फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘झेंडा गीत‘ गायन,'अराजकीय' कार्यक्रम अन्.....राजकीय भाषण!

‘झेंडा गीत‘ गायन,’अराजकीय’ कार्यक्रम अन्…..राजकीय भाषण!

Advertisements

उपक्रम राजकीय राहणार नसल्याचा महापौरांनी केला होता दावा

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १७ ऑक्टोबर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात आज श्‍यामलाल गुप्त ’पार्षद’रचित झेंडा गीताचे १२५ ठिकाणी एकाच वेळी सकाळी ११ वा. सामुहिक गायन झाले.मुख्य कार्यक्रम संविधान चौकात सकाळी ११ वा.पार पडला यात प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महापौर दयाशंकर तिवारी तसेच मनपातील सर्व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.याप्रसंगी कोणतेही राजकीय भाषण होणार नाही,कार्यक्रमाला कोणतेही राजकीय स्वरुप राहणार नसून कोणत्याही पक्षाचे झेंडे देखील राहणार नाही तर देशासाठी जाज्वल्य अभिमान असणा-या झेंडा गीताचे फक्त सामुहिक गायन होईल व हा उपक्रम संपूर्णत: देशभक्ती भावनेवरच आधारलेला असेल,असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्र-परिषदेत म्हटले होते मात्र जिथे राजकीय मंडळी मंचावर असेल तिथे राजकीय भाषण होणार नाही ही अशक्यप्राय बाब कोणालाही साधता येणार नाही.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे देखील या बाबीला अपवाद ठरले नाहीत.‘मौका और दस्तूर’बघता त्यांनी या प्रसंगी देखील राजकीय फटकेबाजी केलीच.संदीप जाधव हे कधीच तिकीट मागायला येत नाहीत,उलट आम्हालाच चिंता वाटते त्यांना कोणत्या ठिकाणाहून तिकीट द्यावे,असे गडकरी म्हणाले.संविधान चौकात उद्देश्‍यपत्रिका शीलालेखाच्या संकल्पनेचे संपूर्ण श्रेय संदीप जाधव यांना देत असताना त्यांनी वरील विधान उद्रृत केले.यामुळे येत्या मनपा निवडणूकीत किमान संदीप जाधव यांचे तिकीट पक्के झाल्याचीच चर्चा होती.
यामुळे संपूर्णत: मनपाच्या, पर्यायाने जनतेच्या खर्चाने पार पडलेल्या या ‘देशभक्तीपर’उपक्रमाच्या आड येत्या मनपा निवडणूकीची ‘पोळी’भाजल्या गेली,असे देखील म्हटल्या जात आहे.
‘राजकीय’ स्वरुप नसण्याचा दावा करण्यात आलेल्या या उपक्रमात केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री या दोघांनीही पंतप्रधान माेदी यांच्या कार्यकर्तुत्वाचा अवार्जून व तेवढाच भरभरुन उल्लेख केला! मोदी हे राजकीय व्यक्ती नसून पंतप्रधान असल्याची भाबडी समजूत उपस्थितांना झाली असेल तर हा भाग अलहिदा!संविधानाच्या उद्देश्‍य पत्रिकेच्या वाचन संस्कृतीची सुरवात पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात केल्याची ‘आठवण’सुरवातीला आपल्या भाषणात फडणवीस यांनी करुन दिली.

यानंतर गडकरी यांनी देखील त्यांच्या भाषणाची ‘रि’ओढत देशभक्तीपर वाचन,पठन आणि चिंतनातूनच मोदींच्या संकल्पनेतील ’आत्मनिर्भर’भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल,हे सांगण्यास गडकरी ही विसरले नाहीत!

गडकरी व फडणवीस यांच्या अलीकडील प्रत्येक भाषणात ‘अभिषिक्त’ असणारे पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकर्तुत्वाचा उल्लेख हा ‘अटळ’असतो मात्र राजकीय व्यासपीठावर हे योग्य असले तरी देशभक्तीपर कार्यक्रमातही पंतप्रधानांचे ‘स्तुतीगान’हे अनेकांना खटकले.
याशिवाय संविधानातील उद्देश्‍यपत्रिकेच्या शिलालेखाचे उद् घाटन मात्र मंचावरील भल्या मोठ्या फलकावर बाबासाहेबांचे एक ही छायाचित्र नसल्याचा देखील संताप कार्यक्रमस्थळी व्यक्त झाला.

मनपा शाळेतील शिक्षक मंडळी व विद्यार्थ्यांनी संविधान चौकात झेंडा गीत सादर केले त्यावरही मुक्तपणे ’ हवे त्या दर्जाचे सादरीकरण झाले नाही’अश्‍या शब्दात गडकरी यांनी कान टोचले.एवढंच नव्हे तर पुढील वेळी चांगले गायन केल्यास व दर्जा सुधारल्यास योग्य ते बक्षीस देऊ,अशी पुस्तीही जोडली.

याच वेळी मुंबईमधील सायन पूलाच्या लोकार्पण प्रसंगी मनपाच्या शिक्षकांनी सादर केलेल्या गीतासंबंधी त्यांनी आठवण सांगितली. १९९८ साली ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सायन येथील पूलाचे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वागत गीत सादरीकरणासाठी विशेषरूपाने नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मनपाच्या शिक्षकांनी सादर केलेल्या गीतांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केल्याची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.

अर्थात त्या चमूचा संपूर्ण खर्च कोणी केला होता?मनपावर त्याचा भुर्दंड पडला होता का?असा प्रश्‍न उपस्थितांच्या मनात उपस्थित झाला मात्र याचे उत्तर गुलदस्त्यातच राहीले.

बक्षीसांची खैरात-
‘आझादी-७५’च्या निमित्ताने नागपूर शहरातील किमान १ लाख विद्यार्थी स्वातंत्र्यगीतामध्ये सहभागी व्हावेत, त्यांना गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीचा परिचय व्हावा त्यांनी इतिहास जाणून घ्यावा ,खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. यामध्ये शहरातील सर्व शाळांचा सहभाग घेण्यात यावा. दहाही झोनस्तरावर या स्पर्धेचे आयोजन करून विजयी संघांना आकर्षक रोख पुरस्कार ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे’ देण्यात येतील. यासाठी १ लाख, ७५ हजार व ५१ हजार तसेच झोनस्तरावरील स्पर्धेत ५ लाख,३ लाख व २ लाखांचे बक्षीस देण्यासाठी देणगीदारांची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचेही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

याशिवाय रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मोठी स्क्रीन लावण्यात आली असून येथे शहरातील विद्यार्थ्यांना देशभक्तीपर चित्रपट दाखविण्यात यावे, यासंदर्भात मनपाने नियोजन करण्याचेही त्यांनी सूचित केले.

थोडक्यात तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या व गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता असणा-या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीचा ‘बिगूल’ देशभक्तीपर व्यासपीठावर फूंकला गेला असल्याचे या संपूर्ण संभाषणातून अधोरेखित झाले.

(वर पँडोल असून देखील छत्रीवरुनही कोसळणारा पाऊस!)

पावसाने उडवली दाणादाण-
एकीकडे महापौरांच्या शब्दातील ‘अराजकीय’ कार्यक्रमात, राजकीय नेत्यांच्या शब्दसुमनांनी वातावरण गारेगार झाले असताना निसर्गानेही नेमके संविधान चौकातच चांगलीच पावसाची झडी लावली.उपस्थित वृत्तवाहीन्यांचे कॅमरे आणि ध्वनि व्यवस्थेवर पावसाने तर विशेष ’राग मल्हार’गात संततधार झडी लावली.आपले महागडे कॅमरे पावसापासून वाचवण्यासाठी एकच मोठी छत्री शेवटी एकाने सर्व कॅम-यांवर धरली,ध्वनि व्यवस्थापकाने तर ‘भला मोठा फलकच’उचलून आणला आणि आपल्या साऊंड सिस्टिमवर टाकला,गंमत म्हणजे त्या फलकाच्या खाली त्याने स्वत:सोबत अनेकांना पावसापासून बचावासाठी आश्रय देखील दिला.

(छायाचित्र- ध्वनिव्यवस्थापकाने असा भला मोठा फलक आपल्या साऊंड सिस्टिमवर झाकला)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या