
फेसबूक लाईव्हवर नागपूरकरांना मिळाला अजब सल्ला
नागपूर: शनिवार दि. ११ एप्रिल रोजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे नागपूरकरांशी संवाद साधणार असल्याच्या ‘जाहीराती’शुक्रवारी दिवसभर मनपाच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकृत व्हॉट्स ॲपवर झळकत होत्या. शनिवारी २ वा.पूर्वीच अनेक फेसबूक व्हीवर्सनी आपापल्या मनातील शंका,प्रश्ने पाठविण्यास सुरवात केली. एका तासाच्या लाईव्ह शोमध्ये आयुक्तच पाऊन तास बोललेत,यानंतर वेळे अभावी त्यांनी फक्त दोन-चार प्रश्ने घेण्याची मुभा दिली. अंदाजे ३० लाख लोकसंख्या असणा-या नागपूरातील निम्मे नागरिक हे फेसबूक वापरतात.
त्यांच्या विविध प्रश्नांचा ‘लाईव्ह शो’मध्ये पाऊस पडत होता मात्र आयुक्तांची ‘करोना,त्याचा उगम,त्याचा प्रभाव,बचावाचे उपाय,प्रशासनाकडून केले जाणारे कठोर उपाय’हीच कॅसेट पाऊन तास वाजली.यानंतर मोजके ५ प्रश्न आयुक्तांनी घेतले.भाजीमार्केटचा प्रश्न,स्वयंसेवी संस्था करीत असणारी मदत असे दोन प्रश्न घेतल्यानंतर नागपूरातील एका नागरिकाने ‘डोक्यावर वाढत जाणारे केस’यावर यक्ष् प्रश्न विचारला. लॉकडाऊन आणखी दाेन आठवडे वाढले आहे.त्यानंतरही ‘किमान’ वाढू शकते असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दोन महिन्यात पुरुषांचे केस घरातल्या घरात वाढून त्याची ‘वेणी’होण्यास वेळ लागणार नसल्याने ‘केश कर्तनालय’संबंधी जिव्हाळ्याचा प्रश्न आयुक्तांना विचारला असता,आयुक्तांनी सांगितले डोक्यावरचे केस वाढणे हा काही जिवनाश्यक बाबीशी निगडीत प्रश्न नाही. ज्यांना ही समस्या वाटत आहे त्यांनी हातात कात्री घ्यावी,आरशात पहावे आणि केस कापून घ्यावे!’
ठराविक मुदतीत ठराविक वेळेसाठी योग्य ती सर्व काळजी घेऊन केस कर्तनालय हे सुरु करता येईल का?या प्रश्नावर शिस्तप्रिय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे चमत्कारीक उत्तर दिले आणि…दिवसभर नेटिझन्समध्ये याचीच चर्चा रंगली. माझी ३ वर्षाची मुलगी व पत्नी ही पुण्याला आहे,त्यांना नागपूरात आणता येईल का?या भावनिक प्रश्नावर देखील शिस्तप्रिय आयुक्तांनी रुक्ष् लष्करी उत्तर दिले. ‘मुळीच नाही’आहे तिथेच थांबा,मुलीकडे आई आहे ना सांभाळायला?
पूर्वी मास्क वापरण्याची गरज नाही, असे सांगितले गेले मात्र नंतर मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले, असे का या प्रश्नाला उत्तर देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, राज्यात कोरोनाने जेव्हा शिरकाव केला तेव्हा त्याची तीव्रता कमी होती. त्यानंतर हळू हळू संख्या वाढत गेली. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य शासन वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करते. पूर्वी शासनाच्या निर्देशासनुसार मास्क प्रत्येकाने वापरणे बंधनकारक नव्हते. मात्र, आता कोरोनाचा प्रसार आणि वाढती रुग्णसंख्या बघता आपल्यापासून दुसऱ्याला आणि इतरांपासून आपल्याला रोग होऊ नये, ही काळजी घेण्यासाठी शासनानेच मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मास्कचा वापर करा आणि स्वत:सोबतच इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे त्यांनी सांगितले.
आयुुक्तांच्या फेसबूकवर अनेकांनी त्यांच्या भागात अद्याप फव्वारणीच झाली नसल्याची तक्रार नोंदवली.वाठोडा,मस्कासाथ,संभाजी नगर इ. भागाचे अद्याप सॅनिटायझर झाले नसल्याचा त्यांच्या प्रश्नच घेण्यात आला नाही. अनेकांनी मनपाद्वारे करण्यात येत असणारा ‘सर्व्हे’हा किती औपचारिक आहे,यावर बोट ठेवले.यावर आयुक्तांनी या बाबीची माहिती घेतली जाणार असल्याचे सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा