
गेल्या २ वर्षात फक्त ५५ कोटींची विकास कामे
एकीकडे कामे थांबवायची दूसरीकडे विकास होत नाही म्हणून ओरड करायची काँग्रेसची दुहेरी नीती
नागपूर,ता. २ सप्टेंबर: महाराष्ट्रात २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये सत्तांतर झालं आणि राज्यात महाविकासआघाडीची सरकार आली मात्र सत्तेत आल्यानंतर सातत्याने आघाडी सरकारने राज्याची उपराजधानी असणा-या नागपूर शहराच्या विकास कामात खोळंबा घातला आणि नागपूरकर नागरिकांना मुलभुत सुविधांपासून वंचीत ठेवले,असा घणाघाती आरोप मनपाचे सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी आज मनपा मुख्यालयात आयोजित पत्र-परिषदेत केला.याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष् प्रकाश भोयर,माजी महापौर मायाताई इवनाते,प्रतोद दिव्या धुरडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ठाकरे म्हणाले,की २०१४ साली महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष्ाची सरकार आल्यानंतर नागपूर शहराचा विकास अत्यंत वेगाने झाला.शहरात सिमेंट रस्ते,बगीचे,५७२ व १९०० ले-आऊट्समधील नागरी सुविधांची कामे वेगाने सुरु झाली व नागपूर शहराचा चेहरा-मोहराच बदलू लागला. या काळात नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबीत प्रश्ने मार्गी लावण्यात आले तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपये अनुदानाच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत होते,त्यामधून नागरिकांना मुलभूत सुविधांची कामे पार पाडली जात होती,ते अनुदान देखील सुडबुद्धिने आघाडी सरकारने थांबवले.
एकीकडे काँग्रेस पत्र- परिषद घेऊन सांगते भाजपने नागपूर शहराचा विकास केला नाही दूसरीकडे मनपा प्रशासनावर दवाब आणून विकास कामे थांबविण्याचे कटकारस्थान गेल्या दोन वर्षांपासून केले जात असल्याचे आमचे मत आहे,शंका आहे.प्रशासनाचा वापर करुन नागपूर शहराचा विकास थांबविण्याचे काम सातत्याने होत आहे.
२०१९ ला सत्ताबदल झाल्यानंतर जे आयुक्त रुजू झाले त्यांनी सर्वात पहीले कोणते काम केले असेल तर विकास कामे थांबवण्याचे काम केले,असे ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांचे नाव न घेता सांगितले.त्या आयुक्तांनी सर्वच कामांच्या फाईली गोठवून ठेवल्या, ज्यात नागरिकांच्या मुलभुत सुविधांचीही कामे होती.तत्कालीन आयुक्तांच्या त्या आडमुठे धोरणामुळेच नागपूरकर नागरिक आज मुलभुत सुविधांपासून वंचित आहे.
नंतर आलेल्या आयुक्तांनी देखील गेल्या दाेन वर्षात फक्त ५५ कोटींच्या विकास निधीलाच मंजुरी प्रदान केली.या पूर्वी दरवर्षी साढे चारशे ते पाचशे कोटींची कामे शहरात होत होती.यावर कहर म्हणजे राज्य सरकारकडून मिळणारे २५ कोटी रुपयांचे मनपाचे हक्काचे अनुदान व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून करण्यात येणा-या विकास कामांना देखील आघाडी सरकारने थांबवले.ही कामे सुरु झाली असती तर नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला नसता,अशी मल्लीनार्थी देखील ठाकरेंनी जोडली.
एकीकडे शहरातील काँग्रेसचे नेते राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणून शहरातील विकास कामांना ब्रेक लावत आहेत तर दुसरीकडे मनपा काम करीत नसल्याचे खोटे आरोप करीत असल्याची टिका ठाकरे यांनी केली.
कोविड-१९ च्या काळातसुद्धा काँग्रेसप्रणीत महाविकासआघाडी सरकारकडून नागपूर मनपाला कोणतीही मदत मिळाली नाही,एकीकडे राज्य शासनाकडून कोणतेही अनुदान मिळू द्यायचे नाही दूसरीकडे मनपाच्या उत्पन्नातून होणा-या विकास कामांना प्रशासनाच्या माध्यमातुन थांबवायचे,अशा प्रकारचे अतिशय हीन दर्जाचे राजकारण काँग्रेसतर्फे सुरु असल्याचे ते म्हणाले.
फक्त मनपाची निवडणूक जवळ आली की काँग्रेसला जनतेची आठवण येते,इतर वेळी हा पक्ष् आपल्या अंतर्गत कलहात गुंतलेला असतो,गेल्या १५ वर्षांपासून मनपात भाजपची सत्ता असून या शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम भाजपनेच केले आहे.
काँग्रेस नेत्यांचे आरोप हे नैराश्यातून आलेले असून येणा-या निवडणूकीत त्यांचा पराभव त्यांना स्पष्ट दिसत असल्याने ते बिनबुडाचे आरोप करीत असल्याची टिका अविनाश ठाकरे यांनी केली.




आमचे चॅनल subscribe करा
