Homeनागपूर न्यूजयशंवत स्टेडियमच्या नांगिया ऑटोमोबाईल्सला नोटीस: मनपा मुख्यालयाचे काय?

यशंवत स्टेडियमच्या नांगिया ऑटोमोबाईल्सला नोटीस: मनपा मुख्यालयाचे काय?

मुख्यालयातील कर्मचारी वा-यावर

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १२ ऑगस्ट: महानगरपालिकेच्या बाजार विभागातर्फे यशंवत स्टेडियम येथील नांगिया ऑटोमोबाईल्सला कोविड-१९ संदर्भात नोटीस देण्यात आली मात्र दूसरीकडे मनपा मुख्यालयात दररोज कोविडचे रुग्ण आढळून येत असून या संदर्भात मात्र प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंढे व त्यांचे सिपाहसलार कोणतेही दिशानिर्देश जारी करीत नाही,मनपा कर्मचा-यांची काळजी घेत नाहीत,अशी कुजबुज आज मनपाच्या कर्मचा-यांच्यामध्ये ऐकू आली.

कालच सत्तापक्ष् कार्यालयात करोना बाधित आढळून आला.यापूर्वी अग्निशमन विभाग,बाजार विभाग,आरोग्य विभाग इ.अनेक विभागात करोना बाधित आढळले मात्र या संबधी प्रशासनाच्या प्रमुखांनी अद्याप मनपाच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी कोणतेही दिशानिर्देश जारी केले नाही. काल सत्तापक्ष् कार्यालयात आढळून आलेल्या बाधिताचा मनपा मुख्यालयातील अनेक कर्मचा-यांशी संपर्क आला होता. ते कर्मचारी आता चिंतेत आहेत.

मनपातर्फे बाहेरच्या संस्थांना नोटीस जारी केली जात आहे मात्र मनपा मुख्यालयातील किती अधिकारी व कर्मचा-यांची करोना चाचणी झाली?याविषयी प्रशासन प्रमुखाला चिंता नसल्याचा संताप खाजगीत व्यक्त होत आहे! सत्तापक्ष्ाचे कार्यालय आता सेनिटाईझ करण्यात आले असले तरी मनपा कर्मचा-यांच्या मनातील भीती दूर झाली नाही. कालच्या घटनेने अनेक कर्मचारी हे अारोग्य विभागाच्या प्रमुखांच्या ढिसाळ,बेजवाबदार कारभारामुळे संतप्त आहेत.

आरोग्य विभागाकडे आपल्याच अधिकारी व कर्मचा-यांसाठी कोणतीच ठोस नियमावली नाही. दिशानिर्देश नाहीत. मनपा मुख्यालयात दररोज गर्दी होते. विविध कामांसाठी शहरातील अनेक प्रतिबंधित क्ष्ेत्रातून लोकं आपली कामे घेऊन येतात. मात्र मनपा प्रशासनाच्या प्रमुखाला स्वत:च्याच कर्मचा-यांची पर्वा नसल्याचे बोलले जात आहे.

हेच हाल झोनस्तरावील कर्मचा-यांचे देखील आहे. कर्तव्यकठोर आयुक्तांच्या शिस्तीखाली मनपाचे कर्मचारी हे काम जरी करीत असले तरी दररोज घरुन निघताना ते जीव मुठीत घेऊनच निघत आहेत.

मनपाच्या बाजार विभागाने कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्तांनी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार दूकानदारांना व संस्थांना नोटीस जारी केली आहे. मास्क लावणे, सेनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टेंसिंग ठेवणे याचे पालन होत नसल्यानेच कोविड-१९ चा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढल्याचा ठपका ठेऊन येत्या काही दिवसात राष्ट्रीय सण तसेच उत्सव असल्याने बाजारात खरेदीकरीता नागरिकांची वर्दळ वाढत आहे.

वस्तूंच्या खरेदी-विक्रीकरिता बाजारात येणारे नागरिक कोविड-१९ च्या अनुषंगाने कोणत्या अवस्थेत आहेत याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात कोविड-१९ ची लागण मोठ्या प्रमाणात जनमानसात पसरत असल्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे बाजार क्ष्ेत्रातील दूकाने,ओटे जागा क्र.१ परवान्यावर आहे.त्यांच्याकडून वस्तूंच्या खरेदी-विक्री संदर्भात दररोज अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे कोविड-१९ च्या विषाणूची लागण आपणास आहे किवा नाही याची तपासणी मनपाच्या जवळपासच्या आरोग्य तपासणी केंद्रात चाचणी करुन झोनचे बाजार निरीक्ष् काकडे अहवाल सादर करण्यात यावे.

चाचणीचा अहवाल गुपित ठेवल्यास,सादर न केल्यास,आपली दूकाने,ओटे जागा सील करुन नियमानुसार उचित कारवाई करण्यात येईल,असे मालमत्ता विभागाच्या उपायुक्तांच्या सहीनिशी नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र हीच तत्परता मनपा प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंढे मनपा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी का दाखवित नाही?असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे खाजगी पॅथॉलॉजीचे अहवाल एखाद्या नियोजित षडयंत्राचा भाग असल्याचा संशय भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी काल व्यक्त केला होता. कोविड-१९ चे सर्वाधिकारी असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या घटनांकडे गांर्भीयाने पाहण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली होती.नियमानुसार चाचणी होत आहे का हे कसे कळेल?असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
परिणामी बाजार क्ष्ेत्रातील व्यवसायिकांचे अहवाल हे तरी खात्रीलायक असतील का?असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

एकाच दिवसात खाजगी लॅबनी केली ६६८ करोना तपासणी!

रामदासपेठ येथील एका खासगी लॅबमध्ये काल एकाच दिवशी एकूण ६६८ जणांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसिद्धीपत्रकात नमूद होती.एकाच दिवशी खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात करोनाची शास्त्रशुद्ध पद्धतीने चाचणी होऊ शकते का?अशी शंका आता नागपूरकर उपस्थित करीत आहे. एक साथ ५२ परखनळ्या चाचणीसाठी ठेवल्या जाऊ शकतात. त्याचा निकाल यायला किमान ५ तास लागतात. मग दिवसाच्या फक्त १२ तासात ६६८ चाचण्या या खासगी लॅबने कोणत्या चमत्कारिक पद्धतीने केल्या?

असा प्रश्‍न मात्र प्रशासकीयस्तरावर कोणालाही पडत नाही. मनपा प्रशासन येनकेन प्रकारे फक्त नोटीस जारी करुन आणि दयाशंकर तिवारी यांनी आरोप केल्याप्रमाणे वांझोट्या बैठकांमध्ये व्यस्त राहूनच करोनाशी लढत असल्याचेच दिसून पडत आहे.

Latest बातम्या