
अति.आयुक्त राम जोशी यांचे व्हाॅट्स ॲप ग्रूपवर धमकीचे मॅसेज!
नागपूर,ता. १२ ऑगस्ट: करोनाच्या महामारीच्या काळात राज्य सरकारने एक अध्यादेश काढला व करोना आटोक्यात आणण्यासाठी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवकांची भर्ती करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले.या आदेशानुसार पहीली करोनाची लाट अोसरत असताना व दूस-या लाटेची सुरवात झाली असताना नागपूर महानगरपालिकेने या आदेशाचे पालन करीत कंत्राटी पद्धतीने कोविड-१९ लसीकरण विशेष पद भरती अंतर्गत आयुष वैद्यकीय अधिकारी,अधिपरीचारीका,आरोग्य सेविका,डाटा एन्ट्री आपरेटर इ.तात्पुरत्या स्वरुपात जवळपास अडीच हजार कर्मचा-यांची नियुक्ती केली मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता आता या कर्मचा-यांना घरी बसवण्यात आले या विरोधात आंदोलन केले असता मनपाचे अति.आयुक्त राम जोशी यांनी १७ जुलै रोजी मनपाच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर धमकीवजा संदेश टाकला यामुळे या कर्मचा-यांनी संविधान चौकात सोमवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती ‘बदलाव‘ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष् यश गौरखेडे यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.

या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,साधारणत: भारत देशात कोणताही करार हा ११ महिन्यांचा असतो मात्र या आरोग्य सेवकांना मनपाने ३ महिन्यांच्या कंत्राटी करारावर नेमले.नागपूरात फक्त १० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे,अद्याप २५ लाख नागरिकांचा दुसरा डोज शिल्लक असताना या सर्व आरोग्य सेवकांना कामावरुन काढून टाकण्यात आले .या सर्व आरोग्य सेवकांनी फक्त नागरिकांच्या लसीकरणातच मोलाची सेवा दिली नाही तर वेळप्रसंगी यांच्याकडून लसीकरण केंद्राची साफसफाई,झाडू पोछा,चहा आणने यासारखी कामे देखील करवून घेण्यात आली!
भारत देशात सर्वात गंभीर समस्या जर कोणती असेल तर ती आहे ‘बेरोजगारी’त्यामुळे आपला रोजगार जाऊ नये यासाठी या आरोग्य सेवकांनी ती देखील कामे केलीत.मात्र लसीकरण केंद्रावर जवळपास सर्वच झोनमधील नगरसेवक,झोन सभापतींनी यांना दडपशाहीतून सर्वसामान्य नागरिकांच्या ऐवजी स्वत:चे नातेवाईक,ओळखीचे,मतदार अादींचे लसीकरण करण्यास बाध्य केले.
अनेक आरोग्य सेवकांनी याला विरोध केला त्यामुळे त्यांना घरी बसवण्यात आले.कराराचा अवधी पूर्ण होण्यापूर्वीच विरोध करणा-या अारोग्य सेवकांना कामावरुन काढण्यात आले.मनपासोबत झालेल्या करारानुसार त्यांना एका महिन्याची नोटीस देणे गरजेचे असताना देखील हा नियम पाळण्यात आला नाही.श्रद्धा वाघमारे या आरोग्य सेविकेला तर एका नगरसेविकेच्या पतीने परशू ठाकूर याने याच वादातून केंद्रातच कोंडून ठेवले शेवटी तिने कंट्रोल रुमला फोन करुन स्वत:ची सुटका करवून घेतली .एवढी पराकोटीची अरेरावी मनपाच्या नगरसेवकांनी या आरोग्य सेवकांसोबत केली.
तीन महीन्यांच्या करारानंतर मनपाने यांची सेवा दिवसाप्रमाणे सुरु केली. यात ही त्यांचे आर्थिक शोषण करण्यात आले.अद्याप जुलैचा पगार देखील त्यांना मिळाला नाही.
१२ जुलै रोजी आमच्या संघटनेने महापौर दयाशंकर तिवारी यांची भेट घेतली त्यांनी फक्त या समस्येवर लक्ष् घालण्याचे तोंडी आश्वासन दिले.‘मी इथे उभा आहे,या आरोग्य सेवकांना कोणीही कामावरुन काढणार नाही’असे आश्वासन दिले असताना देखील या कंत्राटी आरोग्य सेवकांची गच्छंती करण्यात आली.५ दिवसांचा अवधी उलटल्यानंतर देखील कोणतीच कारवाई न झाल्याने १७ जुलै रोजी आमच्या संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला.

मात्र तत्कालीन अति.आयुक्त राम जोशी यांनी त्या सकाळी व्हॉट्स ॲप ग्रूपवर धमकीवजा संदेश टाकला.जो कोणी आंदोलनात सहभागी होईल त्याला कार्यमुक्त केले जाईल.यानंतर खराेखरंच त्यांनी आंदोलनात सहभागी होणा-यांना नोकरीवरुन काढून टाकले.यामुळे जवळपास १२५० आरोग्य सेवकांनी नगरसेवक तसेच मनपा प्रशासनातर्फे त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले याचे पत्रच तयार करुन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्याकडे गेले मात्र दोन तीन दिवस सलग पाठपुरावा करुन देखील मनपा आयुक्तांनी भेट नाकारली.
यानंतर विभागीय आयुक्तांकडे ते निवेदन सोपवण्यात आले.याच ठिकाणी मंत्री बच्चू कडू यांची भेट झाली असता त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री यांच्या कानावर टाकणार असल्याचे आश्वासन दिले मात्र पुढे काहीच घडले नाही.
किमान नागपूरातील संपूर्ण ३५ लाख नागरिकांचे लसीरकण पूर्ण होईपर्यंत या कंत्राटी आरोग्य सेवकांच्या नियुकत्या कायम कराव्या.तसेच ज्याप्रमाणे दूसरी लाट येण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय आरोग्य यंत्रणेला सजग राहण्याचा इशारा दिला होता तसाच इशारा आता देखील देण्यात आला असून करोना आपला व्हेरियंट बदलत असल्याने तिस-या लाटेची शक्यता त्यांनी वर्तवली असल्याने नागपूर महानगरपालिकेने या आरोग्य सेवकांना आता कामावरुन काढल्यास पुढील लाटेप्रसंगी त्यांना याच आरोग्य सेवकांच्या सेवेचा लाभ घ्यावा लागणार असल्याचा इशारा यश यांनी या प्रसंगी दिला.
३५ लाख लोकसंख्येसाठी आज देखील नागपूरात साढे बारा हजार बेड्स उपलब्ध आहेत त्यातही ९१ टक्के खासगी बेड्स आहेत.या शहरात ७५ टक्के नागरिक हा गरीबी रेषेच्या खाली जगतोय तो करोनाबाधित झाल्यास एलेक्सीससारख्या महागड्या रुग्णालयात तर उपचार नाही घेणार त्यामुळे मनपाने या आरोग्य सेवकांचा ‘यूस ॲण्ड थ्रो’म्हणजे वापरा आणि फेका असा वापर करु नये.
राज्य सरकारने तर खासगी रुग्णालयांची दलाली उघडून ठेवली असल्याचा घणाघाती आरोप यश यांनी याप्रसंगी केला.त्यामुळेच नागपूरकर नागरिकांना करोनाच्या तिस-या लाटेत काहीही झाल्यास नगरसेवक,आमदार व या शहरातील खासदार यांच्यावर जवाबदारी निश्चित करण्यासाठी सोमवारी संविधान चौकात मोर्चा व आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.




आमचे चॅनल subscribe करा
