

आयुष्यातील वेदना सूरांमध्ये उमटल्या
ऑस्कर संगीत कला अकादमीतर्फे सादर झाला ऑकेस्ट्रा गायिकांसाठी ‘खास’ शो
बारा गायिकांनी केले उत्कृष्ट सादरीकरण
नागपूर,ता.२४ नोव्हेंबर: एका मराठी कवियित्री ने आपल्या कवितेत ‘माझे जिणे तू जगू दे मला ही..नाते जगाशी जपू दे मला ही..तू गीत गातो सदा पोर्णिमेचे..चंद्रास माझे मला म्हणू दे मला ही..ओलावली तू तुझे गीत गाता..मुक्या आसवांनी भिजू दे मला ही..मागे-पुढे का असावेच तू रे..अस्तित्व माझे कळू दे मला ही..का झेप घेशी सदा एकट्याने…आकाश माझे मिळू दे मला ही’अश्या उत्कृष्ट ओळी गुंफल्या होत्या,शब्दांचे सूर होतात आणि सूरांची मैफिल होते,तेव्हा असाच काहीसा या कवितेसारखा अनुभव आज साई सभागृहात सादर झालेल्या गीतांच्या कार्यक्रमात रसिकांनी अनुभवला.
ऑस्कर संगीत कला अकादमीच्या त्रैमासिक सांस्कृतिक महोत्सवाच्या पाचव्या वैशिष्ठपूर्ण कार्यक्रमात आज बुधवार दि.२४ नोव्हेंबर रोजी शंकर नगर येथील साई सभागृहात नागपूर शहरातील ऑकेस्ट्रा जगतातील फक्त महिला गायिकांच्या ‘आईये मेहरबां’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नागपूर महानगरपालिकेतील मिलन ग्रूपचे कार्यक्रमात विशेष सहाय्य प्राप्त झाले होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे यात अश्या काही गायिकांचा समावेश होता ज्यांनी याच वर्षी करोना महामारीच्या महाभयंकर अश्या एप्रिल-मे महीन्यातील लाटेत आपल्या आयुष्याचा जोडीदार गमावला ,कोणी आपले इतर आप्त-स्वकीय गमावून बसले होते,लॉक डाऊनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती ही खूप नाजूक झाली होती मात्र मंचावर सादरीकरण करताना आयुष्यातील भोगलेल्या वेदना या जणू ‘सूर’बनूनच बहरल्या.
भारतीय पुरुषप्रधान समाजात महिलांचेच स्थान जिथे कायम दुय्यम गणल्या जातं, तिथे त्यांच्या अंगभूत कलेची काय गणना होणार?मात्र या गायिकांनी ऑकेस्ट्राचा स्टेज आपल्या गायकीने गाजवला असल्याची साक्ष, काळाबरोबरच आज रसिक प्रेक्षकांनी देखील अनुभवली.
कार्यक्रमाची सुरवात किरण दिडशे हिने सलमा आगा यांचं ‘फजां भी है जवां जवा‘या गाजलेल्या गीताने केली.यानंतर कामिनी बनसोड हिने ‘चलाे सजना जहा तक घटा चले’हे सुरेल गीत गायले.अर्चना दहिवले हिने लताबाईंचं ‘लग जा गले’हे मनाची तार झंकारणारे हळूवार गीत सादर केले तर निलीमा गावंडे यांनी आशा बाईचे ‘हौले हौले साजना’हे उडत्या चालीचे गीत आपल्या खास शैलीत सादर करुन रसिकांची दाद मिळवली.
रंजना कनोजिया यांनी ‘मैं तेरे इश्क मे’ हे प्रेम गीत सादर करुन समां बांधला तर वैशाली चंदेल हिने ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’हे मर्मर्स्पशी, अजरामर गीत समसरुन गायले.अंजली डबरासे हिने लताबाईंंचं आफबिट गाणं ‘तू क्या जाने बेवफा’गीत हावभावसह सादर करुन चित्रपटातील नायिका हेमा मालिनीचा ‘आतून तुटणा-या ’अभिनयाचा आठव रसिकांना करुन दिला.शीतल दहिकर यांनी ’तुने ओ रंगीले’हे गीत सादर केले आणि ड्रीमगर्ल हेमामालिनीची राेमांटिक अदा जिवंत केली.
वैशाली गणवीर हिने कार्यक्रमाचे शीर्षक गीत ‘आईये मेहरबां’ताकदीने सादर करुन आपल्या दमदार गायकीची चूणूक रसिकांना दाखवली.सीमा टवले हिने ‘शीशा हो या दिल हो’हे आणखी एक भावस्पर्शी अजरामर गीत सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.संध्या टिचकुले हिने ‘ओ सजना बरखा बहार आई’या शास्त्रीय गीताचे सूर छेडले तर पुष्पलता भोर यांनी ट्रेजेडी क्वीन मीनाकुमारी हिच्या लाजवाब अभिनयाचा आठव करुन देणारे ‘मौसम है आशिकाना’गीत सादर केले.
कार्यक्रमात महिला गायिकांनी ‘कजरा मोहब्बतवाला’,’तुमको पिया दिल दिया’ ही युगल गीते देखील सादर केली.गाण्यांची निवड ही कार्यक्रमाची रंगत वाढवणारी ठरली.एकाहून एक सरस गीतांची पर्वणीच जणू, कराेना नंतरच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर रसिकांना अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमात मध्य भारतातील ज्येष्ठ गायिका नंदिनी घटाटे,नंदा पाटिल,विजया हेटे व अहिंसा तिरपुडे यांनी अतिथीस्थान भूषवले.रसिकांच्या विशेष फरमाईशवर नंदिनी यांनी आपल्या कसदार आवाजात ‘पल भर में ये क्या हो गया’हे गीत सादर करुन जुन्या सुवर्ण काळाची आठवण रसिकांना करुन दिली तर विजया हेटे यांनी ‘ये कहां आ गये हम’अहिंसा तिरपुडे यांनी ‘क्या जानू सजन’,संगीता बानाईत यांनी ‘दिल तो है दिल’हे गीत सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.
आपल्या नेहमीच्या खास शैलीत श्वेता शेलगावकर यांनी निवेदन करुन रसिकांना सूरांच्या दूनियेत बांधून ठेवले.संगीत संयोजन ज्येष्ठ की-बोर्ड वादक जहीर भाई,मंगेश पटले व ज्येष्ठ ड्रम वादक संजय बारापात्रे यांचे होते.कार्यक्रमात गिटार,कांगो,तबला,ऑक्टोपॅडवर दीपक कांबळे,गणेश रंगारी,नंदू वडूलवार,गौरव रंगारी व महेंद्र बटूलकर यांनी साथसंगत केली.ध्वनि व्यवस्था ऋषभ ढोमणे तर प्रकाश योजना विजय कीर्तने यांची होती.
ऑस्करच्यावतीने सादर झालेल्या या कार्यक्रमामुळे आज रसिकांनी पुन्हा एकदा गायकीचा तो सूवर्णकाळ अनुभवला.पारंपारिक साडी या वेशभूषेतील सर्व ऑकेस्ट्रा गायिका ‘सूर’या एकाच भावनेतून, एकाच मंचावर रसिकां समोर वावरल्या.हे बघणे ही सुखद होते.खूप मोठ्या कालखंडानंतर सभागृहात गायिकांचे सुरेल सूर दरवळले होते.
’मूल आणि चूल’सांभाळणा-या या गायिकांपैकी अनेक अश्या होत्या ज्यांनी त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात पराकोटीची दू:खे भोगली आहेत पण आज ती सर्व दु:खे विसरुन फक्त सुरांच्या सानिध्यात त्या दरवळल्या,बहरल्या.प्रदीर्घ काळानंतर त्यांना पुन्हा एकदा ‘ऑस्कर’ने स्टेज उपलब्ध करुन दिला,स्टेजवर गीत सादर करताना त्यांच्या चेहर-यावर पडणारा प्रकाश योजनेतील रंगबिरंगी प्रकाश, त्यांचा आत्मविश्वास ही दमकवणारा होता.
ऑस्करचे संयोजक पी.कुमार व सचिव प्रशांत खडसे,सदस्य संगीता गावंडे व इतर सर्व सहका-यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.




आमचे चॅनल subscribe करा
