र परिषदेत दिली.याप्रसंगी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार ॲड.अभिजित वंजारी हे देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना विशाल मुत्तेमवार म्हणाले,की भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने खोटा प्रचार सोशल मिडीयावर केला जात असतो.सातत्याने दिशाभूल करणारी माहिती प्रसूत करण्यात येत असते.२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने हीच रणनीती आखली व खोटा प्रचार करुन तसेच काँग्रेस श्रेष्ठींच्या विरोधात प्रचार करुन निवडणूक जिंकली.तीच रणनीती भाजप प्रत्येक निवडणूकीत अमलात आणतो.

त्यांच्या या खोट्या मोहिमेला आता काँग्रेसतर्फे आक्रमक उत्तर दिले जाईल.यासाठी सोशल मिडीयातील तज्ज्ञ मंडळीच्या वतीने विविध जिल्ह्यांमधून येणा-या प्रतिनिधींना मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल.त्याच बरोबर २९ मे रोजी होणा-या राष्ट्रीय शिबिरामध्ये देशभरातील राज्यांमधील प्रतिनिधी येणार असून त्यांनाही पक्षातील ज्येष्ठ नेते व सोशल मिडीयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

सोशल मिडीयाचा वापर करण्यात भाजपच्या तुलनेत काँग्रेस पक्ष काहीसा माघारला यात शंका नाही मात्रा आता काँग्रेसनेही सोशल मिडीयातील भाजपच्या खोट्या प्रचाराला आक्रमकतेने उत्तर देण्याचा निर्धार केला असल्याचे ते म्हणाले.

२०२४ ची लोकसभेची निवडणूक असो किवा जवळ आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असोत,या दृष्टिनेही पक्षाची रणनीती तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये २८ मे रोजी वनामती येथे प्रदेश काँग्रेसचे शिबिर होईल.सकाळी ११ वाजता शिबिराचा प्रारंभ होईल.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,क्रीडामंत्री सुनील केदार,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मिडीया प्रमुख रोहन गुप्ता,काँग्रेसच्या प्रवकत्या अलका लांबा आदी विभूती मार्गदर्शन करतील.

रविवार दि.२९ मे रोजी हिंगणा मार्गावरील सॉलिटर बॅक्वेटमध्ये होणा-या शिबिराला ज्येष्ठ नेते जयराम रमेश,पवन खेरा यांच्यासह फेसबुक व इतर सोशल मिडीया कंपन्यांचे अधिकारी हे मार्गदर्शन करतील.

या शिबिरात २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या रणनीतीवर देखील सखोल चर्चा होईल,अशी माहिती त्यांनी दिली.भाजपला त्यांच्यात पद्धतीने या पुढे उत्तर दिलं जाईल,असा इशारा देखील त्यांनी दिला.

भाजपने सोशल मिडीयाचा वापर खूप प्रभावीपणे केला हे मान्य करुन भाजपचा आयटी सेल फक्त काँग्रेस पक्षासाठी आव्हानात्मक ठरला नसून तर सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक आहे.नुकतेच पक्षाचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी लंदन येथे घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला असून भारतात सोशल मिडीयाचा वापर हा नि:पक्षपाती नसल्याकडे जगाचे लक्ष वेधले होते,सोशल मिडिया कपंन्या या कोणाच्या हिताच्या बाजूने भारतात सक्रिय असतात,याचा उलगडा राहूल गांधींनी केला होता,याकडे विशाल मुत्तेमवार यांनी लक्ष वेधले.

उदयपूर येथे पार पडलेल्या चिंतनशिबिरानंतर मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल तसेच गुजरातमधील काँग्रेसचा तरुण चेहरा हार्दीक पटेल यांनी पक्षाची साथ सोडली,सिब्बल यांनी तर राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाची कास धरली याकडे लक्ष वेधले असता,हे फक्त काँग्रेसमध्येच नाही घडत तर सर्वच पक्षात घडतं असे ते म्हणाले.काँग्रेस हा एक विशाल समुद्र आहे,लोक येतात,निघून जातात,पुन्हा पक्षात येतात,ही प्रक्रिया चालत असते असे ते म्हणाले मात्र आ.अभिजित वंजारी यांनी सिब्बल यांचा कोणताही जनाधार नाही,ते जनाधार नसलेले नेते असल्याची टिका केली.

हार्दीक पटेल हे तर जनाधार असणारे नेते आहे,याकडे लक्ष वेधले असता एखाद्या नेत्याने पक्ष सोडणे यामागे वेगवेगळी कारणे असतात असे विशाल मुत्तेमवार म्हणाले.ही प्रक्रिया सर्वच पक्षामध्ये घडत असते मात्र ‘चर्चा’फक्त आमच्याच पक्षाची होते,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

Latest बातम्या