फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसहा मुलांची जन्मदात्री कर्करोगामुळे उकीरड्यावर!

सहा मुलांची जन्मदात्री कर्करोगामुळे उकीरड्यावर!

Advertisements


काही एकर शेती हीच ठरतेय आज खरी संपत्ती

८० वर्षीय जन्मदात्री मृत्यूच्या मोजतेय शेवटचा घटका

नागपूर,ता.१३ डिसेंबर २०२१ : अपत्य सुखं यासारखे दुसरे सुखं जगात कोणत्याही जन्मदात्रीसाठी नसतोच.गर्भधारणेचा प्रदीर्घ काळ आपल्या गर्भात बाळाचं अस्तित्व घडवणं आणि त्यानंतर प्रसव वेदनेने विव्हळत असतानाही, नवसृजनाच्या निर्मितीचा आनंद उपभोगनं, हा कोणत्याही स्त्रीच्या जीवनातील ‘पारलौकिक ’ असाच क्षण असतो.कुही येथील इंदिराबाई हटवार यांनी तर एक-दोन वेळा नव्हे तर सहा वेळा या सृजननिर्मितीचा आनंद उपभोगला,पाच मुले आणि एक मुलगी अश्‍या सहा अपत्यांना त्यांनी, प्रसव वेदना सहन करुन जगात आणले मात्र याच अपत्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी त्यांना कर्करोग झाल्याने उकीरड्यावर टाकून दिले!

अतिशय भयावह स्थितीमध्ये तिची आता मृत्यूसोबत झूूंज सुरु आहे.धंतोली येथील जीवनछाया केअर सेंटरमध्ये सध्या तिची सुश्रृषा, तेथील कर्मचारी वर्ग करीत आहे मात्र ज्यांना तिने जगात आणले,संगोपन केले,पुरुष म्हणून समाजात वावरण्या लायकीचे बनवले त्याच कतृत्ववान पुरुषांनी, आपल्या जन्मदात्रीला कर्करोग झाल्याने चिमूटभर जिव्हाळा आणि पोटभर अन्नालाही मोहताज केले…!

अडीच वर्षांपूर्वी इंदिराबाई यांना कंबरेला अतिशय घट्ट पातळ नेसत असल्यामुळे घाव झाला.त्यांनी दूर्लक्ष केलं.मग ती जखम चिघळत गेली,कर्क रोगाने विळखा घातला,त्यातून निघणा-या स्त्रावातून दुर्गंधी येऊ लागली,मरेपर्यंत आईचा सांभाळ करील असे लेखी हमीपत्र देणारा तिचा सर्वात लहान मुलगा, अंकूश हटवार याने मात्र आईच्या वाट्याची एक एकर शेती घेतली पण ? आईच्या वाट्याला आलेले दु:ख दूर करण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही,ना मुलगा म्हणून,ना माणूस म्हणून.

उलट तिला घराच्या दूर एका खोलीत टाकून देण्यात आले.गेल्या अडीच वर्षांपासून ही आई, कंबरेवरची ही जीवघेणी जखम,त्यातून होणारी महाभयंकर वेदना एकटीने सहन करीत होती मात्र नंतर तिला नैसर्गिक विधीसाठी देखील उठता येत नव्हते.अंकूश हटवार आणि त्याचे कुटंूबिय हे दूरुन अन्न फेकून निघून जात राहीले….!

दारावरच्या श्‍वानालाही प्रेमाचा स्पर्श हवा असतो तेव्हाच त्याला मालकाने दिलेला तुकडा गोड लागतो मग ही तर जन्मदात्री होती,पण?जिने मायेच्या ओलाव्याने या ‘कू’पुत्राचे मल-मूत्र साफ केले त्याला ओल्यातून कोरड्यात झोपवले, त्याने आपल्या आईला औषधोपचारालाही मोहताज केले!ती जखम कर्करोगात परिवर्तित होत गेली,आता त्या सहा अपत्यांच्या जन्मदात्रीकडे जगण्यासाठी नव्हे, तर या वेदनेतून सुटण्यासाठी, अवघे काहीच दिवस शिल्लक असल्याचे जीवनछाया केअर सेंटरमधील तज्ज्ञ सांगतात.

(व्हिडीयो-जीवनछाया केअर सेंटरमधील कर्मचारी इंदिराबाई यांची जखम स्वच्छ करताना,ज्यांना जन्म दिला त्यांना त्या जखमेचा तिटकारा वाटला,ज्यांच्याशी कोणतंही नातं नाही त्यांच्यात माणूसकीचा झरा पाझरला)

वयोवृद्धांचे मरण हे यातनादायी नसते हे जरी खरे असले तरी असे ‘उपेक्षेचे’ मरण हे निश्‍चितच यातनादायीच असतात.इंदिराबाई यांच्या वाट्याला तर सहा मुलांच्या उपेक्षेची यातना आली होती….!पाच मुले व एक मुलगी. पाचही मुलांनी वडीलोपार्जित संप्तीची वाटणी आपल्या एकूलत्या एक बहीणीला वगळून, २००२ सालीच केली.म्हातारीच्या वाटेलाही एक एकर शेती आली.सर्वात धाकटा मूलगा अंकूश हटवार याने लेखी करारात लिहून दिले.. तो.. मरेपर्यंत आईचा सांभाळ करेल पण?

इतर चार मुले हे देखील तितकीच दोषी ठरतात कारण,कोणत्याही शेतीच्या तुकड्यापेक्षा आईच्या गर्भाचे मोल हे अमूल्य होते.सर्वात लहान भावाने आईच्या नावाची एक एकर शेती ठेऊन घेतली असल्याने, त्यानेच आता तिचा सांभाळ करावा,या लेखी करारापेक्षा तिच्या गर्भाचे ऋण हे किती तरी एका शेतीपेक्षा जास्त मोलाचे होते.

मात्र ग्रामीण भागातही आता निराधार,वयोवृद्ध जन्मदाते हे अडगळ समजली जात आहेत.जोपर्यंत त्यांच्या नावे शेती किवा घर आहे तोपर्यंत त्यांच्या जिवनाला किंमत असते.काही एकर शेती हीच आज ग्रामीण भागात आपल्या माय-बापापेक्षाही जास्त मोलाची संपत्ती कशी समजली जाते इंदिराबाई हटवार याचे ज्वलंत उदाहरण आहे.

इंदिराबाई यांच्या दूर्दशेची किवंदती त्यांच्या मुलीचा मुलगा म्हणजे नातू राजेश बावणकुळे यांना एका नातेवाईकाकडून कळली आणि ते स्वत: ‘स्वराज फाऊंडेशन’ही सामाजिक स्वयंसेवी संस्था चालवित असल्याने, त्यांनी आपल्या आजीकडे धाव घेतली.राजेश यांना एक वर्षाचा व पाच वर्षांची मुले आहेत.अंकूश हटवार यांच्याकडून त्यांना, त्यांंच्या कुटूंबातील बाबीमध्ये नाक न खुपसण्यासाठी धमक्या देण्यात आल्या असा राजेश यांचा आरोप आहे.

राजेश यांच्या पत्नीने देखील राजेश यांना, हटवार कुटुंबियांविरुद्ध पत्र परिषद न घेण्याचा सल्ला दिला मात्र राजेश यांनी ‘घेतलेला वसा टाकणार नाही’ म्हणून पत्नीला कळवले.त्यांनीच उपचारासाठी आजीला जीवनछाया केअर सेंटरमध्ये दाखल केले.आता आजीच्या जखमांवर माश्‍या बसत नाही,ती जखम स्वच्छ केली जाते एवढंच,वध त्या जखमेची वेदना शरिरावरची आणि मनावरचीही अद्यापही तशीच कायम असणार आहे.

आजीच्या मृत्यूनंतर मीच अग्निसंस्कार करणार असल्याचे राजेश पत्र परिषदेत सांगतात.पाच पैकी एका मुलाने तर आताच कळवले ,तो तेरवीपर्यंत तेरा दिवसांच्या सूतकासाठी सुटी नाही घेऊ शकणार,त्याचा पगार कपात होईल,नोकरीही जाऊ शकते…करोनामुळे आधीच तो आर्थिक अडचणीत आहे…..! हाच विचार त्या जन्मदात्रीने तो १३ दिवसांचा असताना केला असता तर…..!

या जन्मदात्रीचा एक पूत्र शांताराम हटवार आणि शांताराम यांचा पूत्र मंगेश हटवार यांनी राजेशला इंदिराबाईंचा न्यायाचा लढा देण्यास सहाय्य केले,मात्र प्रश्‍न तरीही अनुत्तरीत राहतो, लढ्यात सहाय्य करण्या ऐवजी आपल्या आईलाच योग्य वेळी ठेऊन घेतले असते तर?स्वत:च्या कुटुंबात सामावून घेतले असते तर?तर या यातना इंदिराबाईंच्या वाट्याला आल्या असत्या का?एकटा अंकूश हटवार दोषी कसा?एकटा अंकूश हटवार माणूसकीला काळीमा फासणारा कसा?विवाहीत मुलीला निर्णय स्वातंत्र्य नसतं हे मान्य करावच लागतं,कितीही ईच्छा असली तरी ग्रामीण भागात अद्यापही सुनेच्या निराधार आई किवा वडीलांना आधारासाठी स्वत:च्या घरी ठेवणे ही संकल्पना मान्य नाही,मग दोष कोणाचा?रुढी परंपरेचा?मुल्य,तत्वांचा?भारतीय संस्कारांचा?या प्रश्‍नांचे उत्तर मात्र कोणत्याही धर्मग्रंथात सापडत नाही….!

कुही पोलिस ठाण्यात अंकूश हटवार विरोधात १४ नोव्हेंबर २०२१ रोजी राजेश यांनी तक्रार दाखल केली मात्र आज एक महिना झाला तरी कुही पोलिस ठाण्यातून कोणतीही दखल घेतल्या गेली नाही.कुही पोलिसांनी अंकूश हटवार यांच्यासोबत ‘सेटलमेंट‘ केले असल्याचा आरोप राजेश यांनी आज पत्र परिषदेत केला.

सर्वोच्च न्यायालयाचे सुस्पष्ट असे निर्देश आहेत,वयोवृद्ध आई-वडील यांचा सांभाळ करने त्यांच्या पुत्रांची जवाबदारी आहेत.ज्यांना फक्त मुली आहेत त्या मुलींना देखील आपल्या वयोवृद्ध आई-वडीलांचा सांभाळ करावाच लागेल.या कायद्याचा भंग केल्यास कठोर शिक्षेची देखील तरतूद भारतीय दंड संहितेत नमूद आहे मात्र, ज्यांच्यावर कायद्याच्या अंमलबजावणीची जवाबदारी आहे तेच पोलिस, चौकशीस्तरावरच ‘माणूसकीच्या’ खूनाचा गुन्हा अश्‍यारितीने दाबत असतील तर भारतीय समाजजीवनातील कौटूंबिक मुल्य अशीच -हास होत राहतील,एखादी इंदिराबाई अडीच वर्षे वेदनेने एखाद्या पडक्या घरात एकटीने अशीच विव्हळत राहील,सभ्य समाजाला,माणूसकीचा आव आणणा-या ग्रामीण समाजाला याचे कधीही,कोणत्याही काळात सोयरसूतक राहणार नाही,हेच खरे.

(संपर्क क्रमांक- राजेश बावणकुळे- ७८७५८०४०४०)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या