फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसाहित्य वर्तुळात महापौरांवर नाराजी!

साहित्य वर्तुळात महापौरांवर नाराजी!

Advertisements

कवी मधुप पांडेय यांच्या निवासस्थानी मनपाद्वारे नामफलकाचे ‘कवित्व’

मधुप पांडेय यांच्याविषयी नितांत प्रेम मात्र…..

हयातीत नसलेल्या नागपूरातील साहित्यिक समृद्धिचा विचार प्रथम का नाही?

नागपूर,ता.५ फेब्रुवारी २०२२ : देश-विदेशात हास्य व्यंग कवितांसाठी प्रख्यात, कवी-साहित्यकार व प्राध्यापक मधुप पांडेय यांच्या देवतळे लेआउट येथील निवासस्थानापुढे नागपूर महानगरपालिकेतर्फे तथा धरमपेठ झोनचे सभापती सुनील हिरणवार यांच्या सौजन्याने नामफलक लावण्यात आले. या नामफलकाचे आज शनिवार दि. ५ फेब्रुवारी राेजी महापौर  दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले मात्र जे हयातीत आहेत ते आपल्या घरासमोर नामफलक लावतच असतात, जे हयातीत नाही,ज्यांनी नागपूर या शहराच्या सांस्कृतिक,साहित्यिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे,जे हयातीत नसल्यामुळे स्वत: आपल्या घरासमोर ‘शासकीय सत्काराचा नामफलक’ लाऊ शकत नाही,आधी त्यांच्या कार्यांचा गौरव होणे उचित नव्हते का?अशी तीव्र नाराजी शहरातील साहित्यिक वर्तुळात उमटली आहे.

कवी मधुप पांडेय यांच्या नि:स्वार्थ योगदानाविषयी कोणालाही कोणतीही शंका नाही,त्यांच्या गौरवाचा आंनदच आहे मात्र महापौरांकडून इतरांची होणारी अवहेलना आणि भाषावाद बघता, चीड निर्माण होत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.या शहरात भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी समजण्याच्या पलीकडे गेले असल्याचे बोलले जात आहे.‘जिसकी लाठी उसी की भैस’कारभार चालला आहे.२०१६ मध्ये देखील मनपाचे तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी पुण्यावरुन प्रेरणा घेऊन तातडीने नागपूरच्या सांस्कृतिक याेगदानात भरीव योगदान देणा-या साहित्यिकांची यादी मागवली होती.भली मोठी यादी दटके यांना प्रदान करण्यात आली कारण पुणे ही ऐतिहासिक नगरी म्हणून महाराष्ट्रात नावाजली जात असली तरी नागपूर ही साहित्यिकांची नगरी असल्याचा सार्थ अभिमान नागपूरकर बाळगतात.नागपूर म्हणजे कविवर्य सुरेश भटांची नगरी,नागपूर म्हणजे कवि ग्रेसची नगरी,नागपूर म्हणजे ल.त्र्य.माडखोलकर,वि.भी.कोलते,राम शेवाळकर,पं.वसंतराव देशपांडे,जमुनाबाई शेवडे,अनंतराव शेवडे,ना.रा.शेंडे,वामनराव चोरघडे अश्‍या एक नव्हे तर अनंत नावांची लखलखती दिपमाळा आहेत.

महापौरांना प्रख्यात साहित्यिकांच्या घरासमोर नामफलक लावणा-या सोहळ्याची सुरवात करायचीच होती तर आपल्या प्रतिभेने अजरामर झालेल्या नावांपैकी एकापासून सुरवात करायला हवी होती.

मात्र मनपाच्या ‘निवडणूका’ जवळ येऊन ठेपल्या.मार्चमध्यचे विद्यमान सत्ताधा-यांना आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे,आहे त्या वेळेत लवकरात लवकर लोकप्रियता मिळवण्यासाठी व मतदारांना प्रभावित करण्यासाठी, आदर्श संहिता व तत्वांनाच तिलांजली देण्याचा प्रकार सुरु असल्याचे बोल लावले जात आहे.केवळ साहित्यिकच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करणारे शेकडो रणबाकुरे या शहरात आहेत मात्र ते त्यांचे ‘वोट बँक’नसल्यामुळे त्यांना दूर्लक्षीत करुन स्वस्त लोकप्रियता लाटण्याचा महापौरांचा हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

हयातीत असणा-यांच्या सन्मानाची सुरवात करायचीच होती तर ज्यांची नाट्यसंहिता नागपूरातच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातही डोक्यावर घेतली जाते असे ज्येष्ठ नाटककार महेश एलकूंचवार यांच्याही घरासमोर मधुप पांडेय यांच्याच सोबत नामफलक लावण्याची सोहाद्रता व मनाचा मोठेपणा महापौरांनी दाखवायला हवा होता.हा एक स्तुत्य उपक्रम आहे मात्र कोणत्याही उपक्रमात जेव्हा ‘मतांचं राजकारण’आणल्या जातं तेव्हा त्यातील सात्विकपणा संशयाच्या धुक्यात हरवत असतं, असे आता बोलले जात आहे.

नागपूरच्या रंगभूमीला आपल्या अभिनव नाट्यकौशल्याने अनेकांनी समृद्ध केले आहे.अटकेपार मुंबईचीही रंगभूमी गाजवली,संगीत क्षेत्रातील अनेक धुरीणांनी अनेक गायकांच्या पिढ्याच घडवल्या,खर्डनवीस यांची भातखंडे गायनशाळा कशी विसरता येईल? गंधर्व महाविद्यालयाच्या संस्थापकांना केव्हा देणार हा बहूमान?दलित व विद्रोही साहित्यिकांची मोठी यादी या शहारातील नावातच आहे,त्यांची दखल केव्हा घेणार? आचारसंहिता लागल्यानंतर?कि ३ मार्च रोजी तुमचा संवैधानिक कार्यकाळ संपल्यानंतर?यांचा तरी आठव महापौरांनी आधी करायला हवा होता.

मधुप पांडेय हे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सदस्य आहेत,अर्थात यामुळे त्यांची प्रतिभा व त्यांच्या योगदानाविषयी शंका निर्माण होण्याचे कारण नाही मात्र भाजपच्या समितीत ते असल्याने भाजपच्या पदाधिका-यांकडून त्यांच्या सत्काराला साहित्यिकांच्या श्रेणीत शहरातील ‘पहीला’ बहूमान प्रदान करने हे देखील संयुक्तिक निश्‍चितच नव्हते,असे बोल आता लावले जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या