Homeनागपूर न्यूजवाजू दे तिसरी घंटा.....रंगकर्मींचे सरकारला साकडे

वाजू दे तिसरी घंटा…..रंगकर्मींचे सरकारला साकडे


संविधान चाैकात रंगकर्मींचे आंदोलन
नागपूर,ता. ९ ऑगस्ट: गेल्या दीड वर्षापासून राज्य सरकारने महाराष्ट्रातील नाट्यगृहांना व सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदीतून सभागृहांना टाळेबंदी लावली आहे,जवळपास ७० टक्के कलावंत हे याच व्यवसायावर पूर्णपणे निर्भर आहे.उपजिविकेचे कोणतेही दूसरे साधन त्यांच्या जवळ उपलब्ध नाही,जोपर्यंत करोनाने राज्यात थैमान घातले होते तोपर्यंत राज्यातील रंगकर्मी व कलावंतानी सरकारला पूर्णपणे सहाकार्य केले मात्र आता राज्यात तसेच उपराजधानीत करोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे किंबहूना एक ही करोनाबाधित आढळून येत नाही तरी देखील सरकारने अनिश्‍चित काळासाठी नाट्यगृहे व सभागृहे करोनाच्या तिस-या लाटेच्या भीतीने बंद ठेवली आहेत,सरकारच्या या तुघलकी निर्णयाच्या विरोधात त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रंगकर्मींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला व आज नागपूरात संविधान चौकात रंगकर्मी, स्टेज कलावंत तसेच ध्वनि व प्रकाश व्यवस्थपनातील संचालकांनी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले.

याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की,सरकारने एवढ्या प्रदीर्घ काळासाठी रंगभूमी बंद ठेवल्यामुळे आतापर्यंत अनेक कलावंतांनी आत्महत्या केली,शेकडो कलावंत व नाट्यकर्मी देशाेधडीला लागले.करोनाच्या तडाख्यात काम नसल्यामुळे अनेक कलावंत व रंगकर्मींकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते.यातच महागाईने कंबरडे मोडले.वीज बिला पासून पाल्यांच्या शाळेची फी,दैनदिन गरजांपासून तर कुटुंबियांचे पालनपोषण हे सर्व भीषण प्रश्‍न कलावंत व रंगकर्मींना भेडसावत आहेत.

मात्र सरकारने कलावंत व रंगकर्मींना तसेच या क्ष्ेत्रावर निर्भर असणा-या लाखो माणसांना पूर्णपणे निराधार सोडले आहे.सरकारने आमच्या समस्यांवर ना कोणता तोडगा शोधला ना मदतीचा हात दिला.रंगकर्मी व कलावंतच आतापर्यंत एकमेकांना मदतीचा हात देत आले आहेत मात्र आता त्यांचीही दानत संपली आहे.

आता तर सरकारने तातडीने रंगभूमी व सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केले नाहीत तर अनेकांची उपासमार घडणार हे निश्‍चित!प्रत्येक रंगकर्मी व कलावंत हा अतिशय तनावात जगत आहे.दीड वर्ष आम्ही तग धरली आता मात्र संयम संपला आहे.मायबाप सरकारने हॉटेल्स,बार,मॉल्स सुरु केले मात्र रंगभूमी व सभागृह बंदिस्तच ठेवले.करोना हा फक्त रंगभूमी व सादरीकरणाच्या मंचावरुनच पसरतो का?हाॅटेल्स,बार,मॉल्समध्ये गर्दी होत नाही का?असा सवाल आयोजकांनी सरकारला केला.

एकेकाळी कलावंतांना ‘राजाश्रय’मिळत असे.आता मात्र राजानेच कोंडी केली असल्याने दाद कुणाला मागायची?नुकतेच राज्य सरकारने ५ हजार रुपयांची आर्थिक मदत लोककलांवतांना जाहीर केली मात्र राज्यातील सर्वच कलाकार हे लोककलावंत नाहीत शिवाय कलावंतांना सरकारकडून ‘भीक किवा मदत‘पाहीजे नसून हक्काचे सादरीकरण हवे आहे.आम्हाला स्वाभिमानाने रोजीरोटी कमवायची आहे यासाठीच आज आंदोलनात रंगभूमी क्ष्ेत्र व सांस्कृतिक क्ष्ेत्रातील कलावंत एकत्रित आलो असल्याची भूमिका आयोजकांनी मांडली.

खास ‘सत्ताधीश‘ने सरकार तुमच्या आंदोलनानंतर ही नाही बधली व रंगभूमी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केले नाहीत तर पुढची भूमिका काय?असा सवाल केला.यावर आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाचे राजकीयकरण करायचे नसल्याचे सांगून सरकार जर आता ही नाही बधली तर पुढील बैठकीत पुढची दिशा ठरवू असे त्यांनी सांगितले.कलाकार हा मनानेच आधीच खूप संवेदनशील असतो सरकारने त्यांचा अंत पाहू नये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच सरकारविरोधात प्रक्ष्ोभ होईल,असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी युवा रंगकर्मीनी नाट्यगृहे सुरु करावी या मागणीला घेऊन अप्रतिम पथनाट्य सादर केले.‘वाजू दे तिसरी घंटा..वाजू दे नांदी…उघडू दे मखमली पर्दे..चेह-याला रंग लावू दे..टाळ्यांच्या गजरात तृप्त होऊ दे’हे सुरेल गीत सादर केले.कलावंतांसाठी रंगभूमी हेच थेटर असतं मात्र आज हे संविधान चौकच थेटर झाले असल्याची घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली.याप्रसंगी एक रंगकर्मी दुस-या रंगकर्मींच्या सादरीकरणाला मनापासून दाद देत होता.मंचावर सर्वात वर ‘आम्ही कलाकार झालो निराधार’चा फलक लक्ष् वेधून घेत होता.

गेल्या दीड वर्षांपासून मनात दाबून ठेवलेली कलेची उर्मी आज उस्फूर्तपणे बाहेर प्रकटली.ज्येष्ठ रंगकर्मी सलीम शेख व प्रशांत लिखार यांनी ‘सोम्या-गोम्या’संवादातून अफलातून पथनाट्य सादर करुन आंदोलनकर्त्यांची दाद मिळवली.प्रणय कुथे या युवा गायकाने देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थितांचे मन जिंकले.अंकिता टकले या युवा गायिकेने ‘देश हे रंगीला मेरा रंगीला’हे देशभक्तीपर गीत सादर केले.धीरज पांडे याने देखील देशभक्तीपर गीत सादर केले. देशभक्तीपर गीतांवर आंदोलनकर्त्यांनी नृत्याचा आनंद ही लृटला.’भारत माता की जय’घोषाने आसमंत निनादला. आर्ट डायरेक्टर नाना मिसाळ यांनी वीर सावरकर,नेताजी सुभाषचंद्र बोस,चंद्रशेखर अाझाद इ.अनेक क्रांतीकारकांचे स्केच काढले.राष्ट्रगानाने आंदोलनाची सांगता झाली.

याप्रसंगी चारुदत्त जिचकार यांच्या नेतृत्वात संजय भाकरे, किशोर आयलवार,सचिन ढोमणे,अविनाश सोनुले आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सोपवले.

याप्रसंगी नाग विदर्भ चेंबरचे अध्यक्ष् दिपेन अग्रवाल यांनी देखील आंदोलन स्थळाला भेट दिली.संघर्ष समिती देखील आंदोलनात सहभागी झाली.ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीचे अध्यक्ष् पी.कुमार हे देखील मंचावर उपस्थित होते. सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे,ज्येष्ठ रंगभूमी कलावंत सारीका पेंडसे,संजय भाकरे,प्रकाश वाकेकर,कुणाल गडेकर,उल्लास चिटमूलवार आदी शहरातील रंगभूमी,ऑकेस्ट्रा,संगीत संच,ध्वनि व प्रकाश व्यवस्थापन इ.सर्वच क्ष्ेत्रातील शेकडो कलावंत आंदोलनात सहभागी झाले होते.

डॉ.मनोज साल्पेकर व लकी खान यांनी मंच सांभाळला.

 

 

करोना नियमांचे सर्रास उल्लंघन-

याप्रसंगी मंचावरुन मंच संचालक वारंवार उपस्थितांना करोनाचे नियम पाळण्याची सूचना देत होते मात्र सामाजिक अंतरांचे काेणतेही भान आंदोलनकर्त्यांनी ठेवले नाही.करोनाची तिसरी लाट आलीच तर पुन्हा सरकारला रंगभूमी व स्टेज शो बंद करण्याची संधी मिळेल त्यामुळे आताच करोनाचे नियम पाळा,एकमेकांपासून अंतर राखा आणि मुखपट्टी काढू नका असे वारंवार मंचावरुन सूचना देण्यात येत असल्या तरी करोना नियमांचे सर्रास उल्लंघन आंदोलनस्थळी झाले.अनेक आंदोलकांनी आपली मुखपट्टी चक्क खिशात ठेवली होती तर अनेक कलावंत करोना महामारीच्या विस्मरणातून एकमेकांना चक्क मिठी मारुन एकमेकांचे स्वागत करीत होते.

Latest बातम्या