

नागपूर, 2 एप्रिल: रामचरितमानस गोस्वामी तुलसीदासांनी रामाला माध्यम बनवून जी अभिव्यक्ती केलेली आहे ती अद्वितीय आहे. विविध प्रसंगांमधून तुलसीदासांनी रामाचे मनुष्यबळ व्यवस्थापन व सामाजिक अभियांत्रिकी कौशल्य प्रदर्शित केले ते बेजोड असून आजही आपल्या समाजाचे त्याचे दाखले सापडतात, असे मत ज्ञानवर्धिनी एज्युकेशनल रिसर्च ट्रस्टचे संथापक व शिवायु आयुर्वेद लिमिटेडचे मार्केटिंग डायरेक्टर डॉ. विजय शर्मा यांनी व्यक्त केले.
विदर्भ सेवा समिती नागपूर व चिटणवीस सेंटरच्या संयुक्त वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘रामचरित मानस मे राम का मानव संसाधन प्रबंधन व सामाजिक अभियांत्रिकी कौशल’ विषयावर डॉ. विजय उमेश शर्मा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. विजय शर्मा यांना नागपूर विद्यापीठाने या विषयावरील संशोधनासाठी नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. चिटणवीस सेंटरच्या टॅमरिंड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला चिटणवीस सेंटरचे प्रमुख विलास काळे, डॉ. संतोष मोदी, डॉ. विजय शर्मा यांच्या पत्नी कनक शर्मा, डॉ. मनमोहन यांची प्रमुख उपस्थिती होती. चिटणवीस सेंटरच्यावतीने डॉ. शर्मा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
डॉ. विजय शर्मा म्हणाले, राम नामालाच समजतो. पण राम केवळ एक संबोधन आहे. रामला जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याजवळ जावे लागते. त्यांच्या जवळ जायचे तर स्वत:ला सोडावे लागते. आपण कर्मकांडानाचा धर्म समजतो. धर्माला आपण हिंसात्मक बनवले असून समाज अमर्याद होत चालला आहे. अशा अमर्याद समाजावर नियंत्रण आणायचे असेल तर रामाशिवाय पर्याय नाही. तोच आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्षाचा मार्ग दाखवेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद निर्बाण यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
