पत्र परिषदेत ॲड.सतीश उकेंनी केले हजर
नागपूर,ता. २१ जानेवारी २०२२ : ’मी मोदीला मारु शकतो शिव्या ही देऊ शकतो’अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या वक्तव्यानाने महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाचे राजकारण ढवळून निघाले.उपराजधानीत पटोलेंच्या या विधानावर संतापून भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी आंदोलने व विविध पोलिस ठाण्यात तक्रारींचा अक्षरश:पाऊस पाडला.यात भाजपचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांनी आघाडी घेतली व कोराडीपासून तर नागपूरपर्यंत अनेक पोलिस ठाण्यात पटोले यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचा सपाटा त्यांच्या नेतृत्वात भाजपने लावला. तर देशाच्या राजधानीत दिल्लीतही या वादावर चक्क भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संदीप पात्रा यांनी पत्र परिषद घेऊन काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते.पटोले यांनी त्यांचे हे विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध नसून एका गावगूंडविषयीचे होते असे वारंवार स्पष्टीकरण ही दिले मात्र ’जो बूंद से गई वो हौद से नही आती’या उक्तीप्रमाणे कोणीही त्यांच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवण्यास धजले नसल्याने अखेर, ॲड.सतीश उके यांनी आज शुक्रवार दि. २१ जानेवारी रोजी बाकायदा प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेऊन पटोलेंच्या या बहूचर्चित ‘मोदीला’ माध्यमांसमोर हजर केले.
पटोलेंच्या या मोदीचे नाव उमेश उर्फ मोदी प्रेमदास घरडे असे आहे.११ मार्च २०२० रोजी उमेश उर्फ मोदी याने भंडारा जिल्ह्यातील पालांदूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्याची ती तक्रार ॲड.उके यांनी पुरावा म्हणून माध्यमांसमोर सादर केली एवढंच नव्हे तर दैनिक लोकमतच्या हॅलो भंडारामध्ये १६ मार्च २०२० रोजी छापून आलेल्या वृत्ताची देखील प्रत पुरावा म्हणून सादर केली.या तक्रारीत तक्रारकर्त्याचे नाव मोदी म्हणूनच नमूद आहे हे स्पष्ट झालं.
या वेळी बोलताना ॲड.उके यांनी सांगितले की सात दिवसांपूर्वी पटोले हे ज्या मोदीविषयी बोलले तो हा ’मोदी ’असून हा एका गावातील सर्वसामान्य माणूस आहे.पटोले हे खरे बोलत होते,त्यांचे विधान देशाचे पंतप्रधान मोदी यांच्याविषयीचे नव्हते मात्र भारतीय जनता पक्षाकडून हा मुद्दा पकडून वेगळेच राजकारण केले जात आहे.एवढंच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्याच काही नेत्यांनी संभ्रमातून पटोले यांच्या या विधानाचा निषेध ही केला मात्र पटोले हे खरे बोलत होते.
हा गावातला मोदी सातत्याने पटोले यांच्या विराेधात बोलत राहतो तसेच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही बोलत असतो.एवढंच नव्हे तर पटोले यांच्या काँग्रेस पक्षाला मते देऊ नका असे आवाहन हा मोदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत प्रचार करीत असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी पटोले यांच्याकडे चर्चेदरम्यान केली.त्या वेळी पटोले यांनी या सर्वसामान्य मोदी विषयी ते विधान केले होते की ‘मी मोदीला मारु शकतो,त्याला शिव्या ही देऊ शकतो’.
ज्यांनी हे विधान केले ते पटोले हे सातत्याने सांगत आहेत की मी हे विधान देशाच्या पंतप्रधानांविषयी केले नाही तरी देखील तिसराच माणूस सातत्याने हे विधान पटोलेंनी पंतप्रधान मोदींविषयीच केले असल्याचे आरोळी देत असून राजकारणाची पोळी शेकत असल्याचा आरोप ॲड.उके यांनी या प्रसंगी चंद्रशेखर बावणकुळेंचे नाव न घेता त्यांच्यावर केला.त्यांनी जर राजकारणात पंतप्रधानांचे ’नाकच’ मध्ये आणले,यासाठीच पटोलेंनी ज्या मोदीविषयी ते विधान केले होते त्या मोदीला माध्यमांसमोर आणण्यासाठी ही पत्र परिषद आयोजित केल्याचे उके यांनी सांगितले.
या मोदीचे मूळ नाव उमेश प्रेमदास घरडे मात्र या माणसाला संपूर्ण गाव मोदी नावानेच अनेक वर्षांपासून ओळखतो,संबोधित असतो.या मागे काय कारण आहे हे उघडपणे माध्यमांसमोर सांगण्यासारखे नाही,असे उके यांनी सांगितले.याचे कारण उघड केल्यास पुन्हा इतर कोणत्यातरी व्यक्तीची बदनामी होईल त्यामुळेच उमेश याला समस्त गावकरी मोदी का संबोधतात?याचे कारण उघड नाही करणार.मात्र मोदी नावामुळे गेल्या सात दिवसांपासून उपराजधानीत व महाराष्ट्र,देशाच्या राजकारणात जो अभूतपूर्व गोंधळ घातल्या जात आहे,त्याला पूर्णविराम मिळावा,सत्य जगासमोर यावं यासाठी या मोदीला समोर आणले असल्याचे उके यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी या मोदीच्या मित्राला जी मारहाण झाली होती त्या विरोधात या मोदीने पालांदूर पोलिस ठाण्यात जी कलम ३०७ अंतर्गत तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची प्रत देखील ॲड.उके यांनी माध्यमांसमोर सादर केली,त्या तक्रारीत तक्रारकर्त्याच्या नावासमोर माेदी असेच लिहले असल्याचे स्पष्ट होतं.
हा गावकरी मोदी एक अतिशय साधा माणूस असून या संपूर्ण प्रकरणामुळे पार घाबरुन गेला आहे.याचे नाव समोर येताच राजकारणाची पोळी शेकण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी याचे घर गाठले.याने पोलिस ठाण्यात देखील याविषयी कळवले असल्याची माहिती उके यांनी याप्रसंगी दिली.

आमचे चॅनल subscribe करा