
बाधितांची एकूण संख्या ९२१ वर: ५४९ संपूर्ण बरे
नागपूर,ता. ११ जून: बुधवारी नाईक तलाव-बांग्लादेश येथे कोरोनाचा ब्लास्ट झालेला नागपूरकरांनी पाहीला. तर गुरुवार दि. ११ जून रोजी देखील कोरोनापासून नागपूरकरांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. अाज बाधितांमध्ये आणखी ५८ रुग्णांची भर पडली असून,आता कोरोनाची लागण झालेल्या बाधितांची संख्या ही ९२१वर पोहोचली आहे.
बुधवारी १० जून रोजी एकूण ८६ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता यातील ६७ बाधित हे एकाच नाईक तलाव-बांग्लादेश भागातील होते. गुरुवारी देखील मेयो,मेडिकल, एम्स,निरी तसेच माफसूच्या तपासणीत एकूण ५८ लोकांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. यातील ३५७ रुग्ण हे मेडीकल,मेयो व एम्समध्ये उपचार घेत आहेत.विशेष म्हणजे लष्करी बागेत आणखी १३ कोरोना बाधितांची भर पडली.
नाईक तलाव यानंतर लष्करीबाग हे हळूहळू कोरोनाचा हॉट स्पॉट होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मध्य नागपूरातील भगवानघर या नव्याच वस्तीत कोरोनाने आज शिफातीने शिरकाव केला! गीतांजली चित्रपटगृहाजवळील भगवान घर भागात आज ५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत,हे विशेष!
आज आढळून आलेले सर्व बाधित हे पाचपावली विलगीकरणातील आहेत. लष्करी बागेत अचानक बाधितांचा आकडा हा वाढला असून या भागाचीही आता प्रशासनाला विशेष दक्ष् ता घ्यावी लागणार आहे. नाईक तलाव वसाहतीत आज ७ रुग्ण,हंसापुरी येथे ४ तर भगवान घर भागात ५ अश्या ५८ रुग्णांची आज भर पडली.
काळजीचे कारण म्हणजे सारीच्या रुग्णांना होणारी कोरोनाची लागण हा देखील प्रशासनासाठी अतिशय चिंतेचा विषय ठरत आहे. नुकतेच अकोला येथील ५६ वर्षीय सारीच्या रुग्णाला मेडीकलमध्ये भरती केले असता त्याचा कोरोनाचा चाचणी अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. डायलिसिसवर असणा-या ज्या कोरोना बाधित मृतकाच्या संपर्कात त्याचे कुटुंबिय आले होते,त्यापैकी ५ जणांचा अहवाल हा देखील पॉझिटीव्ह आला आहे. पाचपावली विलगीकरणात ते होते.परिणामी या भागात देखील कोरोनाचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एम्स तसेच मेडीकलमध्ये कोव्हिड-१९ साठी अतिरिक्त वॉर्डाची व्यवस्था-
एम्समध्ये नुकतेच कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ५४ बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला होता मात्र हा वॉर्ड फूल्ल झाल्यानंतर आज दूसरा वॉर्ड तयार करण्यात आला असून या वॉर्डात सध्या १२ चिमुकले उपचार घेत आहेत. मेडीसीन प्रमुख डॉ.प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनात येथील बाधितांवर उपचार सुरु आहे. दर दिवशी एम्सच्या संचालक डॉ.विभा दत्ता, वैद्यकीय अधीक्ष् क डॉ.मनीष श्रीगिरीवार, डॉ.मीना वाजपेयी यांच्याकडून रुग्णांची काळजी घेण्यात येत आहे.
तर,मेडीकलमधील कोव्हिड-१९ वॉर्ड हे शहरातील वाढत्या बाधितांच्या संख्येने हाऊसफूल्ल झाल्याने आज गुरुवारी मेडीकलमध्येही आणखी एका नव्या वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अविनाश गावंडे यांनी दिली. कोरोनावरील उपचारासाठी आधीच वॉर्ड वाढविण्याची योजना आखून ठेवण्यात आली होती,असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे,शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्या ही दोन आकड्यात वाढत आहेत,ती ही ५० च्या पुढे यामुळे मेडीकल,मेयो व एम्सवर अतिरिक्त भार पडत आहे. येथील डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक,परिचारिका हे दिवसरात्र ‘आपातकालीन’कर्तव्य बजावत असल्याचे दृष्य आहे.
मात्र,शहरात दररोज नवनवीन भागात अशीच रुग्ण संख्या वाढत गेली तर नागपूरचं ‘दिल्ली’होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत रुग्णालयातील बेड,वेंटिलेटरची संख्या ही, पाच लाख बाधित होताच पार कोलमडून पडली . उलट तेथील सरकारने ६ च्या ऐवजी आता १२ श्मशान घाटांची संख्या वाढवली आहे! नागपूरातही २७ लाखांच्या वर लोकसंख्या आहे. कोरोनाचा प्रसार याच वेगाने होत राहील्यास लवकरच नागपूर शहरातील आरोग्य व्यवस्था ही देखील कोलमडून जाण्याची शक्यता खासगीत वर्तवली जात आहे.
पुणे-मुंबईतील प्रवाश्यांनी वाढवला कोरोनाचा धोका!
चौथा लॉक डाऊन हा ३१ मार्च रोजी संपला.यानंतर पाचवा लॉक डाऊन राज्य सरकारने ३० जून पर्यंत जाहीर केला मात्र यात अनेक बाबींची सूट देण्यात आली. देशातील अंतर्गत विमानसेवा सुरु झाली तसेच खासगी वाहनाने जिल्हयांतर्गत प्रवासाची परवानगी नागरिकांना मिळाली. परिणामी गेल्या ११ दिवसात अनेक प्रवासी हे पुणे,मुंबई तसेच दिल्लीवरुन शहरात परतले,मात्र त्यातील अनेकांनी आपल्यासोबत कोरोनाचा संसर्गही आणला. यामुळे कोरानाच्या बाधितांमध्ये भरच पडली ही सत्यता खासगीत वैद्यकीय अधिकारी हे देखील मान्य करीत आहेत. ३० एप्रिल रोजी शहरात १३९ बाधित होते. ४० दिवसात ही संख्या ७३३ वर पोहोचली!लॉक डाऊन शिथिल झाल्याबरोबर देशाभरात ५० हजार बाधित आढळले.
ज्या ठिकाणी कोरोनाचा उगम झाला त्या चीनच्या वुहान शहरात देखील बाधितांची एकूण संख्या ही ५० हजार ३४० होती. सध्या मुंबई शहरातच बाधितांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून वुहान शहराचा विक्रम मोडला आहे. नागपूरात अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनावर अतिरिक्त भार न देता प्रत्येकाने स्वत:च आता स्वत:च्या सुरक्ष्ि ततेची काळजी घेणे क्रमप्राप्त झालं आहे.

आमचे चॅनल subscribe करा