

परिणीता फूकें यांनी उपस्थित केला इंदिरा गांधी रुग्णालयाच्या दूर्दशेचा प्रश्न
वर्षभरापासून गंटावार रजेवरच:प्रशासनाची डोळेझाक
ऐन करोनाच्या काळात मनपा रुग्णालये ठरली ’उकीरडेच’
नागपूर,ता.२ मार्च २०२२: बहूचर्चित असे नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्या निलंबनाचे आदेश अखेर,अखेरच्या सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी चर्चेदरम्यान प्रशासनाला चांगलेच कोंडित पकडले व गेल्या वर्षभरापासून रजेवरच असणा-या डॉ.गंटावारांचे निलंबन करुन त्या ठिकाणी योग्य अधिका-यांच्या नियुक्तीची मागणी केली.भाजपच्या नगरसेविका परिणीता फूके यांनी मनपाचे एकमेव जनरल रुग्णालय गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या दूर्देशेबाबत आज सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.डॉ. गंटावार यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार या तेथील प्रमुख आहेत हे विशेष!
इंदिरा गांधी रुग्णालयात स्थायी व अस्थायी अश्या किती डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे?असा प्रश्न फूके यांनी विचारला होता.यावर सहा पदे मंजूर असून सध्या तीनच डॉक्टर त्या ठिकाणी कार्यरत असून डॉ.शीलू चिमूरकर उर्फ शीलू गंटावार,डॉ कांचन किंमतकर व डॉ.बर्वे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवेत असल्याचे उत्तर अति.आयुक्त राम जोशी यांनी दिले.याशिवाय मनपाच्या मागणीवर शासनाने एनयूएचएमतंर्गत बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रीती वाघमारे व भूलतज्ज्ञ डॉ. स्वपनील मेश्राम या डॉक्टरांची तात्पुरती नियुक्ती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.यावर गेल्या चार वर्षांपासून फक्त तीन स्त्रीरोगतज्ज्ञच मनपाचे हे एवढे मोठे व महत्वाचे रुग्णालय सांभाळीत असून हे रुग्णालय जनरल म्हणून सुरु झाले असताना फक्त स्त्रीरोगतज्ज्ञच रुग्णालयात कश्याकाय सेवा देऊ शकतात?असा प्रश्न फूके यांनी विचारला.एकेकाळी अतिशय गजबजलेल्या या रुग्णालयात आता गेल्या काही वर्षात सातत्याने शुकशुकाट असतो.साधी शस्त्रक्रिया किवा जखमेवर एक टाक देखील मारायला त्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञांशिवाय इतर तज्ज्ञ डॉक्टर सापडत नाही असा संताप फूके यांनी व्यक्त केला.
कोविडमुळे अस्थायी वैद्यकीय कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र नुकतेच २८ फेब्रुवरी २०२२ रोजी त्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याचे राम जोशी यांनी सांगितले.यावर इंदिरा गांधी रुग्णालय हे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पीटल आहे हॉटेल नाही फक्त वरण-भात खायला,असा संताप फूके यांनी व्यक्त केला.डॉ.बहीरवार,डॉ.भावना कामदार आदीसारख्या वैद्यकीय अधिका-यांच्या काळात इंदिरा गांधी रुग्णालय हे खूप चांगल्यारितीने चालत होते.आता तर कुठल्या ही वेळी जा,रुग्ण गायब दिसतात.जे येतात त्यांना ही शासकीय रुग्णालयांचा रस्ता दाखवला जातो.रेडियोलॉजिस्टचे पद ही एकसूरी आहे,ही मशीन फक्त स्त्री रुग्णांच्या सोनोग्राफीसाठी नव्हे तर इतर ही आजारांवर बहूउपयोगी आहे मात्र या मशीनचा उपयोग रुग्णांसाठी होत नाही.रात्र पाळीत तर फक्त एकमेव परिचारिका हे रुग्णालय सांभाळते.या प्रभागात सर्वाधिक स्लम भाग असताना गरीब,गरजू रुग्णांना रात्री अपरात्री या रुग्णालयाचा काहीही फायदा होत नाही.मूळात स्थायी व अस्थायी डॉक्टरांना किती रजा मंजूर आहे?असा प्रश्न फूके यांनी विचारला असता वैद्यकीय ८ सुट्या,अर्जित ३० व किरकोळ ३० सुट्या स्थायी डॉक्टरांना तर अस्थायी डॉक्टरांना ८ किरकोळ व ३० वैद्यकीय सुट्या मिळत असल्याचे राम जोशी यांनी सांगितले.
यावर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार हे किती वर्षांपासून रजेवर असल्याचा प्रश्न उपस्थित झाला.११ फेब्रुवारी २०२१ पासून डॉ.गंटावार हे सुटी वर आहेत.१५ जून २०२१ रोजी ते मेडीकल बोर्डाकडे गेले.२८ दिवस उशिर करुन त्यांना मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिली.ऐन करोनाच्या भयंकर त्रासदीत जेव्हा नागपूरकरांना आरोग्य विषयक सेवेची गरज होती त्याच काळात डॉ.गंटावार हे धंतोली स्थित ‘कोलंबिया’ या आपल्या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर गलेलठ्ठ फी घेऊन उपचार करीत होते.डॉ.गंटावार यांना मनपाची प्रशासकीय नोकरी हे केवळ आपला कुटील हेतू साध्य करण्यासाठी अडकवून ठेवण्यात स्वारस्य आहे.उगाच ते जागा अडवून बसले आहेत.प्रशासनाने मंजुरी दिली नसताना ते सुट्यांचा आनंद उपभोगत आहेत.प्रशासनाला माहिती सर्व आहे मात्र डोळे बंद आहेत,असे टिकास्त्र अविनाश ठाकरे यांनी सोडले.
कोणत्या तारखेला चौकशी अहवाल प्राप्त झाला?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावर राम जोशी यांनी विभागीय चौकशी सुरु आहे,अहवाल अद्याप यायचा आहे,अहवाल आल्यानंतर कारवाई करु,अशी नेहमीसारखीच ‘मखलाशी’जोडली.यावर २७ जुलै २०२१ रोजी मेडीकल बोर्डाचे फिटनेस प्रमाणपत्र आल्यानंतर देखील प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही.८ ऑक्टोबर २०२१ व ९ नाेव्हेंबर २०२१ रोजी फक्त दोन वेळा कारणे दाखवा नोटीस देण्याची खानापूर्ती केली.९ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉ.गंटावार यांनी दिलेला खुलासा वाचून दाखवाव,अशी मागणी ठाकरे यांनी केली.यावर इंग्रजीत त्याचे वाचन झाले.
काही नगरसेवकांनी मराठीत सांगा हो याचा अर्थ,विषय गाजलेल्या डॉ.गंटावारांचा आहे,आम्हालाही कळू द्या त्यांनी काय खुलासा केला,अशी उपहासात्मक टिपण्णी केली.
यावर ७ व्या महिन्यात गंटावार फिटनेस प्रमाणपत्र सादर करतात आणि ११ व्या महिन्यात त्यांना प्रशासन खुलासा मागतात.प्रशासनाची भूमिका त्यांना वाचवण्याची आहे का?असा सरळ आरोप ठाकरे यांनी राम जोशींवर केला.
एखाद्या ऐवजदार आठ दिवस सुटीवर असला तर त्याचा पगार कापला जातो,दंडात्मक कारवाई केली जाते मात्र ‘महानगरपालिकेचे जावई डॉ.गंटावार’हे वर्षभर सुटी असताना त्यांना फक्त दोन वेळा कारणे दाखवा नोटीस पाठविली जाते!गंटावार यांनी शासकीय नोकरी न केल्यामुळेच कोविडच्या काळात वीस-वीस कोटी खर्च करुन इतरांची सेवा घेण्यात आली.हा भुर्दंड कोणावर बसला?
गंटावार यांची चौकशी ही ‘अॉन ड्यूटी‘करणार आहात का?असा संताप व्यक्त करीत आधी गंटावार यांना निलंबित करण्यात यावे,यानंतर चौकशी करण्यात यावी इतकंच नव्हे तर सातत्याने गंटावार यांना पाठीशी घालणारे अति.आयुक्त राम जोशी यांची देखील चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी महापौरांकडे गेली.
गंटावार यांना प्रशासनाला वाचवायचे आहे,हे एकदा स्पष्ट सांगूनच टाका,गोल-गोल खूप ऐकलं,गंटावार यांची कायमची सुटी करुन त्या ठिकाणी योग्य अधिका-याच्या नियुक्तीचे आदेश महापौरांनी द्यावे,अशी मागणी ठाकरे यांनी केली.
यावर परिणीता फूके यांनी इंदिरा गांधी रुग्णालयात लॅबतज्ज्ञ नाही,रक्त तपासणी होत नाही,रेडियोलॉजी मशीन आहे पण ती फक्त सोनोग्राफीसाठी उपयोगात येत आहे.बहीरवार,डॉ.कामदार यांना पुन्हा इंदिरा गांधी रुग्णालयात परत बोलवावे व त्यांच्या हाती कार्यभार सोपवण्याची मागणी फूके यांनी केली.डॉ.शीलू गंटावार यांच्याविषयी अडीच वर्षांपूर्वी याच सभागृहात चर्चा झाली होती.त्या देखील लांबलचक सुट्यांवर गेल्या होत्या मात्र मनपा प्रशासनाने त्यांच्या सुट्या कापून पुन्हा त्यांना सेवेत घेतले ते ही त्यांच्यावर मस्टरवर सुट्यांचा घोळ केल्याचा गंभीर आरोप सिद्ध झाला होता.
यावर बोलताना अविनाश ठाकरे म्हणाले की मी दोन प्रशासकीय समितीचा अध्यक्ष होतो,खूप जवळून मी या प्रशासकीय अधिका-यांचा कारभार बघितला,अतिशय निगरगट्ट कातडीचे असून आताच निर्णय नाही घेतला तर उद्या १० व नंतर १०० गंटावार प्रशासनात निर्माण होतील.स्टेशनरी घोटाळा याचे ज्वलंत उदाहरण आहे.त्यामुळेच गंटावार यांचे निलंबन करुन मग चौकशीचे आदेश द्या,अशी मागणी केली.
यावर महापौरांनी इंदिरा गांधी रुग्णालयाच्या दूर्देशेसाठी कोविडचे कारण सांगत सहा वैद्यकिय अधिका-यांना दुसरीकडे झोनमध्ये पाठवल्याचे राम जोशी सांगतात.दुसरीकडे एक डॉक्टर वर्षभरापासूनही सुटीवरच आहे.याबाबत मीच पुरावे २० ते २६ जून २०२० दरम्यान झालेल्या सभागृहाच्या पटलावर ठेवले होते.गंटावार व शीलू गंटावार यांच्याविषयी फार गंभीर तक्रारी होत्या.सुटीवर असताना खासगी रुग्णालय चालवणे,मेडीकल सुट्या घेऊन खासगीत बसणे,स्मार्ट सिटीत कार्यरत एका मुलीला जी नुकतीच आई झाली होती तिला तिच्या एका महिन्याच्या मुलीला सोडून येऊन नोकरीवर रुजू होण्याचे आदेश तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिले होते,ती मुलर्गी आपल्या एका महीन्याच्या मुलीला आपल्या आईकडे सोडून दररोज ८० किलोमीटर येणे-जाणे करीत होती त्याचवेळी गंटावार सारखे मातब्बर हे सुट्यांचा आनंद घेत होते.त्याचवेळी सभागृहाने गंटावार व शीलू गंटावार यांना त्वरित प्रभावाने निलंबित करण्याचा आदेश पारित केला होता.दोन-दोन वर्षाचे मस्टरच इंदिरा गांधी रुग्णालयातून गायब झाले होते.
आयुक्तांनी त्वरित गंटावार यांचे निलंबन करुन इंदिरा गांधी रुग्णालयाच्या विकासाकडे लक्ष द्यावे.स्त्रीरोगतज्ज्ञांशिवाय इतर देखील उपचार पुन्हा या ठिकाणी सुरु होऊ शकतील का,मनपाला आवश्यक वाटत असेल तर इतर सेवाभावी संस्थांची मदत मिळवावी,असे आदेश महापौरांनी दिले.
थोडक्यात परिणीता फूके यांचा इंदिरा गांधी रुग्णालयाचा विषय अविनाश ठाकरे यांनी डॉ.गंटावारांच्या निलंबानाच्या आदेशापर्यंत क्लुप्तीने पोहोचवला मात्र हेच आदेश माजी महापौर संदीप जोशी यांनी २६ जून २०२० रोजी सभागृहात दिले होते.त्याची देखील अंमलबजावणी झालीच नाही उलट प्रशासनाने सभागृहाचा आदेश विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवला होता.
यानंतर दयाशंकर तिवारी हे जानेवारी २०२१ मध्ये महापौर पदी रुजू झाले मात्र त्यांनी देखील गंटावार प्रकरणात लक्ष दिले नाही,ते महापौर पदी रुजू झाल्यावर नागपूरकरांना आशा होती गंटावार यांना योग्य शासन दयाशंकर तिवारी यांच्या काळात आता तरी होईल मात्र अकल्पितपणे गंटावार हा विषय महापौरांनी ‘थंड बस्त्यात’ठेवला एवढंच नव्हे तर त्यांच्याच कार्यकाळात गंटावार यांच्या पत्नी डॉ.शीलू गंटावार यांना इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रमुख पदी विराजमान झाल्या.
अखेरच्या सभागृहात आता गंटावारांचे निलंबनाचे आदेश देत महापौरांनी, गंटावारांना अभय देण्याच्या ‘आरोपातून’ सूटका करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचीच आज चांगलीच चर्चा रंगली होती.मात्र ‘अब पछताये क्या होत जब चिडीया चूग गई खेत’ही म्हण त्यांच्या कृतीवर चपखल बसते,असेच आता म्हणावे लागेल.




आमचे चॅनल subscribe करा
