फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाअंबाझरी उद्यानातील विवेकानंदांच्या डिजिटल जीवनप्रवास वर्णनालाही मराठीचे वावडे!

अंबाझरी उद्यानातील विवेकानंदांच्या डिजिटल जीवनप्रवास वर्णनालाही मराठीचे वावडे!

Advertisements

अंबाझरी उद्यानातील विवेकानंदांच्या डिजिटल जीवनप्रवास वर्णनालाही मराठीचे वावडे!

महाराष्ट्राच्या उपराजधानीत ऐका फक्त हिन्दी व इंग्रजीत स्वामी विवेकांनद यांचा जीवनप्रवास

महापौरांची पत्र परिषदेत माहिती: लवकरच मराठीत ही सुरु करु मात्र मराठीचं दुय्यमत्व कायम

मराठी साहित्यकांची तीव्र नाराजी

नागपूर,ता.१२ जानेवारी २०२२: संपूर्ण देशात आज स्वमी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिवस साजरा होत असताना महाराष्ट्राच्या उपराजधानीत देखील आज अंबाझरी उद्यानातील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाखालील त्यांचा जीवनपट उलगडणारी व डिजिटल माध्यमातून श्रोत्यांना उपलब्ध होणारी माहिती ही नागपूर महानगरपालिकेने हिंदी व इंग्रजीतून नागपूरकर पर्यटकांना उपलब्ध करुन दिली आहे. एका स्क्रीनसामोर तीन कर्णयंत्रांच्या सहाय्याने एक साथ ५१ लोकं हे स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट हिंदी व इंग्रजी भाषेतून ऐकणार आहे मात्र मराठी भाषेतूनही नंतर सुरु करु हे महापौर दयाशंकर तिवारी यांचे शब्द महाराष्ट्राच्या उपराजधानीत मराठी भाषेला प्राप्त दुय्यमत्वाची जाणीव तीव्र करुन गेले.यावर आज अनेक मराठी साहित्यकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये गेले व इंग्रजीत भाषण दिले त्यामूळे इंग्रजी भाषेला प्राधान्य दिलं आहे का?विवेकानंद यांचे स्मारक शिकागोमध्ये नसून मराठी राजभाषा असणा-या महाराष्ट्राच्या उपराजधानी असल्याचे खडे बोल महापौरांना सुनावले आहे.

स्वामी विवेकांनद यांच्या जीवनचरित्राला मराठी माणसांना मराठी भाषेतून ऐकण्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याने केंद्र व राज्य सरकारांच्या लेखीच नव्हे तर आता उपराजधानी नागपूरात देखील मराठी भाषा ही किती उपेक्ष्त व दुय्यम समजली जाते याचा प्रत्यय आला.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व युवा दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने निर्मित अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट जवळील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या खालील भागामध्ये स्वामींचे जीवन दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनीचे लोकार्पण बुधवारी (ता. १२) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ही प्रदर्शनी नागरिकांसाठी सुरु झाल्याची घोषणा केली.

विशेष म्हणजे या प्रदर्शनाचे उद् घाटन २०१७ च्या मनपा निवडणूकीच्या तोंडावर अतिशय घाईने भाजप सत्ताधा-यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उरकण्यात आले होते.मधली तब्बल पाच वर्ष ही प्रदर्शनी प्रेक्षकांसाठी विविध कारणांनी बंदच ठेवण्यात आली होती,हे विशेष!परिणामी पुन्हा निवडणूका आटोपल्यावर ही प्रदर्शनी मेंटनेंस,टपकणारे पाणी,ओलसर भिंती इ.विविध कारणांनी पुन्हा बंद झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

आता पाच वर्षांनंतर पुन्हा मनपा निवडणूकीच्या तोंडावर या ठिकाणचे ‘लोकार्पण’आज सकाळी उरकण्यात आले. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या खालील भागामध्ये स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवनचरीत्र दर्शविणारे म्यूरल लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक म्यूरलखाली एक टिव्ही स्क्रीन आणि हेडफोन आहेत. या टिव्ही स्क्रीनवर स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील अनेक प्रसंगांच्या कथा दृकश्राव्य माध्यमात पाहता आणि ऐकता येणार असल्याचेही यावेळी महापौरांनी सांगितले.

याठिकाणी १७ टीव्ही स्क्रिन लावण्यात आलेल्या असून प्रत्येक स्क्रिनवर एकाच वेळी वेगवेगळ्या कथा पाहता व ऐकता येणार आहेत. मद्रास रामकृष्ण मिशनने स्वामीजींच्या जीवन चरित्रावर एक डिजिटल स्टोरी तयार केली आहे. ज्यामध्ये ३६ कथांचा समावेश आहे. यामध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषा निवडण्याचा पर्याय सुद्धा आहे.  प्रत्येक स्क्रिनजवळ तीन हेडफोन्स ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकाच वेळी ५१ युवक स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्राला पाहू आणि समजू शकतील, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्र परिषदेत दिली.

गुजरातमध्ये गुजराती भाषेला अग्रक्रम,तमिळनाडूत तमिळला,बंगालमध्ये बंगालीला अग्रक्रम मात्र महाराष्ट्रात मराठी ही दुय्यम याची कायमच प्रचिती राजकारण्यांच्या एकंदर कृती व निर्णयांमधून दिसून पडते.नागपूरात मराठीला अग्रक्रम नाही मिळणार तर काय मध्यप्रदेश किवा तमिळनाडूमध्ये मिळणार का?असा संताप देखील आता व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे इंग्रजी व हिंदीसोबतच मराठी भाषेचाही पर्याय प्रेक्षकांसाठी आधीच का उपलब्ध नाही?या प्रश्‍नावर बोलताना,लवकरच ती देखील भाषा आम्ही समाविष्ट करु,अशी सारवासारव महापाैरांनी केली.एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी विदर्भ साहित्य संघात मी ५९ मिनिटे मराठीतच बोललो व परवा पुन्हा तिथेच मला बोलायचे आहे ते ही मी मराठीतच बोलणार असल्याची पुश्‍ती ही त्यांनी जोडली.मात्र महापौरांचे वैयक्तिक कार्यक्रम आणि स्वामी विवेकानंद स्मारकावरील सार्वजनिक उपक्रम हे दोन्ही वेगळ्या बाबी असून सार्वजनिक ठिकाणी पार पडणा-या शासकीय उपक्रमात मराठी भाषेला दुय्यमत्व देणे योग्य नव्हते.सर्वात आधी मराठी भाषेला मान द्यायला हवा होता,इतर दोन्ही भाषा या ऐच्छिक ठेवायला हव्या होत्या,असा ही सूर उमटला आहे.महाराष्ट्रात मराठीचीच गळचेपी पद्धतशीरपणे कशी केली जाते व इतर भाषांना कश्‍याप्रकारे जनतेच्या पैश्‍यांवर उभ्या केल्या जाणा-या सार्वजनिक उपक्रमात ‘प्रस्थापित’केल्या जातं,या मनोवृत्तीवर देखील चांगलेच तोंडसुख घेण्यात आले.

विवेकानंद स्मारक शिकागोत आहे का? ?सुप्रिया अय्यर(ज्येष्ठ साहित्यिक)
नागपूर हे महाराष्ट्रात आहे हे महापौर विसरलेत का?मराठीला नंतर समाविष्ट करु असे सांगून त्यांनी ठलकपणे मराठीला दुय्यम लेखल्याचे सिद्ध होतं.मुळात इंग्रजी भाषेचा पर्याय किती प्रेक्षक निवडणार आहे?हिंदी ही राष्ट्रभाषा आहे मान्य,इंग्रजी ही नोकरीसाठी आत्मसात करणारी भाषा आहे हे देखील मान्य मात्र मराठी ही ज्ञानभाषा आहे.स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा पट हा नव्या पिढीला मराठी भाषेतून सर्वात आधी उलगडायला हवा.स्वामी विवेकानंद स्मारक हे नागपूरात आहे,शिकागोमध्ये नाही,मनपाने जर शिकागोमध्ये हे स्मारक उभारले असते व त्या त्यांचे जीवनपट इंग्रजी भाषेत ऐकण्याचा पर्याय ठेवला असता तर ते समजण्यासारखे होते मात्र नागपूरात हा उपक्रम असताना हेतुपुरस्सर मराठीला दुय्यमत्व देण्याचेच हे कारस्थान आहे.

 

 

मराठीचा आग्रह नागपूरात नाही तर मध्यप्रदेशात धरणार का?सना पंडित(ज्येष्ठ लेखिका)नागपूरात हे स्मारक उभे असताना येणा-या प्रेक्षकांना मराठीमध्ये स्वामी विवेकानंदांचे जीवनपट ऐकण्याची संधी उपलब्ध व्हायला हवी होती.परवा पासून नागपूरातीलच विदर्भ साहित्य संघाच्या वाटचालीला शंभरावे वर्ष लागणार आहे.मराठी भाषेचे संगोपन व संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत असते.मराठी भाषेला राजमान्यता देण्याऐवजी तिची अश्‍यारितीने हेटाळणी करने योग्य नाही.रेल्वे प्लॅटफॉर्मवर मराठी,हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत उद् घोषणा होत असते मग महापौरांना मराठी भाषेबाबत काय वावडे होते?शहराचे प्रथम नागरिक असताना त्यांच्या मनात मराठी भाषेविषयी दुय्यम भाव का आहे?कला,साहित्य व राजभाषेची मान्यता ही महापौरांच्या वर्तवणूकीतून व निर्णयांमधून उमटायला हवी.मराठीसाठी नागपूरात आग्रह नाही धरला जाणार तर काय मध्यप्रदेशात धरणार का?

 

 

स्वामी विवेकानंद यांचे जीवन दर्शनाशी संबंधित दृकश्राव्य माध्यमातून जे काही ऐकवले,दाखवले जाणार असेल त्याचे निवेदन हे या मराठी राज्यात प्राधान्याने मराठीतून असेल याची महानगरपालिकेने काळजी घ्यावी.मराठीबाबत केंद्राची घोर उदासीनता मराठीला अभिजात दर्जा प्रदान करण्याची जी टाळाटाळ चालली आहे त्यातून दिसून येतेच आहे. राज्यातही विद्यमान सरकार येण्यापूर्वी मराठीबाबत दिल्या गेलेल्या आश्वासनांची पूर्तता आम्ही सतत पाठपुरावा करीत राहूनही केली गेली नव्हती.तुलनेने या सरकारने बरीच पूर्तता केली.बरेच काही बाकी आहे.त्यासाठी पाठपुरावा चालूच आहे. —डाॅ श्रीपाद भालचंद्र जोशी, सदस्य,भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य आणि संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official youtube चॅनलवर उपलब्ध)

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या