फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजधावत्या सिटी बसला आग:प्रवाश्‍यांच्या जीवावर डीम्स एजंसी उदार

धावत्या सिटी बसला आग:प्रवाश्‍यांच्या जीवावर डीम्स एजंसी उदार

Advertisements

सकाळीच बसला मिळाले हाेते ‘फिटनेस’प्रमाणपत्र!मेंटनेस,देखरेखीची जबादरी डिम्स एंजसीवर

सत्ताधा-यांच्या एजंसीजचाच मनपात भरणा:गडकरींना हवी मनपात पुन्हा भाजपचीच सत्ता

जनतेच्या पैश्‍यांची लृट:प्रशासनाचा ‘मौन राग’

नागपूर,ता.८ मार्च २०२२: कोणत्याही शहरात त्या शहरातील नागरिकांसाठीची परिवहन व्यवस्था ही सुलभ,सुरक्षित व स्वस्त असण्यावर भर दिला जातो.सिटी बससारख्या परिवहन व्यवस्थेचा लाभ हे शहरातील सर्वसामन्य प्रवाशी,विद्यार्थी वर्ग घेत असतो.अश्‍या वेळी एकेकाळी एस.टी.महामंडळाकडून अट्टहासाने परिवहन व्यवस्था नागपूर महानगरपालिकेने हिसकावली तेव्हा नागपूरकर जनतेला ही वाटलं आता ‘चमत्कार’होईल,रयतेचे राज्य उपराजधानीत अवतरेल,त्यांना सहज,सुलभ,स्वस्त आणि सुरक्षित आवागमनासाठी मनपाची परिवहन समिती व प्रशासन सज्ज झाली असल्याने त्यांचे कष्ट कमी होतील मात्र झाले विपरीत.मनपाची परिवहन व्यवस्था हे सत्ताधा-यांसाठी ’चरण्याचे कुरण’ बनत गेली. शहराची परिवहन व्यवस्था खासगी एजंसींच्या घश्‍यात ज्या पद्धतीने घालण्यात आली त्याचा उच्चांक गेल्या काही महीन्यांपासून नागपूरकर अनुभवतच आहे.

आज काटोल रोड जुना नाकाजवळ मनपाच्या धावत्या आपली बस क्र.एमएच ३१ca6102 ला अचानक आग लागली,चालकाने प्रसंगावधान राखून बस जागेवर थांबवली,जवळपास ६० ते ७० प्रवाशी हे जीव मुठीत घेऊन खाली उतरेपर्यंत बसने चांगलाच पेट घेतला होता,विशेष म्हणजे या बसला सकाळीच डीम्स एजंसीच्या तपासणी कर्मचा-याने  फिटनेस प्रमाणपत्र देऊन रजिस्टरवर सही केल्याची माहिती समोर आली आहे.या बसमध्ये पूर्वीपासूनच डिजेल लिक होण्याच्या तक्रारी पुढे आल्या असताना,अश्‍या बसेस प्रवाश्‍यांच्या जीवावर उदार होऊन रस्त्यांवर धावत आहेत,आजच्या घटनेत दूर्देवाने हे प्रवाशी होरपळून भाजले असते तर एवढ्या मोठ्या दूर्घटनेला जबादार कोण राहीलं असतं?

प्रशासन,परिवहन समिती,खासगी एजंसींना शहरातील या परिवहन व्यवस्थेतून फक्त आपले ‘उखळ पांढरे’ करण्याशिवाय इतर गोष्टीत रस नसल्याचेच ही घटना द्योजक आहे.नुकतेच ४ मार्च रोजी सत्तेतून पायउतार झालेले माजी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी ३४६ कोटींचे बजेट आयुक्तांना सादर केले.पत्र परिषदेत नागपूर परिवहन बसेसच्या संख्येत इलैक्ट्रीक बसेस,मिडी बसेस,महिलांसाठी ’ती’बसेस इ.चा किती ताफा दाखल होणार आहे,याची माहिती वाचून दाखवली मात्र नव्याने दाखल होणा-या बसेस कोणत्या करारतत्वावर कोणत्या ‘कबाडी एजंसींकडून’ ताफ्यात दाखल होणार आहे,त्यांच्या सुरक्षिततेची खात्री नेमकी किती महिन्यांची किंबहूना वर्षांची आहे,याबाबत त्यांनी ’ब्र‘देखील उच्चारला नाही.सत्ताधारी असल्याने किवा फार मोठ्या नेत्याचा वरदहस्त डोक्यावर असल्याच्या अर्विभावात नागपूरकर जनतेच्या जीवाशी हा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून मात्र अव्याहतपणे सुरु आहे.

२०१७ मध्ये नागपूरच्या परिवहन व्यवस्थेत हंसा एजंसी बस सर्व्हिस,आर.के.सिटी बस आणि ट्रॅव्हल टाईम या तीन एजंसींना समाविष्ट करुन कंत्राट देण्यात आले होते.या तिन्ही एजंसींवर देखरेख ठेवण्यासाठी पुन्हा नागपूरकर जनतेवर कराचा बोजा वाढवून डीम्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या चारही एंजसीजचे कर्तेधर्ते ‘लाभार्थी नेमके कोण आहेत?याची बरीच चर्चा मनपात चर्चिली जात असते.या तिन्ही एजंसींच्या अनेक बसेसचे ब्रेक देखील लागत नाही,अनेक बसेस या कबाड झाल्या आहेत मात्र या तिन्ही एजंसींना दहा वर्षांचा कंत्राट देण्यात आला असून पटवर्धन मैदान,एमआयडीसी हिंगणा सारख्या मोक्याच्या जागेवर डेपोसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या

.डीम्स कंपनीचे कर्मचारी यांना देखरेखीसाठी नियुक्ती दिली असताना पहाटे बसेस डेपोमधून निघत असताना त्या बसची अवस्था तपासणे व रजिस्टरवर स्वाक्षरी करुनच ती रस्त्यावर धावू देणे या कामाचा भरघोष पैसा डीम्स कंपनीला प्राप्त होतो मात्र महाराज बागेच्या सिग्नलवर याच एजंसीतील एका बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस सरळ सिग्नलवर उभे असलेल्या निष्पाप वाहनचालकांच्या अंगावर चढली होती,जागेवरच अनेक वाहनचालक, त्यांची कोणतीही चूक नसताना चिरडल्या गेले होते.या घटनेतून कोणताही बोध न घेता ’आंधळा दळतोय कुत्रा पीठ खातोय’अशी अवस्था भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात परिवहन विभागाची झाली.नुकतेच हंसा ट्रॅव्हल्सचीच बायोडिजलवर चालणारी बस अशीच आगीत धू-धू जळत खाक झाली होती.या बसमध्ये भेसळ केमिकलचा उपयोग करण्यात आला असल्याची बरीच चर्चा मनपात रंगली होती

दीड महिन्यांपूर्वी डीम्स कंपनीच्या देखरेखीचा कारभार बघून छापा देखील पडला होता.एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला,पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी निर्दोष प्रवाश्‍यांच्या जीवाशी खेळणा-या या खासगी एजंसींच्या कारभारावर कठोर कारवाईचे आदेश ही दिले होते.यानंतर हे प्रकरण ‘थंड बस्त्यात’गेले हा भाग अलहिदा.

भाजपच्या सत्ताकाळात हंजर एजंसीचा ‘कचरा’ ज्यायप्रमाणे गाजला तोच प्रकार या तिन्ही एजंसीबाबत देखील घडतोय.‘कचरा म्हणजेच भंगार बसेस’नागपूरकर प्रवाश्‍यांच्या जीवावर उदार होऊन रस्त्यावर धावत्या ठेवण्यात आल्या.नगरसेवकांनी देखील सभागृहात फक्त प्रश्‍न उपस्थित करने,महापौरानी प्रशासनाला चौकशीचे आदेश देने,प्रशासनाकडून थातूरमातूर अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणे,गेली पाच वर्षे हेच सुरु होते,कारवाई मात्र शून्य!

गेल्या पाच वर्षात नागपूरकर नागरिकांनी मनपात भाजपला फक्त अश्‍याच प्रकारची ‘एंजसीज व सल्लागारांवर कोट्यावधीच्या उधळपट्टीची’ सत्ता राबवताना बघितले आहे. दोषींवर कारवाईच होत नाही कारण मनपात वेगवेगळ्या विभागात रुजू असणा-या खासगी एजंसीज या कोणत्यातरी ‘मोठ्या बापाची अनौरस औलाद असल्यानेच’ कितीही ओरड झाली तरी त्यांचा बाल भी बांका’होऊ शकला नाही. गेल्या पाच वर्षात नागपूरकर जनतेने मनपात कार्यरत एकाही खासगी एजंसीजच्या एकंदिरत कारभारावरुन सभागृहात किवा प्रशासकीयस्तरावर कारवाई झालेली बघितली नाही.आजची घटना ही त्या ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’वृत्तीचेच निर्दशक असून ७० प्रवाशांचा जीव मात्र धोक्यात आला होता.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या प्रत्येक भाषणात प्रदुषणमुक्त परिवहनासाठी नेहमी आग्रही भूमिका घेताना दिसतात मात्र त्यांच्याच मतदारसंघ असणा-या नागपूर शहरात त्यांच्याच पक्षाची पूर्ण बहूमताची सत्ता असणारे सत्ताधारीच मात्र सातत्याने उरफाटाच कार्यभार हाकताना दिसतात.त्यांच्या नाकावर टिच्चून अतिशय महागड्या अश्‍या एक नव्हे तर तीन-तीन सीएनजी बसेस उभ्या उभ्य पेट घेतात!यावर कोणतीही हाक नाही की बोंब नाही,या बसेस विमा परताव्याच्या लोभासाठी हेतूपुरस्सर जाळण्यात आल्याची देखील चर्चा बरेच दिवस मनपात रंगली होती.मात्र गडकरी यांचे अतिशय प्रिय असणारे महनीय बंटी कुकडे या परिवहन समिती सभापती महोदयांनी या घटनेचा शोध ही घेतला नाही किवा साधी चौकशी देखील लावली नाही,वरुन दावे मात्र प्रदुषणमुक्त परिवहन नागपूरचे!बंटी कुकडे हे दोनवेळा सभापती पदी बसले व ’योगायोगाने’त्यांच्याच कारकीर्दीत हंसा ट्रॅव्हल्सच्या बसेस वारंवार दूर्घटनाग्रस्त झाल्या!तरीही त्यांनी या तिन्ही बस डेपोमध्ये साधी अकस्मात भेट देऊन आकस्मिक चौकशी ही केली नाही.मनपामध्येच ते तीन दुपारी तीन-चार वाजता ‘अवतरतात’हे मनपाचे कर्मचारीच खासगीत सांगतात.कुकडे यांनी मनपाचा ‘जावई’असल्याप्रमाणेच कारभार हाकला.

कुकडे यांच्या खासमखास दोन कार्यकर्त्यांना गिरीश महाजन व शुभम मोहन यांना पगार मनपाकडू मिळतो मात्र हे चाकरी कुकडे यांच्या श्रीकृष्ण नगर येथील कार्यालयात करताना आढळतानची चर्चा मनपात होते,प्रशासनाला देखील ही माहिती असताना जनतेच्या कष्टाचा कराचा पैसा फूकट्या कर्मचा-यांवर निर्दयतेने उधळल्या जात असल्याचा संताप देखील खासगीत व्यक्त होत असतो.

डिम्स कंपनीत कोणत्या सभापतींच्या अतिशय जवळच्या कार्यकर्त्यांचा भरणा आहे ?दररोज तिन्ही डेपोमध्ये पहाटे साढे पाच वाजता जाऊन प्रत्येक बसची कंडिशन ही रसत्यावर धावण्यासारखी आहे की नाही हे कोण तपासतो?कश्‍याप्रकारे होते तपासणी?काय निकष असतात? प्रत्येक बसमागे पैशांचा व्यवहार त्या ‘फिट’असल्याचा रकान्यात स्वाक्षरी करण्यासाठी होतो,असा आरोप केला जात आहे.मूळात आज देखील ज्या बसने अचानक पेट घेतला व ज्यात ७० प्रवाश्‍यांचा सुदैवाने जीव वाचला त्या बसमध्ये आग विझवण्यासाठीचं किट देखील नव्हती!

बसने पेट घेतला तेव्हा समोरचा भाग जळत असतानाच ही किट बसमध्ये असती तर चालकाने त्याची फव्वारणी करुन आग आटोक्यात आणली असती मात्र आगीपासून सुरक्षेच्या किट फक्त ‘कागदांवरच’ नागपूरकर प्रवाश्‍यांना सुरक्षा प्रदान करीत असल्याचे धगधगते ‘वास्तव’आहे.छोटी मोठी आग विझवण्यासाठी मिडी बसमध्ये किमान ५ लीटरची किट असणे गरजेचे असताना मनपा परिवहन विभागातर्फे चालणा-या तिन्ही एजंसीजच्या बसेसमध्ये या किट्स नसतातच, त्यात वाहक किवा चालकांना देखील आपातकालीन घटनेच्या वेळी कोणती काळजी घ्यावी याचे कौशल्य दिले जात नाही.हे सगळे नियम कागदावरच कार्यरत आहेत.

शासनाच्या वाहतूक परिवहन विभागाच्या नियमानुसार सिटी बसेस मधील आग विझवणारे सिलेंडर हे दरवर्षी अद्यावत करने बंधनकारक आहे,येथे तर बसेसमध्ये किट्सच नाहीत तर अद्यावत कशाचे करणार? नागपूरातील वाहतूक परिहवन विभागाच्या अकस्मात तपासणी कर्मचा-यांना देखील मनपाच्या या भंगार बसेसमध्ये डोकावण्याचे धाडस होत नसावे त्यामुळेच ’प्रवाश्‍यांची जिवंत चिता’ बनू शकणा-या तिन्ही एजंसीजच्या भंगार बसेस व त्यांच्यावर देखरेखीसाठी नियुक्त डिम्स एजंसीला फ्री-फूकट पोसण्याचा संपूर्ण आर्थिक भार नागपूरकरांवर भाजपच्या कार्यकाळात उचलावा लागला असून, एकीकडे मनपाच्या कर्मचारी वर्गाला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्यासाठी दीड कोटींचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडेल या सबबीखाली मनपा प्रशासनाची टाळाटाळ सुरु असते दूसरीकडे भाजपची पंधरा वर्षांपूर्वी मनपात, सत्ताधारी होण्याची मुर्हुतमेढ रुजताच, एजंसी व सल्लागारांचा सुळसुळाट सुरु झाला,त्यात आपल्या पहील्याच टर्ममध्ये क्रीडा घोटाळ्यात हात पोळून घेतल्यावरही, नागपूरकर नागरिकांसाठी जीवनावश्‍यक बाब असणारे पाणीच त्यांनी खासगी ओसीडब्ल्यू एजंसीला विकले!कचरा संकलानासाठी ‘कनकला’ नागरिकांच्या डोक्यावर आणून बसवले यानंतर कनकला बाहेरचा रस्ता दाखवून ‘एजी एन्वहायरो’ व ’बीव्हीजी कंपनीच्या’ बेशिस्त दावणीला नागपूरकरांना भाजपने बांधले.आता या दोन्ही एजंसीज पुन्हा कोणत्या नेत्यांच्या आहेत याचा शोध नागपूरकर घेत आहेत.मनपाची संपूर्ण परिवहन व्यवस्थाच महामेट्रोला देण्याचा घाट देखील याच प्रकारात मोडतो.

एकीकडे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात कठोर ताशेरे ओढत सत्ताधारी किवा लोकप्रतिनिधी हे राष्ट्रीय संपत्तीचे विश्‍वस्त असतात मालक नाही,अशी परखड टिका करुन देखील उपराजधानीत, स्थानिक स्वराज्य संस्थेत भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात ज्याप्रमाणे सत्ताधारी विश्‍वस्त नसून संपूर्ण साधनसंपत्तीचे ’मालकच’असल्याप्रमाणे कारभार चालवण्यात आला,
हे नागपूरकर जनता विसरली नाही.

तरी देखील केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे भाजपच्या वर्धापन सोहळ्यात राज्याची सत्ता तर गमावली किमान मनपातील सत्ता तरी गमावू नका,असा आर्जव करतात तेव्हा, देशात किवा राज्यात भाजपची सत्ता असो किवा नसो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचा किती जीव गुंतला किंबहूना ’हितसंबंध‘गुंतले आहे याचा अंदाज येतो.

एकीकडे गडकरी हे पाश्‍चात्य देशाप्रमाणे नागपूरात रोप-वेवर चालणारी म्हणजे हवेत उडणारी बस चालविण्याचा कल्पनाविलास रंगवत असताना त्यांच्याच पक्षाच्या सत्ताकाळात, नागपूरकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी किमान ‘जमीनीवर तरी’ आपली बस सुरक्षित  चालवा,एवढीच आता प्रशासक असलेल्या मनपा प्रशासनाकडून आपली बसच्या प्रवाश्‍यांची अपेक्षा आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या