

ट्वीटरवर पर्यावरणवादी तरुणाईची साद
अजनी इंटर मॉडल स्टेशन प्रकल्पात जाणार ४० हजार झाडांचा बळी
करोना काळात मनपाची आक्ष्ेपांसाठी ऑफ लाईन अर्जाची सूचना!
नागपूर,ता. १ जून: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या साढे आठ हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पानंतर आता फूटाळा येथे लेझर शो,नागनदीत बोटींग तसेच अजनी रेल्वे स्टेशनचे कायाकल्प करुन ४९० एकर जागेवर इंटर मॉडल स्टेशन उभारणीचा प्रकल्प यासाठी सध्या वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या पदावरील अधिकारी जोमात कामाला लागले आहेत मात्र आधीच फूटाळा येथील बंधा-याच्या तोडफाेडीमुळे ३ फूट खाली गेलेले तलावाचे पाणी,साढे आठ हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पामुळे अंबाझरी तलावाच्या बंधा-याचे ‘न भूतो ना भविष्यती’झालेले नुकसान या पाठोपाठ आता शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजे अजनी रेल्वे स्टेशचे इंटर मॉडल स्टेशनमध्ये रुपांतर करण्यासाठी जवळपास ३५ ते ४० हजार हिरवीगार,डोलदार व १०० वर्षे जुन्या झाडांची होणारी कत्तल यामुळे व्यथित होऊन शहरातील पर्यावरणवादी संस्थांनी या विरोधात आता जोमाने जनजागृतीची मोहीम हातात घेतली अाहे,नुकत्याच २८ मे रोजी पार पडलेल्या गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी ट्वीटरवर येणा-या पिढीच्या ऑक्सीजनसाठी हा प्रकल्पच रद्द करुन वाढदिवसाची नागपूरकरांना गडकरी काकांनी हीच गिफ्ट द्यावी म्हणून मागणी केली आहे.

या वादाला पुन्हा तोंड फूटले ते नागपूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या एका जाहीरातीमुळे.यात अजनी प्रकल्पातील विविध प्रजातीची एकूण ४५२२ झाडे तोडण्यात येणार असून यावर आक्ष्ेप घेणा-यांनी येत्या ५ जूनपर्यंत मनपाच्या उद्यान विभागात आक्ष्ेपाचे अर्ज सादर करावे,अशी जाहीरात प्रसिद्ध केली.विशेष म्हणजे सध्या करोना महामारीच्या काळात जिथे केंद्रापासून तर राज्य सरकरापर्यंत सगळं काही ‘आॅन लाईन‘करण्यावर भर दिले जात असताना तसेच मनपाची विशेष तसेच सर्वसाधारण सभा या देखील मनपाचे १५२ नगरसेवक असताना ऑन लाईनच पार पडत असताना शहराच्या पर्यावरणाशी निगडीत व पुढील पिढीच्या श्वसनाशी संबंधित असणा-या एवढ्या महत्वाच्या बाबीवर मनपाने मात्र ऑफ लाईन हरकती मागितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नुकतेच करोना महामारीत ऑक्सीजन अभावी हजारो नागरिकांचे तडफडून प्राण गेले,स्वत:मनपाने करोनामुळे शहरात साढेसात हजार नागरिकांचे प्राण गेल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर केली,स्वत:गडरकी यांनी महत प्रयासातून रेल्वेने,विमानाने ऑक्सीजन नागपूरात आणले तरी देखील या नेते मंडळींना अजूनही प्राणवायूची किंमत समजली नाही?अशी चौफेर टिका समाज माध्यमात उमटली आहे.रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्लान्ट टाकण्याची वेळ आली,इतर राज्यांना व परदेशातून ऑक्सीजनची ‘भीक’मागावी लागली तरी मनपाला ऑक्सीजनचं महत्वं कळालं नाही,चक्क साढे चार हजार झाडे कापण्यावर हरकत मागवणारी जाहीरात काढते!
केंद्रच सांगत आहे तिसरी लाट येणार आहे.लहान मुले या लाटेत बळी पडू शकतात त्यांना जपा,अश्या वेळी देशाचं भवितव्य असणा-या या लहान मुलांच्याच फूफ्फूसाला शुद्ध प्राणवायूच पुरवणारा नैसर्गिक श्वास एखाद्या प्रकल्पाच्या नावाखाली कसा हिरावल्या जाऊ शकतो?असा सवाल पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे गडकरी यांना हा प्रकल्प करायचाच होता व त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास नागपूरचा व्यापारी व औद्योगिक विकास करायचाच होता तर ईतवारी रेल्वे स्टेशनच्या कायाकल्प करण्याची योजना का नाही तयार केली?अजनीच का?मध्यवर्ती भाग आहे म्हणून?ईतवारी रेल्वे स्टेशनच्या कायाकल्प करण्याची सर्वाधिक गरज आज तेथील व्यापा-यांना आपला माल इतर राज्यात पाठविण्यासाठी आहे,कळमना मार्केट तसेच व्यापारी भागातील रेल्वे स्टेशनचा विकास करणे सोडून गडकरी यांनी ४९० एकरचा अजनी प्रकल्प नागपूरकरांवर लादण्याचा प्रयत्न करणे याचा विरोध न्यायालयापर्यंत करण्यात येईल,असे विदर्भ पर्यावरण प्रेरणाचे सदस्य सांगतात.
इंटर मॉडल स्टेशनचा प्रस्ताव ज्या कंपन्यामार्फत मांडण्यात आला त्यांनी निविदा देखील भरल्या नव्हत्या तरीही त्यांनाच काम मिळतं!या नेमक्या कोणाच्या कंपन्या आहेत?ही कोणाची माणसे आहेत?यात कोणते ‘अर्थकारण ’दडले आहे?यामागचे ‘सत्य’ आता नागपूरकर नागरिकांसमोर आले पाहिजे,खूप झाला विकास आता माणसाला जगवणारी,ऑक्सीजन देणारी झाडे तोडण्यापासून या कंपन्यांना न्यायालयीन लढाईद्वारे रोखणार असल्याचा इशारा या संघटनेचे पदाधिकारी देतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे अजनी इंटर मॉडल स्टेशन हे फक्त ९६ एकर जागेवर बनणार असून या प्रकल्पासाठी ४९० एकर जागा का अधिग्रहीत करण्यात येत आहे!यात रेल्वे माईन्स शाळासारखी हॅरिटेज वास्तू,रेल्वे कर्मचा-यांची घरे,मध्यवर्ती कारागृहाची संपूर्ण जागा या प्रकल्पात जाणार असून शहराच्या मध्यवर्ती भागातील जवळपास ४० हजार डोलदार वृक्ष्े या प्रकल्पात तोडली जाणार आहे.स्वत:गडकरी यांनी पत्र परिषदेत दिलेल्या माहितीनुसार ९६ एकर जागेवर अजनी इंटर मॉडल स्टेशन राहील उर्वरित जागेवर शॉपिंग कॉम्पलेक्स,मॉल्स इ.कमर्शियल इमारती राहणार आहेत!करोना महामारीच्या काळानंतर आज शहाराला ४० हजार झाडांची कत्तल करुन खरंच या कमर्शियल कॉम्पेलक्सची गरज आहे का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापौरांच्या भूमिकेवर टिका-
महापौर हे शहरातील प्रथम नागरिक आहेत.करोनाची त्रासदी त्यांनी स्वत: आपल्या डोळ्यांनी बघितली आहे.तरी देखील मनपाचा उद्यान विभाग हे साढे चार हजार झाडे कापण्यासंबंधी हरकती मागवित आहेत?याबाबत सोशल मिडीयावर जोरदार टिकास्त्र महापौरांवर करण्यात येत आहे.महापौर यांच्या हातात काही नाही हे मान्य असले तरी झाडे कापण्याची जाहीरात काढण्याऐवजी त्यांनी किमान गडकरी वाड्यावर जाऊन समस्त नागपूरकरांच्यावतीने गडकरी यांना एखादे निवेदन तर द्यायला हवे होते,असा सूर माध्यमात उमटला आहे.

एकेका ऑक्सीजन सिलेंडरसाठी लोकांनी तडफडून प्राण सोडले आहेत तरीही या महामारीतून नेते मंडळी काहीच नाही शिकली का?नुकत्याच एका चर्चासत्रात देशातील डॉक्टर्स सांगतात,परिसरातच नव्हे तर घराघरात झाडे जगवा!जे डॉक्टर्स मंडळीला कळलं ते विकासाच्या बाता मारणारे राजनेत्यांना कळत नाही का?असा संताप व्यक्त केला जात आहे.महापौरांनी आणखी कोणाचा नाही मात्र त्यांच्या मुलांचा व त्या मुलांपासून जन्माला येणा-या भावी पिढीचा विचार करुन या हजारो झाडांची कत्तल थांबवावी,अशी मागणी या संस्थेच्या अनूसूया काळे करतात.
गडकरी यांनी शहरात एवढे पूल बांधले,रुग्णालयात करोनामुळे दम तोडणा-या रुग्णांना त्या पुलांचा काय फायदा झाला?आम्ही निसर्गाची एवढी गंभीर हाक ही ऐकणार नाही का?जगात आज दिल्ली सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत समाविष्ट आहे तेच नागपूरसोबतही घडत आहे.सिमेंटचे रस्ते,ठिकठिकाणी उड्डाण पुले,तलावांवर अनावश्यक बांधकाम, शहरातील डोलदार १०० वर्षे जुनी हजारो झाडांची कत्तल हे जर थांबले नाही तर नागपूर हे देखील लवकरच या सर्व प्रकल्पांच्या ‘कृपेने’ देशात सर्वाधिक प्रदुषित शहर गणल्या जाणार असल्याचे भाकीत ही पर्यावरणवादी संस्था वर्तवते.
नुकतेच दिल्ली येथील ‘सेंट्रल विस्टा’ संबंधी याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने अर्ज दाखल करणा-या पर्यावरणवाद्यांवरच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला मात्र या आणि अश्या अनेक प्रकल्पांवर जे पर्यावरणाचे अतोनात नुकसान करतात त्याविरुद्ध आवाज उठवित राहणार व न्यायालयात दाद मागत राहणार असल्याचा निर्णयही पर्यावरणवाद्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
उद्यान विभाग त्रस्त!
स्वत:च जाहीरात देऊन ५ जून पर्यंत ऑफ लाईन अर्ज उद्यान विभागाने मागवले असले तरी दररोज हजारो अर्जांचा पाऊस या विभागात येऊन पडत आहे.यामुळे त्रस्त्र होऊन पर्यावरणवाद्यांचे हे अर्ज स्वीकारण्यासाठी उद्यान विभागाने एका कर्मचा-याचीच विशेष नियुक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे.शहरात दररोज ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर तसेस धरमपेठ येथील ट्रॅफिक पार्कसमारे दररोज सकाळी १० वाजेपर्यंत मनपात सादर करण्यासाठी नागरिकांकडून अर्ज जमा केले जात असल्याचे विदर्भ पर्यावरण प्रेरणाचे सदस्य डॉ.अमित हेडा यांनी ‘सत्ताधीशला’सांगितले.
मनपाने दिलेल्या जाहीरातीत साढे चार हजार डोलदार व हिरवेगार १०० वर्षे जुनी झाडे कापण्यासाठी जी जाहीरात दिली ती फक्त पहील्या टप्प्यासाठी असून एकूण ४९० एकरमध्ये उभारण्यात येणा-या या प्रकल्पात ३५ ते ४० हजार झाडांची कत्तल होणार असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणने आहे.याचा अत्यंत गंभीर परिणाम नागपूरकरांना येत्या काळात भाेगावा लागणार आहे यात पराकोटीची पाणी टंचाई,पर्यावरणाची अपरिमित अशी कधीही न भरुन निघणारी हानी,नैसर्गिक प्राणवायूची टंचाई यासोबतच असहनीय असे वाढत जाणारे भीषण तापमान या विरोधात, ४० हजार झाडे वाचवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन अनुसूया काळे यांनी केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
