
(निहालचा याच वर्षी २६ फेब्रुवारीचा वाढदिवसाचा फोटो)
प्रशासनाने शोध थांबवला मात्र जन्मदाता अजूनही चार-चार तास घेतोय शोध!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २७ जुलै: गेल्या रविवारी दहा वर्षाचा चिमुरडा निहाल शेखर मेश्राम हा पूर्व नागपूरमधील भरतवाडा येथील घराजवळील लक्ष्मीनगरातील नाल्यावर पुलाप्रमाणे टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या खांबावरुन घरी येताना खाली पडला व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पाच दिवसांच्या अथक प्रयासानंतर नागपूर महानगरपालिकेने त्याचा शोध थांबवला,मात्र त्याचा जन्मदाता पिता अद्याप ही त्या नाल्याजवळ चार-चार तास बसतो व नाल्याच्या काठा-काठाने किती तरी किलोमीटर पिंजून काढतोय.त्यांची आस अजून ही संपली नाही. ‘सत्ताधीश’ने आज ऑन द स्पॉट त्या घराची,त्या कुटुंबियांची भेट घेतली असता अद्याप ही त्यांचे काळीज हे फाटलेलेच असल्याचे दिसून पडले!

(निहालचे कुटुंबिय)
आईच्या जेवणाच्या ताटात पडतात अश्रू!
रविवारी सुमारे दुपारच्या दीड वाजताची वेळ होती. ढग दाटून आले आणि पाऊस कोसळणार अशी चिन्हे दिसू लागताच निहालच्या आईने सीमा मेश्राम यांनी अंगणात खेळणा-या निहालचा वर घरात येण्यासाठी आवाज दिला,’आता हूं मम्मी’ तो म्हणाला आणि….घरात परतलाच नाही!त्याचा मित्र राजेश लहरे हा त्याला नाल्याच्या पलीकडील लक्ष्मीनगर येथील नाश्ताच्या दूकानात चलतोस का?म्हणून विचारायला आला आणि…नियती निहालला सोबत घेऊन गेली…!आईने आवाज दिला होता..आईच्या कुशीत शिरण्याऐवजी तो मृत्यूचा कुशीत शिरला...कायमचा!नाश्ता करुन परत येताना त्या लहानश्या नाल्यावर येण्या-जाण्यासाठी सिमेंटचा जो खांबा शॉर्ट-कट रस्ता म्हणून जो टाकला होता,तो पूर्णपणे ओला झाला होता.चिमुरड्या निहालला कळलेच नाही,ओल्या झालेल्या त्या खांबावरुन त्याचा चिमुरडा पाय घसरु शकतो, तो खळखळत्या वाहणा-या नाल्यात पडू शकतो..खांब्यावर थोडं पुढे जाताच त्याचा पाय घसरला आणि…..तो पाण्याच्या प्रवाहासोबत दूर….वाहून गेला. राजेश त्याच्या मागेच होता…तो ही चिमूरडाच..त्याने तो खांब ओलांडला आणि धावतच निहालच्या आईला हाका मारत घरी गेला.नाल्यापासून निहालचे घर फक्त एक गल्ली दूर असून दोन मिनिटांचाच रस्ता आहे.

(जीवघेणा नाला)
निहालच्या आईला जसे राजेशने सांगितले निहाल पाण्यात वाहून गेला त्या माऊलीने नाल्याकडे धाव घेतली.तिला तिचा निहाल खळखळणा-या त्या पाण्यात कुठेच दिसत नव्हता..कावरी-बावरी होऊन ती तशीच नाल्याच्या काठाकाठाने धावू लागली,तिच्यासोबत वस्तीतील ५-६ बायका या ही धावल्या,भरतवाड्याच्या मोठ्या पूलापर्यंत ती तिच्या निहालला शोधात पोहोचली मात्र…तो तिला कुठेही गवसला नाही..!
तोपर्यंत तिच्या घर मालकीणीने सीमा पंडीत हिने निहालच्या वडीलांना फोन करुन घडलेली दूर्घटना सांगितली. निहालचे वडील वाहन चालक असून त्यावेळी ते बुट्टीबोरीत होते. त्यांच्याकडे स्वत:ची सायकल देखील नाही. वाहन चालक असल्याने कोणतेही वाहन चालक त्यांना बुट्टीबोरी पर्यंत लिफ्ट देतात. बुट्टीबोरीत ते मजूरी करतात.त्यांना भरतवाड्याला पोहोचायला ४.३० वाजलेत. आल्या बरोबर त्यांनी ही अग्निशमन दलाच्या जवानांसोबत आपल्या मुलाचा खूप लांबवर शोध घेतला मात्र….!
निहालचा मोठा भाऊ २१ वर्षी निखिल हा देखील मजूरीसाठी बाहेर गेला होता. त्यालाही समोर राहणा-या कुटुंबाने फोन करुन घटनेची माहीती दिली.निखिल व निहालच्या मधली साढे सात वर्षीय निकीता आहे,जी अजून ही आईला ’दादा कुठे गेला’म्हणून विचारते,त्याच्यासोबत खेळण्यासाठी,भांडणासाठी भेडसावते..!
गेल्या सात दिवसांपासून निहाच्या घरी अन्न शिजलेच नाही…!त्यांची घर मालकीण सीमा पंडीत या तिला जेवणाचं ताट वाढून देतात मात्र,ती एक घास देखील गिळत नाही.ताट बघताच तिच्या डोळ्यातले अश्रू टपटप ताटात पडतात.’मला असं वाटतं तो मिळाला पाहीजे..त्याच्या एवढासा कपड्याचा तुकडाही मला मिळाला नाही मॅडम..त्याची चप्पल ही मिळाली नाही…मला न भेटता गेला तो…मी आवाज दिला होता हो त्याला….!’चहा देखील या कुटुंबाला अद्यापही वस्तीतील इतर घरातून लोकं आणून देत आहेत.अजूनही त्याच्या घराची चूल ही पेटलीच नाही…!
आम्हाला या भागात २० वर्षे होत आली.नाल्याजवळच्याच झोपडीत मी राहयचे. थोडा जरी पाऊस आला तर हा नाला दूथडी भरुन वाहतो,माझ्या निहालला मी पाळण्यात टाकायचे तेव्हा ते पाणी त्याच्या पाळण्यापर्यंत यायचे…!आता आता आम्ही तीन हजार रु.भाड्याचे घर घेतले. मात्र ते पाणी या घरापर्यंतही पोहोचले….त्याला घेऊन जाण्यासाठी!

(निहालचे भाड्याचे घर)
मूलांसाठी पत्नीला घराबाहेर पडूच दिले नाही!
शेखर मेश्राम यांनी मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांसोबत त्यांच्या निहालचा सायंकाळपर्यंत खूप दूरवर शोध घेतला,हताश होऊन ते घरी आले मात्र पत्नीला एक शब्द ही बोलले नाहीत! मुलांचा सांभाळ करण्यासाठीच मी तिला कुठेही आजपर्यंत मजूरी करायला पाठवले नाही,असे ते सांगतात. फक्त माझं घर आणि मुले सांभाळ,तिलाही काय माहिती होतं…असं अघटित घडणार..!ती लक्ष् द्यायची मुलांकडे खूप…पण? निहाल तीन वर्षाचा होईपर्यंत सतत आजारी राहायचा. त्याला जगवायला खूप पैसा खर्च केला,आता तर तो खूप स्मार्ट झाला होता…!नियतीची नजर लागली जणू..!
’गुलमोहर नगर’असे निहालच्या वस्तीचे नाव आहे. निहाल गेला आणि..या वस्तीतला ’मोहरच’निघून गेला.याच गुलमोहर नगरातून निहाल हा लक्ष्मीनगरात राजेश सोबत नाश्ता करायला गेला होता,त्याची आई सांगते,मॅडम आजपर्यंत तो कधीही नाल्याच्या त्या बाजूला गेलाच नाही…!अगदी पहील्यांदा गेला होता…!त्याला त्या खांबाच्या पुलावरुन चालण्याची सवय ही नव्हती हो…!
‘सत्ताधीश’ने त्या वस्तीतील चिखलयुक्त रस्ते तुडवित तो नाला बघितला असता,अगदी लहानसा तो नाला आहे.तो रौद्र ही दिसत नव्हता. शांत वाहत होता.किंबहूना ’साचलेला’होता.मोठा माणूस तीन-चार पावलात झपाझप तो नाला सहज पार करु शकेल असा,मात्र निहालची पावले ही खूपच लहान होती.त्यावेळी तो त्या आडव्या खांबावरुन वाहत होता,निहालला कळलेच नाही,तो पडू शकतो त्यात….आतापर्यंत निहालचा शोध लागलाच नाही…मोठा माणूस असता तर एखाद्या झाडी झूडपात अडकून पार्थिव तरी सापडले असते…निहाल तर लहानसा जीव होता…त्याचे मांस ही जलचर प्राण्याचे आतापर्यंत भक्ष्य बनले असावे,असे आता वस्तीतील लोकच सांगतात!हा नाला पुढे पोहरा नदीला जाऊन मिळतो,आणखी पुढे अंभाेरा येथे तीन नद्यांचा संगम होता….नद्यांचे ते पात्र फार-फार मोठे आहेत….चिमूकला निहाल त्या विशाल पात्रांमध्ये कायमचा गडप झाला…!
निहालचा नुकताच २६ फेब्रुवारी रोजी त्याच्या कुटुंबियांनी वाढदिवस साजरा केला होता. खूप आनंदी होता निहाल त्या दिवशी..नियतीला माहिती होतं..हा त्याचा शेवटचा वाढदिवस असणार आहे…कुटुंबियांना नव्हतं माहिती….! तीन महिन्यांच्या लॉक डाऊनमध्ये निहालचे वडील आणि मोठा भाऊ हे मजूरी अभावी घरीच बसले होते. लॉक डाऊन उठवले आणि वडील व भाऊ हे ८-१० दिवसच झाले होते मजूरी करायला निघाले होते…त्यांच्या मागे निहालचा असा घात झाला..!लॉक डाऊनच असता तर…वडील आणि भाऊ घरीच असते तर?
नासुप्र आणि मनपाच्या फे-यात स्मार्ट सिटीचा फसला प्रकल्प-
शहरातील अनाधिकृत ले-आऊटमधील रस्ते,गडर लाईन्स,नाल्यांचे काम हे सगळे नासुप्रकडे होते. मनपाला वेळेवरच ते सुपुर्द करण्यात आले असते तर…!स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत या प्रभागातील सर्व नाल्यांची दुरुस्ती होणार होती मात्र….!प्रशासनाच्या भांडणात जीव गेला तो एका चिमुकल्याचा!नासुप्रचे हस्तांतरण ठाकरे सरकारच्या काळात रद्द करण्यात आले. या वस्तीतील माणसे ही अक्ष् र श: जीव मुठीत घेऊन जगतात. पावसाळा आला की त्यांच्या जीवाला धडकी भरते. नाल्याच्या अगदी काठाला अनेकांची घरे आहेत…त्या घरांमध्ये लहान-लहान मुले आहेत…! नाला वाहू लागताच त्यांच्या घराच्या आत…खूप आतमध्ये पाणी शिरतं…!
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अद्याप या वस्तींचा दौरा केलाच नाही. केवळ निसर्गाचाच मारा नाही तर लॉक डाऊन काळातील भयंकर हलाकीचे जगणे ही…ही माणसे भरभरुन सांगतात…स्वयंसेवी संस्थांच्या तर कधी राजकीय पक्ष्ांच्या अन्नधान्यांच्या किटवर ती जगलीत…त्यांची चिल्ले पिल्ले जगलीत…हाताला काम नाही तर खाणार काय?
भाजप नगरसेविका मनीषा अतकरे यांचे आभार-
मनपा प्रशासनाने निहालचा शोध थांबविल्याची माहिती मिळताच ’सत्ताधीश’ने त्याच्या जन्मादात्यांची भेट घेण्याचे ठरवले. मात्र नागपूरात दोन दिवसांचा ’लॉक डाऊन’घोषित झाला आणि आज सोमवारी भाजपच्या नगरसेविका मनीषा अतकरे यांना ’सत्ताधीश’ने विनंती केली,या कुटुंबियांची भेट घालून दयावी. दूपारी ’सत्ताधीश’निहालच्या घरी पोहोचले.मनीषा अतकरे यांनी सांगितले त्यांच्या वतीने या कुटुंबाला अन्न धान्याची किट देण्यात आली. या झोनच्या सहायक आयुक्त साधना पाटील यांनी देखील प्रशासनाच्यावतीने तातडीने पीडीत कुटुंबाची भेट घेऊन अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.
मात्र निहाल याचा मृतदेहच मिळाला नसल्याने प्रशासन निहालच्या कुटुंबियांना कितपत मदत करेल,हे सांगता येणार नाही. काय चमत्कारीक कायदे आहेत ना?इंग्रजांच्या काळातलेच कायदे अद्यापही भारतात लागू आहेत. मृतदेह मिळाला तरच शासनाची मदत मिळू शकेल…! चिमूकला निहालचा मृतदेह सापडलाच नाही तर कूठून दाखवणार निगरगट्ट प्रशासनाला ते?नियम हे माणसांसाठी असतात की माणसे ही नियमांसाठी?असा प्रश्न वस्तीतील माणसे विचारत आहेत..आहे का मुंढेंच्या प्रशासनाकडे याचे उत्तर?
निहालचे कुटुंबिय हे अत्यंत गरीब असून दारिद्रय रेषेखाली येतात. निहालचे वडील आठ दिवसांनंतरही मजूरीसाठी बाहेर पडलेच नाहीत.ते त्या नाल्या किनारी निहालचा शोध घेत असतात.कधी सकाळी निघून जातात ,कधी दूपारी तर कधी सायंकाळी निघतात चार-चार तास ते निहालला शोधत असतात…!
या कुटुंबियाना घर भाडे तीन हजार रुपये द्यावे लागतात.एक चिमुरडी सध्या शिकत आहे. या कुटुंबियाला मदत करण्यासाठी समाजातील दानशूर यांनी पुढे येण्याची विनंती ’सत्ताधीश’करीत आहे.
( निहालच्या वडीलांचा शेखर मेश्राम यांचा मोबाईल क्रमांक-७०३८५५९६७२
निहालच्या मोठ्या भावाचा निखिल मेश्राम याचा मोबाईल क्रमांक-७६२००१२६८०)

आमचे चॅनल subscribe करा