

कर्मचारीही त्रस्त: चौकडीने पाळले ‘गुंंडं’ हाताशी
नोकरीच्या बदल्यात लाखोंचे वारे-न्यारे
कंपन्यांना ‘वजना‘नुसार भूगतानाचा कंत्राट देणारी देशात नागपूर महानगरपालिका एकमेव!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ५ ऑगस्ट: येत्या दहा दिवसात देशाचा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन खूप उत्साहात साजरा होणार आहे. देशवासीयांना हे स्वातंत्र सहज सोपे मिळाले नसून शेकडो आंदोलने व बलिदानातून मिळाले आहे,शेकडो देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले,आपल्या प्राणांची आहूती दिली,आज ही देशाच्या सीमेवर सैन्य आहे म्हणूनच देशाचा प्रत्येक नागरिक निर्धास्त झोपू शकतोय,देशातील सैन्य व सैन्यातील अधिकारी यांच्याविषयी सामान्य नागरिकांच्या मनात अपार श्रद्धा व आदर असतो,मग ते निवृत्त अधिकारी असले तरी यत्किंचित ही हा सन्मान कमी होत नाही मात्र नागपूर महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी ज्या दोन खासगी कंपन्यांना अनुक्रमे ५-५ झोनचा कंत्राट देऊन कोट्यावधीचा करार केला आहे त्यातील एजी एन्वहायरो या कंपनीत नुकतीच याच वर्षी फेब्रुवारीत कंपनीच्या मुंबईतील संचालकांनी ४ माणसांची चौकडी नियुक्त केली अन् ……या चौकडीची मुजोरी इथपर्यंत वाढली की त्यांनी शहरातील एक माजी सैन्याधिकारी ज्यांचा मुलगा या कंपनीत काम करतोय, त्याला मेडिकल फिटनेसच्या नावाखाली कामावरुन काढण्याचा निर्णय घेतला,एजी एन्वहायरोच्या या कर्मचा-याला अडीच वर्षाचं लहान बाळ आहे,पत्नी व आई-वडीलांची जवाबारी त्याच्यावरच आहे,परिणामी लाॅकडाऊनच्या या काळात आपल्या मुलाची खासगी का असेना नोकरी वाचावी म्हणून सलग ३ दिवस हे निवृत्त सैन्याधिकारी यांनी सदर येथील एलआयसी इमारतीच्या बाजूला असणा-या या कंपनीच्या कार्यालयात जाऊन या चाैकडीची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्या प्रशस्त केबिनबाहेर या उन्मत अधिका-यांनी या माजी सैन्याधिक-यांना तासनतास बसवून ठेवलं,काचेच्या केबिनमधून कंपनीच्या या चारही अधिका-यांनी या निवृत्त वृद्ध सैन्याधिका-यांना तासनतास बसलेले पाहीले मात्र भेट दिल नाही.पदाच्या उन्मत मस्तीतून त्यांचा सन्मान करने तर दूर,त्यांची दखल ही घेतली नाही,याचा तीव्र संताप आता नागपूरकर नागरिकांमध्ये उमटला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे,कचरा संकलनाचा कंत्राट आधी कनकला देण्यात आला होता मात्र कनकच्या कारभारावर अतिशय ओरड झाल्यावर एजी इन्वायरो व बीव्हीजी कंपनीना कोट्यावधीचा कंत्राट देण्यात आला.या कंपनीत प्रोजेक्ट अधिका-यांकडून आधी कनकचेच कर्मचारी घेण्यात आले मात्र वारंवार होणारे संप व आंदोलनामुळे एजी एन्वहायरो कंपनीच्या मुंबईतील संचालकांनी या वर्षी नागपूरच्या कार्यालयात या वर्षी फेब्रुवारीमध्ये चार नव्या अधिका-यांची नियुक्ती केली.
यानंतर मात्र कर्मचारी आणि अधिका-यांमध्ये वाद चिघळत गेला.या अधिका-यांनी गेल्या २०-२० वर्षांपासून शहरातील घाणीत ज्यांचे आयुष्य गेले त्यांनाच कामावरुन काढायला सुरवात केली,नुकतेच या कंपनीने मनपा प्रशासनाच्या मंजुरी पत्रानंतर १५० कर्मचा-यांना कामावरुन काढले मात्र दूसरीकडे लगेच नवी भरती ही केली!कंपनीला जर कर्मचा-यांची भरतीच करायची होती तर जुनेच कर्मचारी का घेतले नाही?असा सवाल उपस्थित करुन या नवीन भरतीतून या चार अधिका-यांनी लाखोंचा ‘मलिदा’ कमावला असल्याचा आरोप केला जात आहे.एकेका सफाई कर्मचा-यांकडून ४० ते ५० हजार रुपये घेऊन या कंपनीत नियुक्ती दिली जात असल्याचा आरोप या कंपनीच्या अनेक कर्मचा-यांनी खास ‘सत्ताधीश’कडे केला.
मुंबईतील मालकांच्या डोळ्यात धूळ फेकून ही कमाई सुरु असल्याचे सांगितले जात आहे.सर्वात गंभीर आरोप म्हणजे या चारही अधिका-यांनी काही गुंड प्रवृत्तीची माणसे कंपनी कार्यालयात नेमून ठेवली आहे. ज्यांना कोणतेही पद नाही आणि काम ही नाही,फक्त न्याय मागायला येणा-या कंपनीच्या सफाई कर्मचा-यांना दमदाटी करणे,धमकावणे,हूसकावून लावणे एवढ्याच कामांचा या गुंडाना पगार दिला जात आहे!
ही चौकडी कंपनीतील अनेक जुन्या कर्मचा-यांचा मानसिक छळ करुन त्यांना नोकरी सोडण्यास बाध्य करीत असून नुकतेच मनपातील विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी देखील मागच्या सभेत हा प्रश्न उपस्थित केला होता.या कंपनीतील अनेक जुने कर्मचारी हे शहरातील आमदार,खासदार व लोकप्रतिनिधी यांच्या दारावर आश्रयासाठी जात आहेत. त्यांचा फोन गेल्यास काही दिवस या कर्मचा-यांना योग्य वागणूक मिळते मात्र पुन्हा काही दिवसात त्यांचा मानसिक छळ सुरु होतो!
कनक मधील कमलेश शर्मा हे ज्येष्ठ अधिकारी दहा ही झोनमधील कर्मचा-यांना सोबत घेऊन चालत होते मात्र एजी एनव्हायरोने ज्या ४ अधिका-यांची नियुक्ती केली त्यांना कोणताही तांत्रिक कामाचा अनुभव नाही.गुंडांच्या भरवश्यावर ते संपूर्ण कार्यभार सांभाळत असल्याचा आरोप केला जात आहे.
कर्मचा-यांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर डिजेल चाेरीचाही आरोप लावला जातो.अाधीच भंगार झालेल्या गाड्यांची बॅटरी केली,टायर पंचर झाले तरी पगारातून ३ ते ४ हजार रुपये कापले जातात! नुकतेच कांजी हाऊसमध्ये जिथे बाजार भरतो,कचरा गाडीला जीपीएस लागले आहेत,सुपरवायझर सोबत असतो,सफाई कर्मचारी सोबत असतात त्या गाडीच्या वाहनचालकावर ४० लीटर डिजेल चोरल्याचा आरोप लावण्यात आला.एवढ्या गर्दीत मी एवढे डीजेल चोरणार कसा?हा त्याचा तर्क ही या अधिका-यांनी मान्य केला नाही.नवीन भरतीसाठी हे अधिकारी अश्या खोट्या कलृपत्या अजमावतात,असा आरोप या कंपनीचे कर्मचारी करीत आहेत.
या कंपनीच्या कर्मचा-यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली असून या कंपनीच्या ८० टक्के कचरा गाड्या या अक्ष् रश:कबाड झाल्या आहेत त्यामुळे कधीही टायर पंचर होतो,मेंटेनसच्या समस्या उद् भवतात ते ही पैसे कर्मचा-यांच्या पगारातून हे अधिकारी कापतात!कंपनी मालकाला या गाड्यांचे ८० हजार प्रत्येक गाडीचे भाडे कंत्राटदाराला द्यावे लागत आहे त्यात ही हे अधिकारी आपले कमिशन काढत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत.
कंपनीने गेल्या दीड महिन्यापासून वाहन चालकांना पगार ही दिला नसून मालकांकडूनच पैसे नाही आले तर पगार कुठून देणार? उरफाटे उत्तर पगार मागणा-या कर्मचा-यांना मिळतं.शरमेची बाब म्हणजे अश्या ‘उच्च’पदावर बसलेले हे चारही अधिकारी कर्मचा-यांना अतिशय अर्वाच्य शिव्या देऊनच बोलतात.कमरेखालची भाषा वापरतात,माय-बहीणी जणू रस्त्यावर बसलेली आहे अश्या शब्दात स्त्रीवाचक शिव्यांच्या लाखोळ्या वाहतात!
हे सर्व करताना मात्र कर्मचा-यांना आपला मोबाईल केबिनच्या बाहेर ठेवायला लावतात,वरुन कार्यालयात त्यांनी पोसलेल्या गुंडांची दहशत वेगळी!
माजी सैन्याधिका-यांचा मुलगा ही गेल्या १३ वर्षांपासून कंपनीत कामाला आहे. त्याला फिट्स येतात मात्र शारीरिकरित्या तो तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी देखील दिले आहे.अतिशय घाणीत तो गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो आहे, मात्र उपजिविकेचे इतर कोणतेही दूसरे साधन नसल्याने प्रपंच ओढण्यासाठी तो प्रामाणिकपणे कंपनीचे काम करतोय,शिवाय फिट्स येणे हे त्याच्या ही हातात नाही,मानवतेच्या दृष्टिकाेणातून कंपनीच्या अधिका-यांनी त्याच्या कामावर गदा अाणने योग्य नव्हते.पहाटे ४ वा.पासून तो कंपनीच्या कामावर रुजू होतो.त्याच्या पत्नीला ही फिट्स येतात मात्र ती देखील स्वस्थ आहे.त्यांना अडीच वर्षाचं गोंडस बाळ ही आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोणालाही कामावरुन काढू नका,बेरोजगार करु नका,असे आवाहन देशाच्या पंतप्रधानाने गेल्या वर्षीच केले होते मात्र इतर अनेक क्ष्ेत्राप्रमाणेच या कचरा संकलन कंपनीतील या अधिका-यांना यात ही पैसा कमावण्याची संधी गवसल्याने जुन्यांना काढून ‘लक्ष्मी दर्शनातून’नव्यांच्या भरतीचे डोहाळे या अधिका-यांना लागले असल्याने या कंपनीचे कर्मचारी अक्ष् र श: धास्तीत जगत आहेत.
आपला मुलगा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तनावात जगत असल्याचे पाहून या बापाचे ह्दय कळवळले,मी माजी सैन्याधिकारी आहे,कारगिलच्या युद्धात मी टॅंक चालवले,देशासाठी लढलो, मेजरच्या वरची रँक घेऊनच निवृत्त झालो,२४ वर्षे मी देशाची सेवा केली,८ शौर्य पदकांनी सन्मानित आहे त्यामुळे तुझ्या नोकरीसाठी मी एकदा या अधिका-यांशी बोलून बघतो,अशी बापाची आंधळी माया मोठ्या आशेने या कंपनीच्या कार्यालयाचा जिना चढली मात्र…….!
एका निवृत्त सैन्याधिका-याला ३ दिवस आपल्या केबिन बाहेर बसवून ठेवणे व शेवर्टपर्यंत भेटच न देणे हा त्या सैन्याधिका-यांचा नव्हे तर संपूर्ण सैन्याचाच अपमान एजी एन्व्हायरो कंपनीच्या या ४ उद्दाम अधिका-यांनी केला असल्याचा चांगलाच संताप नागपूरकरांमध्ये उमटला आहे.
या संपूर्ण प्रकरणांची तसेच या कंपनीच्या एकंदरित गुंडगिरीच्या कारभाराची चौकशी गठीत केलेल्या समितीने करावी अशी ही मागणी केली जात आहे.
या कंपनीचे कर्मचारी ४ महिन्यात भिकेला लागले तर ४ अधिका-यांकडे ४ महिन्यात लक्झरी गाड्या आल्या,या मागचे गौडबंगाल याचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.प्रत्येक कर्मचा-याच्या पगारातून दर महिन्यात गाडी मेंटनेसच्या नावाखाली २ ते ३ हजारांचा पगार कापला जातो,प्रत्येक झोनमध्ये या ४ अधिका-यांनी आपले गुंड बसवून ठेवले आहे,लेबर-ड्रायव्हर यांनी संप केला तर गुंडांकरवी दबाव आणला जातो,याची ही महापौरांनी चौकशी करावी,अशी मागणी पुढे येत आहे.
हे गुंडं कच-यातून ‘माल छांटो‘कारभार करीत असून संकलन केलेल्या कच-यामधून प्लास्टिक,तांबा इ.साहित्य विकून दरराेजची ५०० रुपयांची कमाई वेगळी करतात.या कमाईच्या लोभातून ६ गल्लीपैकी चारच गल्लीतला कचरा उचलल्या जातो परिणामी दोन गल्लीतील नागरिक कचरा साचल्याने ओरडा करतात.१६-१६ तास शहरात या कंपनीच्या कचरा गाड्या चालत असूनही अनेक प्रभागाचा उकीरडा का होतो?हे सामान्य नागरिकांनाही कळत नाही.
कंपनीच्या मालकांना अपेक्ष्ा आहे दररोज ५५० टन कचरा उचलल्या जावा तरच त्यांना नफा कमावता येईल मात्र ही कंपनी दररोज ४०० टनच कचरा उचलते त्यातही अर्धा कचरा हा वजन वाढवण्यासाठी माती व कंस्ट्रक्शनचा कचरा असतो,देशभरात नागपूर महानगरपालिका ही एकमेव अशी स्वायत्त संस्था आहे जिने ‘वजना’च्या हिशोबाने या दोन्ही कंपन्यांना कचरा संकलनाचा कंत्राट दिला आहे!इतर महानगरपालिकेत असे कंत्राट ’बल्क’मध्ये दिले जातात.
काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी देखील या कंपनीद्वारे कसे वजन वाढवले जाते याचे व्हिडीयोज ही व्हायरल केले होते मात्र मनपा प्रशासनातील तसेच भाजप सत्ताधा-यांमधील काही ‘झारीतले शुक्राचार्य’यांचा वरदहस्त या कंपनीच्या संचालकांवर असल्याकारणाने कोणीही त्यांचे काहीही वाकडे करु शकत नसल्याची बाब नागपूरकर नागरिकांनाही चांगल्याने अवगत आहे.
या संदर्भात सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी नुकतेच २७ जुलैच्या बैठकीत कचरा संकलन कंपनी प्रमुखांचे मत मागवण्याचे एजी इन्व्हायरो आणि बीव्हीजीवरील चौकशी समितीच्या बैठकीत निर्देश दिले होते. शहर स्वच्छते अंतर्गत कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी मनपाद्वारे नियुक्त एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपन्यांच्या कार्यप्रणालीबाबत प्राप्त होणा-या तक्रारीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या मार्फत समितीच्या समक्ष करण्यात आलेले आरोप गहन असून कंपनीच्या प्रमुखांचे यासंदर्भात मत मागविण्यात यावे, असे निर्देश सत्तापक्ष नेते तथा समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले होते.
एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीच्या कामामध्ये त्रुटी आढळल्यास त्यावर होणारी कारवाई तसेच कंपनीद्वारे बेकायदेशीर काम होत असल्यास नियमाप्रमाणे कारवाई करणे याकरिता महापौर दयाशंकर तिवारी यांच्याद्वारे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
समितीच्या ९ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये आमदार तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके आणि विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत आपले मत मांडण्यांसदर्भात समितीकडे पत्र सादर केले होते. त्यानुसार २७ जुलै रोजीच्या बैठकीत तानाजी वनवे हे प्रत्यक्षात उपस्थित झाले तर आमदार प्रवीण दटके यांनी लेखी स्वरूपात आपले मत नोंदविले होते.
याच संदर्भात बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांच्याद्वारे दाखल व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये माती मिश्रीत कचरा असल्याचे निदर्शनास आल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालक व मालक यांचे बयाण नोंदविण्यात आले होते. त्या सर्व बयाणांचे कंपनीच्या प्रतिनिधीकडून वाचन करण्यात आले होते.
कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत मत नोंदविताना विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले की, दोन्ही कंपनींच्या व्यवस्थापकांची वागणूक अयोग्य स्वरूपाची असून त्यांच्याकडून नगरसेवकांच्या फोनला प्रतिसाद दिला जात नाही. वस्त्यांमध्ये सहा ते सात दिवसांनंतर कचरा संकलन गाड्या जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी ते नगरसेवकांकडे तक्रार करतात, तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क करता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. कंपनीमध्ये नोकरी लावण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांकडून भ्रष्टाचार करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले होते.
समिती अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांद्वारे नोंदविण्यात आलेले मत गांभीर्याने घेत दोन्ही कंपन्यांच्या कर्मचारी भरतीमधील भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांकडे कुठलेही पुरावे असल्यास त्यांनी ते समितीपुढे ठेवण्याची सूचना केली होती. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये मांडलेले मुद्दे गंभीर असून याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे. दोन्ही कंपन्यांसदर्भात संपूर्ण विस्तृत माहिती पुढे यावी यासाठी संबंधित कंपनी प्रमुखांचे अभिप्राय नोंदविण्याचे निर्देश समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले होते,हे विशेष!




आमचे चॅनल subscribe करा
