

पत्रभेटच्या गुरुपौर्णिमा विशेष उपक्रमाचा दुसरा दिवस
नागपूर, २२ जुलै: विश्वकवी म्हणून ख्याती असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांना आपण शिक्षणतज्ञ, लेखक, चित्रकार, गायक, शांतिनिकेतन, राष्ट्रगीत अशा अनेक कारणांनी ओळखतो. त्यांनी ज्याही क्षेत्रात काम केले, त्यात त्यांनी आपली स्वतंत्र ओळखच निर्माण केली नाही तर त्यांच्यापासून ते काम पुढे चालत राहिले. साहित्य, संगीत, चित्रकला टागोरांच्या नावाने ओळखली जाते. ते ख-या अर्थाने ‘ट्रेंड सेटर’ होते, असे मत डॉ. माधवी भट यांनी व्यक्त केले.
गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पत्रभेट संपादकीय मंडळाच्यावतीने आयोजित ‘आबार एसेछे आषाढ’ या उपक्रमाच्या दुस-या दिवशी चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात पंधरा वर्षापासून अध्यापनाचे कार्य करीत असलेल्या व मराठी आणि बाग्ला भाषेचा गाढा अभ्यास असलेल्या डॉ. माधवी भट यांनी ‘रवींद्र संगीत – सगुणातून निगुर्णाकडे’ विषयावर आपले विचार मांडले.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जवळपास तीन हजार कविता लिहिल्या आणि त्या स्वरबद्ध केल्या आणि आजही त्या बंगालमध्ये अतिशय भक्तीने गायिल्या जातात. आपल्याकडे आपण तुकाराम महाराज, नामदेव महाराजांचे अभंग जसे ऐकले जातात तसे तिकडे बंगालमध्ये एक रवींद्र संगीत ऐकले जाते. रवींद्रनाथ माहिती नाही असा बंगालमध्ये कुणीही नाही. परमेश्वर एखाद्या व्यक्तीला भरभरून देत असतो. एकाच व्यक्तीला गायन, वादन, नृत्य, अभिनय, लेखन, चित्रकला सारख्या अनेक प्रतिभा दिल्या. प्रत्येक माध्यम रवींद्रनाथांनी अत्यंत समरसपणे वापरले. वयाच्या साठाव्या त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला इतर माध्यमे तोकडी पडली म्हणून त्यांना कदाचित चित्रांची मदत घ्यावी लागली असावी, असे डॉ. माधवी भट म्हणाल्या.
टागोराच्या आयुष्याचे तीन टप्पे सांगताना माधवी भट म्हणाल्या, ८७५ ते १९०० या काळात त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले, पाश्चात्य संगीत ऐकले. या काळात त्यांच्यावर पूर्वसुरींचा प्रभाव दिसतो. या टप्प्यात त्यांच्या पदावली लेखनाचा जन्म झाला. १९०१ ते १९२० चा दुसरा टप्पा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातली दु:खद असून तिस-या टप्प्यात १९२० ते १९४१ या काळात त्यांच्या निधनापर्यंतच काळ समाविष्ट होतो. या तिन्ही टप्प्यात त्यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा माधवी भट यांनी यावेळी मांडला.
तत्पूर्वी, प्रज्ञा फडणीस यांनी प. पू. सद्गुरूदास महाराजांनी लिहिलेल्या ‘आबार ऐसेछे आषाढ’ या ललित लेखाचे अभिवाचन केले. रवींद्रनाथ टागोर आणि परम पूज्य संत रोहिदास महाराज यांचा अव्यक्त आणि अनाम असणारा हा लेख प्रज्ञा फडणीस यांनी अतिशय सुंदररित्या सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरयू श्रीगडीवार यांनी केले.
…….
आज पत्रभेटमध्ये
सकाळी ११ वाजता ‘गीत विष्णुदास’ या गाण्याच्या संग्रहाचे प.पू. सद्गुरूदास महाराजांच्या हस्ते उद्घाटन व आशीर्वचन.
…….




आमचे चॅनल subscribe करा
