
गडकरी यांच्या भूमिकेमुळे चर्चेला उधाण
नागपूर,ता. ७ जुलै: सीईओपदी नियुक्तीला संचालक मंडळाची मंजुरी नसताना नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेशन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमबाह्य व बेकायदेशीररित्या स्वत:ला ‘पदस्थापित ’व ‘प्रस्थापित’ केल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन २८ जून रोजी पंतप्रधान कार्यालयात स्मार्ट सिटीमधील अनियमितताबाबत कळवले. स्वत: केंद्राचे हेवीव्हेट नेते नितीन गडकरी आता या संपूर्ण प्रकरणाशी जोडल्या गेल्यामुळे शुक्रवार दि.१० जुलै रोजी होणा-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष् लागले असून,या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांचे सीईओ पद जाणार असल्याची चांगलीच चर्चा मनपात रंगली आहे!
महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांच्या विरोधात बेकायदेशीरपणे सीईओ पद बळकावणे, नियमबाह्यरित्या स्मार्ट सिटीचे कोट्यावधी रुपये कंत्राटदारांकडे वळते करणे इ.बाबत पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.यासोबतच त्यांनी गडकरी यांच्याकडेही तक्रार केली. गडकरी यांनी या या तक्रारीची गंभीर नोंद घेत २८ जून रोजी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह तसेच गृहबांधणी व शहर विकास राज्यमंत्री हरदीपसिंग यांना पत्र देऊन स्मार्ट सिटीत अनियमितता सुरु असल्याचे सांगितले.एवढेच नव्हे तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी कंपनीवर ताबा मिळवून केंद्राचा प्रकल्प बंद पाडण्यात येत असल्याचेही पत्रात नमूद केले.गडकरी यांनी पत्रात स्मार्ट सिटी कंपनीचे नियम आदीकडेही दोन्ही मंत्रालयाचे लक्ष् वेधत नियमांची पायमल्ली करणा-या आयुक्तांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बैठकीत आयुक्त मुंढे यांना सहजासहजी सीईओ पद मिळणे शक्य वाटत नसल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करतात. केवळ नागपूरकरांचे नव्हे तर स्वत: गडकरी या बैठकीकडे जातीने लक्ष् देऊन असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे या बैठकीची विषय पत्रिका काढताना मुंढे यांनी पहील्याच क्रमांकावर स्वत:च्या सीईओ पदावरील नेमणूकीचा विषय ठेवला होता.मात्र कंपनीचे अध्यक्ष् प्रवीण परदेशी यांनी हा विषय नियमानुसार सहाव्या क्रमांकावर ठेवला.मूळात महापालिका कायदा व कंपनीचा कायदा या दोघांमध्येही महद् अंतर असल्याने आयुक्तांचे कंपनीचा कायद्यासमोर काहीच चालणार नसल्याची चर्चा आहे.
याशिवाय सत्ताधारी आणि आयुक्तांमधील संघर्ष हा आता पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याने अवघ्या महाराष्ट्राचेच लक्ष् या बैठकीकडे लागले असून,बैठकीत आयुक्तांचे सीईओ पद राहील की जाईल?अशी चर्चा आता रंगली आहे. एकीकडे महापौर हे संचालक मंडळाची बैठकच डिसेंबर महिन्यापासून झाली नसल्याने,बैठकीत संचालक मंडळाच्या मान्यतेनंतरच आयुक्तांच्या सीईओपदावर शिक्कामोर्तब होऊ शकत असल्याचा दावा करीत आहे,दुसरीकडे कंपनीच्या नियमानुसार महानगरपालिका आयुक्त हे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे मुंढे हे ठामपणे सांगत आहेत. कंपनीचे अध्यक्ष् प्रवीण परदेशी यांनी तसे ‘मौखिक ’ आदेश दिल्याचेही मुंढे सांगत आहेत.परिणामी सीईओपदासाठी महापौर व आयुक्त यांच्यात चांगलीच रस्सीखेच चाललेली नागपूरकर जनता पाहत आहे.
सीईओ पद – केंद्र वर्सेस राज्याची लाढाई!
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ पद हे आता बाटलीतून निघणा-या जिन्न प्रमाणे औत्सुकत्याचा विषय झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष् शरद पवार यांचे नेमके नागपूरच्या विकासाशी कोणते वावडे आहे? हे जसे त्या बाटलीतील जिन्नाला माहिती आहे तसेच मुंढे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फक्त ‘मोहरे’म्हणूनच शहरात आले आहेत का? शहरातील विकास कामेच थांबवायची त्यांना सूचना मिळाली आहे का?गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असल्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये या शहराचा जो कायापलट या दोघांनी केला,त्याचा वचपा मुंढेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना काढायचा आहे का?हे देखील गुपित त्या बाटलीतल्या जिन्नाच्याच पोटात दडले आहे. गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणा-या स्मार्ट सिटी प्रकल्पात मुंढे हे राज्यातील सत्ताधा-यांच्या ईशा-यावर खोडा घालीत असल्याची तक्रार गडकरी यांनी केंद्र सरकारजवळ केल्यामुळे आता स्मार्ट सिटी प्रकल्प आणि या कंपनीचे सीईओ पद ही आता केंद्र वर्सेस राज्य अश्या लढाईत परिवर्तित झाल्याचे दिसून पडतंय. म्हणूनच आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष् येत्या शुक्रवारच्या बैठकीकडे लागले असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय स्मार्ट सिटीच्या बैठकीत माजी मुख्य कार्यकारी अध्यक्ष् डॉ.रामनाथ सोनोवणे यांची अचानक १३ फेब्रुवारी रोजी उचलबांगडी का झाली?मुंढे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कोविडच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीचे काम रोखले मात्र त्या पूर्वी दीड वर्षात या प्रकल्पाने किती भरारी घेतली?या प्रकल्पामुळे भरडल्या जाणा-या जनतेच्या समस्यांची जाणीव आताच कशी सत्ताधा-यांना झाली?या प्रकल्पाविषयी मुंढे यांच्याकडे सत्ताधा-यांच्या विरोधात कोणती गुपित माहिती दडली आहे?सत्ताधा-यांच्या चुकांवर जशी बैठकीत चर्चा घडेल तशीच मुंढे यांच्या अंहकारामुळे झालेल्या,केलेल्या काही चुका यांच्यावर देखील चर्चा रंगेल का?या सर्व प्रश्नांची उत्तरे बाटलीतील त्या जिन्नाजवळच असल्याचे मनपातील एका वरिष्ठ अधिका-याने खासगीत सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा