Advertisements

नागपूर,ता.२२ मे २०२६: विद्यार्थ्यांच्या शिक्षण,रोजगार,परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि त्यांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने मंगळवारी राजभवन प्रवेशदारासमोर निदर्शने करण्यात आली मात्र,नागपूर शहरातील काँग्रेसचे दोन्ही आमदार यांचा तसेच त्यांच्या समर्थक नगरसेवकांचा,कार्यकर्त्यांचा कोणताही सहभाग या आंदोलनात नसल्याची माहिती समोर आली असून,याविषयी समाज माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे तसेच उत्तर नागपूरचे आमदार जे माजी मंत्री देखील होते ते आमदार नितीन राऊत यांचा काेणताही सहभाग राजभवना समोरील आंदोलनात दिसून पडला नाही.मात्र,दुसरीकडे जगभरातील अनेक देशात जंतर-मंतर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समर्थन दिले जात असून तेथील विद्यार्थी वर्ग ही अक्षरश: रस्त्यावर उतरलेला असताना महाराष्ट्राच्या उपराजधानीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षातर्फे आयोेजित आंदोलनात शहरातील दोन आमदार,त्यांचे समर्थक नगरसेवक तसेच कार्यकर्तेच सहभागी न झाल्याने,चांगलाच संताप व्यक्त होत आहे.

(छायाचित्र : उत्तर नागपूरचे काँग्रसेचे आमदार डॉ.नितीन राऊत व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे)
कालच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान निवासासमोर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केल्यानंतर,पक्षाच्या निर्देशानुसार देशभरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली.त्याचाच एक भाग म्हणून नागपूरातही हे आंदोलन पार पडले मात्र,शहरातील काँग्रसेच्याच दोन आमदारांनी या आंदोलनापसून स्वत:ला अलिप्त ठेवल्याने ‘रस्सी जल गई मगर ऐंठ नहीं गई’ही म्हण लागू होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ‘सत्ता गेली मात्र गुटबाजी संपता संपत नाही’असा त्याचा अर्थ ध्वनित होतो.
मागील १२ वर्षांपासून काँग्रेस पक्ष हा केंद्र व राज्याच्या सत्तेपासून दूर आहे.इतकंच नव्हे तर देशभरातच ६७ वर्षे देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष हा कमजोर झाला आहे.अगदी विरोधी पक्ष म्हणून देखील तो देशात प्रभावी म्हणून उरला नाही.अशा वेळी सत्तेमुळे बलाढ्य झालेल्या भाजपाच्या विरोधात आंदोलने करण्यातही गटा-तटाचे राजकारण आणले जात असल्याने,काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हे आंदोलन काँग्रेस शहराध्यक्ष प्रफूल्ल गुडधे पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.अशा वेळी नागपूर शहरातील काँग्रेसने एकजुटपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन उभारले असते तर सत्ताधा-यांना एक वेगळा संदेश गेला असता,मात्र,असे घडले नाही.ऐन मुख्यमंत्र्याच्याच शहरात आमदार नितीन राऊत,आ.विकास ठाकरे यांचे वेगवेगळे गट असलेले दिसून पडतात.याच गुटबाजीतून माजी आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वाखालील विविध आंदोलनात देखील या दोन्ही आमदारांचे समर्थक सहभागी होत नसल्याचा इतिहास आहे.

मात्र,दिल्लीत ज्याप्रमाणे आंदोलनकारी निशस्त्र विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला,लाखो रिल्स मधून पोलिसांचा अमानुषपणा उघडकीस आला,महिला विद्यार्थिंनीचे कपडे फाडण्यात आले,त्यांच्या कोमल शरीरावर देखील बर्बरतापूर्ण लाठ्या काठ्या बसरवण्यात आल्या ,सत्ताधा-यांचे ते संपूर्ण क्रोर्य संपूर्ण जगाने बघितले,जगभर त्या विरोधात आंदोलन पेटले,अशा वेळी आपल्याच पक्षाच्या आंदोलनात हे दोन्ही आमदार सहभागी झाले नाहीत,त्यांची ही कृती कोणाच्या समाधानासाठी होती?विरोधक म्हणून तसेच विरोधी पक्ष म्हणून सत्ताधा-यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी न होण्याचे कारण ते जनतेला देणार आहेत का?’आता नाही तर कधीच नाही’,असा लढा जगभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्या -रस्त्यावर पेटवला असता,त्या वणव्यापासून काँग्रेसचे दोन्ही आमदार अलिप्त कसे आहेत?असा सवाल विचारला जात आहे.
मूळात,जगभरातील विद्यार्थी हा पेटलेला असताना,हे दोन्ही आमदार कोणत्या मुद्दावर आंदोलने करतात?नागपूर मनपा किवा नासुप्र मधील भ्रष्टाचाराच्या विषयांवर वृत्तपत्रांमध्ये आपापली निवेदने प्रसिद्ध करुन घेण्यापेक्षा जंतरंतरवर निष्पाप विद्यार्थ्यांचे सांडलेले रक्त,त्यांच्या न्याय मागण्या,त्यांचा निर्धार,धाडस,त्यांचा संयम,आंदोलक तरुणींचे शौर्य,याला पाठिंबा दर्शवण्यासाठी तरी प्रफूल्ल गुडधे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून राजभवना समोरील आंदोलनात आपली उपस्थिती काँग्रेसच्या या दोन्ही आमदारांनी दर्शवली असती तर,नागपूरकरांमध्ये एक वेगळा संदेश गेला असता,मात्र,असे घडले नाही.
काँग्रेसचे हे दोन्ही आमदार,त्यांचे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सपशेल या आंदोलनापासून स्वत:ला दूर ठेवले व नागपूरकर नागरिकांच्या संतापात भर पडली.इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रोर्यपूर्ण लाठीहल्ला यावर देखील नागपूरातील कोणत्याही मोठ्या नेत्याने निषेधाचा एक ‘सूर‘ही आवळला नाही,याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
याच काँग्रसेचे शीर्षस्थ नेते दिल्लीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्तयावर उतरुन आंदोलन करीत आहेत,किमान त्यांचा तरी आदर्श मुख्यमंत्र्यांच्या शहरात गिरवायला हवा होता,असा टोला देखील या आमदारांसाठी हाणला गेला.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरु असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी(CJP)च्या आंदोलनाला परदेशातील भारतीय नागरिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी लंदन,बर्लिन,आयर्लंड आणि नेदरलॅंड्स या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असून जगभरातून ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्सद्वारे आर्थिक व अन्नाच्या मदतीचा ओघ जंतर-मंतरवर सतत सुरु आहे.
परदेशात राहणा-या भारतीयांनी आणि समर्थकांनी लंदन(युनायटेड किंगडम)बर्लिन(जर्मनी)आयर्लंड आणि नेदरलँड्स येथे निर्दशने आणि मेणबत्ती मोर्चे काढून समर्थन दर्शवले.या आंदोलकांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्यावरील पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करत, आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला.आंदोलकांना मदत करण्यासाठी भारतासह परदेशात राहणारे नागरिक Swiggy आणि Zomato सारख्या ॲप्यद्वारे थेट जंतर-मंतरच्या पत्त्यावर खाद्यपदार्थ(चहा,समोसे,जेवण)ऑर्डर करुन पाठवत आहेत.हे लोक डिलिव्हरी एजंट्सना आंदोलक विद्यार्थ्यांपर्यंत मोफत खाद्य पदार्थ वाटण्याच्या सूचना देत आहेत.जंतर-मंतरवर आज देखील शेकडो डिलीव्हरी बॉयज यांच्या सतत येणा-या-जाणा-या दुचाकींचे शेकडो व्हिडीयोज चांगलेच व्हायरल झाले आहे.असे असताना नागपूर सारख्या शहरात विरोधी पक्षाचे आमदार देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरील ज्वलंत आंदोलनापासून , स्वत:ला कसे अलिप्त ठेऊ शकतात?असा संतप्त सवाल आता विचाराला जात आहे.राजकारणातील ही ‘संवेदनशून्यताच‘काँग्रेसला सत्तेबाहेर खेचण्यास कारणीभूत ठरली, तरी देखील काँग्रेसचे काही नेते,आमदार,नगरसेवकाच्या आचरणात,विचारसरणीत आणि मानसिकतेत कोणताही बदल दिसून पडत नाही,यावर देखील बराच खल आज समाजमाध्यमात झाला.
आज राहूल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.त्यांनी ‘नीट‘(NEET)पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांनी काढलेल्या ‘संसद चलो’मोर्चावरील पोलिसांच्या कारवाईवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.गेल्या १० वर्षात माेदी सरकारच्या काळात देशात १५२ हून अधिक पेपरफुटीच्या घटना घडल्या असून,त्याचा फटका तब्बल ७.५ कोटी विद्यार्थ्यांना बसला आहे.देशाचे एकूण शिक्षण बजेट १.४ लाख कोटी रुपये आहे,तर भारतीय कुटूंबे केवळ ‘नीट’परीक्षेच्या तयारीसाठी १.३२ लाख कोटी रुपये खर्च करीत असते,असे सांगत लडाखच्या हक्कांसाठी शांततेत उपोषणाला बसलेल्या साेनम वांगचूक आणि त्यांच्या समर्थकांना जंतर-मंतरवरुन जबरदस्तीने हटवल्याबद्दलही राहूल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना गुन्हेगार न मानता त्यांच्या रास्त मागण्या मान्य करा तसेच पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि संसदेत पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जवर चर्चा घडवून आणावी,शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा,विद्यार्थ्यांवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत,अशी मागणी देखील पत्रकार परिषदेत आज राहूल गांधींनी केली.
दिल्लीतील काँग्रेसवासियांना जमले ते महाराष्ट्रातील विशेषत: मुख्यमंत्र्यांच्याच नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यातील काही कॉँग्रेस नेते,आमदारांना का जमू नये?या मागे कशाची भीती आहे?इडीची भीती आहे का की बलाढ्य भाजपचा धसका आहे?असा परखड सवाल देखील समाज माध्यमांवर उमटला.
थोडक्यात, आंदाेलनाचा मुद्दा हा महत्वाचा होता,आपापली गुटबाजी करण्यासाठी पुढे ही भरपूर वेळ आहे,आपल्याच पक्षाच्या राजकीय आंदोलनापासून दूर राहणे,ही ती वेळ नाही,असा इशारा देखील नेटीझन्स काँग्रेसच्या आमदारांना,नगरसेवकांना देण्यास विसरले नाही.
………………………………..