फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशदेशाच्या संकटात फायदा शोधणारी मोदी सरकार

देशाच्या संकटात फायदा शोधणारी मोदी सरकार

Advertisements

माजी खासदार विलास मुत्तेमवार यांची खास मुलखात
नागपूरचा विकास नाही विनाशच…
आयतेच काही मिळवण्यायपेक्षा ते परिश्रमपूर्वक मिळवण्यातच खरे समाधान दडलेले असते,पूरेपूर परिश्रम म्हणजे पूरेपूर विजय’, ‘वर्तमानात आपण काय करतो त्यावर आपला भविष्यकाळ अवलंबून असतो’गांधीजींच्या एकूण ३६५ सुभाषितांपैकी १६ सुभाषिते माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या शंकर नगर येथील बंगल्याच्या ड्राईंग हॉलची शोभा वाढवताना दिसतात.‘आदर्श रोजच्या जगण्याचा भाग झाले नाहीत तर ते निरुपयोगी ठरतात’हे सारगर्भित सुभाषित मुत्तेमवार यांच्या राजकीय जिवनाशी देखील निगडीत वाटू लागतात तर त्यांच्या वास्तूचं ह्दय कुंज’हे नाव वास्तूपुरुषाच्या जगण्यातील स्पंदनांची ओळख फाटकाच्या आत जाण्यापूर्वीच करुन देतात.
सध्या नागपूरात संपूर्ण प्रचार-प्रसार माध्यमात एकच चर्चा घडत असते ती म्हणजे ’नागपूरचा विकास’.विकास मुत्तेमवार यांनी ७ वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे,तीन वेळा चिमूर तर चार वेळा नागपूरचे ते खासदार राहीले आहेत.आजच्या सोशल मिडीयातील पिढीला कदाचित नागपूर शहरासाठी त्यांनी केलेले कार्य याची तोंडओळख देखील नसावी,मोदी-मिडयाच्या लोकशाहीवरील ‘संक्रमण व आक्रमणाच्या’या कारकार्दीत ती प्रचारात येण्याची शक्यता देखील नाही,२०१४ पूर्वी मात्र त्यांच्याही कार्यांना माध्यमांमध्ये ठलक जागा मिळत असे यासोबतच विरोधकांना देखील तेवढेच महत्वाचे स्थान माध्यमांमध्ये मिळत होते..२०१४ नंतर देशाचे केवळ चित्रच पालटले नाही तर तत्व आणि नीतीमुल्येही पालटली,आता दिल्ली असो किवा गल्लीतील विरोधी पक्ष त्यांच्या विचारांना ‘अडगळीचेही’स्थान माध्यमात मिळत असलेले दिसत नाही,काही दशकांपूर्वी पान परागच्या एका जाहीरातीने जनमाणसांवर चांगलीच भूरळ घातली होती ’क्या बात है?आजकल तो बहोत छाये हूये हो’बघता बघता ही वाक्ये जाहीरातीचा भाग न राहता लोकप्रतिनिधींच्या आचरणात उतरलेला दिसून पडतोय.नागपूरात देखील याची प्रचिती येतच असते,३० ते ३५ लाखांच्या लोकसंख्येचा एकच तारक,एकच विकासपुरुष असल्याची प्रतिमा सातत्याने रंगविली जात आहे,ते जर नसते तर नागपूर हे जणू लोकांच्या जगण्यासाठी’नरकपूर’राहीले असते,असंच आता नागपूरकर जनतेलाही वाटू लागलं आहे,सोशल मिडीयावर यावर चांगलीच चर्चा देखील रंगते,विशेषत: नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात नागपूरचा विकास म्हणजे नेमकं काय?या प्रश्‍नाच्या शोधात नागपूरचं चार वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांना ’सत्ताधीश’ने बोलते केले……

देशपातळीवर असो किवा नागपूर शहराच्या संदर्भात देशातील सर्वात जुना असणारा काँग्रेस पक्ष इतका शांत का?
या प्रश्‍नावर बोलताना काँग्रेस शांत नाही काम चालू आहे ते ही वरपासून तर खालपर्यंत फक्त ‘प्रचारात’आम्ही मागे पडतो.देशाच्या विकासात,देशाच्या जडणघडणीत काम आमचं ही चाललंय फक्त प्रचारात आम्ही ’तुटपुंजे’ठरतोय,मागे राहतोय हेच कारण आहे आमंच काम दिसत नाही.पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात कधीही आपल्या प्रत्येकच कामाचा प्रचार केला पाहिजे,’इव्हेंट’केला पाहिजे ही भावना काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नव्हती.२०१४ च्या पराभवानंतर मात्र आम्ही पराभवाची समीक्षा करण्यास बसलो असता सर्वांचे हेच मत पडले आम्ही प्रचारात मागे राहीलो.लोकसभेच्या त्या निवडणूकीचा प्रचारच जणू ’हायजॅक’झाल्यासारखंच घडत होतं.तेव्हाचे सोडून द्या युक्रेनचाच मुद्दा घ्या ना!
काय सुरु आहे प्रसार-प्रचार माध्यमांवर?अश्‍या संकटकाळात विदेशात अडकलेल्या नागरिकांना,विद्यार्थ्यांना सोडवून आणण्याची जवाबदारी ही भारत सरकारची नैतिक जवाबदारी असते.अडणचीत सापडलेल्या आपल्या नागरिकांची,विद्यार्थ्यांची सोडवणूक करने देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तर केलेच असते.सिरीयाचं संकट ओढवलं तेव्हा पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देखील नागरिकांची सुटका केली होती.पंतप्रधान गुजराल यांच्या काळात देखील संकटकाळात विदेशात अडकेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली मात्र तेव्हा हे माहिती नव्हतं देशाप्रतिच्या या नैतिक कर्तव्यांचं देखील ’इव्हेंट’साजरे करायचे असतात!’मोदी है तो मुमकीन है’,’मोदी जिंदाबाद’’भारत माता की जय’असे काय प्रकार आहे हा?युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांनी ’भारत माता की जय’हा जयघोष केला मात्र ’मोदी जिंदाबाद’चे नारे लावले नाहीत.मोदींचे चार मंत्री संकटात अडकलेल्या या विद्यार्थ्यांची सूटका करण्यासाठी कुठे गेले?तर आजूबाजूच्या चार देशात!तिथून ते सांगतात ८०० ते १००० किलोमीटर बसने सीमेवर या,ट्रेनने या नसेल काही मिळत तर पायी चालत निघा!म्हणजे नागपूर ते गुजरात पायी चालत या असे त्यांचे म्हणने आहे का?किती हाल झाले भारतीय विद्यार्थ्यांचे याची कल्पना आहे का?युक्रेनच्या वाहतूकदारांनी किती लृट केली या विद्यार्थ्यांची याची जाणीव भारत सरकारला तरी आहे का?२००-३०० किलोमीटर चालण्यासाठी ७०० डॉलर विद्यार्थ्यांनी मोजले म्हणजे फक्त ३०० किलोमीटरच्या प्रवासासाठी ५० हजारांचा भुर्दंड भारतीय विद्यार्थ्यांनी भरला.मेट्रोच्या खंदकांमध्ये उपाशीतापाशी तहान-भूक विसरुन भारत सरकारच्या प्रयत्नांकडे डोळे लाऊन बसलेल्या विद्यार्थ्यांना देशात परत आणण्याच्या नैतिक कर्तव्यात देखील मोदी सरकारने इव्हेंट शाेधला!ही सरकार संकटात फायदा शोधणारीच सरकार आहे असा माझा सरळ-सरळ आरोप आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनेच नागरिक मारझोड करीत असलेले व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झालेत मात्र प्रसार-प्रचार माध्यमात त्याची बातमी कुठेही नाही.भारतीय दूतावासातच भारतीय विद्यार्थ्यांना टॉयलेट साफ करण्यास सांगण्यात आले,ज्यांना आधी भारतात जायचे आहे त्यांनी आधी दूतावासातील टॉयलेट साफ करण्याची सूचना करणारे व्हिडीयो हे कशाचे निर्दशक आहे?हे ’मोदी है तो मुमकीन है’चे निर्दशक नाही का?उत्तरप्रदेशाचा निवडणूकीत आपलं सर्वस्व ओतणा-या मोदींनी तेवढ्याच तातडीने भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पोलॅण्ड,रुमानिया इ.राष्ट्रांसोबत तेव्हाच संवाद का नाही साधला?भारतीय विद्यार्थ्यांना त्या देशात जात असताना युक्रेनच्या पोलिसांनी देखील मारझोड केली.मोदी-मिडीयाने हे कुठेच दाखवले नाही,त्या विद्यार्थ्यांनीच ते सोशल मिडीयावर व्हायरल केले की ते किती असुरक्षीत वातावरणातून सूटून आले आहेत.मोदींची मानसिकता काय आहे तर पुतिन से बात करेंगे!भारतीय नागरिकांना युद्धजन्य देशातून सुखरुप बाहेर काढणे हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिनचे काम आहे का?२२ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरु झालं असताना २६ तारखेला फतवा काढला ‘सावध रहा!‘एअरलाईन्सचे तिकीट होते एक लाख वीस हजार रुपये,अरे ते विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी गेले होते,गलेलठ्ठ पगारांची नोकरी करण्यासाठी नाही,भारतात परत यायला एवढा पैसा त्या विद्यार्थ्यांंकडे होता का?सामान्य घरातली मुले आहेत ती,याला तुम्ही अडचणीत आलेल्यांचा निकास(इव्हायूलेशन) म्हणता?
नागपूरच्या संदर्भात काग्रेस शांत का?

सत्ता कशी मिळते ते सांगतो.२०१७ च्या निवडणूकीपूर्वी गडकरी यांनी खूप मोठमोठ्या घोषणा केल्या.नागनदीचे सौंदर्यीकरण करणार,यूरोपमधील थेम्स नदी नागपूरात अवतरवणार,लंडनमधील शहराच्या मधोमध वाहणा-या थेम्स नदीत प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहत असून त्यात तेथील नागरिक नौका विहार करतात.हेच स्वप्न दाखवत २०१२ मध्ये मनपात सत्तेत आले.डीपीआर तयार झाला,१२ हजार कोटी मंजूर ही झाले.दिल्लीत सांगतात या प्रकल्पासाठी पैसे आणले आहेत मग काम कुठे थांबले आहे?२०१२ पासून २०२२ उजाडले तरी एक ही बोट ही नाग नदीत नाही चालली.साधी २० मीटरची देखील स्वच्छता नागनदीची झाली नाही.झोपडपट्टी धारकांना मालकी पट्टे हे केवळ निवडणूकीच्या काळात वितरीत होतात,साढे चार वर्षे ढूंकूनही त्यांच्याकडे बघितले जात नाही.चोवीस बाय सात पाणी पुरवठाचे २०१२ साली दाखवलेले दिवास्वप्न तरी पूर्ण झाले का?स्वच्छ नागपूर,कच-यातून विद्युत अशी दिवास्वप्ने दाखवली मात्र त्या कच-यातून एक तास ही वीज नागपूरकर जनतेला अजून तरी मिळाली नाही.उलट सत्तेत आल्याबरोबर पाण्यासारख्या मूलभूत बाबीचे खासगीकरण केले.अव्वाच्या सव्वा बिले आता नागपूरकर पाणी कर म्हणून भरतात आहेत.मालमत्ता कर वाढवला.गडकरींनी ‘फोकनाड‘मारल्या,लोकं त्यांच्या मागे धावली,२०१४ मध्ये ते खासदार ही झालेत,केंद्रात मंत्री ही झालेत,देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले मात्र २०१४ पासून मिहानमध्ये ५० हजार नोक-यांचे फक्त आकडे सांगतात,नावे आणि मोबाईल क्रमांक सांगत नाहीत.२०१७ च्या मनपाच्या निवडणूकीत तर चक्क बाबा रामदेव यांना नागपूरात अवतरवले.त्यांना फूकटात हजार एकर जागा दिली.दीड कोटी एवढा भाव आहे त्या जागेचा मात्र २५ लाखात जागा दिली.त्या ठिकाणी सेझ तयार आहे,पाणी,वीज,रस्ते संपूर्ण पायाभूत सुविधा असताना स्वस्तात बाबा रामदेव यांना जागा देण्यात आली.गडकरी आणि फडणवीस यांनी लोकांना गोड बोलून फसवलं.सहा महिन्यात रामदेव यांच्या प्रकल्पामुळे ५ हजार लोकांना रोजगार मिळेल,एका वर्षात १० हजार लोकांना रोजगार मिळेल असा खोटा दुष्प्रचार केला.आज २०२२ उजाडले असून एमआयडीसीने आता रामदेवबाबांना नोटीस पाठवून प्रकल्प सुरु करा किवा जागा परत करा असा दम दिला आहे.२०१६ पासून २०२२ आता सहा वर्षे झाली,रोजगार कुठे गेले? शुद्ध फसवणूक करतात नागपूरकरांची.फक्त भूमिपूजन करुन नामानिराळे झालेत.या फसवणूकीची सीबीआयमार्फत चौकशीसाठी मी पत्र दिले आहे.लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या बोलण्यालाही महत्व असतं मात्र गडकरी यांना जेव्हा पत्र परिषदेत मी करीत असलेल्या आरोपाविषयी विचारले गेले तेव्हा ’ती तीनपाट लोकांच्या बोलण्याला महत्व देत नाही!’असे उत्तर ते देतात!३ वेळा चिमूर व ४ वेळा नागपूरचा खासदार राहीलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला गडकरी हे आता खासदार झालेत तर ‘तीनपाट’ही उपाधी देतात?५० हजार सोडा १० हजार मुलांना तरी रोजगार दिला का?टाटा कंटल्संसी,इंफोसिसमध्ये ८ वर्षात म्हणजे २०१४ ते २०२२ पर्यंत ४ लाख लोकांना रोजगार दिल्याचे गडकरी भाषणात सांगतात,या आठ वर्षात ४ लाख तर सोडा ४० हजार तरी रोजगार विदर्भाच्या मुलांना उपलब्ध करुन दिला का?आज देखील नागपूर आणि विदर्भातील मुले हे रोजगारासाठी पुणे,मुंबई,बंकलुरु,हैदराबाद,कोलकता सारख्या आयटी हबमध्येच आपले घर,मायबाप,शहर सोडून जाण्यास बाध्य आहेत,यावर कहर म्हणजे ’माझी मेट्रो’आणली,अरे यांची कशाची मेट्रो?मेट्रोचा पूर्ण पाठलाग तर मी केला.२०१४ मध्ये शहर विकास मंत्री कमलनाथ होते.या प्रकल्पाचा संपूर्ण पाठपुरावा करुन ५० लाख रुपये खर्चून डीपीआर बनवला.भूमिपूजनासाठी इमप्रिंसिपल अप्रुव्हल आणलं.२०१४ मध्ये हे सत्तेच आले अन् मोदी यांच्या हस्ते पुन्हा भूमिपूूूूजन उरकून घेतलं!विधान सभा नोटीफिकेशन पूर्वी भूमिपूजन करता येत नाही.कोणत्याही प्रकल्पात स्वत:चे काय योगदान आहे हे गडकरी सांगत नाहीत.काय करतात तर भूमिपूजन उरकतात.मेट्रोचा प्रकल्प आत दहा हजार कोटींचा झाला.२०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार होता,झाले का टार्गेट पूर्ण?डीपीआर तयार झाल्यानंतर याच मेट्रोच्या भूमिपूजनासाठी मी आणि पृथ्वीराज चव्हाण हे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्याकडे गेलो होतो.त्यांचा पहीला प्रश्‍न होता,या प्रकल्पासाठी पैसा कूठून आणनार?यावर २५ टक्के केंद्र २५ टक्के राज्य ५ टक्के नागपूर महानगरपालिका,५ टक्के नागपूर सुधार प्रन्यास व उर्वरित ४० टक्के जर्मन,जापानकडून कर्ज घेणार असल्याचे मी सांगितले.यावर पंतप्रधान मनमाेहन सिंग यांचे उत्तर होते आपल्याकडे ६० टक्के झाल्याशिवाय मी कसा येऊ?यावर आम्ही सोनिया गांधी यांच्या हस्ते भूमिपूजन करावं का?असे त्यांना विचारले असता ‘हेच तत्व त्यांनाही लागू ’होत असल्याचे मनमोहनसिंग म्हणाले.त्या पंतप्रधानांनी भूमिपूजन नाही केले मात्र नरेंद्र मोदींनी मात्र २०१४ मध्ये सत्ता मिळताच मेट्रोचे भूमिपूजन केले.हाच फरक आहे भाजप व काँग्रेसच्या कार्यपद्धतीमध्ये.आयत्या बिळावर नागोबा झालेत सर्व.म्हणे ‘माझी मेट्रो‘अरे बापाची आहे का मेट्रो?तिथे मोदी येथे गडकरींनी,नागपूरकर जनतेला कराच्या बोजाखाली दाबून माझी मेट्रोचा इव्हेंट साजरा केला.

२०१५ मध्ये बृजेश दीक्षीत आणला.‘आंधळा मागतो एक डोळा’त्याला तर दोन्ही डोळे मिळाले.तोच आता मेट्रोचा मालक झाला.निविदा न काढता कामे दिलीत व फक्त कंत्राटदारांचे भले केले.गडकरी यांनी मनपाच्या किती लोकांना गर्भश्रीमंत केले हे तरी इमानदारीने जनतेला सांगावे!नागपूरातील सर्व मोक्याच्या जागा फूकटात महामेट्रोला दिल्या.त्या जागेचा उपयोग काय केला?तर मॉल्स बांधले.सेवेन स्टार हॉटेल्स बांधले,संपूर्ण व्यवसायिक हेतू साधला.२०१९ च्या लोकसभेच्या निवडूकीत पुन्हा सोनेगावपासून मेट्रो धावणार असे नागपूरकरांना फसवले.मेट्रो तर नाही धावली फक्त काम सुरु केले.प्रत्येक ठिकाणी उद् घाटनाचा सपाटा लावला.स्वत:ची ‘विकास पुरुष’ म्हणून प्रचार-प्रसार माध्यमांत प्रतिमा निर्माण केली.स्वत:ला गडकरी ’मिहान पुरुष’ही म्हणून घेतात.१९९९ ते २००४ पर्यंत मी एमआयडीसीचा उपाध्यक्ष तर विलासराव देशमुख हे अध्यक्ष होते.२००४ मध्ये मी केंद्रात मंत्री झालो त्यामुळे उपाध्यक्ष पद मी सोडले.नागपूरकरांसाठी मेट्रो,मिहान,सेझ,आंतरराष्ट्रीय विमानतळ या सर्व संकल्पना माझ्या होत्या.२००४ मध्ये रामवॉल कंसल्टींग इंजि.प्रा.लि.कडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ३० लाख चौ.मी.जागेवरचा संपूर्ण अहवाल तयार करुन घेतला.विमानतळ,हबची कल्पना त्यातच होती.जेव्हा हब बनेल तरच रोजगार निर्माण होतील.सोबत सेझचीही निर्मिती होणार होती.२००७ मध्ये सेझ तयार झाला मात्र नागरी उड्डयण मंत्री प्रफूल्ल पटेल यांनी समोर काहीच हालचाल केली नाही.हा प्रकल्प तिथेच अडकवून ठेवला.मेट्रो ही गडकरींसाठी पहीली प्राथमिकता होती तर आमच्यासाठी सेझ,मिहान आणि आतंरराष्ट्रीय विमानतळ महत्वाचे होते.

अजनीवनची संकल्पना देखील माझीच आहे मात्र आज गडकरींना या प्रकल्पासाठी जेवढी एकर जागा हवी आहे तेवढी जागा आमच्या प्रकल्पात नव्हती.अजनीचा १०० वर्ष जुना पूल तोडून तुकडोजी पुतळ्यापासून रेल्वेच्या जमीनीपर्यंत नवा पूल तयार करायचा.त्यावेळी मनुकुमार श्रीवास्तव होते.मी खासदार निधीतून ५० लाख रुपयेही दिले.अजनीचा पूल दोन दिशेने येणार होता व नव्या पुलावर उतरणार होता.अजनी क्वार्टर तोडून नवा पूल,नवे रेल्वे स्टेशन बांधायचे,पाटबंधारे विभागाला दूर न्यायचे,कारागृह नव्याने बांधायचं या सर्व कल्पना गडकरी यांनी उचलल्या व ‘जगाच्या बाहेरच्या कल्पना म्हणून मिरवल्या’.गडकरी यांच्या विभागाला तर मेट्रोने नियमबाह्य पद्धतीने पैसे पुरवले.मेरी मुर्गी की एक टांग यालाच म्हणतात.‘सैया भये कोतवाल अब डर काहे का?’एवढी उड्डाण पुले बांधली ती कोणासाठी?उड्डाणपूलांवरुन कोणता सायकलवाला जातो?फक्त कारवाल्यांचीच सोय केली.लाेकं खूश.सामान्यांना काय दिलं?रस्ते ही तुमचीच जवाबदारी आहे.या शहरात एक केंद्रिय मंत्री राहतो तर आपल्या शहरात रस्ते बांधण्याची जबावदारी तुमचीच नाही का?की उपकार करता आहात शहरावर?आता तर मेट्रो बुटीबोरी,कामठीपर्यंत वाढवण्यात आली.शेवटी याचा भुर्दडं काेणावर बसणार आहे?२००४ मध्ये एम्स देखील मीच आणला.केंद्रात मंत्री असताना एम्ससाठी १२० कोटी आणले मात्र ‘नकारखाने मे तुती‘सारखी माझी अवस्था केल्या गेली.

काँग्रेस ना देशात ना शहरात गप्प किवा शांत आहे कारण इतर ही खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या.देशात मोदींनी नंगा नाच चालवला आहे. कोर्टातही यांच्या बाजूनेच निकाल लागतो.त्यामुळे आपलंच तोंड फोडून काय घ्यायचं?या विचाराने गप्प राहवं लागतं.आ.विकास ठाकरे यांच्यावरतर २८ केसेस ठोकल्या आहेत.त्या सर्व राजकीय आंदोलनाच्या केसेस आहेत.अाता सर्व प्रभाव जनतेवर पडू लागला आहे.मोदी तर १०१९ ची लाेकसभा निवडणूक संपली आणि निकाल लागण्यापूर्वी बाबा अमरनाथांच्या मंदिरात जाऊन बसले मात्र लाईव्ह टेलिकास्टवाल्यांना सोबत घेऊन गेले!

माध्यमांविषयी मी काहीही बोलणार नाही कारण हे माझ्या दू:खद निधनाची देखील बातमी मग छापणार नाही!लोकांना माहिती ही नाही पडणार मी मेलो म्हणून!

येत्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत नागपूरकर जनतेनी आता तरी फसव्या स्वप्नांच्या आणि सुंदर शहराच्या कल्पनांच्या मागे न धावता वीज,पाणी,रस्ते,मालमत्ता कर,सांडपाणी,गडर,चेंबर इ.यासारख्या मूलभूत सोयींचा विचार करावा,सामान्य जनता भाजपच्या गेल्या १५ वर्षांच्या कारभारामुळे दु:खी झाली आहे.आत सत्ता बदल होने नितांत गरजेचे आहे.गडकरी यांना काहीही करुन मनपाची सत्ता हवी आहे कारण मनपात जर त्यांची सत्ता नसेल तर त्यांचे अनेक प्रकल्प रखडले जाणार आहेत.देशात किवा राज्यात सत्ता असून देखील फायदा नसतो,मनपात सत्ता असली तरच अापल्या मतदारसंघात फसव्या स्वप्नांचे इमले बांधता येतात.

मी एकमेव असा राजकारणी आहे ज्याची कोणतीही शाळा नाही,कॉलेजस नाहीत,फाईव्ह स्टार रुग्णालये किवा मेडीकल कॉलेज नाहीत.चतुर्वेदीं यांनी काय योगदान दिले?दत्ता मेघेंनी काय केले?रणजीत देशमुखांनी काय केलं?हे जनतेनीच त्यांना विचारायला हवं.जनता ही थंड आहे.संथ आहे.नाना पटोले हा जनतेतला माणूस आहे.त्यांना प्रदेशाध्यक्ष होऊन एक वर्ष ही झाले नाही मात्र ते स्पष्ट बोलतात तरी.विकास ठाकरे यांच्यामुळेच आज नागपूर शहरात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक आहे.२००२ मध्ये विकास ठाकरे महापौर झाले.त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक ही डाग नाही.शहराध्यक्ष पदावरुन त्याला काढा म्हणनारे त्यांच्या जागी कोणाला बसवावे हे मात्र सांगत नाहीत.मनपात पुन्हा काँग्रेसला येण्याची संधी आहे असं मला वाटतं.आता तर नाही लढलो तर कार्यकर्त्यांचे खूप नुकसान होईल.

पाच राज्यांच्या निवडणूकीत काँग्रेसची पिछेहाट झाली हे सत्य नाकारुन चालणार नाही,काँग्रेसमध्ये निराशेचे वातवारण आहे मात्र हे कायमस्वरुपी नाही.विजय आणि पराभव हा काँग्रेस पक्षाचा अविभाज्य भाग राहीला आहे.१९६८ मध्ये इंदिरा गांधींच्या नेर्तृत्वात देशातील आठ राज्यात काँग्रेसचा पराभव झाला होता,त्याचा परिणाम इतर ही राज्यात झाला होता.या आठ राज्यात संयुक्त पक्षांची सरकार स्थापन झाली होती.मात्र हळूहळू लोकांच्या हे लक्षात आले खोटं बोलून सत्ता बदल करण्यात आले आहे,या अनुभवातून बोध घेऊन १९७२ च्या निवडणूकीत पुन्हा इंदिरा गांधींकडे मतदारांनी देश साेपवला होता.१९७१ मध्येच काँग्रेसने देशात उचल खालली होती.१९६९ मध्ये इंदिरा गांधीने बँकांचे राष्ट्रीयकरण,गरीबी हटावचा दिलेला नारा इ.असे खूप मुद्दे काँग्रेसला त्या पराभवातून बाहेर काढण्यास कारणीभूत ठरल्या होत्या.त्यामुळेच पराभव हा कायमस्वरुपी कधीच नसतो.काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पराभवाची देखील सवय आहेच. गावागावात काँग्रेसचा जनाधार आहे.काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रोग्रेसिव्ह म्हणजे पुरोगामी पक्षात आहे त्यामुळे तो भारतीय जनता पक्षासारख्या प्रतिगामी राजकीय पक्षात कधीही जाऊच शकणार नाही.काँग्रेस आणि भाजपमध्ये विचारधारेची खूप मोठी दरी आहे,जी पार करने अशक्य आहे.या पराभवातही आपापल्या ठिकाणीच काँग्रेसला भरारी घ्यावी लागणार आहे.फिनिक्स पक्षी हा राखेतूनच भरारी घेत असतो,काँग्रेसची अजून राख झालेली नाही.

राहीला प्रश्‍न नेतृत्व बदलाचा तर जे नेते ही मागणी करतात आहेत त्यांनी दूसरीकडे बोट दाखवण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात मी पक्षासाठी काय करु शकतो?याचा विचार करावा.स्वत:चे गाव आबाद नाही अाणि बोट दाखवतात आहेत दिल्लीतील नेतृत्वाकडे?या संकटकाळात तुम्ही पक्षासाठी काय योगदान देऊ शकता ते तर सांगा?गांधी परिवारावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार तरी आहे का?ज्यांच्या भरवश्‍यावर ताहयात मजा केली,आपापल्या गावात मिरवत राहीलात, आता पराभव झाला तर गांधी परिवारामुळे आणि विजय झाला तर तो तुमचा?नाक तरी आहे का जी-२३ मधील नेत्यांना गांधी परिवाराविषयी बोलण्याचा?आज पक्ष संकटात असताना तुमचा उपयोग कधी होईल?तुम्ही कधी उपयोगी पडणार आहात?नेहरु,इंदिरा,राजीव,सोनिया,राहूल किवा प्रियंका गांधींच्या काळात तुम्ही लाडू खाललेत ना?मग आता रस्त्यावरचे फूटाणे खा!भाजप नाही का इतकी दशके सत्ते बाहेर राहीली?गांधी परिवाराशिवाय एवढ्या जुन्या व प्रगल्भ विचारधारेच्या पक्षाचे नेतृत्व करणारा एक ही नेता सध्या तरी पक्षात नाही जो एखाद्या सभेसाठी ५०० तरी लोक जमा करु शकेल.

………………………

(शब्दांकन-डॉ.ममता खांडेकर)

(Senior Journalist)

……………………………….‘
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या