

प्रफूल्ल फरकसे पुन्हा स्थायी समिती कक्षात रुजू!
स्थायीचे अंदाजपत्रक फरकसेंशिवाय ‘अनर्थपूर्ण!’
अभियंता पदावरील अधिका-याची कारकूनगिरी
नागपूर,ता.२२ डिसेंबर: सध्या नागपूर महानगरपालिकेत बोगस स्वाक्ष-या,अधिका-यांच्या संगणकांचे पासवर्ड,युझर आयडी वापरुन वित्त विभागातून काढलेले(लृटलेले)६७ लाखांचे प्रकरण चांगलेच गाजत असताना,सत्ताधारी व काही प्रशासकीय अधिका-यांचे ‘सलोख्याचे’संबंध यावर देखील चांगलीच चर्चा झडत आहे. सत्ताधा-यांचे असेच एक ‘प्रिय’अधिकारी म्हणजे अभियंता असणारे प्रफूल्ल फरकसे ही विभूती.
ही विभूती अभियंता असून देखील भाजपच्या सत्ताकाळात गेल्या अनेक वर्षांपासून स्थायी समिती कक्षात ठाण मांडून बसली आहे.यांच्या ‘कल्पक’ मार्गदर्शनाशिवाय स्थायीच्या अंदाजपत्रकाची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.हा मार्गदर्शनाचा अखंडीत प्रवास अवरुद्ध झाला तो मात्र माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात.
फरकासे हे नाट्य महामंडळाचे अध्यक्ष देखील असल्याने या ठिकाणचे देखील ‘नाट्य व राजकारण’सांभाळण्यात अतिशय निष्णात व तेवढेच कर्तबगार समजले जातात.गेली अनेक दशके ते नागपूरातील सांस्कृतिक ‘गांधीवादाच्या’आर्शिवादामुळे नाट्य महामंडळाच्या अध्यक्ष पदावर विराजमान असून त्यांच्या ‘तोडीचा ’अध्यक्ष या उपराजधानीत दूसरा जन्माला येऊच शकला नसल्याने(येऊच दिले नसल्याने) अर्थातच त्यांचे या क्षेत्रातील ’जानी दुश्मन’देखील भरपूर संख्येत निर्माण झाले.
त्यांच्या अश्याच एका हितशत्रूने संपूर्ण कागदोपत्री पुराव्यांनिशी फरकासे यांची तक्रार मुंढे यांच्याजवळ केली आणि मुंढे यांनी तडकाफडकी मनपा मुख्यालयातून फरकासे यांची उचलबांगडी धंतोली झोन कार्यालयात केली.यामुळे गेल्या वर्षी ऐन करोना काळात आपले अंदाज पत्रक सादर करण्यात तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांना चांगलाच ‘अर्थशास्त्राचा’अभ्यास करणे भाग पडले होते.
मात्र मुंढे यांची २७ सप्टेंबर २०२० रोजी आयुक्त पदावरुन महाविकासआघाडी सरकारने गच्छंती करताच एका महिन्याच्या आत फरकासे हे पुन्हा मनपा मुख्यालयात त्यांच्या ‘नेहमी’च्या जागेवर विराजमान झालेत!
आज स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी पत्र परिषदेत मनपा प्रशासनातील भ्रष्टाचारावर कठोर ताशेरे ओढले मात्र प्रशासनातील काही अधिकारी हे ‘कोणाच्या जीवावर’ एवढे उदार होतात,याबाबत त्यांनी ‘ब्र’ देखील काढला नाही.
प्रशासन व काही सत्ताधारी यांच्या ‘अभद्र’ युतीतूनच भ्रष्टाचाराचे कुरण ज्याला-त्याला चरायला मोकळे झाले आहे आणि त्याची इथंभूत माहिती मनपातील कर्मचा-यांच्या मुखात आणि नागपूरकरांच्या स्मरणात चांगल्याने नमूद आहे.
६७ लाखांचा भ्रष्टाचार हे तर हिमनगाचे एक टोक असून प्रशासनाने एकट्याने हा डल्ला मारल्याने काही सत्ताधारी चवताळले असल्याची कुजबुजही मनपात ऐकू येते.इतर अनेक विभागात सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी हे ‘आपण दोघे भाऊ सगळंच मिळून खाऊ‘याच न्यायाने वागत असल्याची टिका देखील खासगीत होत असते.
सत्ताधा-यांच्या कृपेशिवाय प्रशासकीय अधिकारी हे एवढे निर्ढावणे शक्यच नसल्याचे ठामपणे अधोरेखित केल्या जातं.आम्ही जनतेचे कैवारी,जनसेवक,लोकप्रतिनिधी म्हणून घेणा-यांनी कोराेनाच्या काळात याच असहाय,हतबल जनतेचा किती कैवार घेतला,यावर अख्खी पीएच.डी होऊ शकते.
एकीकडे जनता ही मनपा प्रशासनाने लादलेल्या नियमांखाली मानसिक,शारिरीक व आर्थिकरित्या भरडली जात असताना कामठी येथील एका भव्य अश्या फॉर्म हाऊसमध्ये हेच लोकप्रतिनिधी, मनपातील एका भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नाचा हजारोंच्या संख्येत जमा होऊन आनंद लृटत होती.ते फॉर्म हाऊस कोणाचे आहे?मनपाच्या कोणत्या प्रशासकीय अधिका-याचे आहे?मनपाचा अधिकारी हा आपल्या नोकरीच्या भरवश्यावर फार फार तर नागपूरात एखादा फ्लॅट घेऊ शकतो,या प्रशासकीय अधिका-याची अख्खी फ्लॅट स्कीमच आहे!त्यात कामठी येथील फॉर्म हाऊस हे आणखी त्याच्या वैभवात भर टाकणारीच बाब ठरते.
सर्वसामान्य नागपूरकराला आपल्या आप्तांच्या लग्नात फक्त ५० लोकांची मुभा असताना ऐन करोनाच्या काळात त्या फॉर्महाऊसवर किती लोकप्रतिनिधींनी एकसाथ लग्नाचा आनंद लृटला?कुठे होते मनपाचे शोध भरारी पथक?दूसरीकडे मनपाचा हाच शोध भरारी पथक नागपूरातील अनेक मंगल कार्यालये,लॉन्सवर धाडी टाकून ५० च्या ऐजवी ६० माणसे झाल्याने ५ ते १० हजारांचा दंड एवढ्या अडचणीच्या काळातही निर्दयतेने वसूल करीत होता,कुठे होता लोकप्रतिनिधींचा सामान्य नागपूरकरांप्रतिचा कैवार तेव्हा?
नियम सर्वांना सारखेच असताना कोणत्या तोंडाने मनपा सत्ताधा-यांचं हे वर्तन समर्थनीय ठरतं?फरकसे यांना झोन कार्यालयातून तेवढ्याच तातडीने पुन्हा मनपा मुख्यालयात आणनारे सत्ताधारी कोणत्या तोंडाने मनपा प्रशासनातील भ्रष्ट कारभारावर पत्र परिषदा घेऊन आेरखडे ओढतात आहेत?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
फक्त स्वत:ला सोयीस्कर व पूरक अश्या काही मनपा प्रशासकीय अधिका-यांच्या भ्रष्ट कारभारावर पांघरुण घालायचे व ज्यात ’हात ओले’झाले नाहीत त्या अधिका-यांचा भ्रष्टाचारावर पत्र परिषदा घ्यायच्या,हा दुटप्पीपणा नागपूकरांच्याही गेल्या १५ वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात चांगलाच अंगवळणी पडला असून, त्यामुळेच मनपातील नुकताच उघडकीस आलेला ६७ लाखांचा घोटाळा,हा घोटाळा सराईतपणे करण्याची प्रशासनाची हिंमत, या मागे सत्ताधारी असणा-या काही मोठ्या नेत्यांचा ’कृपाआर्शिवाद’याकडेही बोट दाखवले जात आहे.
एवढंच नव्हे तर यावर सोशल मिडीयावर खूप मजेदार मिम्स देखील व्हायरल झाले असून ’पाच बोटे सारखी नसतात हे जरी खरे असले तरी खाताना मात्र पाच ही बोटे एकत्रित येतात’अशी जहाल टिका देखील केली जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
