Homeराजकारणमोदींच्या निरस भाषणाने गर्दीची निराशा

मोदींच्या निरस भाषणाने गर्दीची निराशा

 

सेंदूरवाफा (जि. भंडारा) : चटपटीत राजकीय टिप्पनीसाठी प्रसिद्ध असलेले पंतप्रधान मोदी नेमके कोणाला लक्ष्य करणार, या अपेक्षेने मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांची भाषणाने साफ निराशा झाल्याचे आढळून आले. मोदींनी संपूर्ण भाषणात राजकीय टिप्पनी टाळली. त्याऐवजी त्यांनी विकासाच्या योजनांवर भर दिला. त्यामुळे भाषण अर्ध्यावर आले असताना मैदानावर काही भागातील लोक उठून जात असल्याचे चित्र बघायला मिळाले.

जो काम करणार, त्यालाच तुमचा विश्वास मिळतो, हे तुम्ही दाखवून देणार आहात. या विश्वासातूनच महाराष्ट्रात आता घरोघरी शौचालये आहेत. गरीबांच्या घरी वीज पोहोचली आहे. स्वयंपाकघरात गॅस सिलिंडर आले आहे. गरीबांच्या घरांचे स्वप्न देखील पूर्ण झाले असून मोफत दर्जेदार सुविधा मिळत आहेत, असे मोदी म्हणाले.

मोदींनी मराठीतूनच “स्वातंत्र्यापासून जे झाले नाही, ते करण्यासाठी भाजपचे सरकार यावे लागले ना?” अशी विचारणा केली. त्याला उपस्थित गर्दीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपच्या प्रभारी सरोज पांडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री व उमेदवार डॉ. परिणय फुके, माजी मंत्री डॉ. बडोले, खासदार सुनील मेंढे तसेच अलिकडेच भाजपमध्ये आलेले माजी आमदार गोपाळ अग्रवाल यावेळी उपस्थित होते. देवेंद्रजींनी धानाला बोनस दिल्याने आपण खूष आहात ना?..असेही मोदींनी उपस्थित गर्दीला मराठीतूनच विचारणा केली. त्याला श्रोत्यांनी प्रतिसादही दिला.

निवडणुकीच्या आदल्या दिवशी रविवार असल्याने दोन दिवस सुटीत घालविण्याचा विचार सोडून द्या, सुटी मतदानासाठी..महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्पित करा, असे आवाहनही मोदींनी केले.
———-

Latest बातम्या