
(रविवार विशेष)
\
सरकार आमची शहीद होण्याची वाट बघतेय का?तरुणाईचा संतप्त सवाल
डॉ.ममता खांडेकर
( Senior Journalist)
नागपूर,ता.१ मे २०२२: महाराष्ट्र दिवस आज संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा होत असताना गेल्या ६० दिवसांपासून नागपूरात संविधान चौकात मात्र देशातील विविध भागातून आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी हे रस्त्यावर झोपत आहेत,काही विद्यार्थिनींना सहा महिन्यांचे लहान बाळ देखील आहे,याच ठिकाणी सुलभ शौचालयात या विद्यार्थिनी आपला मासिक धर्म सांभाळून,भूक,तहान,उन विसरुन फक्त हक्काच्या नोकरीवर रुजू करण्याची मागणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करीत आहेत.या ठिकाणी या शेकडो निवड झालेल्या मात्र अद्याप रुजू होण्याचे नियुक्ती पत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मकरित्या एक ‘तिरडी’सजवून ठेवली आहे!२०१८ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन,निवड होऊन तसेच मेडीकल,फिजिकल व लिखित अश्या तिन्ही पातळ्यांवर उत्तीर्ण होऊन देखील देशभरातील ६० हजार २१० विद्यार्थ्यांपैकी ५५ हजार विद्यार्थ्यांनाच गृहमंत्रालयाने रुजू करुन घेतले व उर्वरित हजारो निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वा-यावर सोडून देण्यात आले.
या विद्यार्थ्यांनी दिल्ली दरबारी जंतरमंतरवर देखील आंदोलन केले,उपोषण केले मात्र ’लोकशाही’संवैधानिक व्यवस्था स्वीकारलेल्या भारत देशाच्या राजधानीत, दिल्लीत, पोलिसांनी बर्बरतापूर्वक मारहाण करुन या विद्यार्थ्यांना दिल्लीतून हूसकावून लावले! काही विद्यार्थ्यांनी नागपूरात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची चार-सहा वेळा भेट घेतली,आपल्या समस्या मांडल्या,अनेकांचे पुन्हा परिक्षेला बसण्याचे वय उलटून गेले आहे,अनेकांची लग्न झाली आहेत त्यांना सासरकडच्या अडचणी आहेत,अनेक विद्यार्थिनींना लहान बाळ आहेत,गृहमंत्रालयाने त्यांना देखील नियुक्ती पत्र दिले असते तर आतापर्यंत आपापल्या जिवनात ते स्थिरस्थावर झाले असते मात्र त्यांच्या भावनांना,त्यांच्या स्वप्नांना,त्यांच्या हक्कांना देशाच्या गृहमंत्रालयाच्या लेखी काडीचीही किंमत नसल्यानेच गेल्या ६० दिवसांपासून ही सर्व तरुण मुले-मुली आपापली घर-दारे सोडून संविधान चौकात मोकळ्या आकाशाखाली उघड्यावर रस्त्यावर संजरज्या अंथरुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या साक्षीने झोपत आहेत!
येथील शौचालय वापरण्याचे पैसे ही या तरुणाईला पदरातून भरावी लागतात.नागपूर महानगरपालिकेतर्फे या तरुणाईला कोणतीही सूट मिळाली नाही.पदरातला पैसा खर्च करुन या तरुणाईने नुकतेच पत्रकार भवानात पत्र परिषद ही घेतली.आपली व्यथा मांडताना एका मुलीला इतकं भरुन आलं की ती सर्वांसमोरच ढसाढसा रडू लागली,तिला अन्य विद्यार्थिनींने सांभाळले,पाणी पाजले.त्यांनी परिक्षा दिली,त्यांची निवड ही झाली मग नियुक्ती पत्र देण्यास एवढा जीवघेणा विलंब का?करोनाच्या दोन वर्षाच्या काळात सगळंच विस्कळीत झालं आहे हे मान्य असलं तरी २०१८ मध्ये तर जगात करोना कुठेही नव्हता! आणखी किती वर्षे केंद्र सरकार तरुणाईच्या भविष्याच्या अंत बघणार आहे?गडकरी सांगतात हा विभाग त्यांच्या अखत्यारितीत नाही मात्र गृहमंत्र्यांशी आंदोलना संदर्भात बोलतो,असे आश्वासन ही देतात मात्र निष्पन्न काहीच झालं नाही,काहीही होत नाही,परिणामी देशाच्या गृहमंत्र्यांना आता हीच मागणी आहे देशसेवेसाठी आता आम्हाला ’वर्दी द्या नाही तर अर्थी द्या’.
संविधान चौकात छत्तीसगड,झारखंड,ओरिसा,बिहार, महाराष्ट्राच्या नाशिकसारख्या अनेक जिल्ह्यातील या विद्यार्थिनी या ठिकाणी आंदोलनस्थळी खडतर आयुष्य कंठत आहे. १४ फेब्रुवारी पासून या मुली व देशाचे उज्जवल भविष्य असणारी तरुणाई संविधान चौकात आंदोलन करीत आहे आणि ४ मार्च पासून उपोषण करीत आहेत.नेते येतात,भेटतात,आश्वासन देतात आणि निघून जातात कारण देशाच्या या उज्जवल भविष्यांचा प्रश्न सोडवणे त्यांच्या हातात नाही.देशाचे गृहमंत्रालयच त्यांची समस्या सोडवू शकतो.या तरुणाईची एकच मागणी आहे देशसेवेसाठी गृहमंत्रालयाने त्यांना नियुक्ती पत्र द्यावे.दिल्ली पोलिसांनी अतिशय वाईटरित्या लाठीमार केली,अंगावरचे कपडे देखील फाडलेत,देशाच्या राजधानीत आम्ही खूप सहन केलं आहे अाता नागपूरात आंदोलन करीत आहोत,असे त्या खास ‘सत्ताधीश’ला सांगतात.
आम्हाला आमचा हक्क मिळावा,आम्ही कोणाकडे भीक मागत नाही आहोत.आम्ही मेहनत करुन स्टाफ सिलेक्शन कमिशनची परिक्षा उत्तीर्ण केली,जातीनिहाय भरतीचं वय देखील आता आमचं उलटत आहे,२०१८ मध्ये आम्ही ही परिक्षा उत्तीण केली,आज इतकी वर्षे झाली आमचं वय देखील वाढत आहे,पुन्हा आम्ही परिक्षेसाठी पात्र नसणार आहोत त्यामुळेच आमची एकच मागणी आहे गृहमंत्र्यांनी आमच्या हक्काचे नियुक्ती पत्र द्यावे अन्यथा आमच्याकडे शेवटचा पर्याय हा ’आत्मदहनाचाच’उरला असल्याचा इशारा ही तरुणाई देत आहे.
संविधान चौकात देशाला संविधान देणा-या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर देशाच्या या उज्जवल भविष्यांनी ’तिरडी‘देखील सजवली अाहे,केवढी ही विटंबना!आमचे शूर सैनिक सीमेवर शहीद होत असतात मात्र देशाच्या गृहमंत्रालयाने आम्हाला नागपूरच्या संविधान चौकात शहीद होण्यासाठी लाचार केले आहे….!,




आमचे चॅनल subscribe करा
