Homeनागपूर मनपामुंढेंच्या फायरिंगनंतर आतातरी मनपाचे आरोग्य विभाग सुधारेल का?

मुंढेंच्या फायरिंगनंतर आतातरी मनपाचे आरोग्य विभाग सुधारेल का?

मुंढेंना वाटतात मनपाचे रुग्णालय चक्क उकीरडे!

डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)

नागपूर: गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात इतर विभागाप्रमाणेच सगळा ‘सावळा गोंधळ’सुरु आहे. ना प्रशासन ना सत्ताधारी यांनी कधी नागपूरच्या गरिब आणि गरजू जनतेशी सरळ नाळ जुळलेल्या या इतक्या महत्वाच्या विभागाची सुध घेतली. ‘करोना’या साथीच्या रोगाने मात्र मनपाच्या आरोग्य विभागाला खडबडून जागे केले. या रोगाला प्रसारापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानंतर सर्वात मोठे दायित्व हे मनपाच्या आरोग्य विभागावर येऊन पडले आणि येथेच या आरोग्य विभागाच्या अतिशय ढिसाळ कारभाराची लक्तरे शिस्तप्रिय सनदी अधिकारी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासमोर उघडी पडू लागली. आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना फाईलवर घेताना मुंढे यांनी मनपाची तीन तथाकथित रुग्णालये व जवळपास विविध प्रभागातील ५० दवाखाने यांना चक्क ’उकीरडा’ म्हणून संबोधले.

एवढेच नव्हे तर नागपूर शहराच्या २७ लाख लोकसंख्येला मनपाचे हे रुग्णालय व सर्व दवाखान्यातून दर्जेदार आरोग्य सेवा पुरवल्या गेलीच पाहीजे असा सज्जड दम बैठकीत वैद्यकीय अधिका-यांना दिला.या बैठकीचा व्हिडयो फेसबूकवर चांगलाच व्हायरल झाला असून शहरात आता मुंढे आणि त्यांच्या शिस्तप्रिय,कठोर कारभाराचीच चर्चा रंगली आहे. या बैठकीत मुंढे यांनी वैद्यकीय अधिका-यांना अक्ष् र:शहा धारेवर धरले आहे. त्यांच्या एकंदरीत मानसिकतेवर बोट ठेवत,आपापसातील हेवे-दावे, कामचुकारपणा, सकाळी ११ ते २ काम ढकण्याची मनोवृत्ती,शासकीय पगार घेत असताना खाजगी रुग्णालयातून नफा कमावणे इ. अनेक बाबींवर मार्मिक भाष्य करतानाच या पुढे मी असे पर्यंत असा कारभार चालणार नाही,अशी सख्त ताकीत ही दिली.

खरा प्रश्‍न हा आहे मुंढेच्या या तळमळीच्या क्लासनंतरही मनपाचा आरोग्य विभाग आता तरी सुधारेल का?शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेणारे वैद्यकीय अधिकारी खाजगी रुग्णालयातून नफा कमावणे बंद करतील का? २७ लाख लोकसंख्येला दर्जेदार आरोग्य पुरविण्याचे स्वप्न पाहणारे मुंढे यांच्या फायरिंगला गांर्भीयाने घेतील का? मुंढे यांनी ही फायरिंग २ एप्रिल रोजी केली मात्र गेल्या तीन दिवसात कोणतीही सुधारणा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिका-यांच्या वतर्वणूकीतून दिसली नाही.याचे बोलके उदाहरण म्हणजे मनपाच्या आयसोलेशनमध्ये ४० रुग्ण भर्तीची क्ष् मता असताना सर्दी,खोकल्याचा एक रुग्ण आला असता, तेथील महिला वैद्यकीय अधिकारी यांनी दोन तासात त्या रुग्णाला मेडीकलमध्ये रेफर करुन जवाबदारी झटकून घेतल्याची चर्चा याच विभागातील कर्मचा-यांमध्ये रंगली होती.
एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णांच्या बाय-पास शस्त्रक्रिया होत असताना,नागपूरात एवढ्या आणिबाणिच्या स्थितीत ही मनपाच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी हे सर्दी,खोकल्यासारखे सामान्य रुग्णांना देखील मेडीकल,मेयाेमध्ये रेफर करुन जवाबदारी झटकण्याचे मार्ग शोधून घेतात. अश्‍या मानसिकतेच्या अधिका-यांवर मुंढे काय ‘मिलिट्री’चे जरी‘ अंकूश’ ठेवले तरी ’हम नही सुधरेंगे’असाच कारभार ‘करोना’च्या आणिबाणिनंतर ही नागपूरकर जनतेला बघायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीत अतिशय पोटतिडकीने मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचा-यांना सूचना दिल्या आहेत. यश आलं तर ते तुम्ही घ्या..अपयश आलं तर मी बसलो आहे,अपयशाचं श्रेय मी घेईल मात्र या पुढे हा विभाग सुधारण्यासाठी सहकार्य करा,असे आवाहन त्यांनी केले. मुंढे यांना येऊन फक्त तीन महिन्यांचा कार्यकाळ झाला आहे. मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांना ‘बेफिकिर’वागण्याची सवय ही ‘दशकानुदशकांची’ आहे,एका बैठकीत ती सुधारण्याची शक्यताच नसली तरी,मुंढेंचं पोटतिडकीचं बोलणं किमान आपापल्या ‘कामापर्यंत नव्हे तर कानापर्यंत’ही पोहोचवलं असतं तरी गेल्या तीन दिवसात त्यात सुधारणा दिसली असती,असे सांगितले जात आहे.
संपूर्ण नागरिक हे आरोग्य विभाग,डॉक्टर्स,पोलिस यांचे गूणगाण करीत असताना,त्यांच्याप्रति आभार व्यक्त करीत असताना,काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या स्वार्थी वागण्यामुळे इतर सर्वांच्याच सेवाभावी कार्यावर देखील पाणी पडत असल्याचे दिसून पडतंय.

एनसीएचे गौडबंगाल-
सत्ताधारी भाजपाच्या काळातच मनपाच्या अारोग्य विभागात एनसीएची योजना लागू करण्यात आली.एनसीएचा अर्थ अाहे ‘नॉन प्रेक्टीनशनर अलाऊंस’म्हणजे मनपाच्या आरोग्य विभागातील जे वैद्यकीय अधिकारी हा भत्ता घेत नाही त्यांना खाजगी प्रॅक्टीस करण्याची मुभा देण्यात आली.मात्र कायद्याप्रमाणे शासकीय पगार घेणारे कोणतेही अधिकारी वा कर्मचारी इतर लाभाचा व्यवसाय करु शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या अारोग्य विभागातील हे वैद्यकीय अधिकारी हे दवाखान्यात फक्त ११ ते २ वेळेत खानापूर्ती करतात व स्वत:च्या खाजगी रुग्णालयात आपली सेवा देतात. लाखो रुपयांचा पगार मात्र शासनाकडून घेतात.
मुंढे यांनी याच मानसिकतेवर प्रहार करीत,या पुढे असे चालणार नसल्याचे ठणकावले. पहीली प्राथमिकता ही फक्त आणि फक्त मनपाचीच नोकरी असल्याचे त्यांनी ठणकावले. ज्यांना सोडून जायचे आहे त्यांनी बिंदास नोकरी सोडून द्यावी,असा सज्जड दम ही दिला.

महाराष्ट्र आरोग्य मंडळाला मनपाच्या आरोग्य विभागाची कोणतीही मदत नाही-

दर वर्षी नागपूरात हिवाळी अधिवेशन भरतं. या काळात महाराष्ट्र आरोग्य मंडळाकडून अधिवेशनच्या काळात मनपाला सचिवालय असो, विधी मंडळातील अधिकारी,कर्मचारी असो किवा मोर्चे असो, मदत मागितली जाते मात्र मनपाच्या आरोग्य विभागाकडून मंडळाला चक्क मेयो किवा मेडीकलचा रस्ता दाखवला जातो.या मनोवृत्तीवर मुंढे यांनी चांगलाच प्रघात करीत या पुढे असे घडणार नसल्याचे बजावले. मनपाचे तीन मोठे दवाखाने यात पाचपावली येथील प्रसृति केंद्र जे २५ खाटांचे आहे,आयसोलेशन जे ४० खाटांचे आहे तसेच इंदिरा गांधी रुग्णालय जे ८० खाटांचे आहे तसेच इतर सर्व झोनमधील दवाखाने हे फक्त अधिवेशन काळातच नव्हे तर नागपूरच्या २७ लाख नागरिकांच्या आरोग्यासाठी सुसज्ज राहीलेच पाहिजे,असा दम मुंढे यांनी या बैठकीत दिला. एवढेच नव्हे तर करोनासाठी जी ‘वॉर रुम’तयार करण्यात आली आहे, ती करोना संकटानंतर देखील तशीच सुरु राहील उलट ती अधिक अद्यावत करण्यात येईल,अशी आगाऊ पूर्वसूचना ही त्यांनी अधिका-यांना दिली.

Latest बातम्या