Homeनागपूर न्यूजमी अज्ञातवासात नाही फ्रंटवरती आहे:तुकाराम मुंढेंचे सत्ताधा-यांना उत्तर

मी अज्ञातवासात नाही फ्रंटवरती आहे:तुकाराम मुंढेंचे सत्ताधा-यांना उत्तर

फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सभेतील ताशे-यांचा काढचा वचपा

नागपूर,ता. २३ ऑगस्ट: शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी मनपाच्या ऑन-लाईन सर्वसाधरण सभेत भापचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी स्थगन प्रस्तावावर भाष्य करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शहरात कोविड-१९ ची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना मुंढे काय करीत आहे?त्यांना हे दिसत नाही का?ते अज्ञातवासात गेले आहेत का?असे शरसंधान केले होते,यावर प्रतिउत्तर म्हणून आयुक्तांनी आज दूपारी २ वा. फेसबूक लाईव्हद्वारे ’कोविड ब्लॉस्ट’शीर्षकाअंतर्गत जनतेशी संवाद साधत सत्ताधा-यांनी केलेल्या आरोपांचा चांगला समाचार घेत ‘मी अज्ञातवासात नाही मी फ्रंटवरती’असल्याचे सांगून चांगलाच वचपा काढला.

सुतळीचा साप करण्यात शासन-प्रशासनाला स्वारस्य नाही असे ते म्हणाले. त्यांच्याविषयी हेतूपुरस्सर गैरसमज निर्माण केले जात असून जनतेने याकडे लक्ष् न देण्याचे आवाहन त्यांनी केले.आपत्ती व्यवस्थापन तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा लागू असल्याने कोविड संदर्भात अधिकृत माहिती देण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असल्याचा वारंवार त्यांनी पुर्नउच्चार केला.

दयाशंकर तिवारी यांनी आपल्या भाषणात आयुक्त हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत करोनाच्या उपचारासाठी उपलब्ध खाटा याविषयी, वारंवार खोटे आकडे देत होते,दहा हजार खाटा उपलब्ध असल्याचे खोटे बोलत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला होता.याचे उत्तर देताना, थोरात यांच्यासोबतच्या बैठकीत विभागीय आयुक्तांची जवाबदारी होती त्यांना माहिती देण्याची,त्यांनीच ती पार पाडली, फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत देखील खोटे बोललो नाही,आज ही बीसीसी,सीसीएस मिळून ८ हजार ८६ खाटा उपलब्ध असल्याच्या आकडेवारीचा कागद त्यांनी कॅम-यासमोर धरला. यात राधास्वामी सत्संग मंडळाचे ५ हजार खाटा जोडल्यास ही आकडेवारी १३ हजारच्या पार जाते. माझ्यावर खोटे आरोप करणारे यांचा तो स्वभाव बनला असल्याचा टोला त्यांनी हाणला.माणसाचे विचार जसे असतात तसेच प्रकट होतात,मग ही सवय होऊन जाते पुढे तसा स्वभावच बनून जातो.माझा स्वभाव हा ‘सच्चाईपर चलनेवाला है,आधी अधूरी बात पब्लिक मे करना’योग्य नसल्याचे ते म्हणाले.त्यांना ‘एक्टीव बेड,रेडी बेड’मध्येच फरक समजत नाही तर तो तुमचा स्वभाव आहे माझा नाही,‘लोगो को गुमराह करना बंद करो,झूठे आरोप करना बंद करो,मै लीगल पर्सन हूं,मेरी जानकारी पर भरोसा रखो’असे आवाहन त्यांनी केले. महामारीच्या काळात असे करु नका,असे आवाहन त्यांनी सत्ताधा-यांना देखील अप्रत्यक्ष् पणे केले.

व्यापा-यांच्या प्रश्‍नावर बोलताना,महाराष्ट्र म्यून्सिपल कॉरपोरेशन एक्ट मध्येच शहरातील व्यापा-यांनी महानगरपालिकेकडे आपापल्या व्यवसायाची नोंदणी करुन परवाना घेण्याचा कायदा आहे.याच माझी चूक आहे का?शहरातील अनेक व्यापा-यांनी रहीवाशी भागात आपापले धंदे थाटले आहेत. त्यांना रहीवाशी भागाचा कर लागू होणार नाही,त्यांना व्यवसाय करच द्यावा लागेल.या पुढे ज्या सदनिकांमध्ये असे दूकान थाटण्यात आले आहेत त्या सदनिकेतील लोकांनाही जवाबदार धरुन रहीवाशी कराच्या कक्ष्ेत आणले जाईल,त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेऊन अश्‍या व्यापारिक संकूलांची माहिती प्रशासनाला द्यावी.तुम्ही रहीवाशी भागात धंदा करता,रस्त्यावर दूकाने थाटता आणि आजवर चालली तशीच मनमानी पुढे ही चालली पाहीजे,अशी अपेक्ष्ा असेल तर मी हे होऊ देणार नाही.आतापर्यंत परवाना घेण्यास मी वेळेचे बंधन घातले नव्हते आतामात्र टाईम लिमिट दिली जाईल,असा इशारा त्यांनी दिला.सत्ताधा-यांना टोळा हाणताना,व्यापा-यांना ’गुमराह करना नही धंदा करना आपका काम है’असे म्हटले.तुम्ही नियम कायदे पाळणार नाही,वरुन म्हणाल,करेानाचा काळ आहे,सूट द्यावी,करोनाची चाचणी मी बंधनकारक केली,कारण २०० ग्राहकांना तुम्ही करोना द्याल आणि आम्ही गपचूप बसून राहायचे का?वरुन पुन्हा प्रशासनालाच बोल लावाल की करोना बढ रहा है!लक्ष् णे नसतील तरी चाचणी करा, असतील तर वाटल्यास खासगी लॅबमध्ये करा मात्र चाचणी ही करावी लागेल. तुम्ही तुमच्या दूकानातील दहा कर्मचा-यांना पगार देऊ शकता, चाचणी करायला पैसे नाहीत?

पाच टक्के पाणी दरवाढ तसेच ५० टक्के मालमत्ता करवाढ यावर बोलताना आयुक्त म्हणाले की २०१७ च्या सभेत सत्ताधा-यांनीच शहरात चोवीस बाय सात योजनेवर होणा-या प्रचंड खर्चाची वसूली ही दरवर्षी नागपूरकर जनतेवर ५ टक्के दरवाढ करुन वसूल करावी असा ठराव सभागृहात पारित केला. पाच टक्के दरवाढ म्हणजे १५ मिलीलीटरचा नळ असेल तर दीडशे रुपयांचे महिन्याचे बिल येतं. त्यात ५ टक्के दरवाढ म्हणजे महिन्यात फक्त साढे सात रुपये अधिकचे ग्राहकांना द्यायचे आहेत.ग्राहक हा चारचाकी,दूचाकीमध्ये पेट्रोल,डिझेलवर दरवाढ झाली तरी खर्च करतो,वाढीव विज बिल भरतो नाही तर त्याची वीज जोडणी कापली जाते, मोबाईल रिचार्ज करतो मात्र वर्षाचे फक्त आणि फक्त शंभर रुपये पाणी बिलावर वाढीव खर्च करु शकत नाही?तुम्हाला आंघोळ,घरगूती वापर,व्यवसायिक वापर सगळ्या गोष्टींसाठी भरपूर पाणी वापरायला हवे मात्र पाच टक्के अधिकचे बिल भरण्याचा त्रास होतो?सत्ताधा-यांना पुन्हा टोला हाणताना ’जो इश्‍यू नही त्याचा पण इश्‍यू ते करतात’असे म्हटले.

प्रशासनाचा खर्चच २५०० कोटी रुपये वार्षिक आहे. त्यात प्रशासनाला फक्त ११००,१२०० उत्पन्न होत आहे.आस्थपनेचा खर्च,कर्मचा-यांचे पगार, स्ट्रीट लाईटचे बिल,विजेचे बिल इ. खर्च प्रशासनाला खर्च करवा लागतो. असे असताना नागपूरात लाखो मालमत्ता ही वर्षानूवर्ष कर न भरता वापरली जात आहे.ती आम्ही कराच्या टप्प्यात आणली तर ओरड होत आहे.मात्र या ही मुद्दावर लोकांचा गैरसमज करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

जिमच्या प्रश्‍नावर बोलताना, जिम चालवणारे शिष्टमंडळ मला अनेकवेळा येऊन भेटले.मात्र त्यांना जिम सुरु करण्याची परवानगी देता येणार नाही.यामागे शास्त्रीय कारण आहे. जिममध्ये घाम येतो.ड्रॉपलेसमुळे इतरांना बाधा होण्याची शक्यता आहे.ते ड्रॉपलेस जमिनीवर देखील पडत असतात. याशिवाय जिममधील यंत्रे वारंवार अनेक लोकांकडून हाताळली जातात,यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.आज शहरात आधीच तर करोनाचे केसेस सातत्याने वाढत आहेत,त्यांना कंट्रोल करणे हे प्रशासनाने काम आहे.आयुष्य राहीलं तरच जिमचा उपयोग करु शकाल त्यामुळे नागपूर शहर करोना फ्री करण्यास सहकार्य करा,असे आवाहन त्यांनी केले.

खासगी व सरकारी लॅबमधील पॉझिटीव्ह निगेटीव्ह चाचणी अहवाल याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की करोना हा सातत्याने आपले रुप बदलत असतो. सकाळी चाचणी केली त्यावेळी वेगळी लक्ष् णे असू शकतात मात्र काही वेळाने वेगळी लक्ष् णे दिसू शकतात त्यामुळे असे अहवाल येतात.यात कोणताही घोळ नाही.करोनाचे गांर्भीय ओळखा, कारण या संसर्गावर अद्याप कोणतेही औषध किवा लस उपलब्ध नाही.तंबाकूच्या प्रश्‍नावर बोलताना तंबाकू खाल्यावर कर्करोग होतो हे अनेकांना माहिती असतानाही ते तंबाकू खातात.मात्र जेव्हा त्यांचा मृत्यू तंबाकूमुळे होतो त्यावेळी ती वेदना फक्त त्यांच्या कुंटुंबियांना कळते.शहरात आतापर्यंत करोनामुळे ५९१ मृत्यू झाले,याची वेदना ही फक्त त्यांचे कुंटुंबियच समजू शकतात.कोविड नवा आणि वेगळा आजार आहे.३ जून पासून ’मिशन बिगिन अगेन’नंतर शहरात संसर्गाचा ब्लास्ट झाला आहे.

‘भ्रष्टाचार हा फक्त पैशांमध्ये नाही विचारांमध्येही असतो’असा टोला हाणीत,निश्‍चितच सगळे ओपन होईल,पराचा कावळा करण्याची शासनाला गरज नाही,एक तर नियम पाळायचे नाही वरुन सगळंच ओपन करा ही मागणी करणे म्हणजे दुटप्पीपणाच आहे.व्यापा-यांचेही तसेच चालले आहे. कायदा पाळणार नाही,नियम पाळणार नाही वरुन ऑड-इवन रद्द करुन सगळंच ओपन करा,ही मागणी करायची. गणपती आले आहेत त्यामुळे विघ्नहर्ता बना,योद्धा बना,सहकार्य करा,एकत्रितपणे करोनाच्या विरोधात लढा द्या,असे आवाहन यावेळी मुंढे यांनी केले.

मी अज्ञातवासात गेलो नसून फ्रंटवरच लढतो आहे, मी शहरभर फिरुन व्यापारी वर्ग हा सम-विषम नियमाप्रमाणे चालतात आहेत की नाही,हे बघतो, रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये जाऊन खाटा,डॉक्टर,स्टाफची तपासणी घेतो.कमतरता तपासतो. मी काम करीत आहे,माझी संपूर्ण चमू काम करीत आहे. मी अज्ञातवासात नसून मला करोनाला अज्ञातवासात पाठवायचे असल्याचे ते म्हणाले.

Latest बातम्या