Homeनागपूर न्यूज‘माणूस’नावाची हिंस्त्र श्‍वापदे!

‘माणूस’नावाची हिंस्त्र श्‍वापदे!

पाळीव श्‍वानाने घेतला चिमुकल्याचा जीव: ‘हायब्रिड’च्या हव्यासापायी हिंस्त्र श्‍वानांची उत्पत्ती

भारतात बंदी मात्र सर्रास विक्री

मनपाची श्‍वान नसबंदीही कागदावर: राज्य शासनाच्या कोट्यावधीच्या अनुदानाचे गौडबंगाल

नागपूर,ता. २ जुलै २०२२: समाज माध्यमावर आज अनेक व्हॉट्स ॲप ग्रूप्सवर एक व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला.तो व्हिडीयो बघताच संवेदनशील मनाचा थरकाप उडाला.एका पाळीव असणा-या लॅब्रोडोर श्‍वानाने अक्षर:शहा मालकीन असणा-या तरुणीला न जुमानता घरासमोरुन जाणा-या चिमुकल्यावर झडप घेतली.क्षणात त्या चिमुरड्याचे कोवळे मांस खेचून खाऊ लागला!जीवाच्या आकांताने चिमुरडा किंचाळत होता मात्र हिंस्त्र झालेला लॅब्रोडोर ना त्या तरुणीला जुमानत होता,ना त्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी धावलेल्या दोन माणसांना,तो इतका जब्बर झाला होता की त्याला संपूर्ण ताकद,राग,मांस खाण्याची लालसा त्या निष्पाप,कोवळ्या जिवावरच काढायची होती.अखेर त्याने त्याचे कोवळे मांस खाऊनच सूड उगवला……!

आतापर्यंत रस्त्यावरील भटके श्‍वान हेच क्रूर,हिंस्त्र व झडप घालणारे असतात असाच अनुभव माणसांना येत होता.हा व्हिडीयो बघताच घरातील पाळीव श्‍वान हे देखील एवढ्या पराकोटीचे हिंस्त्र कसे होऊ शकतात?हा प्रश्‍न प्रत्येक संवेदनशील मनाला छळून गेला आणि याचे उत्तर त्या श्‍वानाच्या हायब्रिड उत्पत्तीमध्ये सापडले!

नागपूरसह संपूर्ण भारतातच मोठ्या प्रमाणात कोणत्याही परवान्याशिवाय असे संकरित केलेले श्‍वान सर्रासपणे विकल्या जातात.एकेका श्‍वानाची किंमत ही २० ते २५ हजार रुपये असते.आलिशान बंगल्यात राहणारे धनदांडगे सहजपणे असे संकरित केलेले श्‍वान विकत घेत असतात.लहान असताना हे संकरित झालेेले लॅब्रोडोर,जर्मन शेफर्ड,रॉट व्हीलर,ग्रेट डेन,अस्लो इत्यादी पाश्‍चात्य देशातील संकरित श्‍वान फार गोड व निरागस वाटत असतात.त्यांच्यावर लाड ही खूप येतो मात्र मूळात त्यांच्यातील ‘गूणसूत्रे’ हे दोन वेगवेगळ्या श्‍वानातून आलेली असल्याने ते इतर भटक्या श्‍वानांपेक्षा फार वेगळे असतात.

५-७ महिन्यांचे होता होताच ते आपला खरा रंग दाखवण्यास सुरवात करतात.मूळ स्वीझरलॅण्ड व यूरोपमधील थंड कटिबंध प्रदेशातील ही श्‍वाने भारतासारख्या उष्ण कटिबंध प्रदेशात जगण्यासाठी नसतातच मुळी.तापमानापासून तर खानपानपर्यंत सगळंच अश्‍या संकरणातून उत्पन्न झालेल्या श्‍वानांना झेपत नाही.मात्र अनेक बंगल्यांची,फ्लॅटची शान म्हणून अश्‍या संकरित श्‍वांनाना सर्रास कोणत्याही परवान्याशिवाय पाळले जाते.

असे संकरित झालेले श्‍वान एका बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जन्माला आले नसतात.त्यांना त्यांच्या अस्त्विासाठी मोकळी जागा लागत असते मात्र त्यांना साखळीने सतत बांधून ठेवले जाते.अगदी मनसे प्रमुख राज ठाकरेंचा बंगला ही अश्‍या दोन हायब्रिड श्‍वांनाना रुचला नाही आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे हाताचे मांस नोचून खालले होते,यानंतर त्या श्‍वानांना ठार मारण्यात आले असल्याची चर्चा पुढे आली होती.

एक तर या श्‍वानांना मोठ्या प्रमाणात कच्चे मांस खाऊ घातले जाते त्यामुळे त्यांना रक्त-मांसाची चटक लागते.दुसरे त्यांना अनुशासन शिकविण्याच्या नादात त्यांना त्यांच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध अनेक घरात टॉर्चर ही केले जाते.याचा राग ते मनात धरुन बसतात.

व्हिडीयोमधील घटनेत हा लॅब्रोडोर दोन माणसे त्याला सातत्याने मारत असूनही, त्या लहानग्याची सोडवणूक करण्यासाठी झटत असताना दिसता,तरीही जो श्‍वान जुमानत नाही, ते बघता त्या श्‍वानाच्या मनात पराकोटीचा राग दडला होता,अशीही शक्यता वर्तवली जात आहे.त्या घरातील मालकाच्या मुलाने कदाचित त्याला पराकोटीचे टॉर्चर केले असेल.खोड्या काढल्या असतील,मारहाण केली असेल,त्यामुळेच त्याने त्या लहानग्याच्या अंगावर झेप घेतली आणि त्याचे मांस नोचून खालले,असे पशुप्रेमी आता सांगत आहेत.

श्‍वानांचा मेंदू हा खूप तल्लख असतो.त्यांच्या मेंदूतून सहसा कोणतीही गोष्ट जात नाही.अगदी छोट्यातील छोटा छळ ही ते विसरत नसतात.नुकतेच काटोल येथे एका पाच वर्षीय लहानग्याचे मांस असेच १० ते १५ भटक्या श्‍वानांनी नोचून खालले!ही घटनाही अनेकांना सुन्न करुन गेली होती.आपल्या दहा वर्षीय ताईच्या मागे-मागे फिरणा-या त्या चिमुकल्याचा काय दोष होता?त्याने तर त्या श्‍वानांचा कोणताच छळ केला नव्हता,तरीही त्याचे उमलते जीवन अश्‍या भयंकर पद्धतीने संपावे?या घटनेनंतर काही भटक्या श्‍वांनाना मारुन टाकण्यात आल्याची घटना घडली.

जगातली कोणतीही जन्मदात्री एका ठिपक्या एवढ्या बिजापासून मोठं करीत अपत्याला जन्म देत असते.९ महिने ९ दिवसांचा तो प्रवास तिच्यासाठी सुखद असतोच असे नाही.यानंतर बाळंतपणाच्या असहनीय वेदना ती साहते मात्र नवसृजनाच्या आनंदात आपल्या वेदना ती सहज विसरते.प्रत्येक क्षण ती त्या नवसृजनासाठी वेचते,जगते,आपल्या सुखांचा त्याग करीत त्याला घडवत असते.अश्‍यात तो बघता-बघता थोडा मोठा होतो.घरातले अंगण सोडून हट्टाने बाहेर गल्लीत जाऊन खेळण्याचा,सायकल चालवण्याचा हट्ट करतो.मात्र अलीकडच्या घटना बघता तिच्या जगण्यातील श्‍वासांवरच, श्‍वान नावाचे हिंस्त्र पशू, ज्याप्रकारे हल्ला करतात,त्यांना आयुष्यातून कायमचे उठवून नेतात ते बघता म्हणूनच प्रश्‍न पडतो,या जगात,या देशात,या शहरात जर एखाद्या जन्मदात्रीच्या चिमुकल्याला जगण्याचा मोकळा श्‍वास मिळत नसेल तर यात चूक कोणाची?श्‍वानांची कि माणूस नावाच्या लोभी आणि भ्रष्टाचारी हिंस्त्र पशूंची?

ज्या श्‍वानाने काटोलच्या त्या चिमुकल्यावर आक्रमकपणे हल्ला केला त्याला रेबिज होते.याशिवाय त्याच्या साथीला आलेले इतर १० ते १५ भटके श्‍वान यांनीही त्या चिमुरड्यावर सूड उगवला कारण त्यांच्या मेंदू माणसांच्या छळाचा सूड भरला असतो….!हे भटके श्‍वान माणसांच्याविरुद्ध ’झुंडी’ने एकी करतात…हीच त्यांची सायकॉलॉजी असते.

झोपडपट्टयांमध्ये अनेकदा लहान मुलेच भटक्या श्‍वानांना दगडे मारताना दिसतात.दंडूने मारतात,इजा पोहोचवतात,क्रूर वागणूक देतात,याचा राग त्यांच्या मेंदूत साठत असतो.माणूस तसेच लहान मुले हे त्यांना आपले शत्रू वाटू लागतात.त्यांना हे कळत नाही ज्यांनी आपल्याला त्रास दिला,छळ केला ते, हे नाहीत किवा हा तो लहानगा नाही….! माणूस दिसला कि त्याच्या मागे धावायचे,लहानगा दिसला की त्याचे लचके तोडायचे इतकंच त्यांना कळत असतं.

आधी माणूस त्यांच्याशी क्रूर वागतो यानंतर ते माणसांप्रति क्रूर होतात….! हे श्‍वान इतके क्रूर असतात की त्यांच्या भागात श्‍वानाचेच एखादे निरागस पिल्लू आले तरी त्याला सगळे मिळून फाडून खातात….!

व्हिडीयोमधील घटनेत हा लॅब्रोडोर त्या तरुणीलाही आवरत नव्हता याचे मूळ कारण त्याच्या संक्रमित उत्पत्तीमध्ये दडले आहे.अनेक संकरित श्‍वानांची उंची तर माणसांएवढी असते.त्यांची ताकद ही माणसांनाही पेलवत नाही.व्हिडीयोमध्ये देखील दोन दोन पुरुषांच्या ताकदीलाही तो लॅब्रोडोर जुमानत नसताना दिसतोय…!

प्रश्‍न हा पडतो अश्‍या संकरित श्‍वांनाची फक्त पैश्‍यांच्या लोभापायी, कोणत्याही परवान्या शिवाय जी सर्रास खरेदी-विक्री होते यावर सरकार आणि प्रशासनाचे काेणते वचक आहे?एका सर्वेक्षणानुसार लॉकडाऊनच्या काळात तर श्‍वानांची सर्वाधिक खरेदी-विक्री झाली .अनेकांनी आपल्या रिकामे होऊन घरी बसलेल्या मुलांच्या मनोरंजनासाठी श्‍वानांची खरेदी केली.अनेकांनी श्‍वान दत्तक घेतले.

नागपूरात लाखोच्या घरात श्‍वांनाची संख्या-
नागपूरात महानगरपालिकेच्या एका ‘सुज्ञ’ आरोग्य अधिका-याने २००९ साली एक लाखाच्या घरात श्‍वान असल्याची संख्या भर सभागृहात सांगितली होती.तेच सुज्ञ अधिकारी आज ही २०२२ मध्ये शहरात एक लाखाच्या जवळपास श्‍वानांची संख्या सांगतात!वर्षातून दोन वेळा ६-६,७-७ पिल्ले देणारी श्‍वानांची प्रजाती त्या सुज्ञ अधिका-यांच्या लेखी जणू ‘मानवाची‘प्रजाती आहे….!वर्षातून एक वेळा एकाच अपत्याला जन्म देणारी प्रजाती!

अनेकवेळा अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात हजारोच्या संख्येने बिंदासपणे वावरणा-या श्‍वांनाच्या संख्येविषयी सभागृहात ओरडही केली मात्र घनकचरा विभागाचे अधिकारी डॉ.महल्ले हे दरवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे बोट दाखवून वेळ मारुन नेतानाच आढळून आलेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्‍वांनाना पकडून त्यांची नसबंदी करुन त्याच भागात सोडणे गरजेचे आहे कारण शहराबाहेर किवा जंगलात श्‍वानांना पकडून सोडल्यास भूकेमुळे त्यांचा जीव ही जाऊ शकतो.सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामागे संवेदनशील दृष्टिकोण होता मात्र याच आदेशात शहरातील भटक्या श्‍वानांची ‘नसंबदीही’ अधोरेखित केली आहे त्याचे काय? नागपूर महानगरपालिका,मनपा आयुक्त व घनकचरा विभागाचे अधिकारी शहरातील नागरिकांच्या व लहानग्या चिमुकल्यांच्या जीवाप्रति किती गंभीर आहे?

आतापर्यंत राज्य सरकारकडून नागपूर मनपाला ५ कोटींचा,यानंतर साढे तीन कोटींचे व पुन्हा साढे चार कोटींचे अनुदान श्‍वानांच्या नसबंदीसाठी मिळाले.शहरातील किती श्‍वांनाची नसबंदी या अनुदानातून झाली?

शहरातील एका पशुप्रेमी स्वयंसेवी संस्थेने घनकचरा विभागाकडे याची माहिती घेण्यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला असता त्यांचा अर्जच विभागातून गायब झाला….!

गेल्या दहा वर्षांपासून मनपातर्फे श्‍वानांच्या नसबंदीसंबंधी जी समिती स्थापन करण्यात आली आहे त्यात इतक्या वर्षानंतरही कोणताही बदल झाला नाही.श्‍वानप्रेमी संस्थेच्या करिश्‍मा गिलानी,डॉ.पुंडलिक,अंजली वैदयार,गोरक्षण यांचीच समिती गेल्या एका दशकापासून मनपाच्या समितीत कार्यरत आहे!मूळात गोरक्षणची यात काय भूमिका आहे?‘ॲनिमल वेलफेअर’च्या नावाने कोणाकोणाचे,कसेकसे वेलफेअर(कल्याण) होत आहे?

गेल्या दहा वर्षात काय दिवे लावले या समितीने?नागपूर शहराच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात गेल्या दहा वर्षांपासून श्‍वांनाच्या झुंडशाहीच्या दहशतीत ,नागपूरचा प्रत्येक नागरिक वावरत आहे.त्यांचे चिमुकले घरात,अंगणात बंदिस्त झाले आहेत.मोकळेपणाने ते घराबाहेर या श्‍वानांच्या भितीने खेळू देखील शकत नाही.मुक्तपणे जगण्याचा त्यांचा अधिकार हिरावला गेला आहे.अनेकांच्या जीवावर हे श्‍वान उठले,अनेक चिमुकले जखमी झाले,अनेकांच्या वाहना मागे झुंडीने श्‍वान धावल्याने अपघातात जीव गेले मात्र मनपाच्या आयुक्तांसाठी,मनपा अधिका-यांसाठी या शहरातील नागरिकांच्या,त्यांच्या चिमुकल्यांच्या जीवाचे कोणतेही मोल नाही,हेच त्यांच्या कार्यकृतीतून सिद्ध होतं…..!

श्‍वानांच्या नसबंदीसाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून मिळणारे कोट्यावधीचे अनुदान नेमके गेले कुठे?किती श्‍वांनाची नसंबदी झाली?मनपाच्या मुख्यालयात व झोन कार्यालयांमध्ये खूर्च्या उबणा-या व गलेलठ्ठ पगार घेणा-या अधिका-यांना कळते तरी का नागरिकांच्या मनातील श्‍वानांप्रतिची दहशत?

२५ लाख लोकसंख्येपैकी किती नागरिकांनी श्‍वान पाळण्याचे परवाने घेतले आहेत?परवाना मिळवण्यासाठी नेमके कोणत्या विभागात कोणत्या टेबलवर नागरिकांनी जायचे असते?एक तरी टेबल असा आहे का जिथे परवाना मिळत आहे! श्‍वान पाळणा-या नागरिकांचे आधार कार्ड लिंक झाले आहेत का?शहरातील किती श्‍वान पाळणा-यांची रितसर नोंदणी झाली?मुख्यालयातून झोन कार्यालयात,कार्यालयातून विभागात,विभागातून टेबलवर हेलपाटे, नागरिकांना परवाना घेण्यासाठी खावे लागत आहे आणि नागपूरचे आयुक्त राधाकृष्णन.बी आणि घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ.महल्ले ५ कोटींचा नवा प्रकल्प नागपूरात आणत आहे ज्यात शहरातील मृत जनावरांचे अंत्यसंस्कार होतील!

५ वर्षात या प्रकल्पाची उभारणी हाेणार असून यासाठी लवकरच ऑपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा नवा प्रकल्प राबविण्यासाठी घुडग्याला बाशिंग बांधणारे मनपातील हे उच्च अधिकारी शहरातील नियमबाह्य पद्धतीने कोणत्याही परवान्याशिवाय संकरित श्‍वानांच्या खरेदी-विक्रीवर प्रतिबंध लावण्यासाठी,दंड आकारण्यासाठी मात्र कठोर पाऊले उचलताना दिसत नाही!

त्यामुळेच हिंस्त्र ही ‘श्‍वापदे’ नसून ‘माणूस‘ नावाचा पशू हा अतिलोभामुळे व भ्रष्टाचारामुळे नागपूर शहरातील नागरिकांच्या व लहानग्यांच्या जीवावर उठला आहे,असेच आता म्हणावे लागेल.

Latest बातम्या