
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १ ऑगस्ट: महानगरपालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी व करोना चमूचे समन्वयक डॉ.नरेंद्र बहीरवार यांचा वाहन चालक गुरुवार दि. ३० जुलै रोजी सायंकाळी करोना बाधित अाढळल्याचे सांगितले जात असताना डॉ.बहीरवार यांनी तरी देखील शुक्रवार दि.३१ जुलै रोजी मनपा मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत सहभाग नोंदवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे!
करोना बाधितांच्या जवळून संपर्कात येणा-या प्रत्येकाला १४ दिवस विलगीकरणात राहण्याचा नियम असताना प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्याच नाकाखाली हा नियम पाळला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.डॉ.बहीरवार यांच्या वाहन चालकाला करोनाचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट होताच बहीरवार यांनी स्वत:हून विलगीकरणात राहण्याच्या नियमाचे पालन करणे गरजेचे होते.
मात्र असे न करता ते शुक्रवारी देखील मनपा मुख्यालयात कामावर हजर होते,एवढेच नव्हे तर त्यांनी करोना संबधित बैठकीत सहभाग देखील नोंदवल्याची माहिती सुत्राने दिली.एकीकडे आयुक्त हे नागपूरकर जनतेसाठी वेगळा नियम व त्यांचे आरोग्य अधिकारी यांना वेगळा नियम कसे काय लागू करु शकतात?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
करोनासारख्या महामारीच्या काळात नागपूर शहराबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना राज्य शासनाने बहाल केले आहे मात्र हे तेच मंुढे आहेत ज्यांनी करोनाचा उद्रेग होऊ नये म्हणून कठोरतेने सतरंजीपुरा,मोमिनपुराच नव्हे तर संपूर्ण शहरच प्रतिबंधित क्ष्ेत्राने व्यापून टाकले.बाधिताच्या संपर्कातील केवळ कुटुंबियच नव्हे तर शेजारच्या गल्ल्लयांमधील शेकडो नागरिकांना कोणतीही चाचणी न करता विलगीकरण केंद्रात डांबले.
नागपूरकर नागरिकांनी देखील या विलगीकरणात अनेक त्रास भोगून आपले ’भोग ’संपवले व अद्यापही संपवित आहेत. मात्र मुंढेंना दोष नाही दिला. मात्र आता हेच मुंढे आपल्याच प्रशासकीय अधिका-यांना नियमात कशी सूट देत आहेत,याचे हे मूर्तीमंत उदाहरण म्हणता येईल.डॉ.बहीरवार यांचा वाहन चालक करोना बाधित आढळ्याने बहीरवार यांनी किमान दहा दिवस तरी घरातच विलगीकरणात राहणे आवश्यक असताना ते चक्क मुख्यालयात येतात काय,बैठकीत हजर राहतात काय,एवढेच नव्हे तर डॉ.बहीरवार यांच्या संपर्कात आलेले पाचव्या माळ्यावरील आरोग्य कर्मचारीही आता चांगलेच धस्तावले आहेत.
संपूर्ण नागपूरात करोनाचा जबरदस्त उद्रेग होत असताना आयुक्तांचे मुख्यालय हे देखील नवे ’हॉट स्पॉट’अश्याने होणार असे देखील दबक्या आवाजात आता बोलले जात होेते.नुकतेच कळमना मार्केटमधील १४ जण परवा करोना बाधित आढळले.तेथील एक दलाल याला मनपा आरोग्य कर्मचारी हे मेडीकलमध्ये भरती करण्यास घेऊन गेले असता तेथील तुटलेला बेड,फाटलेली गादी,उशी व अतिशय घाणेरडे शौचालय व न्हाणीघर बघून हा दलाल प्रचंड घाबरला.
’मी तिथे दहा दिवस उपचारासाठी राहीलो असतो ना तर नक्कीच मरुन गेलो असतो’असे त्याचे शब्द होते जे त्याने फोनवर मित्राला सांगितले. त्याने लक्ष् णे कमी असल्याकारणाने घरीच राहणे पसंद केले व ताबडतोब आपले घर गाठले. आता त्याचा परिसर हा सील करण्यात आला आहे. त्याला त्रास विचारला असता काही नाही फक्त उलटी होते असे त्यांनी सांगितले.आरोग्य कर्मचारी हे त्याला गेल्या दोन दिवसांपासून दररोज दोन गोळ्या देत आहेत व थोड्या थोड्या वेळाने तो गरम पाणी पीत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे आयुक्तांनी मनपाच्या पाचही रुग्णालयावर प्रचंड पैसा खर्च करुन तो कोविड रुग्णांसाठी अद्यावत केल्याच्या बाता मारल्या दूसरीकडे शहरातील सामान्य नागरिकांना आतापर्यंत मनपाच्या या पाच पैकी एकाही रुग्णालयाचा लाभ घेता आला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.कोविडच नव्हे तर इतर रोगासाठी देखील अद्याप रुग्ण या रुग्णालयात भरती नाहीत. मग कुठे गेला कोवडीच्या नावाने या सर्व रुग्णालयांवर खर्च केलेला एवढा पैसा?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
राधास्वामी सत्संग मंडळाच्या पाच हजार बेडचे कोविड केअर सेंटर हे देखील अद्याप ’हवेतच’ असल्याची टिका करण्यात येते.नागपूरात दररोज करोनाचा उद्रेग होत असताना आयुक्तांना केवळ सत्ताधा-यांसोबत कुरघोडीचे राजकारण करण्यातच रस असल्याचे आता उघडपणे बोलल्या जात आहे.
शिस्तप्रिय,कर्तव्यकठोर,प्रामाणिक व नियमांप्रमाणे कार्यभार करणारे मनपा आयुक्त आता आपल्याच नाकाखाली त्यांच्याच प्रशासकीय वैद्यकिय अधिका-यांकडून होणा-या नियमांच्या पायमल्लीवर आता कोणती उपाययोजना योजितात,याकडे आता मनपा कर्मचा-यांच्यासह संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष् लागले आहे.

आमचे चॅनल subscribe करा