फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजवीस-वीस वर्षे नागपूरचे रस्ते खराब होत नाही!गडकरींची क्लिप चांगलीच व्हायरल

वीस-वीस वर्षे नागपूरचे रस्ते खराब होत नाही!गडकरींची क्लिप चांगलीच व्हायरल

Advertisements

सोशल मिडीयावर रंगले मिम्स

नागपूर,ता.२ सप्टेंबर: गेल्या तीन दिवसात पावसाने उडवलेली त्रेधातिरपीटने त्रस्त नागपूरकर जनतेला दूसरीकडे पाण्याखाली असणा-या असंख्य ‘महानगरपालिकाप्रणित’खड्डयांचा अंदाज नसल्याने जीव मुठीत घेऊनच घराबाहरेच निघावं लागत आहे त्यामुळेच सोशल मिडीयावर या शहराचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातील शब्दांशी संगती लाऊन शहरातील खड्ड्यांची क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.

यात गडकरी हे मुंबईतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहे मात्र नागपूरातील रस्ते हे वीस वर्ष देखील खराब होत नसल्याचा दावा करीत आहेत.रस्त्यांचे काम खराब झाले तर कंत्राटदाराला बडवल्याशिवाय राहणार नाही,असा दम देखील त्यांनी भरला आहे मात्र दूर्देवाने त्यांच्या शब्दांचे ‘मोल’ किवा ’गांर्भीय’ त्यांच्याच पक्ष्ाची गेल्या १५ वर्षांपासून सत्ता असणा-या नागपूर महानगरपालिकेच्या सत्ताधा-यांनी जाणले असते तर आज नागपूरकरांवर जागोजागी जीवघेण्या खड्डयात आणि पाण्यात तुंबण्याची वेळच आली नसती.

सोशल मिडीयावर आजच्या पावसामुळे ठिकठिकाणी उडालेली धुळवड यावर बरेच मिम्स व्हायरल झाले.डांबरी रस्ते उखडून अगदी गल्ली बोळ्यातील काही फूटांचे रस्ते ही सिमेंट रस्त्यांने सुशोभित करण्याचा सत्ताधारी नगरसेवकांचा हव्यास,त्यासाठी काढण्यात आलेल्या लाखोंच्या निविदा,एकाच रस्त्यासाठी २-२,३-३ वेळा फक्त पावती क्रमांक बदलून उचललेला निधी,कंत्राटदाराच्या संगमताने बांधण्यात आलेले नियोजनशुन्य आणि निकृष्ट सिमेंट रस्ते यासारख्या कारभारामुळे आज नागपूरकरांचा जीव टांगणीला लागला आहे.

गेल्या वर्षी देखील अनेक वस्तीत नियोजनशुन्य सिमेंट रस्त्यांमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले,सामानाची नासधुस झाली,धान्याचे नुकसान झाले मात्र मनपातील प्रशासन व सत्ताधा-यांना याचे कोणतेही सोयरसुतक नव्हते, त्यांचे सिमेंट रस्त्यांचे कंत्राट हनुमंतांच्या शेपटीसारखे आजही संपता संपत नसल्याने जनता आता चांगलीच त्रस्त झाली आहे.

सिमेंट रस्त्यांच्या बाजूला असलेल्या नाल्यांची देखील पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करण्यात आली नसल्याने त्या नाल्या तश्‍याच तुंबलेल्या आहेत,दूसरीकडे रस्ते मात्र नदी झाले असल्याचे छायाचित्र आज सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झालेत.

स्वत: गडकरी यांच्या रेडिसन ब्लू चौकातील त्यांच्या विद्यमान घरासमोरील खड्डे यांचे छायाचित्र देखील नागरिकांनी व्हायरल करण्यास मागे-पुढे पाहीले नाही. मुजोर प्रशासन गडकरी यांना जुमानत नाही ते नागपूरकर जनतेला काय जुमानतील,असा संताप देखील व्यक्त होत आहे.शहरातील नियोजन‘पूर्ण’ असा एक ही सिमेंट रस्ता दाखवा आणि बक्ष्ीस मिळवा,अशी स्पर्धा देखील समाज माध्यमांवर चांगलीच रंगली आहे.

शहराचा सर्वाधिक सत्यानाश मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांनी केला असल्याची टिका केली जात आहे.मेट्रोने संपूर्ण शहरच २०१५ पासून पिल्लर्ससाठी खोदून ठेवले,यानंतर मात्र शहराचा चेहरामोहरा पुन्हा पूर्वपदावर आला नाही,सीताबर्डी मेट्रो स्टेशनसमाेरील सर्वाधिक गर्दी असणा-या रस्त्यावर कितीतरी व्यासमिटरचे खोल खडुडे हे वाहनचालकांच्या वाहन कौशल्याचा अंत पाहत आहेत.एकीकडे मेट्रो स्टेशनचा झगमगाट डोळे दिपवून टाकतात दूसरीकडे साक्ष्ात मृत्यूलोकात घेऊन जाण्यासाठी या सीताबर्डी मेट्रो स्टेशनसमोरचे खड्डे सज्ज झाले दिसतात!!

सिमेंट रस्ते हा तर भाजप सत्ताधा-यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रकल्प!प्रशासन,कंत्राटदार आणि पदाधिकारी यांच्या अभद्र युतीचे ’कारनामे’ सामान्य नागपूरकर भोगून देताना दिसतोय.

गडकरी यांच्या सिमेंट रस्त्याचा संकल्पना फार वेगळ्या होत्या मात्र त्यांच्या पक्ष्ाच्या सत्ताधा-यांनी त्या संकल्पनेचा अन्वयार्थ ‘भेगाधारी सिमेंट रस्ते’असा घेतल्याने २० वर्षे काय अवघ्या २० दिवसात अनेक ठिकाणच्या सिमेंट रस्त्यांवर भेगा दिसू लागतात आहेत.गडकरी यांच्या पहील्या कार्यकाळात मानेवाडा रोडवरील सिमेंट रस्ता मात्र आजही तेथील नागरिक ‘आदर्श’मानतात, हा रस्ता नुसता ‘ट्रेलर’ठरला हा भाग अलहिदा.

यावर कहर म्हणजे आधी सिमेंट रस्ते बांधलेत मग वेगवेगळे केबल टाकण्यासाठी पुन्हा खोदलेत,आयबॉल्स उखडल्यावर पुन्हा ते समान पातळीवर लावण्याची जवाबदारी केबल ठाकणा-या कंत्राटदारांवर मनपा प्रशासनाने कधी ‘निश्‍चित‘केलीच नाही,आज हेच सिमेंट रस्त्यांवरील उखडलेले व ‘फक्त रचून ठेवलेले ’ आयबॉल्स सामान्य जनतेच्या जीवावर उठले आहेत,या आयबॉल्समुळे अनेक अपघात घडले,दररोज घडत आहेत मात्र मनपा प्रशासन व सत्ताधा-यांना याचे कोणतेही सोयरसूतक दिसत नाही,निविदा मंजुर झाल्या,कंत्राटदारांचा पैसा निघाला,नगरसेवकांना हिस्सेदारी मिळाली मग झाले ’काम तमाम!’येथे सामान्य माणूसच ‘तमाम’ होत आहे,घाटावर आणि रुग्णालयात हातपाय मोडून,डोके फोडून पोहोचत आहे,याची जवाबदारी येत्या निवडणूकीत कोण कोण घेणार?असा सवाल विचारला जात आहे.

गोपाल नगरच्या नागरिकांंनी तर आधी गोपाल नगर मेन रोड वर असलेल्या नगरसेवकांचे अतिक्रमण काढा नंतरच रस्त्याचे काम सुरु करा,जुना रस्ता दीड ते दोन फूट खोदूनच रोड लेव्हलने सिमेंट रस्ता तयार करा जेणेकरुन नागरिकांच्या घरात पाणी घुसणार नाही,असा मजेदार फलकच मुख्य खांब्यावर लावला आहे.

गडकरी यांच्या संकल्पना अफाट आणि अद् भूत आहेत मात्र त्यांच्या पक्ष्ातील सत्ताधा-यांचे ‘कामही’तेवढेच अफाट आणि अद् भूत असल्याची साक्ष् गेल्या १५ वर्षांपासून नागपूरकर जनतेला मिळाली आहे.त्यांच्या अफाट आणि अद् भूत विकास कामांमुळेच ‘नागपूर’ला आता समाज माध्यमांवर ‘नरकपूर’म्हणून संबोधले जात आहे.जिथे देशाची राजधानी दिल्लीच पावसाच्या पाण्याने तुंबली,महाराष्ट्राची राजधानी ही तर दरवर्षीच तुंबते तिथे उपराजधानीची काय बिसात?

येत्या निवडणूकीत मनपा सत्ताधारी आपल्या या अश्‍या अदभूत कामगिरी ऐवजी गडकरी यांच्या विकासकामांवरच मतदारांना मत मागणार असल्याचा जनतेलाही ठाम विश्‍वास आहे, म्हणूनच जनता संपूर्ण पाण्याखाली असली तरी मनपा सत्ताधारी अगदी निश्‍चित असल्याचे मिम्स देखील सोशल मिडीयावर झळकले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या