
श्री श्री रविशंकर,स्वामी रामदेव यांच्यासह इतर धर्माचार्यांची उपस्थिती
नागपूरकरांना मिळणार अध्यात्मिक- बौद्धिक पर्वणी
नागपूर,ता.२० ऑक्टोबर: शहरातील ग्रेट नाग रोड येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात रविवारी सकाळी ९.३० वा.आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.‘सामाजिक सौहाद्रे:भारताची भूमिका आणि वैश्विक आव्हाने’या विषयावर सर्व धर्मिय मान्यवर आपले विचार प्रकट करतील.
यात प्रामुख्याने आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर,हरिद्वार येथील पातांजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव,नवी दिल्लीच्या अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य लोकेश्वर मुनी,अजमेर शरीफ दरगाहचे गद्दी नशिन हाजी सईद सलमान चिश्ती,मुंबईच्या जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै,मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्द ग्रेसियस,लेह-लडाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिख्खू संघसेना आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रम्हविहारीदास स्वामी यांचा सहभाग असणार आहे.
ब्रह्मविहारीदास स्वामी हे विशेषत्वाने या परिषदेसाठी अमेरिकेतून येत असल्याची माहिती संचालक-परिचालनाचे अशोक जैन यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.
आज जागतिक पातळीवर सर्वच ठिकाणी धर्माच्या नावावर नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.हे भारताच्या वैदिक संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम् ’विचारधारेचा सर्वथा विरोधात आहे.या देशात शतकानुशतके सर्व धर्म-पंथीय नागरिक एकोप्याने,सलोख्याने राहत आहेत.आपली संस्कृती ही प्रेम,करुणा व बंधुत्वाशी नातं सांगणारी आहे.
भगवान महावीर,भगवान गौतम बुद्ध,गुरु गोविंदसिंह,महात्मा गांधी या सर्वांनी एकच संदेश दिला व त्या तत्वाचा सर्वत्र प्रसार केला.जागतिक बंधुत्व भावनेला बळकटी देने हाच एकमेव उद्देश या परिषदेचा आहे.नागपूरातून प्रसवलेली विश्वबंधुतत्वाची घोषणा संपूर्ण जगापर्यंत पोहोचावी तसेच प्रेम,शांती व सांप्रदायिक सौहार्द्राचा संदेश जनमानसात रुजावा,हीच भावना या आयोजनामागील असल्याचे जैन यांनी सांगितले.
वर्तमानातील संदर्भात भारताची भूमिका काय आहे आणि हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र जगात धार्मिक सोहार्द्र व शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणते योगदान देऊ शकते,या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच धार्मिक नेते व धर्माचार्यांना या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या मान्यवरांचे विचार संपूर्ण जगात सांप्रदायिक सौहार्द्र व शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भूमिका वठवेल,अशी अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली.
नागपूरकरांसाठी ही एक अध्यात्मिक व बौद्धिक पर्वणीच असून मोठ्या संख्येने याचा लाभ घेण्याचे आवाहन जैन यांनी केले.
पत्र परिषदेला संपादक दिलीप तिखिले,एन.के नायक,विकास मिश्रा आदी उपस्थित होते.
गडकरी यांच्या हस्ते उद् घाटन-
रविवार दि.२४ ऑक्टोबर रोजी भट सभागृहात सकाळी १०.वाजता केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परिषदेचे उद् घाटन होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व महापौर दयाशंकर .ितवारी उपस्थित राहतील.




आमचे चॅनल subscribe करा
