
ज्येष्ठ कलावंतांचा आंदोलनका-यांना खडा सवाल:करोनाने दिली संधी विचार करा
सरकारविरोधात निषेधाचे नारे नाहीच मग काय पारिवारीक आंदोलन होणार का?ज्येष्ठ रंगकर्मींचे बोल
नाट्यगृहे उघडा उद्ववा! कलावंतांची आर्त साद:संपूर्ण महाराष्ट्रात रंगकर्मी उतरणार रस्त्यावर
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ८ ऑगस्ट: सलग १६ महिन्यांपासून करोना विषाणूच्या महामारीने सर्वाधिक कहर बरपवला असेल तर ते आहे सांस्कृतिक क्ष्ेत्र.या क्ष्ेत्रावर लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे सांस्कृतिक क्ष्ेत्रातही कोट्यावधींची उलाढाल होत होती मात्र करोना या विषाणूने जगभरात धूमाकूळ घालतानाच भारत देश ही या जीवघेण्या विषाणूच्या तडाख्यात सापडला आणि गेल्या वर्षी २३ मार्च पासून पंतप्रधानांच्या आवहानानुसार जो लॉकडाऊनचा निर्णय देशभर लागू झाला तो आज १६ महीने उलटले असले तरी अनेक राज्यात निर्बंध शिथिल झाले असले जरी अद्याप धार्मिक,सांस्कृतिक क्ष्ेत्रांवर ही बंदी कायमच आहे.
परिणामी या क्ष्ेत्रावर अवलंबून असणारे लाखो रंगकर्मी,गायक-वादक कलावंत,मिमिक्री आर्टिस्ट,निवेदनकार,बॅक स्टेज कलावंत,सभागृहांचे मालक,नेपथ्यकार,ध्वनि व प्रकाश व्यवस्थापक,त्यांच्यावर अवलंबून असणारे सहायक ,नृत्य कलावंत आदी लाखो कलावंतांवर कार्यक्रम व सादरीकरणाअभावी उपासमारीची दूर्देवी वेळ ओढवली,महत्वाचे म्हणजे ही वेळ एखाद वर्षाची किवा काही काळखंडापुरती मर्यादित नसून हनुमंतांच्या शेपटीप्रमाणे लॉकडाऊनचा हा अवधी सतत लांबतच चालला आहे,परिणामी आता कला क्ष्ेत्रातील कलावंतांचा संयम ही संपल्यात जमा झाला आहे,त्याचीच परिणीती उद्या ९ आॅगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात एक साथ एकाच दिवशी होणा-या ‘रंगकर्मी’आंदोलनात उमटली आहे.
सरकारने सरसकट नाट्यगृहे बंदच ठेवली असून संगीताचे कार्यक्रम यांच्यावरही बंदी कायम ठेवली आहे.गेल्या १६ महिन्यांपासून अत्यंत स्वाभिमानी असणारी सांस्कृतिक क्ष्ेत्रातील लाखो माणसे व त्यांच्यावर अवलंबून असणारे लाखो कुटुंबिय हे काम बंद असताना जगतात तरी कसे आहेत?कलावंतांच्या या जगण्या-मरण्याच्या प्रश्नाशी मात्र मायबाप सरकारला काही एक घेणे-देेेणे नाही,सांस्कृतिक क्ष्ेत्र म्हणजे निव्वळ ‘मनोरंजन’एवढ्या कोत्या मानसिकतेतूनच सरकार या क्ष्ेत्राकडे पाहत असल्याचे सरकारच्या निर्णयावरुन वांरवार सिद्ध होत आहे.मात्र मनोरजंनाच्या मागे दडलेले जगण्याचे भयाण वास्तव सरकारला समजून घेण्याची ईच्छा नाही किवा गरजही वाटत नाही.करोनाच्या काळात लोकांचे मनोरंजन नाही झाले तरी चालेल,एवढेच मायबाप सरकारच्या लेखी असून लॉकडाऊन संदर्भातील प्रत्येक निर्बंधात ते उमटत आहे.मात्र नाट्यगृहे व सभागृह सातत्याने बंद ठेऊन आपण आपल्याच राज्यातील लाखो नागरिकांना उपाशी मरण्यास बाध्य करीत आहोत हे सरकारच्या खिजगणतीत सुद्धा नाही!
गेल्या १६ महिन्यांपासून महाराष्ट्राचे रंगकर्मी व कलावंत हा कोंडमारा एकएकट्याने साेसत होते.अनेकांनी लहान-मोठ्या संघटनाही बनवल्या,संघटनेच्या माध्यमातून जगण्या-मरण्याचा प्रश्न शासन दरबारी सोडवण्याचा प्रयत्न ही केला मात्र शेवटी ‘एकीचे बळ’हेच या जीवघेण्या समस्येतून मार्ग काढू शकेल याची प्रचिती झाल्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात आता सरकारला जागवण्यासाठी व कला क्ष्ेत्रातील कलावंतांच्या कोंडमा-याची जाणीव करुन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी हा स्वाभिमानी कलावंत सरकारच्या तुघलकी धोरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे आणि हा मायबाप सरकारला एक प्रकारे इशाराच असल्याचे त्यांचे मत आहे.
सोशल मिडीयावर या आंदोलन संबधी पोस्टचा अक्ष् र: भडीमार होत असून कलावंतांच्या वाटेला आलेल्या आजच्या हलाकीच्या परिस्थितीची जाणीव सरकारला व्हावी व सरकारने सांस्कृतिक क्ष्ेत्रावर गेल्या १६ महिन्यांपासून सलग घातलेले निर्बंध उठवावे यासाठी महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण पातळीवरील कलावंत देखील या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने गटा-तटात विखुरलेल्या वेगवेगळ्या संघटना एकत्रित आल्याचे बघून नागपूरकर प्रेक्ष् क व श्रोते ही चकीत झाले आहेत.सोमवारी सकाळी १० वा.शिस्तबद्ध पद्धतीने नागपूरकर रंगकर्मी व कला क्ष्ेत्रातील कलावंत हे मूक मोर्चा काढणार आहे.‘नवीन सांस्कृतिक क्रांती’घडवून आणावयाचा निर्धार ही व्यक्त केला जात आहे मात्र अनेक ज्येष्ठ कलावंतांच्या मनातून अद्यापही त्यांच्या आजपर्यंत झालेल्या उपेक्ष्ेचे शल्य गेले नसल्याचे निर्दशनास येतं.
९० च्या दशकापासून नागपूरच्या सांस्कृतिक क्ष्ेत्रात विशेषत: संगीत क्ष्ेत्रात ‘कंपूगिरीच्या’प्रवेशाने अनेक ज्येष्ठ कलावंत नाराज आहेत.प्रत्येक संगीत संचाने अगदी ‘ठरवून‘ठराविकच गायक-वादक कलावंतांचा ‘कंपू’बनवला असून या कंपूत इतरांना प्रवेश दिला जात नाही त्यामुळे अनेक ज्येष्ठ तसेच नवोदित हरहुन्नरी गायक-वादक कलावंतांना काम मिळत नाही.या मानसिकतेने संगीत क्ष्ेत्रासोबतच दर्जेदार संगीत ऐकण्यास आतूर असणा-या श्रोत्यांची देखील फसवणूक केली आहे.
फक्त आंदोनासाठी ‘एकी’नको तर एक ’नियम’बनवा,आपापले कंपू कायम ठेवा मात्र इतर ही कलावंतंाना महिन्यातून किमान ५ तरी कार्यक्रमात संधी देण्याची तयारी या अांदोलनका-यांची आहे का?असा सवाल शहरातील काही ज्येष्ठ कलावंतांनी उपस्थित केला आहे.पैसा हा दुय्यम आहे मात्र कलावंत म्हणून मानाची अपेक्ष्ा ते व्यक्त करतात.कला साधक असल्याने कलेच्या सादरीकरणाची भूक त्यांना ही असते,हे धगधगते वास्तव कंपूगिरी करणारे समजून घेतील का?असा त्यांचा सवाल आहे.
४०-४० वर्ष ज्यांनी फक्त संगीत साधनेतच खर्ची केली असे अनेक प्रतिभावंत ज्येष्ठ कलावंत या कंपूगिरीमुळे फिल्डच्या बाहेर फेकल्या गेली.यांच्याशी जुळवून घेण्यासाठी नवीन पिढीच्या कलावंतांना कठीण जातं,अशी सबब सांगितली जाते मात्र कार्यक्रमाच्या सरावाच्या दरम्यान नवीन पिढीला ज्येष्ठ कलावंत जर योग्य मार्गदर्शन करीत असतील आणि परफेक्ट टायमिंग व परफेक्ट म्यूझिकची अपेक्ष्ा करुन चूक-बरोबर सांगत असतील तर भारतीय संस्कृतीत गुरुस्थानी असणा-यांना जो मान असतो तोच मान या ज्येष्ठ कलावंतांना का मिळत नाही?नवीन पिढीच्या कलावंतांचा लगेच ‘ईगो‘कसा हर्ट होतो?असा सवाल ज्येष्ठ कलावंत करीत आहेत.
७० च्या दशकात यू-ट्यूब नव्हता ना मोबाईल होते.नागपूर शहरातील अनेक ज्येष्ठ कलावंतांनी आणि रंगकर्मींनी कलेची साधना करण्याकरीता आपल्या रक्ताचे पाणी केले आहे.कोणत्याही गाण्याचे एक-एक पीस काढण्यासाठी सर्व म्यूझिशियन्ससोबत रात्र-रात्र भर सराव केला आहे.तो काळ साधनेचा होता,आजही कला म्हणजे त्यांच्यासाठी साधनाच आहे,बाजार नाही,आजसारखे आयते यूट्यबवरील नोटेशन्स त्याकाळी त्यांना उपलब्ध नव्हते.हजारो टेपरिकॉर्डर्स ‘रिवाईण्ड-फॉरवर्ड’ करुन-करुन या कलावंतांनी खराब केले आहेत.अश्यावेळी ९० च्या दशकापासून नागपूरच्या संगीत क्ष्ेत्रात शिरलेली कंपूगिरी, आणि फक्त आपल्याच कंपूतील कलावंतांना घेऊन शोज करणे,ही प्रवृत्ती संगीत क्ष्ेत्रासाठी घातकच ठरली.
त्यामुळेच आंदोलनाला पाठींबा देतानाच या ज्येष्ठ कलावंतांची अपेक्ष्ा आहे आता तरी संगीत असो किवा नाट्य या क्ष्ेत्रासाठी काहीतरी ‘नियम’बनावे.करोना संपला व पुन्हा कार्यक्रम सुरु झाले तर महिन्यातून २५ कार्यक्रम कंपूला घेऊन करा मात्र ५ कार्यक्रमात तरी ज्येष्ठांना व नवोदितांना संधी द्या.फक्त दायित्व देऊ नका तर सन्मानही द्या,आमच्यातली कला ही जगवा…!
करोनाने ही संधी कलावंतांना उपलब्ध करुन दिली आहे.आता तरी नव्याने विचार करा.फक्त आज एकीची गरज आहे म्हणून सरकारवर दवाब आणण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलावल्या जात आहे,पुन्हा ’गरज सरो वैद्य मरो’सारखी परिस्थिती होईल आणि उत्तर नागपूरचे कलाकार ते पश्चिम नागपूरचे कलाकार,हे अमूक कंपूचे कलाकार ते तमूक कंपूचे कलाकार असे राजकारण सांस्कृतिक क्ष्ेत्रात पुन्हा सुरु होईल,असा ठाम विश्वास असल्यानेच उद्याच्या आंदोलनापासून अनेकांनी आजच फारकत घेतली असल्याची माहिती ‘सत्ताधीश’ला प्राप्त झाली.
रंगकर्मीही नाराज!
उद्याचे आंदोलन हे’रंगकर्मींचे’आंदोलन म्हणून प्रसिद्ध केल्या जात आहे मात्र शहरातील हजारो रंगकर्मींपैकी किती रंगकर्मी उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार आहे?याबाबत आंदोलनका-यांमध्येच पराकोटीची सांशकता आहे!आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पार पडेल्या बैठकीतच ‘नेतृत्वाचा’वाद उफाळून आल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय सरकारच्या विरोधात कोणतीही नारेबाजी किवा घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे मग हे आंदोलन रंगकर्मींचे आहे की ‘पारिवारीक?’असा सवाल केला जात आहे.
आम्हाला सरकारला फक्त एकजूटता दाखवायची आहे,अशी सबब पुढे केली जात आहे मात्र गेल्या १६ महिन्यांपासून नाट्यगृहे बंद आहेत तेव्हापासून अश्या एकजुटीसाठी काय केले?आता लेटरहेडवर चार नावे आली तर गर्दी जमवण्यासाठी एकजुटीची भाषा बोलली जात आहे!
रंगकर्मींच्या नावाने होणा-या आंदोलनामध्ये रंगकर्मीपेक्ष्ा लाईट व साऊंडवाल्यांचाच भरणा अधिक आहे,या उपर ही मेकअपवाले,डेकोरेशनवाल्यांनाही गर्दी जमविण्यास सांगितले जात आहे.सर्वांना आपापले बॅनर आणता येणार नाही,नारे देता येणार नाही,घोषणाबाजी करता येणार नाही,फक्त अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य भारतीयांना बहाल करणारे क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यापर्ण केले जाईल,काही पावलांचा मूक मोर्चा,जिल्हाधिका-यांना निवेदन आणि संपले आंदोलन.अश्या आंदाेलनाला नागपूरातील अनेक नाट्यकर्मींचाच विरोध आहे.पहील्या दिवशी जेवढ्या हिरीरीने शहरातील अनेक रंगकर्मी आंदोलनासाठीच्या बैठकीत हजर होते त्यातील अनेकांनी काढता पाय घेतला असल्याची माहिती आहे.
आता रंगकर्मींऐवजी लाईट व साऊंड व्यवस्थापक व्हालेंटियर्सची जवाबदारी सांभाळणार आहेत!आंदोलनाच्या यशस्वीतेच्या सांशकतेतून अनेक व्हाॅट्स ॲप ग्रूप्सवर आता आंदोलनाचे नेतृत्व पेलणा-या रंगकर्मींचे ‘भावनिक’मॅसेज फिरत आहेत!काहीही करा पण उद्याचे आंदोलन यशस्वी करा,एकजुटता दाखवा,गर्दी दाखवा,आपाल्या बायको-मुलांनाही आंदोलनात घेऊन या!याने सरकारला तरी काय फरक पडणार आहे?
सर्वात महत्वाचे म्हणजे ‘एक कलावंत लाख कलावंत‘हे मराठा आंदोलनाचे घोषवाक्य घेणा-या आंदोनलच्या नेतृत्वाकारांना संविधान चौकात आंदोलन घेण्याचे कारण काय?नाट्याशी संबंधित असणारी वास्तू कविवर्य सुरेश भट सभागृहासमोर आंदोलन का करण्यात येत नाही?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.का नाही सरकारला इशारा देत नाट्यगृहाचे कूलूप तोडून सभागृहात जाऊन बसत?जोपर्यंत सरकार नाट्यगृहे उघडण्याची परवानगी देत नाही तोपर्यत सभागृहातून हलणार नाही,असे ठिय्या आंदोलन करत?
याचीच नाराजी अनेकांनी मनात धरुन उद्याच्या आंदोलनात रंगकर्मी म्हणून सहभागी होत असलो तरी मनापासून या आंदोलनात सहभागी नसणार असल्याचे उघड-उघडपणे बैठकीत सांगितले असल्याची माहिती आहे.




आमचे चॅनल subscribe करा
